मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
प्रमाण मीमांसा

वेदांत काव्यलहरी - प्रमाण मीमांसा

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


वस्तू सिद्ध कराया, मानावें लागती प्रमाण बहू ॥
परि स्थूल विचारेंहि, मानावे लागती प्रमाण चहू ॥१॥
ढोबळ चार प्रमाणे; शाब्दिक, प्रत्यक्ष, आणि अनुमान ॥
ऐसीं तीन प्रमणे, त्यापरि चवथे प्रमाण उपमान ॥२॥
परि चार्वाकास असे संम्मत एकचि प्रमाण “प्रत्यक्ष”; ॥
व्यवहारांत परंतू आणिकहि मानण्यांत तो दक्ष ॥३॥
मार्गांत एक रुपया पडला, वृश्चिक तिथेंच शेजारीं ॥
पाहुनि रुपया उचली, टाळी विंचूस भिउनिया भारी ॥४॥
ऐशी क्रिया कशानें ? रुपया कां ग्राह्य, त्याज्य वृश्चिक तो ॥
रुपाय उपयोगा ये, वृश्चिक करि दंश आणि रडवी तो ॥५॥
हें ठरविले कशाने, पाहुनि नुसत्याच काय डोळ्यानें ॥
हा रुपया ! हा विंचू ! दावावें हेंच ते नयन जाणे ॥६॥
इष्टानिष्ट ठरविणें डोळ्याचें कार्यक्षेत्रची नाहीं ॥
पूर्वानुभवावरुनि, बुद्धीचें कार्य हें उघड पाही ॥७॥
चार्वाक असो कोणी, बुद्धीवांचून त्यास हें न कळे ॥
अनुमान मानणेची भाग, परी करि वितंडवाद बळें ॥८॥
प्रत्यक्ष पूर्व अनुभव, अनुमानाला जरूर जरि म्हणशी ॥
तरि हा आक्षेप तुझा नाहिं खरा, ग्राह्म नाहिं सर्वांशीं ॥९॥
परगांवी “बाप तुझा मेला”, ऐकोनि शब्द रडतोसी ॥
बापाच्या मृत्यूचा, अनुभव पूर्वी कधीं असे तुजसी ॥१०॥
मार्गांतुनि जातांना, वीणास्वर ऐकशी घरांतून ॥
प्रत्यक्ष तोहि नसता, स्वरओळख होय तुज मनांतून ॥११॥
वीणा प्रत्यक्ष तुंवा पूर्वी पाहोनि सूर ऐकून ॥
मंजुळ, तत्‌साद्दश्यें म्हणशी स्वर तोचि, हेच उपमान ॥१२॥
जिव्हेनेंच म्हणावें “जिव्हा नाहीं मला” तशाच परी ॥
“नाहीं प्रमाण शब्दा, “म्हणशी शब्देंच हें नवल भारी ॥१३॥
अंत:करणांत स्फुरे प्रथम परा, तेथुनी पुढिल वाणी ॥
आत्मा राहुनि मागे, अंत:करणांस चेतवी स्फुरणीं ॥१४॥
डोळा प्रमाण मानी, परि डोळा काय तेंहि समजेना ॥
डोळ्यामागें इंद्रिय, मन, बुद्धी, अंत:करण तें जाणा ॥१५॥
सर्वांस मूळ कारण आत्मा, बुद्धयादिका अधिष्ठान ॥
ऐसी परंपरा ही, त्याविण कोठील वस्तुलें ज्ञान ॥१६॥
इंद्रिय म्हणजे शक्ती डोळ्याची, कान, नाक, रसनेची ॥
आणि त्वचेचि शक्ती, त्याविण सर्वांस चेतना कैची ॥१७॥
डोळा असुनि दिसेना, असुनी दो कान शब्द नायकती ॥
नाक असोनी ये ना वास, रुचीनाश असुनि जिव्हां ती ॥१८॥
मुदुशीतल जाणेना, असुनि त्वचा सर्व जेथल्या तेथें ॥
म्हणुनी डोळाच नसे कर्णादिक, कां म्हणावया येतें ॥१९॥
रोगानें अथवा अपघातानें, अन्यही उपाधीनें ॥
प्रतिबंध इंद्रियाच्या शक्तीला होतसे समज तेणें ॥२०॥
इंद्रिय शक्ती न दिसे, तरि आहे ठाम, हेच “अनुमान” ॥
न दिसे म्हणुनी नाहीं; मूर्खाविण बोलतो दुजा कोण ॥२१॥
म्हणशिल “प्रत्यक्षासी दोष तसे शब्द आणि अनुमान ॥
उपमान  हेहि असती दोषानें युक्त”; दे तरी कान ॥२२॥
सर्वचि प्रमाण नसती शब्द, तसे जाण सर्व अनुमान ॥
उपमानही तसे ते, सर्वचि नसती प्रमाण हें जाण ॥२३॥
रोशिमकाठी-धोतरजोडा लग्नास मागवी जनक ॥
रोशिम, काठी, धोतर, जोडा नेईल पुत्र तो मूर्ख ॥२४॥
लिहिणार वाचणारा कोण असे मूर्ख सांग यांतून ॥
बाळ्याच मूर्ख ठरतो, अपुरे भलतेच शब्द वाचून ॥२५॥
धूम्र असे तेथेची अग्नी, अनुमान तें यथार्थ असे ॥
पाहुनि ढगास, अग्नीं अनुमानिल; लागले तयास पिसे ॥२६॥
दोष प्रमात्याचा, तो नाहीं प्रमाणांत हाच सुविचार ॥
भलल्याचे मानुं नको, शब्दादिक तूं प्रमाण हे चार ॥२७॥
पोट दुखे कुणि म्हणतां, त्याच्या शब्दावरीच विश्वास ॥
स्वार्थी किंचिज्ञ अशा मनुजावरि तूं विसंबतो खास ॥२८॥
सर्वज्ञ हेतुनिरहित मानवकल्याण ध्येय हें ज्याचें ॥
आप्ताचें वाक्य असे, काका मामादि आप्त हे कैचे ? ॥२९॥
वेदचि एक असे आप्त तुझा, मानि वेदप्रामाण्य ॥
आफत सब कुछ जानो, वेदावांचून जें असे अन्य ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 17, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP