TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

चुडालाख्यान सार - पद १०१ ते १५०

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


कवी - हंसराज स्वामी
धि:कारोनि नृपातें कुंभक वदला ‘तुला गमे त्याग’ ॥
त्यागुनि राज्य, वनां तूं धरिलें, तरि काय टाकिले भोग ? ॥१०१॥
स्वजन तिथें, पशु येथें, रंजविण्या चित्त फरक काय पडे ? ॥
वाडा तिथें, इथें ही गुंफा, छाया समान दोहिंकडे ॥१०२॥
शय्या तिथें, तृणासन येथें, दोहींकडे असे झोंप ॥
दिव्यान्न तिथें, येथें कंदफलें, एक तृप्तीचें माप ॥१०३॥
सेवकगण तव तेथें, इंद्रियगण येथही करी सेवा ॥
राज्याचें कर्म तिथें, येथें तपकर्म, त्याग हा बरवा ! ॥१०४॥
मुगुट तिथें डोक्यावर, येथेंही वाहशी जटाभार ॥
उंची वस्त्र तिथे, ही कौपिन येथेंहि कां नव्हत चार ? ॥१०५॥
काष्टाची पात्रें, ही मृगचर्में, भोपळा, तशा माळा ॥
भस्माचें गोळे, ही परडी पुष्पार्थ करिसि तूं गोळा ॥१०६॥
फलमूल कंद संग्रह येथेंही जमवुनी बहू केर ॥
म्हणशी प्रपंच त्यजिला, येथेही थाटलास संसार ॥१०७॥
उपहास असा परिसुनि त्यागाचा आसनावरुनि उठला ॥
शतचूर्ण भोपळा करि, राजा तोडीत निजकरें माला ॥१०८॥
विभुती आणि कडासन फेंकी बहु दूर पादुका नृपती ॥
कटिबंदासह कौपिन तोडी यज्ञोपवीत मंदमती ॥१०९॥
तशि काष्ठाचीं पात्रें, अग्नीकुंडात टाकिता झाला ॥
ऐसा त्याग करुनिया, सोडुनि गुंफेस दूर तो गेला ॥११०॥
कुंभक करी विचारा, हेकड दिसतो पिसाट हा राजा ॥
सन्निध जाउनि वदला, त्याग असा येइ कोणत्या काजा ॥१११॥
कौपिन माळेनें तुज केलें रें काय, त्या तुला खाती ? ॥
किंवा टाकुनि दिधलें, म्हणुनी त्या काय तुजवरी रुसती ॥११२॥
अपुलीं फळें न खाशी, म्हणुनी घें घें फलें वदुनि झाड ॥
पाया पडेल तुझिया; त्यागाचें हें असें कसें वेड ॥११३॥
त्यागायाची वस्तू ठेवुनि तैसीच, बाह्म हा त्याग ॥
शाखे जसें खुडावें रक्षुनिया मूळ, हाच भवरोग ॥११४॥
करुनी विवेक वागे, ऐसा त्यागांत लाभ तो काय ? ॥
बाधक जें, त्याचाची त्याग करी, संग ज्यामुळें जाय ॥११५॥
परिसुनि कुंभक वचना, राजा तो मनि विचार करि ऐसा ॥
आतां एकच उरला देह, तया चढवितो बघा फांसा ॥११६॥
पारंब्या झाडाच्या कंठीं घालोनि फांस आंवळिला ॥
धांवुनि कुंभक तोडी फांस, म्हणे वेड लागलें तुजला ॥११७॥
भोजन तेची भक्ती, पाखांडयाची असे मरण मुक्ती ॥
कैसें सुख भोगावें मोक्षाचें, देह टाकिल्यावरती ॥११८॥
वेणू फोडूनि बघणें सुंदर कैसा असे मधुर नाद ॥
तैसे टाकुनि देहा, कोठुनि तुज प्राप्त मोक्ष आनंद ॥११९॥
नरदेह बहू पुण्यें लाभे, तेथें न आत्मज्ञान जरी ॥
देता प्राण, कसारे भोग टळे जन्ममरण कल्पवरी ॥१२०॥
देहाचा त्याग नसे त्याग खरा, संग कोणता जडला ॥
त्याचा विचार करुनी त्याग करी, मोक्षसौख्य तेंच तुला ॥१२१॥
यापरि वदुनी कुंभक स्नान तयें घातलें, नृपा दिधलें ॥
यज्ञोपवीत कौपिन आसन आदी करूनिया सगळें ॥१२२॥
जपसंध्यादिक करुनी, फलमूलें भक्षिती उभयतांही ॥
भूप वदे मग स्वामी सांगा मज संग कोणता तोही ॥१२३॥
मी मंदमती मजला, न कळे हो संग कोणता जडला ॥
गुरुराज कृपा करणें म्हणुनी तो भूप तत्पदीं पडला ॥१२४॥
त्याग अहंकाराचा, स्त्रीपुत्रांचा करुन तो व्यर्थ ॥
ते तरि भिन्न तुझ्यांहुन, त्याग तयांचा नसेच कीं सार्थ ॥१२५॥
देहाचे आश्रम वा धर्म तसें कर्म वर्ण त्यागांत ॥
कठिण तरि काय असे, देहहि सहजीच टाकितां येत ॥१२६॥
स्थूलासी “मी” म्हणशी तें सांडी त्याग मग नको दुसरा ॥
सूक्ष्माची गांठ नृपा सोडी, जाणोनि “मी”से, त्याग खरा ॥१२७॥
कारण-मूळ खणोनि सांडी, त्रिपुटींत द्वैत तें सांडी ॥
जगताचा सत्यपणा, स्फूर्ती जाणीव मीपणा सांडी ॥१२८॥
मीपण कैसें सांडूं, देह तिथें मीपणा सहज येई ॥
व्यवहार सर्व चाले मी मी म्हणुनीच या जगीं पाही ॥१२९॥
‘मी’ न मुखानें वदलो, ‘मी’ ऐसी अंतरांतये स्फूर्ती ॥
जाणोनि कसे ‘मी’ ला टाकावें मज कळे न गुरुमूर्ती ॥१३०॥
जागृत असतां अथवा स्वप्नीं सुखदु:ख भोगणें न चुके ॥
झोंपेत मात्र केवळ सुखचि मिळे, मीपणास येथ मुके ॥१३१॥
जरि मीपण मम जावें, झोंप सदा मज मिळे करा ऐसें ॥
व्यवहारास पुन्हा नच यावें, त्यावीण ‘मी’ स सांडुं कसें ॥१३२॥
कुंभक म्हणे “शिखिध्वज मरणांतींही गळे न अभिमान” ॥
अभिमानें जनन पुन्हां, सूप्तीमाजीं तसेंच तूं जाण ॥१३३॥
सुखरूप, परी नाहीं ओळखिलें म्हणुनि नाम ये सूप्ती ॥
यास्तव जाणुनि सगळें प्रथम, करी त्याग मागुती नृपती ॥१३४॥
दोनचि पदार्थ असती, मिथ्या जग, सत्यब्रह्म तें दुसरें ॥
चिन्मात्र ज्ञानद्रष्टा, द्दश्यजगत दोन यापरी बा रे ॥१३५॥
सुखदु:खाचा साक्षी सुखदु:खातीत एक सुखरूप ॥
शाश्चत सत्य, जयाला तीन्ही काळांत नाश-नच भूप ॥१३६॥
सत्याचें रूप असें, आतां मिथ्या स्वरूप जी माया ॥
उपजे, राही थोडा काल, तिचा भास जातसे विलया ॥१३७॥
जगदुत्पत्ति स्थिति लय सांगे रायास जीव शिव कैसे ॥
आकाशीं वायु जसा, स्वरुपीं ‘मी ब्रह्म’ स्फुरण हें तैसें ॥१३८॥
स्फूर्तीविण पुरुषोत्तम, विसर तया हेंच जाण अज्ञान ॥
चंचल स्फूर्ती प्रकृती. स्फुर्तींतिल ज्ञान तो पुरुष जाण ॥१३९॥
अज्ञान ही अविद्या, चंचल जाणीव तीच विद्या रे ॥
विद्येंत बिबला तो ईश, अविध्येंत जीव तो बारे ॥१४०॥
ईश्वर सर्वंज्ञ, परी दिसतो र्किचिज्ञ्ज्ञ जीव, हा फरक ॥
भिन्न उपाधी कारण याला, स्वरुपें परी उभय एक ॥१४१॥
ज्ञान, क्रिया, द्रव्यात्मक शक्ती सत्वांत रज तमीं असती ॥
अंशें तमोगुणाच्या पंच-महाभूत-जन्म ये जगतीं ॥१४२॥
या पंचमहाभूतीं त्रिगुणांचा मेळ अष्टधा प्रकृती ॥
पंचीकरण इथोनी सारे ब्रम्हांड पिंड उद्भवती ॥१४३॥
रज्जूवरि सर्प जसा भासे, जगभास ही स्थिती राया ॥
अज्ञान ज्ञान नाशें जीवशिवानाश, जाइ जगत लया ॥१४४॥
“मी ब्रह्म” स्फुरण हाची पहिला अभिमान घे विविध वेष ॥
“मी ईश”, “जीव मी” या अभिमानें पात्र जन्ममरणास ॥१४५॥
स्वप्नांमाजिल भासा, सूप्तींमाजील गाढ अज्ञाना ॥
अभिमान हाच म्हणतो जागृत स्थूलास “मी” असें जाणा ॥१४६॥
उठलें, दिसलें, गेलें जितुकें या मीपणावरी जगत ॥
तितुकें, सारें मिथ्या, मिथ्याधिष्ठान ब्रह्म एक सत ॥१४७॥
म्हणशिल जग लय होतां, ब्रह्मीं होइल सर्व जग लीन ॥
जीवास सहज मुक्ती, मानुं नको सहज जाइ अज्ञान ॥१४८॥
रज्जू सर्प न दिसला गाढामीं, लीन तो जरी झाला ॥
भीतीचा नाश नसें, दीपानें जो न रज्जु ओळखिला ॥१४९॥
मिथ्या जगत तसे हें, जोवरि ज्ञानें तया न ओळखिलें ॥
“जगमिथ्या” म्हणणेंची मिथ्या, हें पाहिजे तुला कळलें ॥१५०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-16T10:18:00.7300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

registry

  • स्त्री. निबंधनी 
  • स्त्री. Admin. नोंदणी शाखा 
RANDOM WORD

Did you know?

देवक म्हणजे काय ? त्याचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.