चुडालाख्यान सार - पद ५१ ते १००

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


मागे कुबेर ऋण कीं, करणें तैसेंच योग अभ्यास ॥
भोजनतृप्तीनंतर पाक जसे, तेवि योग सायास, ॥५१॥
सूर्योदय झाल्यावर, दिवटया जैं लावणें तशाच परी ॥
योगाभ्यास गमे मज, रज्जू वळखोन धांवुनी मारी ॥५२॥
शिपीचें रजत कळुनि वेचावें, तेवि योगसायास. ॥५३॥
हे सर्व मला कळतें, परि सिद्धीवांचुनी कशी राया ॥
शोधूं, तयास बोधंधू सिद्धीविण भूप जातसे वांया. ॥५४॥
लोकोपकार करण्यासाठीं, बहु निद्यकर्म थोरांनीं -- ॥
आचरिलें. पतिसाठीं शिरतें मी म्हणुनि योग अडरानीं” ॥५५॥
यापरि विचार करुनी, हठयोग्या एक शरण ती गेली ॥
हठयोग सिद्ध केला, अपुल्या राज्यांत परतुनी आली, ॥५६॥
अंतर्गृहांत गेली, दरवाजे बंद करुनिया बसली ॥
नाना प्रयोग केले सिद्धीचे, खातरी तिची झाली ॥५७॥
आज्ञा करी प्रधाना, बंदी येण्यास येथ कोणासी ॥५८॥
अंतर्गृहांत शिरली, दरवाजे लावुनी पुन्हा बसली ॥
अंतर्ध्यानें शोधित रायासी तीन लोक ती फिरली. ॥५९॥
शोध न लागे त्याचा, तिज वाटे “काय राजया झालें ? ॥
झाली विदेह मुक्ती ? एक परीनें बरेंच तें झालें. ॥६०॥
ऐसा कोण मिळाला सद्नुरु, ज्यानें विदेह मुक्तीतें ॥
रायास दिलें, झालें कार्यचि माझें” करीत तर्कातें ॥६१॥
“परि निश्रयें कळे जरि मातें होईल फार आनंद ॥
कोण मला शुभवार्ता कळविल, ‘रायास प्राप्त स्वानंद” ॥६२॥
ऐसे तर्कवितर्का करितां, राजा पडे तिच्या द्दष्टी ॥
सहजीं, दरींत गुंफा तेथें तो देखिला बहू कष्टी ॥६३॥
आनंदली मनीं, मग गुप्तपणें ये दरीजवळ राणी ॥
ऐसीच जरी भेटू, कैसा विश्वास धरिल भूप मनीं ? ॥६४॥
“पुरुषाचें रूप धरुनि बोधावें राजया” गमे तिजला ॥
परि पूर्णपणें कष्टूं द्यावें तपसाधनांत रायाला ॥६५॥
“कष्टाशिवाय नाहीं ब्रम्हप्राप्ती” असा अभिनिवेश ॥
याचा, भाव जिरे तो, करिना कां अधिक कष्ट सायास ॥६६॥
उष्णें भूमी तपतां, वृष्टीनें बीज लवकरी उगवे ॥
जप तप कर्में झाल्या मनशुद्धी, बोध लौकरी पावे. ॥६७॥
आली पुन्हा घरीं ती राणी राजास तेथ सोडून ॥
राज्य करी त्रय वर्षें, सकल प्रजा फार तुष्ट ठेवून, ॥६८॥
राज्ञीस आठवे मग भूप, तिला वाटलें तिथें जावें ॥
मध्यंतरी वनीं तो राजा अनुतापपूर्ण पस्तावे. ॥६९॥
“मी राज्ससंपदेचा त्याग करुनि या बनीं सुखासाठीं ॥
आलों परी मिळेना सौख्य, उलट दु:ख लागलें पाठीं ॥७०॥
हातींचें सुख सोडुनि स्वर्ग सुखासाठि ते किती झटती ॥
करिती उधार धंदा रोकड दवडोन मूर्ख मंदमती. ॥७१॥
कुणि देखिलें सुखासी स्वर्गांच्या, जें मिळेल मरणांतीं ॥
सरतां तेथिल पुण्यें पुनरगमन येथ शास्त्र हें वदती ॥७२॥
स्वर्गांत तरी ! दुसरें काय असे ? अप्सरा अमृतपान ॥
धांगडधिंगा येथिल वेश्या मदिरा तसेंच तें जाण ॥७३॥
मोठयांच्या कर्माला मोठें जरि नांव मासला एक ॥
कां स्वर्गसुखालागी व्यर्थचि येथील कष्टती लोक ॥७४॥
एकाचें पाहुनिया दुसरा वर्ते तसाच. अविचारी ! ॥
विरळा कुणी विचारी, शाश्चत स्वानंद सौख्य-अधिकारी ॥७५॥
माझी प्रिया चुडाला सांगत होती मला न तें पटलें ॥
सद्रुरु घरांत असतां, मुर्ख्रें म्या तीस दूर लोटियलें ॥७६॥
येथें सौख्य न वाटे; जाउं घरीं ? तोंड नाहि जायाला ॥
घरचा न दारचा मी झालों भूभार काळ खायाला ॥७७॥
सद्नुरुवाचुन कैचें ज्ञान समाधान आतुडे आतां ॥
मज दीनावरि करणें गुरुरावो सत्वरी कृपा ताता ॥७८॥
जपतपसंध्या न रुचे शयन अशन चातकापरी झाला ॥
उत्कंठ, ‘कधीं भेटे सद्नुरु तारील हो कधीं मजला’ ॥७९॥
तळमळ ऐसी असतां शिष्य मनीं, सद्नुरू नसे दूर ॥
प्रगटे तेथ चुडाला, पुरुषाचा वेष घेऊनी रुचिर ॥८०॥
तें दिव्य रूप पाहुनि, राजा आनंदला मनीं भारी ॥
हांकेसरसीं आला सद्नुरु धांवोनि दीनकैवारी ॥८१॥
आलिंगिला शिखिध्वज राणीनें क्षेमही तया पुसिलें ॥
रायें दिलें तृणासन, त्या पुरुषा आदरें बहू पुजिलें ॥८२॥
उदयास भाग्य माझें आलें स्वामी तुम्हीं इथें आला ॥
आपण कोठिल ? अपुलें नाम असे काय ? सांगणें मजला ॥८३॥
नारदपुत्र असें मी, कुंभक मम नाम राजया आहे ॥
सर्वत्र गमन माझें, जनउद्धारार्थ हिंडतों पाहे ॥८४॥
राजा म्हणे अतां नच सोडिन मी चरण आपुलें स्वामी ॥
कुंभक म्हणे तथास्तू राहूं राजा तुझ्याजवळ आम्ही ॥८५॥
तीव्र मुमुक्षा ज्याची, ज्ञान समाधान त्या दिल्यावीण ॥
आम्हीं कुठें न जाऊं, ही संतांची खरी समज खूण ॥८६॥
आम्हीं भूतभविष्या जाणों तव वर्तमानही सगळें ॥
मुंगीचें अंतरही नाणों सर्वांस ज्ञानसिद्धिबळें ॥८७॥
सत्संग तुम्हां होता सदनीं, टाकोनि कां वना आला ॥
धन्य चुडाला ! ज्ञानी अर्धांगी सोडुनी असे श्रमलां ॥८८॥
सांग खरें कीं खोटें, लाथाडुनि पत्नि कामधेनूतें ॥
आलास वनीं, राजा काय तुला सौख्य सांग झालें तें ॥८९॥
राजा म्हणे बरोबर ओळखिलें हो त्रिकालज्ञान तुम्हां ॥
धि:कारुनी चुडाला, आलों मी व्यर्थ विजन वनधामा ॥९०॥
झालें तें होउनिया गेलें, गुरुमाउली परी आली ॥
कष्ट न गेले वांया, त्याचमुळें भेट आपुली झाली ॥९१॥
कुंभक संतोषोनी वदला तूं धन्य, जपतपा केलें ॥
निष्कामचित्त होउनि, त्याचमुळें चित्तशुद्ध तव झालें ॥९२॥
ज्ञानावांचुनि सगळा शीण असे, याच साधनें कळलें ॥
साधन यास्तव फळलें, चित्त तुझें सद्रुरूकडे वळलें ॥९३॥
यास्तव धांवुनि आलो, प्रेम तुझें पाहुनी गुरुचरणीं ॥
आवड कर्मांत तुझी असती तरि, भेटता न गुरु धरणीं ॥९४॥
राजा करी विनंती, सुख कैसें प्राप्त होइ भवनाश ॥
सांगा उपाय स्वामी, पुरवावी ही मनांतली आस ॥९५॥
कर्में सुख नच लाभे, त्यागाविण मोक्षलाभ कैं जोडे ॥
“पुत्राच्या प्राप्तीनें मोक्ष घडे,” सांगणार ते वेडे ॥९६॥
चित्तांत त्याग नाहीं, व्यर्थचि अनुकूलता सकल कांहीं ॥
त्याग नसे दु:ख तिथें, त्याग करी म्हणुनि उत्तमू पाही ॥९७॥
आतां त्याग कशाचा, भूप वदे त्यागिलें सकल कांहीं ॥
धनसंपदा स्वजनही त्यागुनिया, पातलों वनीं पाही ॥९८॥
दिव्यान्नें टाकुनिया, खातों फलमूल त्याग नच काय ॥
त्यजुनी वस्त्राभरणें, रक्षा कौपीन मी न धरि काय ॥९९॥
उत्तम शय्या टाकुनि, निजतों तृणआतसनावरी हाय ! ॥
झालों पूर्ण अकिंचन, गुरुराया त्याग तो दुजा काय ? ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP