मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत हे बंध रेशमाचे

संगीत हे बंध रेशमाचे

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(६-५-१९६८). संगीत : जितेंद्र अभिषेकी


छेडियल्या तारा । ते गीत येइना जुळून
फुलते ना फूल तोच । जाय पाकळी गळून ॥धृ०॥
आकारून येत काही । विरते निमिषांत तेहि
स्वप्न चित्र पुसुनी जाय । रंग रंग ओघळून ॥
क्षितिजाच्या पार दूर । मृगजळास येइ पूर
लसलसते अंकुर हे । येथ चालले जळून ॥


आज सुगंध आला लहरत
येइ उपवनि माधवी
मी तेवि धुंद ।
मधुमासातील सूर नवे तैसा
हा वाटे आनंद माझा


विकल मन आज झुरत असहाय
नाहि मज चैन क्षण क्षण झुरति नयन
कोणा सांगू ?
ही चांदरात नीज नच त्यात
विरह सखि मी कुठवर साहू ?


का धरिला परदेश ?
सजणा का धरला परदेश ?
श्रावण वैरी बरसे झिरमिर, चैन पडेना जीवा क्षणभर
राहू कोठे ? राहू कैसी ? घेऊ जोगिन वेष ?
रंग न उरला गाली ओठी, भरती आसू काजळ काठी
शृंगाराचा साज उतरला मुक्त विखुरले केश !


काटा रुते कुणाला     आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे         हा दैवयोग आहे ।

सांगू कशी कुणाला     कळ आतल्या जिवाची
चिरदाह वेदनेचा         मज शाप हाच आहे ।

काही करू पाहतो         रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही         विपरीत होत आहे ।

हा स्नेह वंचना की     काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी     मी रिक्त हस्त आहे ।


पंथ, जात, धर्म किंवा     नातेहि ज्या न ठावे
ते जाणतात एक         प्रेमास प्रेम द्यावे

ह्र्दयात जागणार्‍या     अतिगूढ संभ्रमाचे
तुटतील ना कधीही     हे बंध रेशमाचे ।

विसरुनी जाय तेव्हा     माणूस माणसाला
जाळीत ये जगाला     विक्राळ एक ज्वाला

पुसतात डाग तेही         धर्मांध आक्रमाचे
सुटतील ना कधीही     हे बंध रेशमाचे ।

हे बंध रेशमाचे         ठेवीं जपून जीवा
धागा अतूट हाची        प्राणात गुंतवावा

बळ हेच दुर्बळांना         देतो पराक्रमाचे
तुटतील ना कधीहि     हे बंध रेशमाचे ।


संगीत सर सुरस मम जीवनाधार
सूर, ताल, लय, धून
नटला विविध रंगी स्वररूप ओंकार !
आनंद घन असा बरसे नभातून
हा वेद श्रुतिसमान सुखसार !
संगीत रस सुरस मम जीवनाधार !


दैव किती अविचारी !
ऊधो ! जीवनगति ही न्यारी ॥धृ०॥

शुभ्र वर्ण बगळ्यास दिला तू
कोकिळ तनु अंधारी     धृ

कृष्ण लोचन सुंदर हरिणे
वनि वनि भ्रमति बिचारी ! ॥

मूर्ख भोगितो राजवैभवा
पंडित फिरत भिकारी

सूरदास विनवितो प्रभूला
क्षण क्षण हो जडभारी ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP