मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत प्रीतिसंगम

संगीत प्रीतिसंगम

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(३-१-१९७१) संगीत : वसंत देसाई


घेई घेई माझे वाचे गोड नाम विठठलाचे !
तुम्ही घ्या रे डोळेसुख पहा विठोबाचे मुख !
तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण !
मना, तेथे धांव घेई राहे विठ्ठलाचे पायीं !
तुका म्हणे जीवा नको सोडूं या केशवा !


जीवनांत माझ्या विठु हा देव लाडका,
जीवनांत एकच विठ्ठल सखूचा सखा
मायबाप विठ्ठल माझा बहिणबंधु विठ्ठल माझा
प्रीतिचा विसावा विठ्ठल सोयरा सखा ! ॥१॥
प्राण एक विठ्ठल माझा घ्यास एक विठ्ठल माझा
किती विठ्ठलाला माझ्या मारू मी हांका ॥२॥


काय सांगो आता संतांचे उपकार ?
मज निरंतर जागवितो ! ॥१॥
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ?
ठेविता हा पायी जीव थोडा ! ॥२॥
सहज बोलणें हित उपदेश,
करून सायास शिकवितो ! ॥३॥
‘तुका’ म्हणे वत्स
धेनुवेच्या चित्तीं, तैसे मज येतो सांभाळित ! ॥४॥


किती पांडुरंगा वाहूं, संसाराचा भार ?
लक्ष चौर्‍याऐशीची नको आता येरझार
लोखंडाचे गुणदोष, बघे का परिस ?
लेंकराची कासावीस, माहीत आईस ।
पाण्यामाजी तूंच देवा, तारिले पाषाण
ब्रीद तुझें दिननाथा, पतितपावना, !॥
कठीण हो मायापाश, सुटेना कोणास,
कपाळीचा टळेनाही; कोणा वनवास ॥
अनाथांचा नाथ, तुला बोलतात संत
काकुळती आलों आतां नको बघू अंत !
कोठे गुंतलासी देवा, कोणाला ताराया ?
पंढरीच्या राया, तुझ्या दंडवत पाया !


आमुची मिरास पंढरी । आमुचें घर भीमातीरीं ॥१॥
पांडुरंग आमुचा पिता । रखुमाई आमुची माता ॥२॥
भाऊ पुंडलीक मुनी । चंद्रभागा आमुची बहिणी ॥३॥
‘तुका’ जुनाट मिरासी । ठाव दिला पायांपाशी ॥४॥


छुमछुम चालत, रुमझुम नाचत, जर्गत विठुंचे नाम !
चल पंढरिला, सखु, बंधु तो भक्ताचा विश्राम ॥धृ०॥
धन्य भीवराकांठा, असे ती वैकुंठाची वाट !
आषाढी कार्तिकीस भरतो कैवल्याचा हाट !
चल पंढरीला सखू, तिथें तें लुटावया हरिनाम ! ॥१॥
पंढरिला जो जाई त्याला पुन्हां जन्म नाहीं !
पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म येई !
चल पंढरिला सखू, चल पंढरिला सखू,
बघूं तें दीनांचे निजधाम ॥२॥
छुमछुम चालत, रुमछुम नाचत गर्जत विठुचें नाम !


गोपाळकृष्ण । राधाकृष्ण
वणवाहि ग्रासिला । गोवर्धन उचलीला
अबबबबब ! गोपाळकृष्ण ! आपटले गजासी ।
मल्लयुद्ध खेळसी । हुतु तु-तु-तु-तू !


आम्ही बिघडलों । तुम्ही बिघडा ना !
चंदनाच्या संगें । बोरी बिघडल्या
बोरी बिघडल्या । चंदनमय झाल्या ॥१॥
सागराच्या संगे । सरिता बिघडल्या
सरिता बिघडल्या । सागरमय झाल्या ॥२॥
परिसाच्या संगें । लोह बिघडलें
लोह बिघडलें । परिसमय झालें ॥३॥
गोपाळाच्या संगें । गोपी बिघडल्या
गोपी बिघडल्या । गोपालमय झाल्या ॥४॥
एका जनार्दनी । विश्व बिघडलें
विश्व बिघडलें । जनार्दन झालें ॥५॥


धांव पंढरीच्या राया, सख्या, सखूच्या सखया
प्राण उडूं पाहे आतां अगा रखुमाईकांता,
किती मांडूं मी आकांत ? सुकला पांडुरंगा कंठ !
कांहीं नुरलें अंगीं त्राण, अवघा व्याकुळलला प्राण !
नको आतां दवडूं वेळ सखू झाली उतावीळ

१०
तूं सुंदर चाफेकळी । धमक ग पिवळी
किती कांति तुझी कोवळी !
तूं नंदनवनिंची चुकुन अप्सरा,
आलिस या भूतळीं ॥धृ०॥
हे ओठ लाल पोवळीं । त्यांत घातलीं,
जाईच्या फुलांची कुशी शुभ्र रांगोळी !
पुनवेचि रात्र हासते जशी आभाळीं ॥१॥
हनुवटी छान चिंचोळी । गालांत लाजरी खळी,
डोळ्यांत जादु काजळी ।
जिव झुरे पाहुनी जशी जळीं मासोळी ! ॥२॥
पोटर्‍या मऊ कर्दळी । कमरेंत लचक वादळी,
गातसे कोकिळा गळीं । शिरिं बसे वेणिची
नागिण काळी, वेटाळुनी वारुळीं ॥३॥
स्वर्गास उमलली सूर्यफुलाची कळी,
तूंज लावण्याची तिच्याच का पाकळीं ?
वर्णितांतुला ही जीभ पडे पांगळी ?
हें काळिज माझें टाक चुरडुनी सदा तुझ्या पायदळी ॥४॥

११
अंबादास : आज प्रीतिचा प्रथम आपुल्या संगम हा झाला !
सखू : प्रेमफुलांच्या गळ्यांत घालुनि हिंडूं या माळा ॥धृ०॥
अंबादास : नाचति झाडें, नाचति वेली,
सखू : रानपाखरें वेडीं झाली !
अंबादास : पृथ्वीवरती स्वर्ग धरेला
सखू : भेटाया आला !
अंबादास : पहा कोयना इकडून येई,
सूख : समोरून ही कृष्णामाई !
अंबादास : प्रीतीसंगम सखे असे हा,
सखू : जगामधें पहिला ॥
अंबादास : हरी कोयना राधा कृष्णा गोकुळ गाई राधाकृष्णा
सखू : यमुनाकाठी प्रीतिसंगम असाच ना झाला ?
अंबादास : प्रीतिसंगमी करूं आत्मर्पण,
अंबादास : दोन नद्यांचा प्रीतिसंगम
सखू : दोन जिवांचा प्रीतिसंगम
दोघे : अमर इथें झाला !

१२
आम्ही जातो आमुच्या गांवा,
आमुचा रामराम घ्यावा !
श्रीराम जयराम जयजयराम

१३
लोहो परिसासी रुसले, सोनियासी मुकले !
येथें कोणाचें काय बा, गेले,
ज्याचें त्यानेंच अनहीत केले !

१४
धन्य दिवस हा सोन्याचा अमृतांत न्हाला !
आज काय पृथ्वीवरतीं स्वर्ग प्रकट झाला ?
लाज राखण्या भक्ताची, पांडुरंग आला,
इथें कोयना कृष्णेच्या प्रीतिसंगमाला !
अंत नाहि भगवंताच्या कृपासागराला,
‘पुंडलिक वरदा विठ्ठल’ आता सर्व बोला !

१५
देज देवाचें मंदिर । आंत आत्मा परमेश्वर ।
देव देहांत देहांत । काहो जातां देवळांत ?
जशी उसांत साखर । तैसा देहांत ईश्वर ।
जैसें दुधामध्ये लोणी । तसा देंही वसे चक्रपाणी ।
तुका सांगे मूढ जना, । देहीं देव का पहा ना ।

१६
कृष्ण माझी माता । कृष्ण माझा पिता
बहिण बंधू चुलता । कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरू । कृष्ण माझें तारूं
उतरील पैलपारू । भवनदीची ॥२॥
कृष्ण माझें मन । कृष्ण माझें जन
सोयना सज्जन । कृष्ण माझा ॥३॥
तुका म्हणे माझा । श्रीकृष्ण विसावा
वाटे न करावा । परता जीवा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP