पंचसमासी - समास ३

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥  
मागिले अध्यायीं निरूपण । निरोपिलें आत्मज्ञान । तेंचि आतां दृढीकरण । केलें पाहिजे ॥१॥
जें ब्रह्मादिकां दुर्लक्ष । तें मानवांसी सुलभ । ऐसा हा अलभ्य लाभ । सद्‍गुरुवचनें ॥२॥
परी हें बाणलें पाहिजे अंगीं । तरी होइजे धन्य जगीं । जेणें समाधान योगी । महानुभावां ॥३॥
जें समाधान उत्कट । अंगीं बाणतां संकट । कां जें प्रपंचासि निकट । संबंध आहे ॥४॥
बहुतां दिसांची भ्रांति । देहबुद्धीची संगति । आणि भगंवताची प्राप्ति । सांप्रत झाली ॥५॥
अनंत जन्मींचा काट जडला । अभ्यासचि पडोनि गेला । तो तितुकाहि झाडिला । पाहिजे कीं ॥६॥
सकळ सृष्टीचा दंडक । लोभें व्यापक एकेक । तयामध्यें हा विवेक । आठवेल कैंचा ॥७॥
आपुला संसार करितां । जीव सर्वकाळ दुश्चिता । तेणें गुणें भगवंता । अंतर पडे ॥८॥
क्षणभरहि प्राण्यास । माया घेवूं नेदी उमस । मिथ्या लोभासाठीं आयुष्य । व्यर्थ गेलें ॥९॥
उपाय होतां दिसेना । प्रपंची गुंतली वासना । तेणें गुणें समाधाना । अंतर पडे ॥१०॥
अनंत जन्मीं अभ्यास । तोचि आतां निजध्यास । लागला असे जगदीश । केंवी जोडे ॥११॥
मळीन वस्त्र धुतां धुतां । तेणेचि तें पावे शुद्धता । कैसा साधक तो भगवंता । साधनें पावे ॥१२॥
साधनेंवीण ब्रह्मज्ञान । तेणें बुडे समाधान । अंगीं जडे देहाभिंमान । वाचाळपणें ॥१३॥
शब्दज्ञान हातां आलें । मी सिद्ध ऐसें कल्पिलें । बळेंचि धारिष्ट धारिलें । सिद्धपणाचें ॥१४॥
तें धारिष्ट अंतीं उडे । प्राणी महासंशयीं पडे । शेखीं जन्म मृत्यु घडे । भोगणें संशयें ॥१५॥
म्हणोनि जाणते पुरुषीं । सांडूं नये साधनासी । भांडूं नये आपणासी । सिद्धपणें सर्वथा ॥१६॥
जो सिद्धाचाहि सिद्ध । ज्ञानवैराग्यप्रसिद्ध । सामर्थ्यसिंधु अगाध । कैलासराणा ॥१७॥
तो सिद्ध करी साधन । सर्वकाळ रामचिंतन । ध्यान धारणा अनुष्ठान । चुकों नेदी ॥१८॥
ऐसे अपार महामती । झाले ते साधन करिती । तरी तेथें मानव । बापुडे किंकर ॥१९॥
राज्यपदाचे गुणें । रासभारूढ होणें । हें लोकीं लजिरवाणें । निपटचि झालें ॥२०॥
मी सिद्ध ऐसें कल्पुनी । नित्यनेम न धरी मनीं । तत्पर अशनशयनीं । आत्महत्यारी ॥२१॥
ज्ञानें भाव पालटला । देवाचा पाषाण झाला । ज्ञानें संत सज्जनाला । भौतिक भावी ॥२२॥
जप कोणाचा करावा । नेम कोणाचा धरावा । सर्वात्मा भजावा । कोण सद्रुरु ॥२३॥
स्वयें धर्म न करिती । पुढिलां वेड लविती । भेदला गेला नाहीं म्हणती । वाचाळ ज्ञानी ॥२४॥
सहज सोडूनि उपाधि । तें तय नेमस्त बाधी । म्हणोनि भजनविधी । चुकों न द्यावा ॥२५॥
बिढार नाहीं भक्तीचें । तेथें समाधान कैंचें । भिंतीवरील भस्माचें । झालेपण ॥२६॥
भक्तीवीण जें ज्ञान । तेंचि सोलीव अज्ञान । तेणें कांहीं समाधान । होणार नाहीं ॥२७॥
समाधानीं जो आगळा । तेथें भक्तीचा जिव्हाळा । जैसीते गृहाची कळ । आंगण सांगे ॥२८॥
भक्तीवीण देव जोडे । ऐसें कल्पांतीं न घडे । भक्तीकरितां साधक जडे । भगवंतीं ॥२९॥
आतां भक्ति ते कैसी । दृढ व्हावया ज्ञानासी । हेंचि पुढिले समासीं । बोलिजेल ॥३०॥ इति श्री० ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP