नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान - निर्णुंण ध्यान

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥   ॥
जेथूनि निर्माण विद्या । तेथें विद्या ना अविद्या । ऐक्यरूपें तया आद्या । नमन भावें ॥१॥
जे निराकारीं जन्मली । जन्ममूळा प्रवर्तली । इच्छा द्रुमा धांवली । उभय भागीं ॥२॥
जेथेम भंगपणें हेत । तें माया नसतां निवांत । तया निवांताचा प्रांत । सद्रुरु स्वामी ॥३॥
तया सर्वांगे नमन । तैसच संत सज्जन । आतां आठवूं ध्यान । सर्वोत्तमाचें ॥४॥
असंगासी जदे संग । आकाशीं उमटे तरंग । तरी अभंगासी भंग । वर्णूं शके ॥५॥
अघटितहि साक्षेपें । घडे स्वामीचे प्रतापें । जैसे अयोध्येचे नृपें । सिंधू पालणिला ॥६॥
तैसी सद्रुरुकृपा ओल । तेथें मुकेपणाचे बोल । खुणे बुझतां सखोल । अर्थ लाभे ॥७॥
तया लाभाचेनि गुणें । जालें ब्रह्मांड ठेंगणें । सद्रुरुकृपास्फुरणें । वाचा वदों लागे ॥८॥
सहज स्थिति न मोडे । जोडलेंचि मागुतें जोडे । रिघत ठायीं पवाडे । नि:शब्द शब्दू ॥९॥
तये विद्येचें रत्न । न जोडे केलिया प्रयत्न । तें श्रवणें जोडे यत्न । केला पाहिजे ॥१०॥
जें पुरुष ना प्रकृति । जें मूर्ती ना अमूर्तीं । जेथें श्रुती स्मृती । निवांत जाल्या ॥११॥
दृश्य कुळातें पाळित । म्हणोनि नामें कुळदैवत । दृश्यावेगळें स्वतंत्र । आपण आहे ॥१२॥
तो हा जाणिजे आत्माराम । सगुण निर्गुण पूर्णकाम । जयाच्या स्वरूपाचा नेम । न कळे सर्वथा ॥१३॥
जैसे कर्पूराचे बंबाळ । नेमून सांगणें बाष्कळ । ज्ञातेपणाची पुष्पावळ । आत्माराम वर्णिती ॥१४॥
परंतु याचे कृपेस्तव । मीपणाचा पुसे ठाव । न वदोन वक्तृत्वभाव । सहजचि आहे ॥१५॥
बोलत असतां न बोलणें । हे खूण जयासी बाणे । तेचि श्रोते वक्ते शहाणे । स्वहितविषयीं ॥१६॥
आतां वर्णीन रामराव । जो शंकराचा अंतरभाव । त्याच्या स्वरूपाकडे धांव । घेतली मनें ॥१७॥
रत्नखचित पादुका । तेथें खुंटती आशंका । जयापासोनि विवेका । पुढें रीघ नाहीं ॥१८॥
पादुकांमध्यें विवेकबळ । करी असंभाव्य तुंबळ । जैसें ऊष्णामध्यें जळ । हेलावूं लागे ॥१९॥
जैसें द्वैत आहे तोवरी । विवेक नाना युक्ती करी । अपार तर्क नानापरी । आणून दावी ॥२०॥
मीनाचें चाळपण । जंव तें जळ आहे संपूर्ण । जळ सोडितां आपण । मृत्यु पावे ॥२१॥
तैसी द्वैतापैलीकडे । विवेकाची हांव मोडे । मीनासारिखें मुरडे । अक्षोम जळीं ॥२२॥
पद प्राप्त झाल्यावरी । विवेकाची कैशी उरी । निर्बुजोनियां माघारी । वृत्ति मुरडे ॥२३॥
निजपदीं विवेकासी । मार्ग फुटेना जावयासी । पद पादुका संधीसी । आनंद पावे ॥२४॥
जेथें मीपण सोडिती । सज्जन पुढें पवाडती । जाणीव सोडूनियां श्रुटी । गौप्य झाला ॥२५॥
जेथें अत्यंत सांकडी । मन संगती सोडी । तर्क जाणीव बापुडी । उभीच विरे ॥२६॥
वेदें जाणोनि मौन धरिलें । तें अनुभवा आलें । अनुभवासि अनुभविलें । अनुभवेंविण ॥२७॥
जो मार्ग परम कठीण । न चलै भोयाळेविण । स्वामी-विरहित कोण । पावो शके ॥२८॥
जेथें नांव रूप हें झडे । आनंद आनंदीं बुडे । जेथें नि:शेष फुंज मोडे । निजसुखाचा ॥२९॥
जेथें विषयसुख आटे । आनंद प्रगटोनि तुटे । जैसा कर्पूरदीप झटे । उजळोनि मुरे ॥३०॥
पदाऐलीकडील गोष्टी । जेथें पडली विवेकदृष्टी । विवेकबळें तर्क वेष्टी । सीमा पादुकांची ॥३१॥
राम निजपदीं दृष्टी पडतां । कैंचा उरेल वणितां । जयास वर्णाचे तत्त्वतां । तोचि आपण ॥३२॥
निवांत विश्रांतिस्थळ । उभा विराला ब्रह्मगोळ । निर्मळ स्वरूप निखळ । कोदाटलें ॥३३॥
अवघे तेचि उदंड । वाटे बुडाले ब्रह्मांड । अंधार तुटला निबिड । रामरूप प्रगटलें ॥३४॥
वर्णितां रघुनाथचरण । अद्‍भुत भासले निरूपण । वाटे परंतु परम हीण । पदीं न साहे ॥३५॥
पदापासोनि साकार । सृष्टि झाली चराचर । तेंचि ध्यान मनोहर । वर्णीन आतां ॥३६॥
निजपदीं नाम ठेविले । तीं साजिरीं दोनी पाउलें । येथें मुनी रंगले । अनुभवें ॥३७॥
मोक्षध्वज ऊर्ध्वरेखा । ते सायुज्यमुक्ती देखा । वज्र तें अंकुर सुखा । अंकुश शोभे ॥३८॥
निजसुखाची नवाळी । ते पदी पद्म झळाळी । दिव्य चक्षूची न्याहळी । दिपोनि ठेली ॥३९॥
ज्ञानसूर्य बालप्रभा । ते टांचाची दिव्यशोभा । गुल्फ नीळ तेणें नभा । नीळिमा आली ॥४०॥
पदीं पद महानुभाव । ते पदाचे पदपल्लव । साजिरे शोभती लाघव । मुक्तीचे राहिले ॥४१॥
शून्यत्व नखाग्रं फोडिलीं । सजीव सतेज उरली । पाहो जातां दिसे बिंबली । स्वरूप-स्थिती ॥४२॥
निज पदापे निवृत्तिगंगा । निघाली भवतापभंगा । श्रवणें निववी जगा । सज्जनसंगे ॥४३॥
विशाळ ओघ प्रगटला । तिहा लोकीं प्रगटला । मुमुक्षू उपेगा आला । ओकार भगीरथ ॥४४॥
तये गंगेसी भावार्थी । मननें स्नानें करिती । ते सायुज्यता पावती । निजध्यासे ॥४५॥
तये गंगेतीरीं स्वानंदें । मिळालीं ब्रह्मवृंदें । स्नानें अद्वैतबोधें । बुडया देती ॥४६॥
अनंत जन्माचा मळ । क्रित्या पालटे तत्काळ । ऐसें पवित्र गंगाजळ । कर्णद्वारें सेविती ॥४७॥
जया प्रत्यहीं स्नान घडे । दिवसेंदिवस मळ झडे । अभ्यंतरीं कैवल्यपद जोडे । मननेकरोनि ॥४८॥
वासनावस्त्र मळीण झाल । प्रपंचसंग स्नेह लागलें । तें असंगजळें धुतलें । शुद्धता पावे ॥४९॥
ब्रह्मनिष्ठा तेचि वस्त्रे । प्रत्यहीं क्षाळिती धोत्रें । म्हणोनि तीं परम पवित्रे । सर्वकाळ ॥५०॥
जरी झाला थोर ब्राह्मण । केलें पाहिजे क्षाळण । क्षाळण न करितां मळीण । अभंगळ ॥५१॥
अहंतेच डाग पडले । बहुतांचे निघोन गेले प्राणी शुद्धत्वें पावले । अक्षय पद ॥५२॥
एक स्नान करिती । परि मळ ठेविता । ऐशा स्नाने फळश्रुता । होणार नाहीं ॥५३॥
जे संसारउष्णें पोळले । ते गंगाजळें निवाले । परम विश्रांति पावळे । सत्संगे शीतळ ॥५४॥
जे असंतप्त संसारीं । ते मळीण बैसले भीतरीं । हुडहुडी अंगावरी । महामोहाची ॥५५॥
भाविक गंगेंत पडले । ते वाहतचि उगमा गेले । गंगेसहित प्रवेशले । श्रीरामपदीं ॥५६॥
उगमाहूनि गंगा पडे । तेथोनिं धावे उगमाकडे । माग जावोनि पडे । जेथील तेथे ॥५७॥
गंगे पुढें आणि मागें । अवघा उगम निजांगे । उगमेचि व्यापिलें गंगे । सबाह्य उगम ॥५८॥
जे जे उगमासि गेले । ते उगम होवोनि राहिले । सदा सर्वांगीं निवाले । आनंदरूप ॥५९॥
गंगोदक कर्णीं भरलें । ते सुखें उचंबळलें । पुन्हां उपेगा आलें । भाविकासी ॥६०॥
महिमा गोदावरीचा । मार्ग दाखवी मोक्षाचा । श्रीरामपदांबुजाचा । अगाध महिना ॥६१॥
आतां असो ही खूण । मागें राहिलें निरूपण । ध्यान रामाचें श्रवण । श्रोतीं करावें ॥६२॥
स्वरूपी मुरडे वृत्ति । तैशा वांकी खळाळिती । मुरडल्या परी असती । जेथील तेथें ॥६३॥
कामक्रोधादि निशाचद । त्यांचा करोनियां संहार । तोचि निजपदीं तोडर । गर्जे प्रतापें ॥६४॥
जानूपंर्यत पीतांबर । न कळे जानुजंघाविचार । जैसा आकार निराकार । आच्छादिला ॥६५॥
बुद्धि ताम्रपणीचे जळेम । स्वरूपसागरीं मिळाले । तया संगमीं मुक्ताफळें । मुक्तपणें होती ॥६६॥
देहबुद्धीचे शिंपले । ज्ञानदृष्टीं विकासले । जीवन पडतां बुडाले । कठीणपणें ॥६७॥
तया शिंपल्याकरितां । आली कठिणता । जीवन परी ऐक्यता । तुटोनि गेली ॥६८॥
उकलेनि पाहिलें । जीवन नि:शेष गेलें । तें पाषाणरूप झाले । संगागुणें ॥६९॥
जें दुर्लभ जगासी । परंतु झालें एकदेशी । ऐक्यरूपें जीवनासी । मिळों नेणे ॥७०॥
मुक्तपण अंगीं जडलें । तेव्हांचि वेगळें पडलें । अभिन्नत्व विघडलें । वेगळेपणें ॥७१॥
सगुणपल्लवीं जडतां । त्यासी होय सार्थकता । सगुणीं जडलें नसतां । व्यर्थचि गेले ॥७२॥
जें सगुण-पल्लवीं जडे । तें सर्वथा भिन्न न पडे । ऐसीं मुक्तें अपाडें । तळपती पल्लवाग्रीं ॥७३॥
प्रबोधसिंह विवेकबळें । भवगजांचीं गंडस्थळें । विदारित संसारसळें । महाबळी ॥७४॥
तया सिंहाचें मुख्य मान । तैसे शोभे सान जघन । जेथें असे गुह्यस्थान । तें बोलतांचि नये ॥७५॥
जें गुरूचें निज गुह्य । कळल्याहि बोलों नये । तेथील सुख जानकीगुह्य । सज्जन विचारी ॥७६॥
असो ऐसें गृह्यस्थान । आच्छादूनियां वसन । वेष्टित शोभे जघन । काशिला जेणें ॥७७॥
तयावरी कटिसूत्र मेखळा । क्षुद्र घंटिका सोज्ज्वळा । जैसा बोध-सूर्याच्या कळा । फांकती रशमी ॥७८॥
क्षुद्र दृष्टीचा वांटा । म्हणोनि नामें क्षुद्रघंटा । त्या अधोमुखें द्रष्टा । म्हणोनि आहेती ॥७९॥
भ्रम हा नि:शेष घडे । तेचि शोभती पवाडे । समाधानीं प्रीति जडे । तैशा जडती किंकिण्या ॥८०॥
निरावलंबी जी अवलंबिली । नसोन इच्छा उभारिली । तेचि नलिनी प्रगटली । मूळमाया ॥८१॥
जें निर्मळ स्वानंदजळ । आदि अंतीं एकचि निखळ । तेथें इच्छारूप कमळ । प्रगटलें बळें ॥८२॥
तयापासून कळा । पूर्वीं होता संकोचला । तो गुणक्षोभें विकासला । रहस्यरूपें ॥८३॥
तया अभ्यंतरीं पत्रें । सुकुमारें चित्रें विचित्रें । सुरंग रंगांचीं अपारें । नानावर्णें ॥८४॥
तेंचि साजिरें नाभिकमळ । जें ब्रह्मदेवाचें जन्ममूळ । तया कमळाचा तळ । त्याचा अंत न लागे ॥८५॥
विधि जन्मे नाभिकमळा । मनीं आवेश आगळा । पाहीन म्हणे जन्ममूळा । तर्कानळाचे बळें ॥८६॥
त्या मूळा शोध न करी । तो लागे दुरिचा दूरी । निर्बुजोनियां माघारी । वृत्ति मुरड ॥८७॥
तेथोनि निघाला । आपुले स्थानासी आला । कांहीं न स्मरे बुडाला । शून्यत्वडोहीं ॥८८॥
तेथें मन निबुजलें । स्वामीचें स्तवन केलें । सद्भाव देखोनि संभाळिलें । सद्भुरुराजें ॥८९॥
प्रगटला स्वामीरावो । हंसरूप देवदेवो । ज्ञान देवोनियां ठावो । फेडी अज्ञानाचा ॥९०॥
म्हणोनि जन्ममूळाचा ठाव । मीपणें घेईन हें वाव । निर्बुजला ब्रह्मदेव । इतर ते किती ॥९१॥
शोध ध्यावा हांव जेथें । मीपण लपोनि बैसे तेथें । मीपण योगियासी पंथें । मार्ग न चले ॥९२॥
संग सोडीना मीपण । म्हणोनि परमार्थ कठीण । मीपण सोडितां खूण । बाणे अनुभवाची ॥९३॥
जंव जंव कमळ वाढें । तंव तंव कठिणता चढे । कठिणपणें नातुडे । जन्ममूळा ॥९४॥
जीवनापासोनि झालें । जीवनासी अंतरलें । जीवनीं परी स्पर्शिलें । नाहीं जीवनासी ॥९५॥
या नांव स्वानंदजळ । तें ऐलीकडे सकळ । सांडूनियां गेला नळ । भूमीच्या पाठीं ॥९६॥
जीवन आणि नलिनी । मिळोनियां कमळिणी । कमळिणी चाळक धणी । त्या स्वामित्व नलगे ॥९७॥
मूळमायेचें पिसें । आलें घरपणाचे मिसें । पिसेपणीं आपैसें । पूर्णत्वपण ॥९८॥
पूर्णा अपूर्णपणा़चा कळंक । अपूर्णपणें लविती लोक । अपूर्ण पूर्ण विवेक । कमळकोशीं ॥९९॥
विवेकाचा पारमळ । घेती संत षट्‍पदकुळ । गुणगुणिती सकळ । लाधले विवेकां ॥१००॥
परिमळ घेऊन निघाला । तयास विवेक पावला । विवेकेंसी अडकला । तयास बंधन ॥१॥
यापरी नाभिकमळ । उदरीं ब्रह्मांडगोळ । मायोपाधी सकळ । होत जात ॥२॥
सत् चित्‍ आणि आनंद । हे त्रिपुटी जीवें मंद । तेचि सुखानंद दोंद । शोभे उत्तमाकृति ॥३॥
शिव शक्ति ऐक्य दिसे । देखणें स्वयंभ असे । विशाळ वक्ष: स्थळ तैसें । शोभे दो अंगीं ॥४॥
वामांगाचि मायाशाक्ति । दक्षिण ते पुरुष व्यक्ति । दोनी मिळोनि आदि अंतीं । एकचि अंग ॥५॥
विदेहीपणाचें कोंदड । भग्र केलें महा प्रचंड । तेचि मुरडींव दोंर्दड । ज्ञानशक्ति ॥६॥
तया कोदंडाचे बळें । रजोगुणें क्षत्रियमुळेम । छेदोनि ब्रह्मकुळें । सुखी केलीं ॥६॥
ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण केवळ । विधियुक्त आचारशीळ । विवेकसंयुक्त निर्मळ । भ्रातीवेगळे ॥८॥
सत्वगुणाचे आधारें । भजती हर्षें थोरे । तैसीं नसती पामरें । रजोगुणी ॥९॥
रजोगुणी क्षत्रिय जाले । ब्राह्मण राज्यभ्रष्ट केले । अवघे आपणचि झाले । अधर्मी दुरात्मे ॥१०॥
माझें माझें करीत धांवती । सात्विक पळोनि जाती । सावकाश राज्य करिती । रजोगुण क्षत्रिय ॥११॥
म्हणोनि पृष्ठावतार । महाप्रतापी विचार । तेणें रजोगुणसंहार । बळें केला ॥१२॥
राज्य दिलें ब्राह्मणांसी । आनंद झाला सात्विकांसी । पुन: पुन: क्षत्रियांसी । देशधडी केलें ॥१३॥
जगीं क्षत्रिय महाक्रूर । परम प्रतापी अनावर । तयां निदाळूनि विचार । आनंद मानी ॥१४॥
तया विचाराचें ज्ञातेपण । तें कोदंड महाकठीण । अभंग जाणोनि पण । विदेहें केला ॥१५॥
सकळ पृथ्वीचे ठायीं । कोदंड भंगीसा नाहीं । परम प्रतापी तेही । साशंक झाले ॥१६॥
रामीं शरण अनन्यभावें तेंहीं स्वयें रामचि व्हावें । राम जालिया स्वभावें । भंगे धनुष्य ॥१७॥
परंतु हें महाप्रचंड । भंगलें न जाय कोदंड । कठीण ज्ञातेपणाचें बंड । भंगणार नाहीं ॥१८॥
ऐसें जें कां अनावर । गुणी लावून केलें चूर । तेंचि दोंर्दड अपार । ज्ञानशक्ति जेथें ॥१९॥
तये शक्तीचेनि बळें । रणा आलीं महा ढिसाळें । क्रूर तामसे विखाळे । विक्राळवाणीं ॥२०॥
गुणीं लावूनियां शर । कुबुद्धिताटिकाशीर । तोडूनियां ऋषीश्वर । सुखी केले ॥२१॥
जे कुपात्रामाजीं.भूषण । निर्दाळिले खर दूषण । कपटरूप ये हरिण । तोहि पिटला ॥२२॥
मकरध्वज महाबळी । देवां आण दानवां बळी । जेणें घातिलें पायांतळीं । महानुभाव ॥२३॥
अजिंकपणाचें माजें । अभिलषिलें अनुजभाजे । देहाभिमानफुंजें । बंधु दवडिला ॥२४॥
ऐसा जो परम प्रतापी । बळिया वितंडरूपी । तोडि निर्दाळिला कपी । दोर्दंडबळें ॥२५॥
वर्णावया दोर्दंडशाक्ति । इतुकी मज कैची मती । आदि करोनि सुरपति । अमर मुक्त केले ॥२६॥
निजशक्ति वानितां हरिखें । सज्जन संतोषती सुखें । तेचि शोभती कीर्तिमुखें । वेद वाखाणिती ॥२७॥
दोर्दंडवेष्टित बाहुवटें । साहित्य प्रतापें गोमटें । जेथें शत्रुकुळ आटे । अहंकारादि ॥२८॥
दुस्तर जे महाबळी । त्यांची करोनि रवंदळी । शोधूनि रणमंडळीं । निर्मूळ केलें ॥२९॥
दुष्ट वीरांची संपली उठी । तेचि वीरकंकणें गोमटीं । रत्नजडित मनगटीं । प्रतापकिरणें ॥३०॥
सुख पाविजे अभयकरें । रत्नभूषणें मनोहरें । नवविधा भजनद्वारें । फांकती किरण ॥३१॥
जेथेम आटती सर्व रंग । तेंचि साजिरें सर्वांग । अति सकुमार संग । सुमनांचा न साहे ॥३२॥
सगुण निर्गुण न कळे । शुद्ध भावार्थें आकळे । लावण्यरूप सांवळें । सुनीळ शोभा ॥३३॥
सत्व चंदनाचा गाळा । लविली उटी पातळ । शांति वैजयंती माळ । आपादपर्यंत ॥३४॥
मूळ तंतु जो ओंकार । मातृका सुमनहार । नाना पुष्पांचे अपार । रुळती गळां ॥३५॥
नित्य मुक्त मुक्ताफळें । स्वप्रकाशें तीं सोज्ज्वळें । मुक्तपणाचे विटाळे । स्पर्शलीं नाहींत ॥३६॥
ऐसी मुक्तमाळा साजिरी । अखंड हदयावरी । अति आदरें धरी । देवाधिदेव ॥३७॥
तया मुक्तांच्या निजवृत्ती । किरणासारिख्या फांकती । ऐक्यरूपें मिळोनि जाती । निजपदकीं ॥३८॥
आकाशींचें चंद्रमंडळ । केवळ पूर्णपणेम वर्तुळ । परम लावण्य शीतळ । अमृतमय जें ॥३९॥
तयासारिखें वदन । जें मंदळ काळाहीन । तयासि अपूर्णपण । कलंक लागला ॥४०॥
मागां वर्णिलें शरीर । त्या शरीराचें निजसार । तेंचि वदन मनोहर । आनंदमय ॥४१॥
कीं आनंदाचें ओतिलें । कीं तें स्वरूप मुसावलें । लावण्यासी लावण्य आलें । जयाचेनि ॥४२॥
शब्द निघतां हास्यवदन । शरणागतां आश्वासन । तेणें झमकती दशन । डाळिंबबीजाऐसे ॥४३॥
एकीं अनेक ऐक्य आलें । तें तांबूल मिश्रित झालें । एकपणें रंगोनि गेलें । अभिन्नत्वें ॥४४॥
अधर प्रवाळवल्ली । मी म्हणतां ऐक्या आली । तेणें मिठी पडली । निवांत शब्दीं ॥४५॥
अंत न कळे शब्दाचा । तेथें उत्पन्न चारी वाचा । वेदशास्त्रपुराणांचा । विस्तार झाला ॥४६॥
निज शब्दांचें अंतर । शब्दीं तयाचा विचार । लब्ध होय निजसार । स्वानुभवें ॥४७॥
वक्तृत्वें त्रिपुटीं आटे । तेचि श्रीमुख गोमटें । हनुवटी चुबुक प्रकटे । मंद मंद श्मश्र ॥४८॥
समता भ्रुकुटीचा प्रकार । सरळ नासिक मनोहर । जेथें स्वयमेव बिढार । विश्रांति घेत ॥४९॥
मागें वर्णीलें पद्मपत्र ।  तेथील देखणेम विचित्र । लावण्य विशाळ नेत्र । लक्षिले न वचती ॥५०॥
द्रष्टेपणाची त्रिपुटी । लक्ष अलक्ष मूळ तुटी । तेणें गुणें प्रकाशदाटी । प्रकाशाविण ॥५१॥
चक्षूचें देखणें सरे । ज्ञानदृष्टी पावोनि विरे । देखणेपणेंविण उरे । सर्वांगदेखणा ॥५२॥
अखंड चक्षु र्धोन्मीलित । सकळ देखण्याचा प्रांत । जेथें अगोचरा सहित । मुद्रा आटती ॥५३॥
श्रवण मनन निजध्यास । साक्षात्कारें जडे विश्वास । परमानंद सावकाश । होइजे स्वयें ॥५४॥
मुमुक्षू साधक सिद्ध झाले । तेहि येणेंचि मार्गें गेले । निखळ सुखें सुखावले । महानुभाव ॥५५॥
योगी वितरागी उदास । चतुर्थाश्रम जो संन्यास । दिगंबर नाना तापस । येणेंचि मार्गें ॥५६॥
जोगी जंगम आणि सोपी । फकीर कलंदर नानारूपी । येणेंचि मार्गें स्वरूपी । पावती सकळ ॥५७॥
ऋषी मुनी आणि सुरवर । आदिकरूनियां हरिहर । येणेंचि मार्गें पैलपार । पावती सकळ ॥५८॥
असो ऐका श्रवणपुटें । श्रोतव्य त्रिपुटी आटे । परम गुह्य प्रकटे । अनिर्वाच्य ॥५९॥
तेचि कुंडलें मनोहरें । रत्नजडित मकराकारें । तळपती श्रोत्रभारें । लंबित झाले ॥६०॥
शुद्ध स्वरूपीं शुद्ध ज्ञान । आहेचि तैसें विलोपन । मृगमदमिश्रित चंदन । नाना परिमळ ॥६१॥
काढिली कस्तूरी उन्मनी । हेतुरूपें विलेपनीं । ऐक्यती झाली ॥६२॥
शुद्ध स्वानुभवाचीं फुलें । तीं मस्तकीं चर्चिकीं चर्चिली तैलें । तेही मस्तकीं जिरालें । ऐक्यरूपें ॥६३॥
तेणें बळे चांचर कुरळ । बाहेर आलें प्रबळ । जेथें बद्धपणाचा मळ । नि:शेष नाहीं ॥६४॥
अति सूक्ष्मीं सूक्ष्म दृष्टी । तेचि साजिरी वीरगुंठी । पाहाता तर्ककला मोठी । मागें राहिली ॥६५॥
जेथें तर्कजाणीव गळाली । तीच किरीटीं झळाळी । जेथोनि फांकती कपाळीं । रम्य किळा ॥६६॥
जे इतुक्यांचा शेवट । तोचि मस्तकीं मुगुट । जेथोनि सर्वही खटपट । निवांत झाली ॥६७॥
ऐशी सर्वाभूतीं भूषित । स्वयंभ मूर्ति आदि अंत । सृष्टिरचना होत जात । द्वारां तयाचा ॥६८॥
राम लक्ष्म्ण सीता । भरत शत्रुघ्र हनुमंता । सकलिकां भक्तांसी ऐक्यता । भेटी झाली ॥६९॥
मागां जाहले आतां होती । होऊनि नाहीं पुनरावृत्ति । ऐसी अभंग ऐक्यस्थिती । वर्तल्यासहित ॥७०॥
सकळ भक्त मिळाले । हरिहर ब्रह्मादि आले । ऐक्यरूपें राम झाले । रामेसहित ॥७१॥
जितुकें दृश्य साकार । आहे अनमेय अपार । तेचि उधळले धूसर । रक्त श्वेत सुगंध ॥७२॥
पंचभूतीं कर्पूरगौळ । ज्ञानरूपें झाला प्रबळ । ओवाळूनियां सकळ । निवांत झाले ॥७३॥
गेला कर्पूर जळोनी । राहिल्या अनुहतध्वनि । ऐक्यरूपें समाधानीं । सकल राहिले ॥७४॥
चार देहांची कुरवंडी । दास ओवाळूनि सांडी । श्रोते वके आवडीं । ओवाळिले ॥१७५॥
इति श्रीनिर्गुणध्यानं संपूर्णम्‍ ॥ ओवीसंख्या ॥१७५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP