स्फुट श्लोक - श्लोक ५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  



विधीभुगोळ पाहिला । कवी रिझोनि राहिला ।
अनंत लाघवी भला । बहुत खेळ खेळला ॥१॥
कविप्रबंद साजिरे । मधुर शब्द गोजिरे ।
सगुण तो मनीं धरा । अनंत गण वीवरा ॥२॥
कळोन ना कळे मना । गळीत देहभावना ।
लळीत होतसे जना । मिळोनि जा निरंजना ॥३॥
अनंत संत शोधितां । सतंत संत बोधितां ।
अभेद भक्त नाडळे । विचार पाहातां कळे ॥४॥
पाहाल आपअपणा । राहाल जीविच्या खुणा ।
निसंग तो मनीं धरे । तरीच जन्म वोसरे ॥५॥
नसोन दास देखिला । जिवांत राम रेखिला ।
नुरेल तो भला भला । अलप्त होय दादुला ॥६॥
मही किकाल पावकु । प्रभंजनु उपावकु ।
नभास भास नाडळे । भुतांस वास तो कळे ॥७॥
तुटे फुटेल तें नव्हे । रचे खचेल तें नव्हे ।
नसे वसेल तें नव्हे । असे दिसेल तें नव्हे ॥८॥
उदास अंतराळसें । उदंड साळमाळसें ।
गुणारहीत टाळसें । दुजें नसे विटाळसें ॥९॥
गुणी गुणास नाडळे । भुतीं भुतांस नातळे ।
अतर्क्य तें कसें कळे । निरूपणेंचि नीवळे ॥१०॥
भले भले मधें पडा । असार सार नीवडा ।
चळेचिना  ढळेचिना । कळेचिना टळेचिना ॥११॥
चहाय हाय हाय रे । उदास हा उपाय रे ।
आहा जना आहा जना । पुसाचिना माहाजना ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP