मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
सत्कवींची काव्ये भाग ९

सत्कवींची काव्ये भाग ९

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


जगज्जननि इंदिरे सुंदरे, अरुणोदय झाला ।
उठि लौकरि जय माय भवानी, उदया रवि आला ॥

सुंदर तें ध्यान पंचगंगातीरीं ।
करवीरनगरीं नांदताहे ॥
दक्षिणेसी उभी सखी महाकाली ।
सरस्वती ठेली वामांगेसी ॥
बैसला गणेश स्वयें अग्रभागीं ॥
वसे शिरोभागीं दिव्य लिंग ॥
गदा पानपात्र महाळुंग हातीं ।
धरियेलें प्रीतीं खेटकादि ॥
रेखिला कपाळी टिळा कुंकुमाचा ।
हार मौक्तिकांचा कंठीं शोभे ॥
दास म्हणे अंबा माउली जगाची ॥
तारिणी भवाची देखे डोळां ॥

माउलिचें मन कोमल तें. वद कठिण कसें होइल तें? ।
किति धीर देउं चित्तातें? ।
दे दासातें दर्शन चित्सुखदायी ॥
अंबिके, पाव लवलाहीं ॥

हेंचि एक माझ्या अंतरींचे आर्त ।
करी वो कृतार्थ दीनासी या ॥
आयकोनि कानीं माझी आर्त वाणी ।
पाव गे भवानी, दास म्हणे ॥

भेटीलागी तुझ्या तळमळ जीवा ।
अंतरली सेवा माउलिये ॥
पूर्वकर्म माझें आड आलें माये! ।
दुरावले  पाय आई, तुझे ॥

उजळलें भाग्य भेटी आजिं झाली ।
वृत्ती रंगियेली पायीं तुझ्या ॥
न साहे वियोग तुझा माउली वो ।
पदीं देई ठावो. दास म्हणे ॥
असे कमलवासिनी, प्रबलदैत्यसंहारिणी ।
स्वभक्तवरदायिनी, अखिलविश्वउद्धारिणी ॥
समस्तअघनाशिनी, भगवती, यशोदायिनी ।
शिवे, शरण मी मुला, वरदहस्त ठेवी झणीं ॥

झणीं अभय देउनी तव पदांबुजीं ठाव दे ।
त्वदीय गुणगायनीं अचल चित्त हें राहुं दे ॥

शरण तुला आलो, अंबिके! शरण तुला आलो ।
श्यामल सुंदर मूर्ति मनोहर पाहुनि मनिं धालो ॥ध्रु.॥

कृपा करि भक्तावरि आतां ।
अभयकर ठेवि झणीं माथां ॥
ज्ञानरस पाजुनि मच्चित्ता ।
शांत करी वो माय भवानी, काकुळती आलो ॥

साक्षाद्‌ हरिस्तु यद्‌भर्ता यद्‌गृहं कमलं शुभम्‌ ।
सौंदर्यसीमा सततं महालक्ष्मीं नमामि ताम्‌ ॥३॥
भाग्यैश्वर्यां भव्यरूपां भव्यसौख्यप्रदां शुभाम्‌ ।
दिव्यां दिव्यजनाराध्यां महालक्ष्मीं नमामि ताम्‌ ॥६॥

फिरती रवि शशि गगनीं, करि अंबुद वृष्टी ।
तुझेनि आज्ञें निर्मित कमलोद्‌भव सृष्टी ॥

महाद्वारि येऊनी पहा मग जगदंबा लोचनीं ।
भेट दे गणपति कविलागुनी ॥५॥

झडकरि पाव जगज्जननी ।
कोलासुर मर्दुनि करवीरीं वससी सुखसदनीं ॥ध्रु.॥

उजवीकडे महाकाली । वामीं सरस्वती ठेली ।
गजाननमूर्ती पुढे बसली ।
सकलसुरप गिरिजावल्लभ तो धरिसि शिर:स्थानीं ॥
मणिकर्णिका काशि दत्त । मुक्तिमंडप बहु लखलखित ।
राम अहिशयन रमाकांत ।
राधाकृष्ण शनैश्वर मारुति रहाती वेष्टुनी ॥

मनोरम रूप तुझें माते ।
गदा-खेटक--फल-पात्रातें ।
धरुनी उभी चार हातें ।
बलवद्‌दास-मनोरथ-पुरविणि वससिं कास कसुनी ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP