श्री वेंकटेश्वर - पदे १११ ते १२०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


१११
जय जय ब्रह्मानंदा आदिपुरुषा । श्रीपय शेषाचलनिवासा ।
वैकुंठनायका व्यंकटेशा । इंदिरावरा श्रीहरी ॥१. १॥
जय जय भक्तामानसराजहंसा । जय जय क्षीरसागरविलासा ।
दीनवत्सला पुराणपुरुषा । श्रीनिवासा गोविंदा ॥२॥
ब्रह्मा विष्णु महेश । शिव शक्ति आणि गणेश ।
इतुक्या स्वरूपेंचि परेश । श्रीव्यंकटेशस्वामी पै ॥३॥
तूचि स्वामी ब्रह्मानंद । श्रीदत्तात्रेय तूचि अभेद ।
श्रीपांडुरंगरूपें प्रसिद्ध । पंढरीये नांदसी ॥४॥

११२
तुझी लीला अपार । मज न वर्णवेचि साचार ।
तू दयाळ दीनोद्धार । पावन चरित्र वदवी तुझे ॥६॥
तूचि प्रकट माझे हदयीं । श्रोतयांचे हदयीं तूचि राही ।
तुझे चरित्र तूचि गाई । आवडे तैसे भक्तांसी ॥७॥
ऐसे ऐकोनि वचन । देवाधिदेव सनातन ।
म्हणे, ‘माझी लीला प्राकृत गाऊन । भोळे भक्त तोषवी ॥८॥
ब्रह्मांडपुराणीं व्यंकटेशमाहात्म्य । ते संस्कृत ( गहन ) परम ।
ते प्राकृत भाषें सुगम । निजभक्तां समजावे’ ॥९॥

११३
ऐसा आठव दे क्षणक्षणां । परी हे गोष्टी न धरी मना ।
मग स्वप्नामाजी त्रिपतिराणा । त्रिवार येवोनि सांगितले ॥१०॥
‘तुझिये मुखींचे कीर्तन । ऐकता मज समाधान ।
तरी हे माझे माहात्म्य संपूर्ण । निजमुखें वर्णी तू ॥११॥
तुझिये मुखींचा हा ग्रंथ । जे ऐकती भावें भक्त ।
त्यांसी एक आवर्तनें अद्‍भुत । माझे यात्रेचे पुण्य घडे’ ॥१२॥
ऐसे घडीं घडीं त्रिपतिराव । मज येऊनि दे आठव ।
म्हणे, ‘माहात्म अपूर्व । गाउनी भक्तां सुखी करी ॥१३॥
या ग्रंथासी ठेविता बोल । माझे पूजन केले सकळ ।
ते अवघेचि झाले निर्फळ । सत्य बोल माझा हा ॥१४॥
उठे उठे रे श्रीधरा । वेगें सांग माझिया चरित्रा ।
प्रेमळ सद्‍भक्तां पवित्रां । कथामृतें निववी’ ॥१५॥

११४
भृगूचे वचन ऐकोनी । संतोषला महामुनी ।
व्यंकटाद्रीसमान त्रिभुवनीं । तीर्थक्षेत्र दुजे नाही ॥३५॥
त्या व्यंकटगिरीचा महिमा । वर्णू न शके शिव ब्रह्मा ।
श्रीव्यंकटेश पद्मा । जेथे सुर नर सेविती ॥३६॥
जेथे तीर्थ स्वामिपुष्करिणी । तेथे सकळ तीर्थे येती मिळोनी ।
नारद म्हणे, तये स्थानीं । हरी येऊनी राहिला ॥३७॥
टाकुनी क्षीरब्धि, वैकुंठभुवन । कोणें कारणें झाले आगमन ।
ते सविस्तर बोलें संपूर्ण । जेणें कान निवतील ॥३८॥

११५
‘ते स्थळींचे जन । तप-अध्ययन-वर्णित जाण ।
आधिव्याधींकरून । परम दीन जीव तेथे ॥७०॥
ते स्थळीं तू श्रीहरी । उद्धरिजे सकळी धरित्री’ ।
यावरी क्षीरसागरविहारी । बोलता झाला ते ऐका ॥७१॥
‘पुढे द्वापराचे अंतीं । कलियुगीं होईल चोळ चक्रवर्ती ।
भजनसुशील, त्याचिये भक्ती । कारणें मी येईन’ ॥७२॥

११६
तेथे म्हणेल जो विटाळा । तो म्हणावा परम चांडाळ ।
जो अध:पाती दुर्जनखळ । तोचि मानी विषम पै ॥२.५४॥
तेथींचा घेतां प्रसादकवळ । सर्वथा नाही जी विटाळ ।
जे वैकुंठ निर्मळ । जन सकळ चतुर्भुज ॥५९॥
तेथे जे विकल्प धरिती । त्यांसी हरिगण शिक्षा करिती ।
लोटुनि माघारें घालिती । अध:पाता जाती ते ॥६०॥
सांडुनि विकल्प, अभिमान । अनन्यभावें जे हरिसी शरण ।
तेचि तरले संपूर्ण । सत्यवचन जाणिजे ॥६१॥

११७
तो गिरी केवळ नारायण । वरी गुल्मलता तृण ।
ते सकळ देव, मुनिजन । यालागी छेदन न करावे ॥२.५१॥


ज्या पर्वतीं सुवर्ण-रौप्य-खाणी । प्रकाशमय नाना रत्नीं ।
पर्वत पाझरे चहूंकडोनी । अमृतमय उदकें ॥३.५॥
विविध वृक्ष सदाफळ । नाना  पुष्पांचे परिमळ ।
मालती, पिंपळ वृक्ष सबळ । शाल, तमाल शोभती ॥६॥
कदंब, अर्दुन, वंश, चंदन । फणस, बकुळ, अशोक, कांचन ।
आंबे, निंबुणी, रातांजन । नारिकेळी मधुवृक्ष ॥७॥

११७
कोटि विजांचा पुंजाळ । तैसा प्रकाश पडला ।
घवघवीत घनसावळा । नेत्रीं देखिला नारायणें ॥१५॥
श्रीहरि धनश्याम वर्ण । झळकत श्र्वेत वसन ।
विजुप्राय लक्ष्मी संपूर्ण । वामांगीं शोभतसे ॥१६॥
सच्चिदानंद घनसावळा । आपाद रुळती वनमाळा ।
दशांगुळीं मुद्रिका वेल्हाळा । तळपताती निजतेजें ॥१७॥
चरणीं गर्जती तोडर । कटीं मेखला तेजाकार ।
वीरकंकणें, केयूर विचित्र । इंदिरावर उभा असे ॥१८॥
कर्णीं झळकती कुंडले । मकराकार चपळे ।
मुकुटाचे तेज आगळे । झाकोळले सहस्त्रसूर्य ॥१९॥
शंख, चक्र, गदा, पद्म । पूर्णब्रह्म मेघश्याम ।
तुळसीमाळा उत्तमोत्तम । श्रीवत्सलांछन झळकतसे ॥२०॥

११८
तुझिया दर्शना जे येती । ते जपतप काही नेणती ।
त्यांसी दर्शनमात्रें तू श्रीपती । द्यावी मुक्ती सर्वांतें ॥३.४८॥
जो तू सर्वांसी अगोचर । तो येथे होऊनि श्यामसुंदर ।
सगुण रूप मनोहर । दर्शनें उद्धार करी का ॥४९॥
मग बोले विश्वंभर । ‘तुवां जो मागितला वर ।
तो म्यां दिधला साचार । तुझ्या वचनेंकरूनी ॥५३॥
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र । माझे घेता दर्शन मात्र ।
त्यांचा होईल उद्धार । नाही विचार दुसरा’ ॥५४॥

११९
पारधीये आला जगन्नाथ । शबर मिळोनि असंख्यात ।
साष्टांग करिती प्रणिपात । रमानाथ पूजिला तेहीं ॥४-६॥
शबर सवें घेऊनी । पुढे चाले चक्रपाणी ।
धावता घोरविपिनीं । श्रीशैल्य पर्वत देखिला ॥७॥

१२०
त्या व्यंकटाचलाचे तटीं । गुहा धरूनि राहे गोरटी ।
चिंता करीतसे पोटीं । कैं देखेन दृष्टीं सुपुत्रासी ॥२२॥
तेथे आकाशगंगेचे पाणी । धबधबां रिचवे अवनी ॥
वायुदेवातें कामिनी । दृढ चिंतूनि तप करी ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP