श्री वेंकटेश्वर - पदे ५१ ते ६०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


५१
जय देवा वेंकटेशा । महाविष्णू हे परेशा ।
आरती ओवाळीतो । तुज चिन्मय अविनाशा ॥ध्रु.॥
पुत्रासाठीं तैं अंजना करुनी तप जेथे ।
वायुपासुनी लाभली तैं हनुमंतातें ॥
त्रेतीं यास्तव अंजनाद्रि मणती तयातें ।
द्वापरीं हो वायु शेष तोलिती बळातें ॥
शेष तैं मेरुकुमरा । वोढितां सदृढ कमरा ।
त्यासहित त्या नगवरा ।
झुगारिले श्रीवायूने तो शेष महीधर ॥२॥

५२
कलियुगीं श्रीकांचीनगरी माधव मण्णार ।
ब्राह्मण होता, नीच स्त्रीशी जडे कामातुर ॥
अंत पावतां ते, मग होउनि विरक्त तो फार ।
या शैलातें पावुनि झाला बहुत पवित्र ॥
‘वें’ मणिजे पापराशी ‘कट’ जाळणार त्याशी ।
मणुनि त्या डोंगराशी कलियुगीं
वेंकटाचल मणती सुरनर ॥३॥
आहे स्वामिपुष्करिणि जे गंगेसमान ।
जीचे पश्चिम तीरीं राहे वराह आपण ॥
त्याचे दक्षिणभागीं आहे विष्णु निदान ॥
तेथे त्याचा साक्षात्कार घडेल म्हणून ॥
सांगतां पद्मजाने मुनि अगस्त्य हरखून ।
सुवर्णमुखरीं स्नान ।
करोनि डोंगर चढला पाहुनि नृहरिगुहाद्वार ॥४॥

५३
उठि उठि बा व्यंकटरमणा । सखया, दाखवी वदना ।
मावळली निशी । उदयो जाहला रविकिरणां ॥ध्रु.॥
वेदश्रुती प्रबोध करिती । गाती सुर नाना ।
ओवाळिती आरती । ह्या देवांच्या ललना ॥१॥
जडित पात्रें, सर्वही तीर्थे । घेउनी हातीं ।
मुखप्रक्षालन करी । रमा, भूमी विनविती ॥२॥
ब्रह्मा, वायू, शंकर । अनंत, खगेश, सुरपती ।
उपायने घेउनी । नाना आले तुजप्रती ॥३॥
सावित्री, भारती । गिरिजा, वारुणी नारी ।
सौपर्णी, इंद्रायणी, रती । आल्या सुंदरी ॥४॥
कवि, गुरु, काम, इंद्र । अग्नि, यम, नैऋती ।
वरुण, वायू, धनपती । ईशान, स्कंद, गणपती ॥५॥

५४
चंद्र, सूर्य, तारांगण । नवही ग्रहपती ।
आले सप्तही सागर । सहित सप्त द्बीपवती ॥६॥
गंगा, यमुना, सरस्वती । गौतमी, पुष्करिणी ।
भीमा, कृष्णावेणी । तुंगा, शरयू , पयोष्णी ॥७॥
गंडकी, गोमती, ताम्रपर्णी । पिनाकादिकरूनी ।
पादोद्‍भव आल्या । सर्वही सेवेलागूनी ॥८॥
मेरू, मंदर्, गंधमादन । मैनाक, विंध्याद्री ।
रजताचलदिकरूनी । सर्वही आले शेषाद्रीं ॥९॥
वेदशास्त्रें, पुराण, भाष्य । भारत, भागवत ।
साहित्यालंकार, नाटक । सद्‍गुण वर्णिती ॥१०॥

५५
शुक, सनकादिक । नारद , तुंबर गणवृंद ।
उद्धव अक्रूर, भीष्म । बिभीषण आला प्रल्हाद ॥११॥
विश्र्वामित्र, भृगु, मरीची । कश्यप, अदिती ।
गौतम, वसिष्ठादिक सप्तही । ऋषिसहित अरुंधती ॥१२॥
उत्तान, प्रियवत्‍ , गय । दुष्यंत, भरत ।
ययाति, इक्ष्वाकु, नहुष । आला दशरथ ॥१३॥
मरुत्त, मांधाता, शिबी । यदु, पंडुसुत ।
हरिश्चंद्र, नळादिक। आले समस्त ॥१४॥
कामधेनू, कल्पतरू । ऋद्धि, सिद्धी, चिंतामणी ।
अणिमादिक सर्वही । उभ्या जोडुनिया पाणि ॥१५॥

५६
अहल्या, द्रौपदी, सीता । तारा, मंदोदरी ।
पतिव्रता, पुण्यवंता । सर्वही आल्या सुंदरी ॥१६॥
अयोध्या, मथुरा, माया । काशी, कांची, अवंतिका ।
द्बारावती आदि आल्या । सर्वही मोक्षदायिका ॥१७॥
तुळसी, धात्री, बिल्व, चंपक । बकुळ, मालती, सेवंती ।
गरुड, मुख्यप्राण आले । घेउन तुजप्रती ॥१८॥
शिरोमणी वैष्णवांचा । मध्व, अवतार पवनाचा ।
आला सखा पूर्ण तुमचा । शिष्यांरहित पूजनेचा ॥१९॥
अनंतजन्मींच्या सुकृतें । पावले तव चरणांसी ।
सत्यपूर्ण कृपावंत । गणपतिसुत तिमयासी ॥२०॥

५७
व्यंकटरमणा, ये सत्वरि संकटहरणा ॥ध्रु.॥
शरणागत मी तुझिया चरणां ।
चुकवि चुकवि जन्ममरणा ॥
लागो मानस तुझिया चरणां ।
दया करी वो अंबुजनयना ॥१॥
उपाय न दिसे मज भवतरणा ।
धाव सत्वरी दीनोद्धरणा ॥
येऊ दे हरि माझी करुणा ।
स्वच्छ करी वो अंत:करणा ॥२॥
वारुनिया अविद्यावरणा ।
बोधि आपुल्या स्वरूपज्ञाना ॥
देई शांति क्षमेच्या भरणा ।
शरणागत तापत्रयहरणा ॥३॥
उदार तू तव भक्तरक्षणा ।
देई देवा, हेचि दक्षणा ॥
अगाध तव गुण येवो वदना ।
कृपादृष्टि करि निरंजना ॥४॥

५८
भावार्थ कानगीसी । भक्तांपासी तू मागसी ।
अज्ञान छेदूनिया । भवसंकट वारीसी ॥
देवोनी स्वात्मबोधा । परमानंदीं तू ठेवीसी ॥१॥
तत्त्वंपद भेदबुद्धी । निर्मुन शबलांश-उपाधी ।
लक्ष्यार्थी जीवेशांचे । करिसी ऐक्य असिपदीं ॥
जीवन्मुक्तिसुख थोर । देसी परम कृपानिधी ॥२॥
विवर्त हे नामरूप । जगद्‍भवचि असार ।
अधिष्ठान पूर्ण याचे । देवा, सन्मय साचार ॥
मौनी म्हणे तूचि सर्व । भूमानंद हे अपार ॥३॥

५९
जय देव जय देव जय व्यंकटेशा ।
केवल करुणासिंधू पुरवीसी आशा ॥ध्रु.॥
शेषाचलिं अवतार तारक तू देवा ।
सुरवर, मुनिवर, भावें करिती जन सेवा ॥
कमळारमणा, अससी अगणितगुणठेवा ।
कमळाक्षा, मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥१॥

६०
हे निजवैकुंठ म्हणूनि ध्यातो मी तूतें ।
दाखविसी गुण कैसे सकळिक लोकांते ॥
देखुनी तूझे स्वरूप सुख अद्‍भुत होते ।
ध्यातो तुजला श्रीपति, दृढ मानस होते ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP