स्त्रीधन - विठ्ठल रखुमाई

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचें एक आवडतें दैवत आहे. बहुजन समाजाला संस्कृतातील धार्मिक व सामाजिक तत्त्वज्ञान समजावून द्यावें म्हणून मराठीची सेवा ज्ञानदेवांनीं केली. त्यासाठीं विद्यापीठ म्हणून त्यांनीं पंढरपूर निवडलें आणि नामदेवासारखा कीर्तनकार हाताशीं घेतला. पंढरपूरच्या विठ्ठलाचें राऊळ त्यावेळीं मराठीचें माहेर झालें. तेव्हांपासून गेलीं सातशें वर्षे विठ्ठलाचा महिमा अजूनहि टिकून आहे. हजारों लोक वारकरी म्हणून पंढरीला जाऊन येतात. जणुं विठ्ठल रखुमाई म्हणजे सर्वांचे मायबाप ही भावना !
जुन्या काळच्या थोर संतांनीं विठ्ठलाचा महिमा आपपल्यापरीनें गाइलेला आहे. सामान्य स्त्री-मनालाहि विठ्ठलाची गोडी आगळी. त्यानं देखील विठ्ठलाचें गुणगान केलें आहे. पण संत मंडळींच्यापेक्षां हा भावनाविष्कार वेगळा, मनाचा मोकळा आणि सगळ्यांत सगळा असा आहे.
एवढंस होतं पंढरपूर    विठोबारायाचं नगर    रखमाबाईचं सासर
अग अग भुलाई माळणी     तुला ग राजा बोलावितो    तुला ग कंगण्या घडवितो
नको मेल्याच्या कंगण्या     विकीन सोनीयाची भाजी    घेईन मोतीयाची वेळा
माझा माळी तो बरवा    दंडीं रुमाल हिरवा
दंडीं रुमाल काय परी    हिरा झळकतो तुर्‍यावरी
पंढरपूरचें आणि तेथील विठोबाला फुलें पुरविणार्‍या माळणीचें स्वभाव वर्णन या गाण्यामध्यें आलेलें आहे. हें गाणे दिसायला लहानसें आहे परंतु त्यानें एका फार मोठ्या मानवी वृत्तीचा उल्लेख केलेला आहे. स्वाभिमानी माळणीनें राजाच्या पैशाला लाथाडून आपल्या धंद्याशीं इथें इमान राखलें आहे ! एवढेंच नव्हे तर स्वाभिमानानें आपल्या नवर्‍याचा व कर्तबगारीचा उल्लेख केलेला आहे.
पैला माजा दंडवत        हाय इसाव्या पासुनी
सावळ्या पांडुरंगा        न्यावं रथांत बसवुनी
दुसरा माजा दंडवत        चंद्रभागच्या अलीकडं
सावळ्या पांडुरंगा        मला न्यावं पलीकडं
तिसरा माजा दंडवत        चंद्रभागच्या वाळवंटीं
सावळ्या पांडुरंगा        झाल्या पुंडलिकाच्या भेटी
चवथा माझा दंडवत        नामदेवाच्या पायरीं
सावळ्या पांडुरंगा        चोखामेळा तो भाईरीं
पांचवा माझा दंडवत        चढ घाटाच्या पायर्‍या    
सावळ्या पांडुरंगा        भेट द्यावीत सोयर्‍या
साव्वा माझा दंडवत        उभी राहिलें बारीला
माज्या ग दर्शनाची        चिंता पडली हरीला
सातवा माझा दंडवत        उभी राऊळाच्या कोना
सावळ्या पांडुरंगा        इटवरील्या मोहना
आठवा माजा दंडवत        उभी राहिलें इटपशीं
सावळ्या पांडुरंगा        संतासंगतीं कर गोष्टी
नव्वा माजा दंडवत        उभी साकळ दंडापशीं
सावळ्या पांडुरंगा        पातकाच्या जळ राशी
धाव्वा माजा दंडवत        राऊळांत झाली दाटी
सावळ्या पांडुरंगा        होती संतांच्या भेटाभेटी
आकरावा माजा दंडवत        गरुड खांबाला घाली येडा
बोल सावळा पांडुरंग        जनी आलीया वाट सोडा
पंढरीच्या वारीला गेलेल्या भाबड्या मनानें विठ्ठलाला दंडवत घालतां-घालतांच, पंढरपूर जवळ येईल तशी आपली भावना या ओव्यांच्या निमित्तानें बोलून दाखविलेली आहे. विठोबा आणि आपण अगदीं एकजीव झाल्याचें सांगण्याची ही तर्‍हा मोठी देखणी आहे. जनाईला विठोबानें कामाधामांत मदत केल्याची कथा ऐकल्या कारणानें विठोबा आपल्यालाहि कसा जागोजाग प्रसन्न झाला आहे तें भोळ्याभावानें इथें व्यक्त झालेलें आहे. एवढेंच नव्हे तर आपल्याला अडथळा होतांक्षणीच विठ्ठ्ल चिंताग्रस्त झाल्याचेंहि आवर्जून सांगितलेलें आहे ! आणि विठ्ठलाला सोयर मानून घाटाच्या पायरीवरच भेटीस यावयाचें निमंत्रण करीत त्याच्या राऊळांत झालेली हालचाल व्यक्त करतांना जनाईच आपल्या रूपानें आली आहे, तेव्हां भोंवतालच्या गर्दीला वाट सोडायची केलेल्या विनंतीची भावनाहि मोठी ह्रदयस्पर्शी आहे यात शंका नाहीं.
पैल्या पंगतीला        बाई मी घालीतें रांगूयीळी
इट्टल तुकाराम        द्याव गेल्याती आंगूयीळी
दुसर्‍या पंगतीला        बाई मी टाकीयीतें पाट
इटू देवाच्या जोडीला        सादु जेवील तीनशें साठ
तिसर्‍या पंगतीला        बाई मी टाकीयीतें पान
इटू देवाच्या संगं        देव जेवीला सूर्याबान
चवथ्या पंगतीला        बाई मी वाढीतें ग भात
इटू देवाच्या पंगतीला        सये जेवीला एकनाथ
पांचव्या पंगतीला        बाई मी वाढीतें तूपपोळी
इटू देवाच्या शेजारी        पंढरीचा ग वनमाळी
साहाव्या पंगतीला        मी ग वाढीतें शाकभाज्या
इटू माज्याच्या सोबतीला        पांची पांडाव धर्मराजा
सातव्या पंगतीला        बाई मी वाढीतें दहीभात
इटू देवाच्या पंगतींत        देव जेवीला रघुनाथ
देवाला जेवू घालण्याच्या इच्छा या ओव्यांच्यामधून प्रकट झालेली आहे. सर्वसामान्य मानवांची पंगत एखाद्या घरांत उठावी तसा प्रकार इथें झाला आहे. परंतु महत्त्वाच्या देवमाणसांना विठ्ठलाच्या पंगतीचा लाभ झाल्याकारणानें या पंगतीची शोभा आगळी झाली आहे. या ठिकाणी कथा व पोथ्या ऐकून लक्षांत राहिलेल्या पांडवांचा, कृष्णाचा, आणि संतांचा या पंगतींत समावेश केला असून सूर्यालाहि तेथें आणून बसविलें आहे !
पहिल्या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली मीठ
            पायीं तोड्याचा थाट
दुसर्‍या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली खीर
            गळीं शोभतो चंद्रहार
तिसर्‍या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली गूळ
            जरी पातळ पायघोळ
चवथ्या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली भात
            जेवला पैठणचा एकनाथ
पांचव्या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली पोळी
            आला आरणचा सावतामाळी
सहाव्या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली वड
            पायीं शिंदेशाई तोड
सातव्या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली डाळ
            गळ्यां पुतबीळ्यांची माळ
आठव्या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली कढी
            हातीं शोभलीं राजवरखी बांगडीं
नवव्या पंगतीत        रुक्मीण वाढत गेली भेंडी
            देवा लावावी तमी तोंडीं
दहाव्या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली धई
            जेवली ज्ञानोबा मुक्ताबाई
अकराव्या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली पिठलं
            साधू जेवून तीनशें उठल
बाराव्या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली तूप
            विठू नारायणाचं रूप
तेराव्या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली ताक
            मानसं जेवलीं सारी पाक
चवदाव्या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली सार
            गळीं नवलाखी हार
पंधराव्या पंगतींत        रुक्मीण वाढत गेली पाणी
            देवा विठ्ठलाची राणी
या ओव्यांच्या निमित्तानें विठ्ठलाच्या घरी निरनिराळ्या संतांच्या समवेत जेवण घेतल्याचें समाधान वारकरी मनानें अनुभवलेलें आहे. विठ्ठलाच्या घरीं जेवण आणि रुक्मिणीनें स्वतः पंगतीला वाढणें ही गोष्ट मोठी अद्‌भुतरम्य तर खरीच पण देवाबद्दलचा विशेष जिव्हाळा व्यक्त करणारी झाली आहे. आणि देवाघरचें जेवण असलें तरी सामान्य माणसाच्या घरांतीलच पदार्थ इथें ताटांत आल्यानें त्यांची चव आणखी गोड झाली आहे ! भपकाच म्हणावयाचा तर तो फक्त रुक्मिणीच्या अंगावरील साडीचा व दागिन्यांचा आला आहे. एरव्हीं इथें सर्व अगदीं रोजच्या परिचयाचेंच वाटावें, एवढा स्वाभाविक असा हा भावनाविष्कार झालेला आहे. त्यामुळेंच सर्वसामान्य स्त्रीला या ओव्या स्वतःच्या मुलासारख्या आवडीच्या वाटतात !
मोत्या पवळ्यांची रांगोळी    जडीत पाटावरी
त्यावरी बैसावें जेवाया    पंढरीराया, यावें लौकरी
चहूंकडे समया लावोनी    उदबत्त्या खोवोनी
झार्‍या पंचपाळ्या भरोनी    उटी घ्या हो हरी
केशर कस्तुरी कपाळीं    अक्षदा नीढळीं
तुरा खोविला मोत्यांचा    गळां हार तुळशीचा
रूप दिसतें अमोलिक    रत्‍नजडीत पाट
त्यावरी बैसावें जेवाया    पंढरीराया, यांवे लौकरी
शाखा साठोर्‍या रुचकरी    बारा कोशिंबीरी
आणिक सांबारी गोळ्याची    सुंदर शेवग्याची, पानें वाढिलीं
खिरी दुधाच्या आळविल्या    पानावरी वाढिल्या
श्रीखंड बासुंदी पुरी लोणी,    पक्वान्नें ऐशीं वाढोनीं
रस आंब्याची शिकणी    दही, दूध दोन्हीं, पानें वाढिली
पोळी पुरणाची पांढरीं    आणिक गुळवणी
घावन घारगे घारीया     खाजा करंजीया
लाडू बुंदीचे फेणीया     धीवर मांडीया, पानें वाढिलीं
भात केशरी मोहन     आणिक साखर
आंबेमोहोर जिरेसाळ,     तूप परीमळ
वरी वरण निर्मळ,     वैरिलें, वरंगळ, पानें वाढिलीं.
आले जेवया रघुपती,     आनंदले चित्तीं
जेवुनी उठले रघुवीर,     तांबूळ घेतिलें
चरणीं लागतें विठुराया     पंढरीच्या राया, यावें लौकरी.
या गाण्यामध्यें सामान्य मनाला सुचेल तेवढे सगळें वैभव आलेलें आहे. येथें व्यक्त झालेला हा सगळाच थाट देवाला शोभणारा परंतु सर्वसामान्य मनाला अद्‌भुतरम्य वाटणारा, न पेलणारा असा आहे. त्यामुळें मध्यमवर्गीय महिलांच्या तोंडीं हें गाणें जेवढें आढळतें, तेवढें शेतकरी वा कामकरी स्त्रीजवळ आढळत नाहीं. विठ्ठलाच्या वर्णनाबरोबर पक्वान्नांची झालेली गर्दी देखील श्रीमंती थाटाखेरीज इतरांना पहायलाहि न मिळणारी आहे असें म्हटलें, तर वावगें होणार नाहीं. रत्‍नजडित रांगोळीचा थाट कल्पनेनेंदेखील डोळ्यासमोर येईल कीं नाहीं याची सामान्य मनाला शंका वाटते ! तीच गोष्ट इथें नमूद केलेल्या पक्वान्नांचीहि होईल ! नाहीं म्हणायला यदाकदाचित् गोरगरिबांच्या कानावरून या गोष्टी कधींकाळीं चुकूनमाकून गेलेल्या असल्या, तरी अनुभवाची गोडी या जन्मीदेखील होणें नाहीं अशी वस्तुस्थिति आहे !
पंढरीला जातें मी     संगं न्यावं मावशीला
सोन्याच्या कळशीनं     पानी घालीतें तुळशीला
पंढरीचि ग वाट      बाई कशानं झाली वली
सईला किती सांगूं     र्‍हाई रुक्मीन पानी न्हाली
पंढरीची ग वाट     कुन्या पाप्यानं नांगरली
लाडके भैनाबाई     गाडी बुक्क्याची हादरली
पंढरीला जाया    माज्या आळिची गेली सारी
माज्या ग राजसाची     बाई आटपना तालीवारी
पंढरीला जातों      जातों म्हनून र्‍हाऊं नका
देवा माज्या इट्टलाला     वाट बगाया लावूं नका
पंढरीला जाया    मी कां विच्यारी सासूबाई
लाडके बाळाबाई     पांडुरंगाच्या वारीपाई
पंढरीला जाया     घाट चढतें दरडीचा
पांडुरंगाच्या माज्याबाई     आला सांगावा पिरतीचा
पंढरीची हवा         काय सांगू मी वेडीला
चंद्रभागा सोडूयीनी     करी आंगूळ वड्याला
काय पुन्य केलं     कुंभाराच्या ग विट
विठ्ठलाचे पाय     तुला सांपडल कुठ
विठ्ठलाचे ग पाय     जसे कोरीव भोपळे
करीत दर्शना         आंत सोडून मोकळे
विठ्ठलाचा ग शेला     कोन्या शिंप्यानं शिवीला
देवा पांडुरंग         वर अभंग लिहीला
पंढरी पंढरी         दिसती ग अवचित
सईला किती सांगूं      देव बसले नामानीट
भरली चंद्रभागा     पाणी लागलं तटायाला
सावळ्या बाळराजा     उभा इट्टल घाटायाला
पाटच्या पार्‍यामंदीं     कर्णा वाजतो मंजूयीळ
सावळ्या विठूबाळा     दह्या दुधाची आंगूयीळ
पाटच्या पार्‍यामंदीं     कर्णा वाजतो सोनीयाचा
माज्या त्या विठूबाला         आला निवद लोनीयाचा
जाईन पंढरीला उभी         राहीन धर्मशाळ
इट्टल देव बोल             कवा आलीस लेकीबाळ
पंढरपूर बाई                 माजं म्हायार साजनी
विठ्ठल शिवी चोळी            हरीनामाची गजनी
पंढरपुरामंदीं                 बाई कशाचा गलबला
रुक्मिनी घेई             चोळी नामदेव शिंपी आला
पंढरपुरा जावं             संगं न्यावं आईला
गोपाळ पुरामंदीं             कडबा सोडावा गईला
जाऊनी पंढरीं             महाद्वारीं मी चुकली
देवा विठ्ठलाच्या             चंद्रहाराला दिपली
पंढरपूर बाई दुरून             दिसतं लालशार
देवा विठ्ठलाच्या             तुळशीबनाला आला भार
पंढरपुरीचा ग             माळीदादा अव्वल
रुक्मिनीच्या राऊळाला         घाली फुलाचीं कवलं
पंढरपुरामंदीं बाई             पैशाला माळा नऊ
हात माजा पुरना             देवा विठ्ठला खालीं लवू
जाऊनी पंढरीं             उभी राहिलें धोंड्यावरी
नदर माजी गेली             रुक्मिनीच्या गोंड्यावरी
पंढरपुराग ग             बुक्का विकीती शेरानं
विठ्ठला शेजारी             रुक्मिन बसली भारानं
पंढरीची वाट             सई चालाया हालकी
माजे तूं राजाई             संगं साधूची पालखी
पंढरीला जाती             लोक पैशाच्या ग बळं
माजा नमस्कार             काकड आरतीच्या येळं
पंढरी पंढरी                 विठूरायाची नगरी
रुक्मिनी बाईनं ग             भरल्या बुक्क्याच्या घागरी
भरली चंद्रभागा             पल्याड कशी जाऊं
रुक्मिनी नारीनं ग             फुलांची केली नावू
शेरभर सोनं                 रखमाईच्या ग अंगावरी
असा ढाळ देतो             चांद सुरव्या भांगावरी
पंढरीची वाट             दिंड्या पताका लोळती
देवा माज्या विठ्ठलाचं         साघु रंगानं खेळती
पंढरपुरामंदीं                 न्हाई कशाची निवड
देवा विठ्ठलाला             चोख्यामेळ्याची आवड
पंडरीची वाट             कशानं ग झाली लाल
ज्ञानदेव नामदेव             इथं येऊन गेले काल
पंढरपुरामंदीं                बाई पैशाला माळा वीस
देवा माज्या विठ्ठला        हात पुरेना खालीं बस
पंढरपुरामंदीं                 विठू देवाची कोणती आळी
लाडके भैनाबाई             दारीं बुक्क्याची रांगोळी
पंढरपुरामंदीं                 हाईत्या मालनी रमाउमा
देवा माज्या विठ्ठलाला         शेवंती फुलांचा पायजमा
पंढरपुरामंदीं                 बडवे करीती मारामारी
देव इट्टल बोलयीतो         येऊं द्याती माजी सारी
पंढरपुरामंदीं                 याक नवाल यीपीयीलं
विठ्ठल देवांनी ग             वाघ रथाला जुपीयील
पंढरीचा माळ             सये हिरवा लुसलुशी
देवा विठ्ठलांनी             दारीं लावील्या तुळशी
विसाव्या पासुनी             बाई पंढरी तीन कोस
दवा माज्या विठ्ठलाचा         दिस सोन्याचा कळस
आठा दिवसाच्या ऐतवारीं         विठूं यावं माज्या वाड्या
कापराच्या वड्या             देवा घालीन पायघड्या
पंढरपुरामंदीं                 माळणी ग निरदोशी
तुळशीच्या माळा             गरुड खांबापाशी
एकादशी बाई             दुवादशी ग माझे आई
बारस सोडायला             हरी अजून आला न्हाई
पंढरीला जातें             गरुड खांबाला देतें पाठ
लाडके भैनाबाई             तिथं गडनी तीनशें साठ
विटेवरी उभा             वसुदेवाचा ताना बाळ
सईला किती सांगूं             हाती चिपळ्या वीणा टाळ
पंढरपुरामंदीं                 कोन सोन्याच्या जोडव्याची
माजी ती रखुमाई             राणी माज्या विठ्ठलाची
भरली चंद्रभागा             पाणी लागलं वडायाला
विठ्ठल रखुमाई             जाती नारळ फोडायाला
पंढरीचा विठू             न्हाई कुनाच्या देव्हायिरीं
त्येच्या ग दर्शनाला         सारी लुटली जवायीरी
वाखुर्‍या वड्यावरी             झालं फलाचं हातरून
ज्ञानुबा तुकाराम             देव गेल्याती उतरून
विठूच्या देवळांत             वारकर्‍यांची झाली दाटी
तान्या ग राजसाची         मानकर्‍याची गेली काठी
विटवरी उभा             युगं झाल्याती अठ्ठावीस
देवा माज्या विठूबाला         कोन म्हनीना खालीं बस
दुकानदारानू                 तुमी दुकान हालवा
देवा विठ्ठलाचा             आला रथाचा हेलवा
पाऊस पडतो             पंढरीच्या माळावरी
ज्ञानोबा नामदेव             माझे भिजले वारकरी
पंढरपुरीच्या                 माळिणी उंच काठ्या
देवाच्या पालखीला             फुलांच्या बांधा काठ्या
भरली चंद्रभागा             वाहिलें पंढरपूर
पाण्यांत राहिलें             उभें विठ्ठलाचें घर
भरली चंद्रभागा             पाणी शिरलें गांवांत
हातीं घेऊनी कावड             इठू चालला धांवत
पंढरपुरामंदीं                 पाऊस पडतो झिरीमिरीं
सावळा बाळराज             माजा भिजला वारकरी
विठ्ठला माजा सका         रुक्मीन माजी माता
येतांजातां पाय धुई             चंद्रभागा पतिव्रता
विठ्ठल माजा सका         रुक्मनि माजी माता
शीन माजा गेला             दोगांला वव्या गाता
या ओव्यांनी पंढरपूरचें आणि विठोबाचें मनसोक्त गुणगान केलेलें आहे. एका दमांत दळणार्‍या बाईच्या तोंडून एवढ्या ओव्या बाहेर पडूं लागल्या, म्हणजे या गीतांना नवख्या असलेल्या माणसांना मोठा अचंबा वाटूं लागतो. वाटायला लागतें, एवढी ही प्रचंड कल्पना एका मनाला सुचते तरी कशी ? पण कारणें नाहीं कळली तरी हें सगळें भोळ्याभाबड्या मनाला सुचतें हे खरें आहे. अर्थात् एकटीदुकटीची ही कल्पना नसली, तरी तो एक सामुदायिक मनाचा आविष्कार आहे.
या गीतांपैकीं प्रत्येक ओवी ही निराळी भावना घेऊन आली आहे. आणि ती वैशिष्ट्यपूर्णहि आहे. गांवांत पाणी शिरलें म्हणून कावड घेऊन विठोबा धांवत जातो, विठोबा अठ्ठावीस युगें विटेवर उभा तरी त्याला कुणीं खाली बैस म्हणून सुचवीत नाहीं, तो उभा आहे ती विट कोणतें पुण्य केलें म्हणून तिथें आली आहे, विठ्ठलाच्या शेल्यावर अभंग लिहिणारा शिंपी, विठोबानें शिवलेली हरीनामाची गजनी अशी चोळी, पंढरपूरच्या माळ्यानें रुक्मिणीच्या घरावर घातलेलीं फुलांचीं कवलें, विठोबाच्या पैशाला मिळणार्‍या वीस माळा घालण्यासाठीं हात उंचीला पुरेना म्हणून त्याला खालीं लवावयाची अगर बसावयाची केलेली सूचना इत्यादि कितीतरी शेलक्या भावना इथें मोठ्या दिमाखानें व्यक्त झालेल्या आहेत. ही कल्पनाशक्ति सामान्य मनाच्या मानानें खरोखरच विलोभनीय आहे. साध्यासुध्या मनानें एवढें चांगलें चांगलें वर्णन करून पंढरीची दुनिया अशी नजरेसमोर उभी केली आहे. आणि अतिशय प्रामाणिकपणें मनांत आलें तें बोलून दाखविलें, अशी ही कल्पनाशक्ति इथें खुबीनें व्यक्त झाल्या कारणानें तिची गोडी विशेष वाढली आहे. एवढेंच नव्हे तर ज्याची पंढरपूरच्या विठोबावर भक्ति जडलेली नाहीं, त्याचें देखील मन जिंकण्याची हिंमत या गीतांनीं अंगीं बाणलेली आहे ! त्यामुळें विठ्ठल रखुमाईला वडील व आई मानून गाइलेल्या या ओव्यांनीं सर्व शीण नाहींसा झाला, अशी इथें झालेली अखेर देखील मोठी आकर्षक वाटते. इथें आलेलें खुद्द पंढरपूरचें वर्णनहि सुंदर आहे.
या गीतांची भाषा इतकी सोपी आणि शब्दरचना इतकी शेलकी झालेली आहे कीं, त्यांनीं स्वतःच आपला अर्थ स्वयंपूर्णतेनें ऐकणाराला सांगितला आहे ! अधिक विवेचनाची अगर संदर्भाची त्यास आवश्यकताच भासत नाही ! आणि म्हणूनच लोकगीत हें सामुदायिक मनाचा आविष्कार असतें व एकदां ऐकलें कीं मनावर ठसून तें कायमचें आठवणींत राहातें, म्हणतात तें अशा वेळीं अगदीं खरें वाटते.
रुसली रुक्‌मीन     देवाजवळ बसयीना
            गर्दी नारीला सोसयीना
रुसली रुक्‌मीन     ती का जेवीन दूधपोळी
            इटू जनीची शिवी चोळी
रुसली रुक्‌मीन     कां ग जेवीना दूधभात
            इटू जनीच्या मंदिरांत
रुसली रुक्‌मीन     बापा घरी सांग चाडी
            मला सवती बांधा माडी
रुसली रुक्‌मीन     ती ग बसली खिडकीत
            विठू पंढरीं धुंडीयीत
रुसली रुक्‌मीन     ती कां बसली वाळवंटीं
            विठू चरणीं घाली मिठी
रुसली रुक्‌मीन     गेली पदम तळ्यायाला
            हात विठूचा गळ्यायाळा
रुसली रुक्‌मीन     अवघ्या पंढरीत न्हाई
            हिच्या रागाला करावं कायी
रुसली रुक्‌मीन     हिचं रुसनं वंगाळ
            गार पाण्याची आंगूळ
रुसली रुक्‌मीन     जाऊन बसली डगरीला
            हंसूं आलं नगरीला
रुसली रुक्‌मीन     जाती मंगळवेड्यायाला
            जिन घातीलं घोड्यायाला
रुसली रुक्‌मीन     देवा पिरीत कोणायाची
घरला येती जाती     माजी सगळी गुणायाची
या ओव्यांच्या रूपानें विठ्ठलावर रुसलेली रुक्मिणी आपल्या नजरेसमोर उभी करण्याचें काम सामान्य बायकांनीं केलेलें आहे ! रुक्मिणी रुसली म्हणून विठ्ठलाची केवढी धांदल उडाली आणि तिचा रुसवा काढण्यासाठीं त्यानें काय खटपट केली, याचें हें एक मनोहर चित्र आहे. सामान्य लोकांच्या जीवनांतील हा प्रसंग देवाच्या घरांत निर्माण करून देवाला मानवीरूप देण्याचा केलेला हा प्रयत्‍न मोठा चित्ताकर्षक आहे. आपलीं सुखदुःखें देवालाहि सुटूं नयेत अशी सामान्य मनाला वाटणारी कल्पना इथें या रीतीनें शब्दमय झालेली आहे. त्यामुळें या ओव्या गातांना व ऐकतांना मोठी बहार उडून जाते !
रुक्मिनी धुनं धुती         देव इट्टल वरी बस
दोगांच्या पिरतीचं ग     चंद्रभागाला येतं हंसं
सोळा सत्रा नारी         कवाडाच्या कोनी
इट्टल देव बोल         रजा दे ग रुक्‌मीनी
रुक्मीनीची साडीचोळी     नऊ लाखाची जरतारी
देवा भिमक्कांनीं         लेक थोराच्या घरीं दिली
गोपाळपुरां जाया         तुला रुक्मिनी झालं ऊन
देवा माज्या विठ्ठलांनीं     बघ लावीलीं चिंचबनं
रुक्मिनीला मागयीनं     काशीखंडच आल देव
कोर्‍या कागदीं काळी शाई     वर विठ्ठलाचं नांव
पांडुरंग म्हनीयीतो         देग रुक्मिनी धोतयीर
दिंडी आली ज्ञानोबाची     मी ग जातों सामोयीर
विठ्ठल देव बोल         सोड रुक्मिनी माजी बंडी
आल्यति साधुसंत         दिंडी दरवाज्या तोंडीं
गोरी पक्‌मीन         काळ्या विठूबाला दिली
मोत्या पवळ्यांची बाई     कुनीं जडाजड केली
गोरी पक्‌मीन         काळासावळा तिचा पति
सुरतीचं मोतीं         कुन्या जवार्‍यापशीं हूती
शेर शेर सोन्याच्या ग     रखमाबाईच्या पाटल्या
देवा इट्टलाच्या         किती म्हवरा आटल्या
शेर शेर सोन्याच्या ग     रखमाईच्या खुट्टावळ्या
देव इट्टल फिरतो         जव्हार्‍याच्या सार्‍या आळ्या
शेरभर सोन्याचं ग         रखमाबाईच गोंड
देवा इट्टलाला माज्या     राज पंढरीचं दंडं
रुक्मिनी लेनं लेती      लेती सोन्याच बाजूबंद
देवा माज्या इट्टलाला     हाय डागीन्याचा छंद
रुक्मिनी लेनं लेती         सव्वा तोळ्याची बुगडी
देवा माज्या इट्टलाची    खिडकी राजाची उगडी
रुक्मिनी लेनं लेती         साज मागीती डोरल्याचा
इट्टल देव बोल         मळा पिकूं दे कारल्याचा
इट्टल देव बोल         चल रुक्मिनी माडीवरी
द्यानुबाचा सोळा         आला पाहूंया घडीभरीं
इट्टल म्हनीयीतो         कां ग रुक्मिनी डोळ लाल
गोपाळपुरामंदीं         चोळी भिंगाचीं घेतों चल
विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यामधील समाधानी जीवनाची हकीकत या ओव्यांनी सांगितलेली आहे. त्याचबरोबर भगवान् श्रीकृष्णाचा नवा अवतार म्हणजेच विठोबा असल्याचेंहि इथें मोठ्या सुंदर रीतीनें सूचित केलेलें आहे !
रुक्मिणीच्या अंगावरील दागिने आणि विठ्ठलानें तिची हौस पुरवितांना दिलेलें उत्तर, ह्या या ठिकाणीं आलेल्या भावना सामान्य स्त्रीच्या मनांतील ऐश्वर्याच्या कल्पनेंतून उतरलेल्या आहेत असें म्हणावयास हरकत नाहीं ! तिला स्वतःला आपल्या हौसेबद्दल जें वाटतें तें तिनें रुक्मिणीच्या निमित्तानें इथें व्यक्त केलें आहे. एवढेंच नव्हें तर हें वैभव निदान कल्पनेनें तरी उपभोगण्याचें समाधान मिळविण्याचा प्रयत्‍न केलेला आहे हें निश्चित !
विठ्ठलाच्या रूपाबद्दल या गीतांत आलेली भावना मोठी सुंदर आहे. काळ्या रंगांतहि किती सौंदर्य सापडतें, हें त्याच्या घरच्या धनदौलतीनें इथें दाखविण्याचा प्रयत्‍न केला आहे !
रुक्मिणीनें विठ्ठलाला पसंत केल्याची 'कोर्‍या कागदीं काळी शाई वर विठ्ठलाचं नांव' ही निशाणी इथें मोठ्या खुबीनें सांगितली आहे. त्यामुळें सुशिक्षित मनालाहि ही कल्पना वेड लावून सोडण्यासारखी आहे असें दिसून येईल !
विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यामधील प्रेमभावहि इथें मोठ्या छानदार रीतीनें व्यक्त झाला आहे. त्या दोघांमधील प्रेमलीला बघून चंद्रभागा हंसूं लागते, ही कल्पना तर विशेष सुंदर आहे.
आपले प्रिय भक्त घरीं येतात त्यांची आपणाला किती आवड आहे, हें दर्शविण्यासाठीं विठ्ठलानें इथें केलेली भाषा नितांतरम्य आहे. ज्ञानोबाला धोतर अंगावर घेऊन सामोरें जावयाचें आणि दारांत साधुसंतांची दिंडी उभी आहे, तेव्हां बंडी काढण्याची विनंति रुक्मिणीला करून पुढें व्हावयाची घाई करावयाची, ह्या गीतांनीं सांगितलेल्या भावना विठोबाची थोरवी तर गातातच; पण सामान्य मनाच्या भव्य कल्पनेचीहि चुणूक दाखवितात. विठ्ठलाचें एकूण वैभव या गीतांनीं खुलविलें व अधिक वाढविलें आहे, असें निश्चित म्हणावें लागेल.
राजा भिमक्काची रुक्‌मीन किती शानी
अंगं पाईला वर पंढरीचा राजा धनी
राजा भिमक्काची रुक्‌मीन उपवर
अंगं लिहिली पत्रिका लाविती देशावर
राजा भिमक्काच्या नऊजनी कन्या
धाकली रुक्‌मीन दिली पंढरीच्या वान्या
रुक्‌मीन दिली पंढरीच्या गुजर्‍याला
नऊ लाख मोतीं तिच्या पायींच्या जोडव्याला
इथें रुक्मिणीच्या लग्नाच्या वेळची हकीकत आली असून त्याची अखेर अशी झालेली आहे -
पंढरपुरांत काय वाजतं गाजतं
सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं
म्हणजे जुन्या काळच्या लग्न पद्धतीचीहि इथें हकीकत आलेली आहे. जुन्या काळीं मुलीनें स्वतः आपला नवरा पसंत करावयाची पद्धत होती तिचाच हा आविष्कार आहे. रुक्मिणीनें विठ्ठलाला पत्र पाठविलें अशी इथें सांगितलेली कल्पना मोठी आकर्षक तशीच आजच्या काळाला जुन्या पुराव्याची माहिती देणारीहि आहे. नऊ लाख मोतीं जोडव्याला लावणार्‍या रुक्मिणीचें या ठिकाणीं सांगितलेलें वैभव आगळें आहे !
रुक्मिनी विचारीती        देवा जनीचं काय नातं
विठ्ठल सांगीयीतो         पाखरूं वस्तीला आलं हुतं
देव विठ्ठल बोलतो     जनी माजीला कोन न्हाई
चंद्रभागाच्या काठावरी    धुनं धुतीया माजी बाई
आकाड एकादस        बाई विठ्ठल लालायाल
जनी लावीती ग शिडी    वागाट्याच्या येलायाला
गाद्यावरी गाद्या        सये झाल्यात्या बक्कळ (पुष्कळ)
विठूला आवडली        जनाबाईची वाकळ
इट्टलाच्या पायाला ग    रुक्‌मीन लावीती लोणी
खरंच सांगा देवा        कोन व्हवी तुमी जनी
पंढरीं झाली चोरी        कंठींचं गेलं पान
रुक्‌मीन किरकीरी        देवा विठूला माजी आन
विठ्ठल देव मोठा        बाहुरथी बाई गडी
जनीला दळूं लाग        जातं फेराखाली वडी
विठ्ठल देव बोल        जनी माजी सासुरवाशीं
दळनाची पाटी बाई        जनीच्या ग उशापाशीं
विठ्ठल विठ्ठल        हांक मारीतें राऊळांत
सावळा पांडुरंग        उभा जनीच्या मंदिरांत
विठ्ठल देव बोल        चल जने धुनं धुवूं
चंदनाच्या ग शिळा        धुनं ठेवनीचं काडूं
पंढरपूरांत ग            जनाईची गेली घाटी
देव ग नामदेव        उभ्या पेटंत दौंडी पिटी
जनाईचे मायबाप        देव विठू रुक्‌मीन
तुळशी वृंदावनीं        वेनी घालीती हातानं
जनी बसली न्हायाला    पानी न्हाई विसनाला
सावळे भैनाबाई        झरा फुटला पाषानाला
इठू बसला जेवायाला    पोळी ठेवी मांडी आड
सईला सांगूं किती        देवा जनीचं लई याड
इठू बसला जेवायाला    पोळी ठेवीली काढूनी
रखमाई बोल देवा        ठेवलं जनीला वाढूनी
विठ्ठल आणि जनाई यांच्यामधील निर्मळ जिव्हाळ्यानें रंगलेलीं जनाबाईचीं भावगीतें ऐकलेल्या सामान्य स्त्रियांनीं आपल्या परीनें जनाईची गोष्ट इथें सांगितलेली आहे. जनाई ही सामान्य स्त्री असूनहि विठ्ठलाला तिचें एवढें वेड कां असावें ही गोष्ट रुक्मिणीला समजत नाहीं. त्यामुळें ती तिच्याबद्दल विठ्ठलाला विचारते आहे आणि विठ्ठलहि तिला इथें उत्तर देत आहे !
विठ्ठलाच्या गळ्यांतील मौल्यवान हारामधील पान चोरीला गेल्याचें सूचकतेनें रुक्मिणीनें जनीवर घेतलेला आळ आणि जनाईची वाटी हारवलीं तेव्हां तीं सापडावी म्हणून नामदेवनें गांवांतील पेठेंत पिटलेली दौंडी, या इथें आलेल्या कल्पना मजेदार आहेत. त्यावरून रुक्मिणीच्या मनांत जनीबद्दल असलेला मत्सर व नामदेवाच्या मनांत जनीबद्दल असलेला आदर या गोष्टी व्यक्त होतात.
पैली माजी ववी        जनीच्या अंतरीं
भरली पंढरी            पांडुरंगा
दुसरी माजी ववी        जनीचा हुंकार
वाईट शेजार            पांडुरंगा
तिसरी माजी ववी        जिवा ताप लाही
जनी रडे धाई धाई        पांडुरंगा
चवथी माजी ववी        गडबडून ऊठ
सोडील वैकुंठ            पांडुरंगा
पांचवी माजी ववी         देव गरुडावर
गळीं शोभे हार         पांडुरंगा
सहावी माजी ववी         गदाचक्र हातीं
परकाशल्या            मूर्ति पांडुरंगा
सातवी माजी ववी         देव जनीच्या घरीं
गोपाळपुरीं            पांडुरंगा
आठवी माजी ववी         देव मधींच गेला
उठवी जनीला            पांडुरंगा
नववी माजी ववी         मग जनी ऊठ
झाली देव भेट         पांडुरंगा
दहावी माजी ववी        गोष्ट करीतें जनीशीं
आळवीतें तुजशी         पांडुरंगा
आकरावी माजी ववी     हारखली मनीं
शांत झाली जनी         पांडुरंगा
बारावी माजी ववी         हरी गाईला पुरता
अंबारीचा हत्ती         चंद्रभागेवरता
जनाईचें व पांडुरंगाचें गुणगान इथें या रीतीनें आणखी गाइलेलें आहे. पांडुरंगाची सावली जनीला कशी मिळत असे हें यावरून चांगलें लक्षात येतें.
शेवटी अंबारीचा हत्ती चंद्रभागेच्या वर जाईपर्यंत हरीनामाचा उच्चार झाला असें जें सांगितलें आहे, तें हें गुणगान किती वेळ चाललें होतें हे मापावयास उपयोगी पडतें. म्हणजे बराच वेळ ही भावना मनांत घोळत असली पाहिजे असें म्हणावयास हरकत नाहीं.
जातीची कळवातीन        तिला देवाजीचं याड
विठूबाच्या दारी         कानूपातरा तुजं झाड
साधूमंदीं साधू         नामदेव साधू खरा
विठ्ठला दारीं         झाला पायरीचा चिरा
कानू पातराचं झाड         सत्यभामानं लावीलं
रुक्मिनीबाईनं ग        फूल वेनीला खवीलं
कानू पातराचं झाड         सत्यभामा तुज्या दारीं
कळ्या पडत्याती         रुक्मिनीच्या शेजेवरी
पांडुरंग म्हणे         ऐक रुक्मिणी झणत्कार
हातीं वीणा टाळ         आले आले ज्ञानेश्वर
पोथीला मी जातें         तुमी सयानू जागा धरा
सावळा पांडुरंग         उभा चांदणीखालीं हिरा
विठ्ठलाच्या देवळामधील संतमंडळींचें स्थान आणि त्यांचेशीं घडलेलें विठ्ठल रुक्मिणीचें नातें इथें सांगण्यांत आलेलें आहे. त्याचप्रमाणें सत्यभामा व रुक्मिणी यांच्यामधील कल्पवृक्षासंबंधींचा शेवट कान्होपात्रेच्या झाडाच्या निमित्तानें सूचित झालेला आहे.
सर्वसामान्य स्त्रीला पोथीपुराणाला जाऊन देवादिकांच्या कथा ऐकण्याची जी आवड असते, तिचा देखील इथें मोठा सुंदर उल्लेख आलेला असून वाटेल तेवढा वेळ त्यापायीं तिष्ठत बसावयाचीहि ईर्षा शेवटीं 'उभा चांदणीखालीं हिरा' या रीतीनें मोठ्या हिरीरीनें सांगून टाकली आहे !
विठ्ठलासंबंधीं सामान्य मानवी मनानें केलेला असा आविष्कार आणखी मापतां येऊं नये एवढा अमाप असेल. परंतु माझ्या ओळखींत आला तो असा विविध प्रकारांनी नटला आहे. या खेरीज खेळांच्या गाण्यांनीं नटलेली विठ्ठलाबद्दलची भावना प्रस्तुत ग्रंथामध्यें वेगळ्या प्रकरणामध्यें आलेली आहेच.
अगदीं सर्वसामान्य स्त्रियांनीं विठ्ठलाची, त्याच्या कुटुंबाची आणि त्याच्या भक्त मंडळाची केलेली पारख आणि ठेवलेली आठवण ही अशी आहे. ती साधीभोळी असली तरी प्रामाणिक आहे. घरगुती असली तरी असामान्य आहे. आणि परिचित असली तरीहि विलक्षण सुंदर आहे.

N/A

References : N/A
Last Updated : December 25, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP