स्त्रीधन - लक्ष्मी आई

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

लक्ष्मी ही संपत्तीची देवता म्हणून सर्वत्र मानण्यांत येते. या देवतेनें आपल्यावर प्रसन्न व्हावें आणि आपलें घर खातेंपितें होऊन सुखाने नांदावें, म्हणून शेतकरी मंडळी शेतावर या देवतेची पूजा करीत असतात. ही पूजा नवीन पीक तरारून वर आलें म्हणजे प्रामुख्यानें केली जातें. त्याचप्रमाणें खळ्यावर मळणी सुरू झाली म्हणजे धान्याच्या राशीचीहि अशी पूजा करण्यांत येते. ह्या पूजेसाठीं हळदकुंकूं, फूल, गंध, उदबत्ती, नैवेद्य वगैरे साहित्य गोळा करतात.
लक्ष्मी आई आली            तूं ग आल्याली जाऊं नको
बाळाचा माझ्या            धरला पालव सोडूं नको
लक्ष्मी आई आली            आली बैलाच्या ग नकीं
माजा ग बाळराजा            धड्यानं सोनं जोकी
या ओव्यांनीं लक्ष्मी आईच्या आगमनाची व तिला केलेल्या प्रेमळ विनंतीची माहिती दिली आहे. माझ्या बाळाच्या धोतराचा पालव धरलेला सोडूं नकोस, चालू काळांत बसलेली शेताची घडी न विसकटतां उलट ती वाढीला लाव, अशी विनंति येथें करण्यांत आली असून, ती पाळली जाईलशी मनांत निर्माण झालेली आशा फुलावी म्हणून बैलाच्या पायांत नखांत तिचें वास्तव्य आहे, तेव्हां त्या हिंमतीवर माझा बाळ भरपूर संपत्ति मिळवील, असेंहि मग मोकळें करीत सांगितलें आहे !
बैलाच्या शक्तीवर आणि मदतीवर शेतीवर अवलंबून असल्यानें, ती भावना लक्षांत घेऊन झालेला हा आविष्कार मोठा आकर्षक वाटतो यांत शंका नाहीं. भोळ्या मनानें दिलेला हा विलोभनीय कौल आहे.
लक्ष्मी आई आली            आली शेता नि शिवारांत
सावळ्या बाळराजा            पाणी तुझ्या कीं घागरींत
लक्ष्मी आई आली            आली शेताच्या बांधासडीं
माझा ग बाळराजा            हातीं गोफण पाया पडी
लक्ष्मीचें आगमन कुठें आणी कसें झालें त्याची मनोहर हकीकत इथें आलेली आहे. मुलाच्या घागरीत पाणी आहे त्या अर्थी लक्ष्मीचें आगमन शेतामध्यें झालें आहे आणि हातांत गोफण घेऊन पाखरें हांकायला बाळ निघाला असतां पाया पडतो आहे, तेव्हां ती बांधावर येऊन उभी राहिली आहे, अशी या ठिकाणीं केलेली कल्पना सामान्य मनाच्या कल्पनाशक्तीचा दाखला देत आहे.
लक्ष्मी आई आली            धर माज्या तूं पदराला
नेणती माझी बाळ            धनी दावून देतो तुला
लक्ष्मी आई आली            धर माझ्या त्या हातायाला
पित्या माझ्या दौलताच्या        दोघी जाऊं त्या शेतायाला
आपल्या मनानें लक्ष्मी आली असतां तिला केलेली विनंति या पद्धतीनें प्रकट झालेली आहे. ही लक्ष्मी आपल्या मुलीला चांगला नवरा बघून देईल आणि तिच्याबरोबर आपण आपल्या वडिलांच्या शेतावर जाऊन वडिलांचें घर समृद्ध करूं, अशी या गीतांत व्यक्त झालेली कल्पना सामान्य मनाच्या हौशी भावनेची साक्ष देत आहे. संपत्ति भरपूर कां हवी त्यासाठीं दाखविलेली कारणें नित्य व्यवहारांतील असल्यानें बायकांना त्यांची गोडी अधिक. मुलीला चांगलें स्थळ मिळवायाचें म्हणजे आपल्या हौसेला मोल नसावें ही एक भावना आणि माहेरींहि आपली हौस भरपूर भागावी ही दुसरी भावना, लक्ष्मीच्या व्यावहारिक किंवा खर्चीक स्वभावाची कल्पना देत आहे.
लक्ष्मी आई आली            उभी राहिली मधल्या बांधा
जडावा माझा बंदु            कुरी रेटीतो गोरा चांद
लक्ष्मी आई आली            हातीं तांब्या तो अमृताचा
जडाव्या बंधुजीचा            वाडा विचारी समृताचा
लक्ष्मी आई आली            धरी हाताची करंगळी
पित्या माज्या दौलताची        चल दावीतें सोपामाळी
या गीतामध्यें लक्ष्मीआईच्या आगमनाची लागलेली चाहूल, तिनें बरोबर आणलेली देणगी आणि तिनें विचारलें म्हणून तिला सांगितलेला वडिलांच्या घरचा पत्ता एवढी माहिती आलेली आहे. ही सगळीच कल्पना इतकी आनंद निर्माण करणारी आहे कीं, पहिल्या ओवीला यमकाची नीट जुळणी झाली नाहीं, तरी त्या ओवीतील भावना कुठें खटकली नाहीं.
शेतांतील मधल्या बांधावर लक्ष्मी येऊन उभी रहाते आणि बरोबर आणलेलें अमृत द्यावे, म्हणून आपल्या अगोदरच सामर्थ्यवान, धनदौलत असलेल्या, वडिलांच्या घरचा पत्ता कुरी चालवीत असलेल्या भावाला विचारते आहे, अशी इथें सांगितलेली कल्पना मोठी अद्‌भुत आहे ! त्याचप्रमाणें तिनें आपल्या हाताच्या करांगुलीला धरून विचारपूस केल्यामुळें आपण मोठ्या खुशीनें 'वडिलांचे घर तुला दाखवितें म्हणून चल' म्हटलें अशीहि या ठिकाणीं आलेली कल्पना अद्‌भुतरम्य आहे यांत शंका नाहीं.
माणसाच्या मनावर अद्‌भुतरम्य गोष्टींचा असलेला पगडा आणि अद्‌भुत चमत्काराविषयीं असलेली गोडी इथें या प्रकारें प्रकट झालेली असल्यानें, ती ऐकतांच शेतीशीं तिळमात्र संबंध नसलेलीं माणसेंहि वेडी होऊन जातात !
लक्ष्मी ग आई            चल शीवेच्या शेता जाऊं
                    चल धावेव हुबा र्‍हाऊं
लक्ष्मी ग आई            चारी कोपर आमी पाहूं
                    हिरीं बारवीं पाणी पिऊं
लक्ष्मी ग आई            चल आमुच्या शेतायाला
                    दुवा पित्याला दियाला
या गीतांनीं वडिलांच्या घरचें वैभव लक्ष्मीला दाखवून तिचा वडिलांना आशीर्वाद मिळविण्याचें भाग्य व्यक्त केलें आहे. माहेरच्या संपत्तीबद्दलचा हा अभिमान या रीतीने इथें सांगितलेला दिसून येईल ! बायकांना मुळांतच माहेराबद्दल अपार प्रेम असतें. तशांत असें कांहीं बोलून दाखवावचा योग आला म्हणजे त्यांच्या या भावनेला आणखीनच उधाण येतें ! त्या दृष्टीनें या ओव्या जरूर पाहण्यासारख्या आहेत.
लक्ष्मी आई आली            तांब्यानं ताक पेली
बंदुरायाला माज्या            गवळ्याला हांक दिली
लक्ष्मी आई आली            मोत्यापवळ्यांनी वटी भरा
झाल्या तिन्ही सांजा            दिव्याची ग वात करा
लक्ष्मी आई आली            आली पांगळ्या पायाची
बंदूला करती बोली            न्हाई परत जायाची
घरीं आलेल्या लक्ष्मीचें स्वागत कसें झालें आणि त्यामुळें याच लक्ष्मीला परत जायचा मोह कसा झाला नाहीं याची मजेदार हकीकत इथें दिलेली आहे !
लक्ष्मीची ओटी मोत्या पोवळ्यांनीं भरली त्यामुळें ती खूष झाली आणि तिला भरपूर ताक प्यायला मिळाल्यानें ती संतुष्ट झाली, अशी ही सुंदर कल्पना आहे. या माहितीवरून लक्ष्मीचें स्वागत जुन्या रीतरिवाजाप्रमाणें कसें झालें हें तर दिसतेंच, परंतु त्या वेळची मोत्या पोवळ्यांनीं ओटी भरायची म्हणजे स्वस्ताई किती असे हेंहि यावरून लक्षांत येतें. ओटी भरावयाची म्हणजे सौभाग्याचें लक्षण आणि ताक द्यावयाचें म्हणजे अमृत प्यायला द्यावयाचें आणि तेंही तांब्या भरून, हेंहि मोठ्या भाग्याचें लक्षण होय ! 'तकं शक्रस्य दुर्लभम्' म्हणजे ताक हें इंद्रालाहि मिळायला कठीण असते, अशी ताकाची महति गाइलेली आहे.
लक्ष्मी आईला इथें पांगळ्या पायाची म्हटलें आहे ! याचा अर्थ एवढाच घ्यावयाचा कीं, तिचा पाय आतां आल्याघरींच रुतून बसावा, एवढी ती खूष झालेली आहे ! तिनें परत न जाण्याची भावाजवळ इथें दिलेली ही या प्रकारची कबुली मोठी ह्रद्य आहे.
तिन्हीसांज झाली आहे तेव्हां दिवा लावण्याविषयीं या गीतांत केलेली सूचनाहि लक्ष्मीच्या स्वागताला शोभेल अशीच आहे.
लक्ष्मी आई आली            आली उठत बसयीत
माज्या ग हावशाचा            वाडा गवळ्याचा पुसयीत
अस्तुरी पुरुषाचा            दोनीचा नित्य दावा
लक्ष्मी आई बोल            मी उगीच आली देवा
अस्तुरी पुरुषाचं            दोनीचं एक चित्त
लक्ष्मी आई बोल            मी आल्यानं न्हाई हित
या गीतांमध्यें आळशी अगर व्यसनी पुरुषाच्या घरीं यायला लक्ष्मीनें घेतलेले आढेवेढे आणि अशा घरीं आल्याबद्दल तिला होणारा पश्चात्ताप बोलून दाखविलेला आहे.
चैनी अगर व्यसनी माणसाच्या घरीं लक्ष्मी रहात नाहीं, असें जें व्यावहारिक जीवनांत दिसून येतें, त्याची प्रचिति इथें या रीतीनें येत आहे ! ज्या घरांत नवरा बायको गुण्यागोविंदानें नांदतात तिथेंच लक्ष्मीला रहायला आवडतें, ही कल्पनाहि इथें सूचित करण्यांत आलेली आहे.
लक्ष्मीआईचें प्रतीक म्हणून कुठें कुठें शेतामध्यें एखाद्या दगडावर शेंदूर फासून त्याची पूजा करण्यांत येते. अशा वेळींहि या निमित्तानें बायका पुढील ओव्या गातात-
ईश्वबीराच्या पिंडीं            बेल वाहिला शिळाताजा
ताईता बंदू माजा            पुत्र मागून आला राजा
ईश्वबीराच्या पिंडीं            सासू मालन माजी गेली
हळदीकुंकवाची            रास खंडूनी मला दिली
ईश्वबीराच्या पिंडीं            बाई म्यां वाहिल पिवळ सातू
बाळाईचं माज्या बाळ        हौससारक माज नातू
या ठिकाणीं धन दौलतीबरोबरच लक्ष्मीआईजवळ मुलाबाळांची, नातवांची, सुखसमृद्धीची आणि सौभाग्याच्या लेण्याची मागणी केली असून, स्त्रियांच्या स्वभावाला धरूनहि ती आहे असें दिसून येईल.
लक्ष्मीआईची माझ्या ओळखीची पूजा ही अशी आहे. तिची आणखी रूपेंहि असूं शकतील. परंतु या पूजेमागची भावना मात्र अशीच असल्याकारणानें एवढ्यावरूनहि तिच्या थोरवीची सहज कल्पना करतां येण्यासारखी आहे.


Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP