मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌मुअमिन

सूरह - अल्‌मुअमिन

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ८५)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

हाऽमीऽऽम. या ग्रंथाचे अवतरण अल्लाहकडून आहे जो जबरदस्त आहे, सर्वकाही जाणणारा आहे. गुन्हा माफ करणारा आणि पश्चात्ताप स्वीकारणारा आहे, कठोर शिक्षा देणारा आणि मोठा उदारहस्त आहे, कोणी उपास्य त्याच्याव्यतिरिक्त नाही. त्याच्याकडेच सर्वांना रुजू व्हायचे आहे. (१-३)

अल्लाहच्या वचनांत वाद घालीत राहतील केवळ ते लोक ज्यांनी द्रोह केला आहे. यानंतर जगाच्या देशातील त्यांच्या वावरण्याने तुमची फसगत होऊ नये. यांच्यापूर्वी नूह (अ.) च्या राष्ट्रानेसुद्धा खोटे ठरविले आहे. आणि त्यांच्यानंतर बर्‍याचशा अन्य जमातींनीसुद्धा हे काम केले आहे. प्रत्येक लोकसमूहाने आपल्या प्रेषितावर झडप घातली जेणेकरून त्याला पकडावे. त्या सर्वांनी असत्याच्या हत्याराने सत्याला नमविण्याचा प्रयत्न केला परंतु सरतेशेवटी मी त्यांनी पकडले, मग पहा, माझी शिक्षा किती कठोर होती. अशाच प्रकारे तुझ्या पालनकर्त्याचा हा निर्णयसुद्धा त्या सर्व लोकांवर लागू झाला आहे ज्यांनी, सत्याचा इन्कार केला आहे. ते नरकवासी होणार आहेत. (४-६)

ईश-सिंहासनधारी दूत आणि जे ईश-सिंहासनाच्या सभोवती उपस्थित राहतात. ते सर्व आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबरच त्याचे पावित्र्यगान करीत आहेत. ते त्याच्यावर श्रद्धा ठेवतात आणि श्रद्धा ठेवणार्‍यांसाठी क्षमेची प्रार्थना करतात. ते म्हणतात, “हे आमच्या पालनकर्त्या, तू आपली कृपा व आपल्या ज्ञानानिशी प्रत्येक चराचरास व्यापिले आहेस, म्हणून क्षमा कर आणि नरकाच्या यातनेपासून वाचव, त्या लोकांना ज्यानी पश्चाताप व्यक्त केला आहे आणि तुझा मार्ग स्वीकारला आहे. हे आमच्या पालनकर्त्या, आणि दाखल कर त्यांना सदैव राहणार्‍या त्या स्वर्गामध्ये ज्यांचे तू त्यांना वचन दिले आहेस, आणि त्यांच्या आईवडील आणि पत्नीं व संततीपैकी जे सदाचारी असतील (त्यांनासुद्धा तेथे त्यांच्याबरोबर पोहचव) तू नि:संशय सामर्थ्यसंपन्न आणि बुद्धिमान आहेस. आणि वाचव त्यांना वाईट गोष्टींपासून. ज्याला तू वाईट गोष्टीपासून पुनरुत्थानाच्या दिवशी वाचविले त्यावर तू मोठी मेहरबानी केलीस, हेच महान यश आहे.” (७-९)

ज्या लोकांनी द्रोह केलेला आहे, पुनरुत्थानाच्या दिवशी त्यांना हांक मारून सांगितले जाईल, “आज तुम्हाला जितका भयंकर राग स्वत:वर येत आहे, अल्लाह तुम्हावर त्यापेक्षा जास्त क्रोधित त्यावेळी होतअसे जेव्हा तुम्हाला श्रद्धेकडे बोलविण्यात येत होते आणि तुम्ही द्रोह करीत होता.” ते म्हणतील, “हे आमच्या पालनकर्त्या, तू खरोखर आम्हाला दोन वेळा मृत्यू आणि दोन वेळा जीवन दिले, आता आम्हीआपले गुन्हे मान्य करतो, आता येथून निघण्याचा एखादा मार्ग आहे काय?” (उत्तर मिळेल) “ही स्थिती ज्यामध्ये तुम्ही गुरफटलेले आहात, अशा करणाने आहे की जेव्हा एकटया अल्लाहकडे बोलाविले जात होते तेव्हा तुम्ही मानण्यास नकार देत होता, आणि जेव्हा त्याच्याबरोबर दुसर्‍यांना बोलाविले जात असे तेव्हा तुम्ही मान्य करीत होता, आता निर्णय श्रेष्ठ व उच्चतर अल्लाहच्या हाती आहे.”(१०-१२)

तोच आहे जो तुम्हाला आपले संकेत दाखवीत असतो आणि आकाशांतून तुमच्याकरिता उपजीविका उतरवीत असतो. परंतु (या संकेतांच्या निरीक्षणाने) बोध केवळ तोच मनुष्य घेतो; जो अल्लाहकडे रुजू होणारा असेल. (म्हणून हे रुजू होणार्‍यांनो!) अल्लाहचाच धावा करा, आपला धर्म त्याच्याकरिता विशुद्ध राखून. मग तुमचे हे कृत्य अश्रद्धावंतांना कितीही अप्रिय वाटो. (१३-१४)

तो उच्च दर्जे राखणारा, सिंहासना (अर्श) चा स्वामी आहे. आपल्या दासांपैकी ज्वावर इच्छितो त्यावर आपल्या आज्ञेने आत्मा अवतरतो जेणेकरून भेटीच्या दिवसापासून त्याने सावध करावे. तो दिवस, जेव्हा सर्वजण उघडे असतील, अल्लाहपासून त्यांची कोणतीही गोष्ट लपलेली नसेल. (त्या दिवशी पुकारून विचारले जाईल.) आज साम्राज्य कोणाचे आहे? (सर्व जग मोठयाने उद्‌गारेल) एकमेव महाप्रतापी अल्लाहचे. सांगितले जाईल आज प्रत्येक सजीवाला त्या कमाईचा बदला दिला जाईल जी त्याने केली होती, आज कोणावर कसलाही अत्याचार होणार नाही, आणि अल्लाह हिशेब घेण्यात फार तत्पर आहे. हे पैगंबर (स.), भय दाखवा या लोकांना त्या दिवसाचे जो जवळ येऊन ठेपला आहे. जेव्हा काळीज तोंडाशी येत असतील आणि लोक निमूटपणे दु:खाचे घोट गिळून उभे असतील, अत्याचार्‍यांचा कोणी प्रेमळ मित्रही नसेल आणि कोणी शिफारस करणारादेखील नसेल की ज्याचे म्हणणे मान्य केले जावे. अल्लाह. दृष्टीच्या चोरीलादेखील जाणतो आणि ते रहस्यसुद्धा जाणतो जे मनांनी लपवून ठेवले आहेत. आणि अल्लाह ठीकठीक नि:पक्षपणे निर्णय देईल. उरले ते ज्यांचा (हे अनेकेश्वरवादी) अल्लाहला सोडून धावा करतात, ते कोणत्याही गोष्टीचा निर्णय लावणार नाहीत, नि:संशय अल्लाहच सर्वकाही ऐकणारा व पाहणारा आहे. (१५-२०)

हे लोक पृथ्वीवर कधी निरीक्षण करीत नाहीत काय की यांना त्या लोकांचा शेवट दिसला असता जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत? ते यांच्यापेक्षा अधिक शक्तिमान होते आणि यांच्यापेक्षा अधिक प्रबळ अवशेष पृथ्वीवर सोडून गेले आहेत. परंतु अल्लाहने त्यांच्या अपराधांबद्दल त्यांना पकडले आणि त्यांना अल्लाहपासून वाचविणारा कोणीही नव्हता. असा त्यांचा शेवट यामुळे झाला की त्यांच्याजवळ त्याचे प्रेषित स्पष्ट प्रमाण घेऊन आले आणि त्यांनी मानण्यास नकार दिला. सरतेशेवटी अल्लाहने त्यांना पकडले. निश्चितच तो मोठा सामर्थ्यवान आणि शिक्षा देण्यात अत्यंत कठोर आहे. (२१-२२)

आम्ही मूसा (अ.) ला फिरऔन, आणि हामान व कारूनकडे आपले संकेत आणि नियुक्तीच्या स्पष्ट सनदीसह पाठविले परंतु त्यांनी सांगितले, “लबाड आणि जादुगार आहेत.” जेव्हा त्यांनी आमच्याकडून सत्य त्यांच्यासमोर ठेवले तेव्हा त्यांनी सांगितले, “जे लोक श्रद्धा ठेवून याच्याबरोबर सामील झाले आहेत, त्यांच्या सर्व मुलांना ठार मारा आणि मुलींना जिवंत सोडा.” परंतु अश्रद्धावंतांची कारस्थाने फोल ठरली. (२३-२५)

एके दिवशी फिरऔनने आपल्या दरबारी लोकांना सांगितले, “सोडा मला, मी या मूसा (अ.) ला ठार करून टाकतो, आणि पुकारून पहावे याने आपल्या पालनकर्त्याला. मला भीती आहे की हा तुमचा धर्म बदलून टाकील, अथवा देशात उपद्रव माजवील.” (२६)

मूसा (अ.) ने सांगितले, “मी तर त्या प्रत्येक गर्विष्ठांविरूद्ध जो हिशेबाच्या दिवसावर श्रद्धा ठेवीत नाही, आपला पालनकर्ता व तुमच्या पालनकर्त्याचा आश्रय घेतला आहे.” (२७)

त्याप्रसंगी फिरऔनवंशियांपैकी एक माणूस ज्याने आपली श्रद्धा लपवून ठेवली होती, म्हणाला, “काय तुम्ही एका माणसाला केवळ या कारणाने ठार कराल की तो सांगतो, माझा पालनकर्ता अल्लाह आहे? वस्तूत: तो तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यापाशी स्पष्ट प्रमाण घेऊन आला, जर तो खोटा असेल तर त्याचे असत्य त्याच्याच अंगलट येईल, परंतु जर तो खरा असेल तर ज्या भयंकर  परिणामांची तो तुम्हाला भीती दाखवीत आहे त्यापैकी काही तर जरूर तुमच्यावर येतील. अल्लाह कोणत्याही अशा माणसाला मार्गदर्शन करीत नाही जो मर्यादा ओलांडणारा आणि मोठा लबाड असेल. हे माझ्या राष्ट्रबांधवांनो! आज तुम्हाला राज्य प्राप्त आहे आणि पृथ्वीवर तुमचा वरचष्मा आहे परंतु जर अल्लाहचा प्रकोप आमच्यावर कोसळला तर मग कोण आहे जो आम्हाला मदत करू शकेल?” फिरऔनने सांगितले, “मी तर तुम्हा लोकांसमोर तेच मत व्यक्त करीत आहे जे मला योग्य दिसते, आणि मी त्याच मार्गाकडे तुमचे मार्गदर्शन करतो जो यथायोग्य आहे.” (२८-२९)

तो मनुष्य ज्याने श्रद्धा ठेवली होती त्याने सांगितले, “हे माझ्या राष्ट्रबांधवांनो, मला भय आहे की एखादे वेळी तुमच्यावरसुद्धा तो दिवस येईल जो यापूर्वी बर्‍याचशा जथ्यांवर आलेला आहे, जसा दिवस नूह (अ.) च्या लोकांवर आणि आद व समूद व त्यांच्या नंतरच्या लोकसमूहांवर आला होता. आणि ही वस्तुस्थिती आहे की अल्लाह आपल्या दासांवर अत्याचाराचा कसलाही इरादा बाळगत नाही. हे राष्ट्र्बांधवांनो, मला भय आहे की एखादे वेळी तुम्हावर गयावया करण्याचा दिवस येऊ नये. जेव्हा तुम्ही एकमेकाला हाका माराल आणि धावत फिराल, परंतु त्यावेळी अल्लाहपासून वाचविणारा कोणीही असणार नाही. सत्य असे आहे की ज्याला अल्लाहने भटकविले त्याला मग मार्ग दाखविणारा कोणीही नसेल. यापूर्वी यूसुफ (अ.) तुम्हापाशी स्पष्ट प्रमाण घेऊन आले होते, परंतु तुम्ही त्यांनी आणलेल्या शिकवणीसंबंधी साशंक राहिला. मग जेव्हा त्याचे निधन झाले तेव्हा तुम्ही सांगितले, आता त्यांच्यानंतर अल्लाह कोणताही प्रेषित कदापि पाठविणार नाही.”-अशाच प्रकारे अल्लाह त्यासर्व लोकांना पथभ्रष्टतेत टाकतो जे मर्यादा उल्लांघन करणारे आणि शंकाखोर असतात, आणि अल्लाहच्या संकेतात तंटे करतात याविना की त्यांच्याकडे एखादे प्रमाण अथवा सनद आलेली नसतानाही हे वर्तन अल्लाह आणि श्रद्धा ठेवणार्‍यांजवळ अत्यंत वाईट आहे. अशाच प्रकारे अल्लाह प्रत्येक गर्विष्ठ आणि कठोर व्यक्तीची ह्रदये मोहरबंद करतो. (३०-३५)

फिरऔनने सांगितले, “हे हामान, माझ्यासाठी एक उत्तुंग इमारत बनव जेणेकरून मी मार्गापर्यंत पोहचू शकेन, आकाशांच्या मार्गापर्यंत, आणि मूसा (अ.) च्या ईश्वराला मी डोकावून पाहीन. मला तर हा मूसा (अ.) खोटारडाच वाटतो.”- अशाप्रकारे फिरऔनसाठी त्याच्या दुसचार आकर्षक बनविला गेला आणि सरळ मार्गापासून तो रोखला गेला. फिरऔनची संपूर्ण कुटिलता (त्याच्या स्वत:च्या) सर्वनाशाच्या मार्गात खर्ची पडली. (३६-३७)

तो मनुष्य ज्याने श्रद्धा ठेवली होती, म्हणाला, “हे माझ्या राष्ट्रबांधवांनो, माझे म्हणणे ऐका, मी तुम्हाला सरळमार्ग दाखवीत आहे. हे राष्ट्रबंधुनो, हे ऐहिक जीवन तर क्षणभंगूर आहे, नेहमीच्या निवासाची जागा तर परलोकच आहे. जो दुराचार करील त्याला तेवढाच बदला मिळेल जितका याने दुराचार केला असेल आणि जो सत्कर्म करील, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, तो श्रद्धावंत असावा, असे सर्व लोक स्वर्गामध्ये प्रविष्ट होतील. तेथे त्यांना अमाप उपजीविका दिली जाईल. हे बंधूंनो, अखेर ही काय गोष्ट आहे की मी तर तुम्हा लोकांना मुक्तीकडे बोलावीत आहे आणि तुम्ही मला अग्नीकडे आमंत्रित करीत आहात! तुम्ही मला या गोष्टीचे आमंत्रण देत आहांत की मी अल्लाहशी द्रोह करावा आणि त्याच्याबरोबर अशा जणांना भागीदार ठरवावे ज्यांना मी जाणत नाही. वास्तविकत: मी तुम्हाला त्या जबरदस्त क्षमाशील ईश्वराकडे बोलावीत आहे. नव्हे, सत्य असे आहे, आणि याच्याविरूद्ध असू शकत नाही की ज्यांच्याकडे तुम्ही मला बोलावीत आहात, त्यांच्यासाठी जगातही कुठले आवाहन नाही आणि परलोकमध्ये सुद्धा नाही. आणि आम्हा सर्वांना परतणे अल्लाहकडेच आहे, आणि मर्यादा ओलांडणारे अग्नीत जाणार आहेत. आज जे काही मी म्हणत आहे, लवकरच ती वेळ येईल जेव्हा तुम्ही ते आठवाल. आणि आपले प्रकरण मी अल्लाहच्या स्वाधीन करतो. तो आपल्या दासांची काळजी घेणारा आहे.” (३८-४४)

सरतेशेवटी त्या लोकांनी ज्या वाईटातल्या वाईट चाली त्या श्रद्धावंतांविरूद्ध लढविल्या, अल्लाहने त्या सर्वांपासून त्याला वाचविले, आणि फिरऔनचे सोबती स्वत: अत्यंत वाईट प्रकोपाच्या चक्रात सापडले. नरकाग्नी आहे ज्याच्यापुढे ते सकाळ-संध्याकाळ पेश केले जातील. आणि जेव्हा पुनरुत्थानाची घटिका येऊन ठेपेल तेव्हा आज्ञा होईल की फिरऔनी लोकांना कठोरतम प्रकोपात दाखल करा. मग जरा कल्पना करा त्या वेळेची जेव्हा हे लोक नरकांत एकदुसर्‍याशी भांडत असतील. जगात जे लोक दुर्बल होते ते मोठे बनणार्‍यांना सांगतील, “आम्ही तुमच्या अधीन होतो, आता येथे तुम्ही नरकाग्नीच्या यातनेपैकी काही अंशी आम्हाला वाचवाल काय?” ते मोठे बनणारे उत्तर देतील, “आम्ही सर्वजण येथे एकाच परिस्थितीत आहोत, आणि अल्लाहने दासांच्या दरम्यान निर्णय करून टाकला आहे.” मग हे नरकाग्नीत पडलेले लोक नरकाच्या कर्मचार्‍यांना सांगतील, “आपल्या पालनकर्त्याची प्रार्थना करा की आमच्या यातना त्याने केवळ एका दिवसाने कमी कराव्यात.” ते विचारतील, “तुमच्याजवळ प्रेषित स्पष्ट प्रमाण घेऊन येत राहिले नव्हते काय?” ते म्हणतील, “होय.” नरकाचे कर्मचारी म्हणतील, “मग तर तुम्हीच प्रार्थना करा, आणि अश्रद्धावंतांची प्रार्थना वायाच जाणार आहे.” (४५-५०)

खात्री बाळगा की आम्ही आपल्या प्रेषितांची आणि श्रद्धा ठेवणार्‍यांची मदत या जगाच्या जीवनांतसुद्धा निश्चितपणे करीत असतो, आणि या दिवशीसुद्धा करू जेव्हा साक्षीदार उभे राहतील, जेव्हा अत्याचार्‍यांना त्यांचे निमित्त दाखविणे काहीच लाभदायी ठरणार नाही आणि त्यांचा धिक्कार होईल आणि अत्यंत वाईट ठिकाण त्यांच्या वाटयास येईल. शेवटी पहा, मूसा (अ.) ला आम्ही मार्गदर्शन केले आणि बनीइस्राईलना त्या ग्रंथाचे वारस बनविले, जो बुद्धी आणि विवेक बाळगणार्‍यांसाठी मार्गदर्शन आणि उपदेश होता. म्हणून हे पैगंबर (स.), संयम राखा, अल्लाहचे वचन सत्याधिष्ठित आहे, आपल्या चुकीबद्दल क्षमा-याचना करा आणि सकाळ-संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबरच त्याचे पावित्र्यगान करीत राहा. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक एखादी सनद अथवा प्रमाणाविना जो त्यांच्याजवळ आलेला आहे, अल्लाहच्या संकेतांमध्ये भांडत आहेत, त्यांच्या मनांत गर्व भरलेला आहे, परंतु ते त्या मोठेपणाप्रत पोहचणार नाहीत ज्याचा ते अभिमान बाळगतात. म्हणून अल्लाहचा आश्रय मागा, तो सर्वकाही पाहतो आणि ऐकतो. (५१-५६)

आकाशांना आणि पृथ्वीला निर्माण करणे मानवाला निर्माण करण्याच्या तुलनेत खचितच अधिक मोठे कार्य आहे, परंतु बहुतेकजण जाणत नाहीत. आणि असे होऊ शकत नाही की आंधळा आणि डोळस एकसमान होतील आणि श्रद्धावंत व सदाचारी आणि दुराचारी एकसमान ठरतील. परंतु तुम्ही लोक काहीसे कमीच समजता. निश्चितच पुनरुत्थानाची घटिका येणार आहे, तिच्या आगमनात कोणतीच शंका नाही, परंतु बहुतेक लोक मानत नाहीत. (५७-५९)

तुमचा पालनकर्ता सांगतो. “माझा धावा करा. मी तुमच्या प्रार्थना स्वीकारीन. जे लोक गर्वांत येऊन माझ्या उपासनेपासून तोंड फिरवितात, निश्चितच ते अपमानित होऊन नरकामध्ये दाखल होतील.” (६०)

तो अल्लाहच तर आहे ज्याने तुमच्यासाठी रात्र बनविली जेणेकरून तुम्ही त्यात शांती व समाधान प्राप्त करावे आणि दिवसाला प्रकाशमान केले. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह लोकांवर मोठी मेहेरबानी करणारा आहे परंतु बहुतेक लोक कृतज्ञता मानीत नाहीत. तोच अल्लाह (ज्याने तुमच्यासाठी हे सर्वकाही केले आहे) तुमचा पालनकर्ता आहे. प्रत्येक वस्तूचा निर्माता. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही उपास्य नाही. मग तुम्ही कोणीही उपास्य नाही. मग तुम्ही कोणीकडून बहकविले जात आहात? अशाच प्रकारे ते सर्व लोक बहकविले जात राहिले आहेत, जे अल्लाहच्या संकेतांचा इन्कार करीत असतात. (६१-६३)

तो अल्लाहच तर आहे तुमच्यासाठी पृथ्वीला निवासस्थान बनविले आणि या आकाशाचे घुमट बनविले. ज्याने तुमचे रूप बनविले आणि फारच चांगले बनविले. ज्याने तुम्हाला शुद्धा वस्तूंची उपजीविका दिली. तोच अल्लाह (ज्याची ही कामे आहेत) तुमचा पालनकर्ता आहे, अतिशय समृद्धशाली आहे तो सृष्टीचा पालनकर्ता, तोच जिवंत आहे, त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही, त्याचाच तुम्ही धावा करा, आपल्या धर्माला त्याच्यासाठीच विशुद्धा राखून. सर्व स्तुती सकल जगांचा पालनकर्ता अल्लाहसाठीच आहे. (६४-६५)

हे पैगंबर (स.), या लोकांना सांगा की मला तर त्या अस्तित्वांच्या उपासनेची मनाई केली गेली आहे, ज्यांचा तुम्ही अल्लाहला सोडून धावा करता (मी हे काम कसे करू शकतो) जेव्हा माझ्या पालनकर्त्याकडून माझ्याकडे स्पष्ट प्रमाण आले आहेत, मला आज्ञा दिली गेली आहे की मी सकल जगांच्या पालनकर्त्यापुढे नतमस्तक व्हावे. (६६)

तोच तर आहे ज्याने तुम्हाला मातीपासून निर्माण केले, मग वीर्यापासून, मग रक्ताच्या गोळ्यापासून, मग तो तुम्हाला अर्भकाच्या रूपांत काढतो, मग तुम्हाला वाढवितो जेणेकरून तुम्ही आपल्या पूर्ण शक्तीप्रत पोहोचता. मग आणखी वाढवितो जेणेकरून तुम्ही वृद्धावस्था गाठावी. आणि तुमच्यापैकी एखादा अगोदरच परत बोलाविला जातो. हे सर्वकाही अशासाठी केले जाते की तुम्ही आपली ठरलेली वेळ गाठावी आणि अशासाठी की तुम्हाला वस्तुस्थिती कळावी. तोच आहे जीवन देणारा आणि तोच मृत्यू देणारा आहे. तो जेव्हा कोणत्या गोष्टीचा निर्णय घेतो. केवळ एक आज्ञा देतो की ती होवो आणि ती होते. (६७-६८)

तुम्ही पाहिले काय त्या लोकांना जे अल्लाहच्या वचनांमध्ये वाद घालतात,  कोठून ते फिरविले जात आहेत? हे लोक जे या ग्रंथास आणि त्या सर्व ग्रंथांस खोटे लेखत आहेत, जे आम्ही आमच्या प्रेषितांबरोबर पाठविले होते, लवकरच यांना कळून येईल. जेव्हा जोखड यांच्या मानेत असतील आणि साखळ्या, ज्यांनी पकडून ते उकळत्या पाण्याकडे फरफटले जातील आणि नंतर नरकाग्नीत लोटले जातील. मग यांना विचारले जाईल. “आता कोठे आहेत अल्लाहव्यतिरिक्त ते इतर उपास्य ज्यांना तुम्ही भागीदार करीत होता?” ते उत्तर देतील, “हरवले गेले ते आम्हाकडून किंबहुना आम्ही यापूर्वी कोणत्याही वस्तूचा धावा करीत नव्हतो.” अशा प्रकारे अल्लाह, अश्रद्धावंतांचे मार्गभ्रष्ट असणे प्रणाणित करील. त्यांना सांगण्यात येईल. “हा असा तुमचा शेवट यासाठी झाला आहे की तुम्ही पृथ्वीत असत्यावर मग्न होता आणि शिवाय त्यावर तुम्ही गर्व करीत होता. आता जा नरकाच्या दारांत प्रविष्ट व्हा, सदैव तुम्हाला तेथेच राहावयाचे आहे, फारच वाईट ठिकाण आहे गर्विष्ठांचे.” म्हणून हे पैगंबर (स.), संयम राखा, अल्लाहचे वचन सत्याधिष्ठित आहे. आता एक तर आम्ही तुमच्यासमोरच यांना त्या वाईट परिणामांचा काही भाग दाखवू, ज्यांची भीती आम्ही यांना दाखवीत आहोत, अथवा (त्यापूर्वी) तुम्हाला दुनियेतून उचलून घ्यावे, परतून यावयाचे तर यांना आमच्याकडेच आहे. (६९-७७)

हे पैगंबर (स.), तुमच्यापूर्वी आम्ही अनेक प्रेषित पाठवून दिलेले आहेत, ज्यांच्यापैकी काहींची माहिती आम्ही तुम्हाला सांगितली आहे व काहींची सांगितलेली नाही. कोणत्याही प्रेषिताचे हे सामर्थ्य नव्हते की अल्लाहच्या आज्ञेविना स्वत:च एखादा संकेत घेऊन यावा. मग जेव्हा अल्लाहचा आदेश आला तेव्हा सत्याबरहुकुम निर्णय लावला गेला आणि त्यावेळी मिथ्याकारी लोक तोटयात आले. अल्लाहनेच तुमच्यासाठी ही चतुष्पाद जनावरे बनविली आहेत जेणेकरून त्यांच्यापैकी काहींवर तुम्ही स्वार व्हावे आणि काहींचे मांस खावे. त्यांच्यात तुम्हासाठी अन्य पुष्कळसे लाभ आहेत. ते या कामीसुद्धा येतात की तुमच्या मनात जेथे जाण्याची गरज असेल, तेथे तुम्ही त्यांच्यावर स्वार होऊन पोहचू शकाल. त्यांच्यावरसुद्धा आणि नौकांवरसुद्धा तुम्ही स्वार केले जाता. अल्लाह आपले हे संकेत तुम्हाला दाखवीत आहे, बरे तुम्ही त्याच्या कोणकोणत्या संकेतांचा इन्कार कराल.? (७८-८१)

मग काय हे पृथ्वीवर वावरले नाहीत, की यांना त्या लोकांचा शेवट दिसला असता जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत? ते संख्येत यांच्यापेक्षा जास्त होते, यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली होते आणि पृथ्वीवर यांच्यापेक्षा जास्त वैभवशाली अवशेष सोडून गेले आहेत. जी काही कमाई त्यांनी केली होती, शेवटी ती त्यांच्या कोणत्या उपयोगी पडली बरे? जेव्हा त्यांचे प्रेषित त्यांच्याकडे स्पष्ट प्रमाण घेऊन आले तेव्हा ते त्या ज्ञानातच मग्न राहिले जे त्यांच्या स्वत:जवळ होते आणि मग त्या गोष्टीच्या फेर्‍यात आले जिची ते थट्टा करीत असत. जेव्हा त्यांनी आमचा प्रकोप पाहिला तेव्हा ते म्हणाले की आम्ही ज्याचा कोणीही भागीदार नाही अशा एकमेव अल्लाहला मानले आणि आम्ही इन्कार करतो त्या सर्व उपास्यांचा ज्यांना आम्ही त्याचा भागीदार ठरवीत होतो. परंतु आमचा प्रकोप पाहिल्यानंतर त्यांची श्रद्धा त्यांच्यासाठी काहीही लाभदायक ठरू शकल नव्हती, कारण हाच अल्लाहचा ठरलेला शिरस्ता आहे जो सदैव त्याच्या दासांमध्ये जारी राहिला आहे, आणि त्यावेळी अश्रद्धावंत लोक तोटयात आले. (८२-८५)

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP