मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
मरयम

सूरह - मरयम

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ९८)

अल्लाहच्या नावाने,
जो अत्यंत दयावंत व असीम  कृपावंत आहे.

“काऽऽफ, हाऽ, याऽ, ऐऽऽन, सॉऽऽद.” उल्लेख आहे त्या कृपेचा जी तुझ्या पालनकर्त्याने आपला भक्त जकरिय्यावर केली होती, जेव्हा त्याने आपल्या पालनकर्त्याला हळुवारपणे पुकारले. (१-३)

त्याने विनविले, “हे पालनकर्त्या! माझी हाडेदेखील खिळखिळी झाली आहेत आणि डोके वार्धक्याने भडकले आहे. हे पालनकर्त्या, मी कधी तुझ्याजवळ प्रार्थना करून निष्फळ राहिलो नाही. मला माझ्या पाठीमागे आपल्या भाईबंदांच्या दुष्टतेचे भय आहे आणि माझी पत्नी वांझ आहे. तू मला आपल्या विशेष कृपेने एक वारस प्रदान कर, जो माझा वारसदेखील असावा व ज्याला याकूब वंशीयाचा वारसादेखील मिळावा. आणि हे पालनकर्त्या! त्याला सर्वप्रिय मनुष्य बनव.” (उत्तर दिले गेले), “हे जकरिय्या, आम्ही तुला एका मुलाची सुवार्ता देतो ज्याचे नाव ‘याहया’ असेल, आम्ही या नावाचा कोणी मनुष्य यापूर्वी निर्माण केला नाही.” सांगितले, “हे पालनकर्त्या! माझ्या येथे पुत्र कसा बरे होईल. ज्याअर्थी माझी पत्नीज वांझ आहे आणि मी वयोवृद्ध झालो आहे?” उत्तर आले, “असेच घडेल. तुझा पालनकर्ता फर्मावितो की ही तर माझ्यासाठी क्षुल्लकशी गोष्ट आहे. बरे यापूर्वी तर मी तुला निर्माण केलेच आहे जेव्हा तू काहीच नव्हतास.” जकरिय्याने सांगितले, “हे माझ्या पालनकर्त्या, माझ्याकरिता एखादी खूण निश्चित कर.” फर्माविले, “तुझ्यासाठी खूण ही आहे की तू सतत तीन दिवस लोकांशी बोलू शकणार नाहीस.” त्याप्रमाणे तो कमानीमधून निघून आपल्या लोकांसमोर आला आणि त्याने संकेताने त्यांना सूचना दिली की सकाळ संध्याकाळ पावित्र्यगान करा. (४-११)

“हे याहया! ईशग्रंथाला भक्कमपणे धार्ण कर.” आम्ही त्याला बालपणातच हुकुमाने उपकृत केले. आणि आपल्याकडून त्याला कोमल ह्रदय, निर्मलता प्रदान केली आणि तो मोठा पापभीरू, आणि आपल्या आईवडिलांचे हक्क जाणणारा होता. तो दुर्वर्तनीही नव्हता व अवज्ञाकारीदेखील नाही. सलाम त्यावर ज्या दिवशी तो जन्मला व ज्या दिवशी तो मृत्यू पावेल आणि ज्या दिवशी तो जिवंत करून उठविला जाईल. (१२-१५)

आणि हे पैगंबर (स.), या ग्रंथात मरयमचा वृत्तांत वर्णन करा जेव्हा ती आपल्या लोकांपासून अलिप्त होऊन पूर्व दिशेस एकांतवासिनी झाली होती. आणि आडपडदा करून त्यांच्यापासून लपून बसली होती. या स्थितीत आम्ही तिच्याजवळ आपल्या आत्म्या (म्हणजे दूतांस) पाठविले आणि तो तिच्यासमोर एका पूर्ण मानवाच्या रूपात प्रकट झाला. मरयम अकस्मात उद्‌गारली, “जर तू एखादा ईशपरायण मनुष्य आहेस तर मी परमदयाळू ईश्वराचे आश्रय मागते तुझ्यापासून.” त्याने सांगितले, “मी तर तुझ्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे आणि यासाठी पाठविला गेलेलो आहे की तुला एक निर्मळ मुलगा द्यावा.” मरयमने सांगितले, “माझ्याठायी कसा मुलगा होईल जर मला कोणत्याही पुरुषाने स्पर्शदेखील केलेला नाही आणि मी काहीक्ज व्यभिचारिणी नाही.” दूताने सांगितले, “असेच घडेल.” तुझ्या पालनकर्त्याने फर्माविले की असेज करणे माझ्यासाठी फार सोपे आहे आणि आम्ही असे यासाठी करू की त्या मुलाला लोकांसाठी एक संकेत बनवावे, आणि आपल्याकडून एक कृपा. आणि हे काम होणारच आहे.” (१६-२१)

मरयमने त्या मुलाचा गर्भ धारण केला. आणि ती तो गर्भ घेऊन एका दूरवरच्या ठिकाणी गेली. मग प्रसूती वेदनेने तिला एका खजुरी्च्या झाडाखाली पोहचविले. ती म्हणू लागली, “मी यापूर्वीच मेले असते आणि माझा मागमूसही उरला नसता.” दूताने चरणाकडून हाक मारून तिला सांगितले, “दु:ख करू नकोस. तुझ्या पालनकर्त्याने तुझ्याखाली एक झरा प्रवाहित केला आहे. आणि तू थोडे या झाडाच्या खोडाला हलव, तुझ्यावर ताज्या रसाळ खजुरी पडतील. तर तू खा आणि पी आणि आपले डोले थंड कर, मग जर तुला एखादा मनुष्य दृष्टीस पडला तर त्याला सांग की मी परमदयाळूसाठी उपवासाचे व्रत केले आहे, म्हणून मी आज कोणाशीही बोलणार नाही.” (२२-२६)

मग ती त्या मुलाला घेऊन आपल्या लोकांत आली, लोक म्हणू लागले, “हे मरयम, हे तर तू मोठे पाप केलेस. हे हारूनच्या भगिनी. तुझा बापही काही वाईट मनुष्य नव्हता आणि तुझी आईदेखील काही व्यभिचारिणी नव्हती.” मरयमने मुलाकडे इशारा केला. लोकांनी सांगितले, “आम्ही याच्याशी काय बोलावे जे पाळण्यात असलेले एक मूल आहे?” मूल उद्‌गारले, “मी अल्लाहचा दास आहे. त्याने मला ग्रंथ दिला आणि प्रेषित बनविले, आणि समृद्धशाली बनविले, जेथे कोठे मी असेन, आणि नमाज व जकात सुनियमित करण्याची आज्ञा दिली जोपर्यंत मी जिवंत असेन, आणि आपल्या आईसंबंधी कर्तव्यपालन करणारा बनविले. आणि मला दुर्वर्तनी आणि कठोर बनविले नाही. सलाम आहे माझ्यावर जेव्हा मी जन्मलो आणि जेव्हा मी मरेन आणि जेव्हा जिवंत करून मला उठविले जाईल.” हा आहे मरयमपुत्र ईसा आणि ही आहे त्याच्यासंबंधी ती सत्य गोष्ट ज्यात लोक संशय घेत आहेत. अल्लाहचे हे काम नव्हे की त्याने एखाद्याला पुत्र बनवावे. तो पवित्र अस्तित्व आहे. तो जेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतो तेव्हा म्हणतो को अस्तित्वात ये, आणि ती अस्तित्वात येते. (२७-३५)

(आणि ईसाने म्हटले होते की) “अल्लाह माझाही पालनकर्ता आहे आणि तुमचा पालनकर्तासुद्धा, म्हणून तुम्ही त्याचीच भक्ती करा, हाच सरळमार्ग आहे.” परंतु नंतर वेगवेगळे गट आपापसात विरोध करू लागले. म्हणून त्या लोकांनी द्रोह केला त्यांच्यासाठी ती वेळ अत्यंत विनाशाची असेल जेव्हा ते एक भयंकर मोठा दिवस पाहतील. जेव्हा ते आमच्यासमोर उपस्थित होतील त्या दिवशी तर त्यांचे कानदेखील चांगले ऐकत असतील आणि त्यांचे डोळेसुद्धा चांगले पहात असतील. परंतु आज हे अत्याचारी उघड मार्गभ्रष्टतेत गुरफटलेले आहेत. हे पैगंबर (स.), अशा स्थितीत जेव्हा हे लोक बेसावध आहेत आणि श्रद्धा ठेवीत नाहीत, यांना त्या दिवसाची भीती दाखवा जेव्हा निर्णय केला जाईल आणि पश्चात्तापाशिवाय अन्य कोणताच उपाय उरणार नाही. सरतेशेवटी आम्हीच पृथ्वी व तिच्या सर्व वस्तूंचे वारस ठरू आणि सगळे आमच्याकडे परतविले जातील. (३६-४०)

आणि या ग्रंथात इब्राहीम (अ.) ची गोष्ट वर्णन करा. नि:संशय तो एक सत्यवादी मनुष्य आणि नबी होता. (यांना जरा त्या प्रसंगाची आठवण करून द्या.) जेव्हा त्याने आपल्या पित्याला सांगितले की, “हे पित्या, आपण का त्या वस्तूंची उपासना करता ज्या ऐकतही नाहीत आणि पहातही नाहीत आणि आपले कोणतेही काम पार पाडू शकत नाहीत? बाबा, माझ्याजवळ एक असे ज्ञान आले आहे जे आपल्याजवळ आले नाही. आपण माझे अनुकरण करावे. मी आपल्याला सरळमार्ग दाखवीन. बाबा, शैतानची भक्ती करू नये शैतान तर ‘परम दयाळू’ची अवज्ञा करणारा आहे. बाबा, मला भीती आहे की एखादेवेळी तुम्ही ‘परम दयाळू’ च्या प्रकोपात अडकू नये आणि शैतानचे सोबती बनून रहावे.” पित्याने सांगितले, “इब्राहीस (स.), काय तू माझ्या उपास्यापासून पराङमुख झाला आहेस? जर तू परावृत्त झाला नाहीस तर मी तुला दगडांचा वर्षाव करून ठार करीन. बस्स, तू माझ्यापासून कायमचा वेगळा हो.” इब्राहीस (अ.) ने सांगितले, “सलाम आहे तुम्हाला, मी आपल्या पालनकर्त्याजवळ प्रार्थना करीन की त्याने आपल्याला क्षमा करावी. माझा पालनकर्ता माझावर फारच कृपावंत आहे, मी तुम्हा सर्वांनासुद्धा सोडतो आणि त्यांनादेखील ज्यांचा तुम्ही अल्लाहला सोडून धावा करता. मी तर माझ्या पालनकर्त्यालाच पुकारीन, आशा आहे की मी माझ्या पालनकर्त्याला पुकारून विफल ठरणार नाही.” मग जेव्हा तो त्या लोकांपासून आणि त्यांचे अल्लाहखेरीज असलेल्या उपास्यापासून वेगळा झाला, तेव्हा आम्ही त्याला इसहाक (अ.) आणि याकूब (अ.) सारखी संतती दिली आणि प्रत्येकाला प्रेषित बनविले. आणि त्यांना आपल्या कृपेने उपकृत केले आणि त्यांना खरा नावलौकिक प्रदान केला. (४१-५०)

आणि वर्णन करा. या ग्रंथात मूसा (अ.) चे. तो एक निवडलेला माणूस होता आणि तो प्रेषित (नबी) होता. आम्ही त्याला तूर पर्वताच्या उजव्या बाजूने पुकारले आणि रहस्ये सांगून त्याला जवळीक प्रदान केली, आणि आपल्या कृपेने त्याचा भाऊ हारून (अ.) ला नबी बनवून त्याला (मदतनीस म्हणून) दिले. (५१-५३)

आणि या ग्रंथात इस्माईल (अ.) चा उल्लेख करा. तो वचनाचा खरा होता आणि प्रेषित (नबी) होता. तो आपल्या कुटुंबियांना नमाज आणि जकातची आज्ञा देत होता आणि आपल्या पालनकर्त्यापाशी तो एक प्रिय मनुष्य होता. (५४-५५)

आणि या ग्रंथात इद्‌रीस (अ.) चा उल्लेख करा, तो एक सत्यनिष्ठ मनुष्य व एक नबी होता. आणि आम्ही त्याला एक उच्चस्थानी उचलले होते. (५६-५७)

हे ते पैगंबर आहेत ज्यांना अल्लाहने इनाम बहाल केले. आदम (अ.) च्या संततीपैकी, आणि त्या लोकांच्या वंशापासून ज्यांना आम्ही नूह (अ.) च्या समवेत नौकेत स्वार केले होते, आणि इब्राहीम (अ.) च्या वंशापासून, आणि इस्राईलच्या वंशापासून-आणि हे त्या लोकांपैकी होते ज्यांना आम्ही मार्गदर्शन प्रदान केले आहे आणि त्यांना निवडले आहे. त्यांची अवस्था अशी होती की जेव्हा त्या परम दयाळूची संकेतवचने त्यांना ऐकविली जात तेव्हा साश्रू नयनांनी नतमस्तक होत असत. (५८)

त्यांच्यानंतर ते दुष्टपुत्र त्यांचे उत्तराधिकारी बनले ज्यांनी नमाज व्यर्थ घालविली आणि मनोवासनेच्या आहारी गेले. तर निकटच आहे, की त्यांना पथभ्रष्टतेच्या परिणामांना सामोरे जावे लागेल. तथापि ज्यांनी पश्चात्ताप केला आणि श्रद्धा ठेवली आणि सदाचरण अवलंबिले ते स्वर्गामध्ये दाखल होतील. आणि त्यांचे तिळमात्रदेखील हक्क मारले जाणार नाहीत. त्यांच्यासाठी सदैव राहणारे स्वर्ग आहेत ज्यांचे परमदयाळूने आपल्या दासांना आडपडद्यात वचन दिले आहे आणि खचितच ते वचन पूर्ण होऊनच राहणार आहे, तेथे ते कोणतीही वाह्यात गोष्ट ऐकणार नाहीत. जे काही ऐकतील योग्यच ऐकतील आणि त्यांची उपजीविका त्यांना सतत सकाळ-संध्याकाळ मिळत राहील. हाच आहे तो स्वर्ग ज्याचा वारस आमच्या दासांपैकी आम्ही केवळ त्यालाच बनवू जो पापभीरू आहे. (५९-६३)

हे पैगंबर (स.), आम्ही तुमच्या पालनकर्त्याच्या हुकुमाविना उतरत नसतो. जे काही आमच्यासमोर आहे व जे काही आमच्या मागे व जे काही त्यांच्या दरम्यान आहे, प्रत्येक वस्तूचा तोच स्वामी आहे, आणि तुमचा पालनकर्ता विसरणारा नाही. तो पालनकर्ता आहे आकाशांचा व पृथ्वीचा आणि त्या सर्व वस्तूंचा ज्या आकाश व पृथ्वी दरम्यान आहे, म्हणू्न तुम्ही त्याची भक्ती करा आणि त्याच्याच भक्तीवर अढळ रहा, तुमच्या माहितीप्रमाणे त्याच्या समान कोणी आहे काय? (६४-६५)

मनुष्य म्हणतो, काय खरोखरच जेव्हा मी मेलो असेन तेव्हा पुन्हा जिवंत करून बाहेर आणला जाईन? काय मनुष्याला आठवत नाही आम्ही पूर्वी त्याला निर्माण केले आहे जेव्हा तो काहीच नव्हता? तुझ्या पालनकर्त्याची शपथ आम्ही अवश्य या सर्वांना आणि यांच्यासमवेत शैतानांना देखील घेरून आणू. मग नरकाच्या सभोवती आणून यांना गुडघ्यावर खाली पाडू, मग प्रत्येक गटातून अशा प्रत्येक व्यक्तीला निवडून काढू जो ‘परमदयाळू’च्या विरोधात जास्त दुर्वर्तनी बनला होता, मग हे आम्हाला माहीत आहे की त्यांच्यापैकी कोण नरकामध्ये फेकला जाण्याच्या लायकीचा आहे. तुमच्यापैकी असा कोणीही नाही जो नरकात येणार नाही. ही तर एक ठरलेली गोष्ट आहे जिला पूर्ण करणे तुझ्या पालनकर्त्यावर आहे. मग आम्ही त्या लोकांना वाचवू जे (जगात) ईशपरायण होते आणि अत्याचार्‍यांना त्याच स्थितीत सोडून देऊ. (६६-७२)

या लोकांना जेव्हा आमची उघडउघड वचने ऐकविली जातात तेव्हा इन्कार करणारे श्रद्धावंतांना म्हणतात, “सांगा, आम्हा उभय पक्षांपैकी कोण उत्तम स्थितीत आहे आणि कोणत्या मैफली जास्त वैभवशाली आहेत? वस्तुत: यांच्यापूर्वी आम्ही कित्येक अशा लोकसमुदायांना नष्ट केलेले आहे जे यांच्यापेक्षा अधिक साधन-सामुग्री बाळगत होते आणि सकृत्‌दर्शनी वैभवात यांच्यापेक्षा वरचढ होते यांना सांगा, जो माणूस मार्गभ्रष्टतेत गुरफटतो त्याला परम दयाळू सवलत देत असतो येथपावेतो की जेव्हा असले लोक ती गोष्ट पाहून घेतात जिच्यासंबंधी त्यांना वचन दिले गेले आहे - मग तो अल्लाहचा प्रकोप असो अथवा पुनरुत्थानाची घटका - तेव्हा त्यांना कळून चुकेल की कुणाची स्थिती वाईट आहे आणि कुणाचा गट दुर्बल! याउलट जे लोक सरळमार्ग अवलंबितात, अल्लाह त्यांना सन्मार्गात गती प्रदान करतो, आणि बाकी राहणारी सत्कृत्येच तुझ्या पालनकर्त्याजवळ मोबदला व शेवटाच्या दृष्टीने उत्तम आहेत. (७३-७६)

मग तू पाहिलेस का त्या माणसाला जो आमचे संकेत मानण्यास नकार देतो, आणि म्हणतो की मी तर संपत्ती व संततीने अनुग्रहीत होतच राहीन? काय त्याला परोक्षाची माहिती झाली आहे अथवा काय त्याने परमकृपाळूकडून एखादे वचन घेतले आहे? मुळीच नाही, जे काही हा बरळत आहे ते आम्ही लिहून घेऊ आणि त्याच्यासाठी शिक्षेत आणखी अधिक वाढ करू. ज्या साधन-सामुग्री व फौजफाटयाचा हा उल्लेख करीत आहे, ते सर्व आमच्याच जवळ राहणार आणि हा एकटाच आमच्यासमोर हजर होईल. (७७-८०)

या लोकांनी अल्लाहला सोडून आपले काही उपास्य बनवून ठेवले आहेत की ते यांचे पाठीराखे बनतील. कोणीही पाठीराखा असणार नाही. ते सर्व यांच्या उपासनेचा इन्कार करतील, आणि उलट यांचे विरोधक बनतील. (८१-८२)

काय तुम्ही पहात नाही की आम्ही सत्याचा इन्कार करणार्‍यावर शैतान सोडलेले आहेत जे यांना खूप-खूप (सत्याच्या विरोधासाठी) उत्तेजित करीत आहेत? तर आता यांच्यावर प्रकोप कोसळण्यसाठी बेचैन होऊ नका. आम्ही यांचे दिवस मोजीत आहोत. तो दिवस येणार आहे जेव्हा ईशपरायण लोकांना आम्ही अतिथीप्रमाणे ‘परमदयाळू’च्या ठायी सादर करू. आणि गुन्हेगारांना आम्ही तृषार्त जनावराप्रमाणे नरकाकडे हाकून नेऊ. त्यावेळी लोक कोणतीही शिफारस आणण्यास समर्थ असणार नाहीत, त्याखेरीज ज्याने ‘परमदयाळू’च्या ठायी परवाना मिळविला असेल. (८३-८७)

ते म्हणतात की परमदयाळूने एखाद्याला पुत्र बनविले आहे. अंत्यंत बाह्यात गोष्ट आहे जी तुम्ही घडून आणली आहे. निकटच आहे की आकाशाने फाटावे, पृथ्वीने दुभंगावे आणि पर्वताने ढासळावे. या गोष्टीवर की लोकांनी परमदयाळूला अपत्य असल्याचा दावा केला. परमदयाळूचे वैभव असे नाही की त्याने एखाद्यास पुत्र बनवावे. पृथ्वी व आकाशांत जे काही आहे सर्व त्याच्या ठायी दास म्हणून हजर होणार आहेत. तो सर्वव्यापी आहे आणि त्याने त्यांची मोजदाद करून ठेवली आहे, पुनरुत्थानाच्या दिवशी सर्व त्याच्यासमोर एक एकटे हजर होतील. (८८-९५)

निश्चितच ज्या लोकांनी श्रुद्धा ठेवली आहे आणि सत्कृत्ये करीत आहेत, लवकरच परमदयाळू त्यांच्यासाठी इतरांना सह्रदय करील. म्हणून हे पैगंबर (स.)! या वाणीला आम्ही सोपे बनवून तुमच्या भाषेत यासाठी अवतरले आहे की तुम्ही पापभीरू लोकांना आनंदवार्ता द्यावी व हट्टी लोकांना भयसूचना द्यावी. यापूर्वी आम्ही कित्येक जनसमुदायांना नष्ट करून टाकले आहे मग काय आज तुम्हाला कुठे त्यांची चिन्हे आढळतात अथवा त्यांची कुजबूजही कोठे ऐकू येते? (९६-९८)

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP