श्रीदत्तात्रेयाचीं पदे - संग्रह ६

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatreya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.


५१. गळा टाळा फूटतां वाहतां रे । कां न ऐकसी सांग नरहरे । कुठें तुझा सर्वज्ञपणा गेला । मला नेणसि काय म्हणूं तुला ॥१॥
न पाहसी मजला जरी दत्ता । सर्वसाक्षित्त्व राहील कसे आतां । मद्विलापा नायकसी जरी । कसी राहे व्यापकता त्वदंतरीं ॥२॥
न येसी ऐकुनि मद्विलापा । कृपालुत्व जाईल तुझें बापा । संकटीं मी घायाळ असें देवा । धावें पावें बा कृपालो सदैवा ॥३॥

५२. कलियुगिं साधन हेंचि एक । मनुजा तूं बा ऐक ॥धृ.॥
सुखकर श्रीदत्ताचें नाम । हेंचि कल्याणाचें धाम । कलिमलहर हें निकाम । जेणें निष्काम हो लोक ॥१॥
मखमुख आवश्यक जें कर्म । नाम घेतां तें दे शर्म । हाचि मुनिसंमत सद्धर्म । मनुजा वर्म हें चोख ॥२॥
धाक ये यच्छ्रवणें काळ । ग्राहसुर होती न प्रतिकूळ । वासु म्हणे मोक्षहि अनुकूळ । उद्धरे कूळ घ्या भाक ॥३॥

५३. या युगीं उगीच लोक कष्टती पहा । दत्तभजन चित्तशोधन नेणती अहा. ॥धृ.॥
होत सांग यागयोग परि न भेट दे । तोचि दत्त दत्त वदतां दावितो पदें । म्हणुनि इतर त्यजुनि सुकर भजनीं स्थिर रहा ॥या युगीं०॥१॥
येत जेथ दत्त तेथ देव धावती । सर्व तीर्थ गंगा तेथ अचल राहती । म्हणुनि चांग भजन याग पापताप हा ॥या युगीं॥२॥
दत्त स्मरुनि चित्त लाउनि भजन हो करा । वित्तविषयमत्तसंग नित्य परिहरा । मग भजनीं जग विसरूनि दत्तमय पहा ॥या युर्गी०॥३॥

५४. कां भटकत फिरतां तुम्हिं सदैव । प्रिय मानुनि विषयवैभव धुंडितां किं तें सदैव ॥१॥
स्वर्गिं नरकिं तें वैभव दैव दे सदैव । मायामय तें वैभव दे कष्टाचि सर्व दैव ॥२॥
होतां प्रतिकूल दैव ! नष्ट होय सर्व । यम मारी नेउनि पुरीं । शिक्षा करी नानापरी । कोण तयातें निवारी । तारी कोण तदैव ॥३॥
दैवत जें दैवतांचे । तारक जें तारकांचे ॥ दत्त दत्त मम वाचें  । वद मया सदैव ॥४॥
हो कृतार्थ वासुदेव । चिंतुनियां तेंचि दैव । तुच्छ करुनि तें वैभव भाव धरि सदैव ॥५॥

५५. एकचि नाम मंगलधाम । घेतां होतिल पूर्ण काम । परि ये आळस यास्तव नाम । बोला लीलायुक्त ॥१॥
भाकर भान भूक हरीन । परि खोळंबतो हात । बहुविध मिळतां शांत । होतो जैसा मुक्त ॥२॥
दत्तलीलानामान्वित । करितां भजन प्रेमभरित । युक्त होतो दत्तभक्त । विस्मृतविग्रह शांत ॥३॥

५६. मी धरिं धरिं पादा सुखवरदा ह्रतखेदा अक्षयवरदा ॥धृ.॥
श्रीसद्‌गुरुवर नरतनुधर जय जय यतिवर अत्रिकुमर सुमनोहर गाणगापुरकृतविहार भो वरदा ॥१॥
भो उद्‌धृतजन करुणासदन दमितदमन सुमुखनलिन हीररदन कमल नयन प्रियभजन वरदा ॥२॥
संसिद्धिकरा अमरवरा धोरतरा भवसागरापासुनि नरा उद्धरि हरा जोडोनि करा नमूं सुरवरदा ॥३॥
मां पाहि  ईश्वर करुणाकर जोडुनि कर विनवीं सादर शिरीं वरकर धरिं सादर दर परिहरिं तूं गतिदा ॥४॥
मी पापी जरी धर्म न करिं वासुदेवावरि न दर करीं तूं सदा ॥५॥

५७. भगवान्‌ अनसूयेचा पुत्र त्रिभुवनीं गातचरित्र । भगवान्‌ अनसूयेचा पुत्र ॥धृ.॥
दत्तत्रेय श्रुतिगणगेय त्रिदशवरीय स्तुतगुणनिचय ॥ योगिध्येय स्वच्छतराशय स्वयें निराश्रय स्वीयजनाश्रय समर्पिताभय दर्शितविनय नयविदात्त विश्वसूत्र जो वसे सर्वदा स्वतंत्र ॥१॥
रमणी चिमणी जयाचि तरुणी मूर्ति सद्‌गुणी भरलि गुवर्णां वाटे तरणी जेथ लपे झणि ज्याचे चरणीं श्री घे धरणी तो हा नरमणि अवतरे धरणी गृहिणी अत्रिची पवित्र तीचा होय जो सुपुत्र ॥२॥
भाविकवरदा परमानंदा पाहिं मुकुंदा परमानंदा जय गोविंदा वारूनि खेदा पुरवुनि छंदा हरिं या विपदा परमानंदा दाविं निजपदा वरदा वासुदेवमित्र अससी तूं अत्रिपुत्र ॥भगवान्‌ अनसूयेचा०॥३॥

५८. दत्ता चरण सेवा तुझी । देईं आस नाही दुजी ॥धृ.॥
तव कृपें मी धन्य झालों ॥ भव भ्रांति तुटली ॥ परम पदीं परब्रह्ममूर्तीं ॥ आंगें भेटली ॥१॥
अनउदयास्त बोधरवी हा ॥ ह्रदयी प्रगटला ॥ स्थिरचर व्यापुनी अनंतरूपें ॥ अखंड भेटला ॥२॥
भावाचा भुकेला । सुलभ दीन दासाला । गुप्त रूपें जनीं नांदुनी भेटे ॥ अनन्य भक्ताला ॥३॥

५९. दत्ता विसरू कसा तुला ॥ तव पदीं अर्पिन प्राणाला ॥धृ.॥
उपकृति अपार फेडूं न शके ॥ भावें पद नमितों । चहुं देहांची आस सांडुनी निरंजनी रमतों ॥१॥
‘नेति नेति’ म्हणुनि लाजला ॥ वेद झाला मुका ॥ तव वर्णनीं गर्व धरुनि ॥ प्रण पडला फिका ॥२॥
भक्तवत्सल बालमुकुंदपदीं । दीन दत्त तरला ॥ सत्य सांगतो तत्पदीं मुक्ति ॥ अनुभव हा ठरला ॥३॥(पंतमहाराज)

६०. सगुण मूर्ति मनोहर ॥ स्वामी माझा दिगंबर ॥ मुखें नारायण उच्चार ॥ दत्तात्रय माझा ॥१॥
कंठीं रुद्राक्षांची माळा ॥ हातीं शोभतो त्रिशूळ ॥ ज्याला कांपे महाकाळ ॥ दत्तात्रय माझा ॥२॥
भववी छटी अंगावरीं ॥ सदा यती दंड धारी । दीन भक्तांचा कैवारी ॥दत्ता०॥३॥
पायीं पादुका सुंदर ॥ शंख चक्र गदाधर ॥ भस्मोद्धुलीत शरीर ॥दत्ता०॥४॥
निरंजन अवधूत ॥ संगें श्वान भुंकत ॥ कामधेनु सवें येत ॥दत्ता०॥५॥
नित्य करी गंगास्नान ॥ करविर क्षेत्रीं भिक्षा जाण ॥ कृष्णतिरीं अनुष्ठान ॥दत्ता०॥६॥
ऐसा संन्यासी निर्गुण ॥ बोधें हरी जन्ममरण ॥ दासा दावी निजखूण ॥दत्ता०॥७॥
त्रैमूर्तींचा अवतार । दयाळू हा गुरुवर ॥ करी दीनांचा उद्धार ॥दत्ता०॥८॥
सत्यज्ञान अनंत ॥ शिवयोगी बालावधूत ॥ दत्त भजनीं नाचत ॥दत्ता०॥९॥(पंतमहाराज)

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP