गंगारत्‍नमाला - भाग १

कवी नरहरी यांनी पौराणिक काव्य लिहून मराठी भाषेला एक आगळीच झळाळी दिली.

व०ति०
भागिरथि त्रि-पथ-गे पद-वंदनाते ॥
मी दीन गे करितसे मति-मंद माते ॥
हेतू मनात भरला तव गुण गाया ॥
जावो न मागत असे इतुकेचि वाया ॥१॥
दिंडी
विश्वामित्र रामलक्ष्मणांसह आपल्या आश्रमास जात असता वाटेत, पुढे जाता पाहोनि जान्हवीला ॥
राम-चित्ती सं-तोष फार झाला ॥
वंदुनीया गाधि-जा मुनी पाया ॥
म्हणे सांगा ही कोण मुनी-राया ॥२॥
नाव काय ही उत्पन्न कोण ठायी ।
पाहतांची सं-तोष दे मला ही ॥
दाट झाडी अत्युच्च दो तटा या ।
स्वये तापा साहोनि करी छाया ॥३॥
आम्र जंबू जंबीर ताल-जाती ।
नभा स्पर्शाया काय ऊर्ध्व जाती ॥
वरी चाषहि कोकील मत्त रावे ।
पांथ जाता बोलाविताति यावे ॥४॥
शा.वि
आहा जी मुनि-राय धन्य बहु मी पाहोनिया आ-श्रमा ॥
माझे चित्त सुखावले पुनरपी हे आठवी न श्रमा ॥
चाले निर्मळ वेद-घोष मजला ऐकावया येतसे ॥
स्वाध्यायाभ्यसनी द्वि-जौघ अवघा हा मग्न झाला असे ॥५॥
एथे आश्रमसन्निधी च तटिनी स्वच्छोदका वाहती ॥
वैरा श्वापद टाकुनी हि सहजा शत्रूसवे खेळती ॥
हत्ती-पोटिशि वासरू दडतसे, आखू न ओतूस भी ॥
व्याघ्रांगावरि मान ठेवुनि पहा ही गाय आहे उभी ॥६॥
उ०जा०
निर्वैर या पाहुनि आश्रमाते ॥
भारी च होते सुख आजि माते ॥
प्रेमे वृकांनी मृग खाजवावे ॥
जेथे, अशा टाकुनि काय जावे ॥७॥
साकी
माध्यान्ही रवि आला पाहुनि, नदी-जलाचे काठी ॥
दर्भ करी निजकर्म कराया, झाली मुनिंची दाटी ॥८॥
शिशू किती उप-नीत ऋषींचे, आले गंगा-तीरी ॥
दंड कमंडलु दर्भ-मुष्टि करि, कृष्णाजीन शरीरी ॥९॥
जटा-मुकुट शिरि कटिस मेखला, भस्म वि-लेपन तनुसी ॥
ब्रह्म-सूत्र-युत वामन मूर्ती, सुखविति बघता मजसी ॥१०॥
पहा पहा हे पोहू लागले, उदकी जाउनि कैसे ॥
देह जलांतरि मान दिसे वरि, भासति कच्छप जैसे ॥११॥
जनक मारिती हका परंतु, पर-तीराला जाती ॥
अहं-पुर्विके करुनि पुन्हा ते, परतुनि स-त्वर येती ॥१२॥
लाटा येता त्यांवरि मारुनि, कर-युग शब्दा करिती ॥
पुढे पोहता गुप्त जाउनी, मागुनि त्याते धरिती ॥१३॥
बुडे एक त्या हुडकी दुसरा, तव तो वरती आला ॥
जवळी येता सुसर पाहुनी, मागे परते भ्याला ॥१४॥
स्नान करोनी तीरि पातले, धरिता कौपीनाला ॥
भस्म लावुनी कंठि घालिती, रुद्राक्षांच्या माळा ॥१५॥
साकी
मध्यान्ही सु-स्नात सर्व ही, पवित्र-पाणी झाले ॥
ब्रह्म-कर्म मुनि समाप्त करुनी, काही परत निघाले ॥१६॥
दिंडी
जिचे तोथी मत्स्यादि जंतु राहे ।
शीत-मंजुल स-गंध वायु वाहे ॥
गमे स्पर्शै निष्पाप करि काया ।
वदा ईचे माहात्म्य मुनी-राया ॥१७॥
मग विश्वामित्र म्हणाला-
व.ति०
ऐकोनि राम-वचना मुनि-गाधि जाला ॥
आनंद होय पथिंचा श्रम ही रिझाला ॥
रामा म्हणे मज तुवा अजि धन्य केले ॥
प्रश्ने सख्या सकल कल्मष दूर केले ॥१८॥
जीच्या तरंग-पवने पशुही तरावे ॥
स्नाने तसे सकल पातक सं-हरावे ॥
जीते मुनींद्र सुर किन्नर सिद्ध गाती ॥
ही राघवा हरि-पदी सुर-सिंधु गाती ॥१९॥
ईचा अ-गाध महिमा विधि शेष भानू ॥
वर्णू न ते शकति, मी वद काय वानू ॥
विस्तार मंद-मतिच्या वदने कशाचा ॥
होतो, परंतु कथितो तुज अल्प साचा ॥२०॥
देई सुखासी इह आणि परत्र लोकी ॥
उंचा पदार्थ दुसरा न जगी विलोकी
गंगेविणे म्हणउनी जगदीश्वराने ॥
ही मस्तकी धरियली गिरि-जा-वराने ॥२१॥
सर्पा खगेंद्र धरुनी वदनी वरोनी ॥
जाता नदीत पडला अहि तो मरोनी ॥
तात्काळ होउनि चतुर्भुज त्याच पक्षी ॥
राजावरी चढुनि विष्णु-पदास लक्षी ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP