मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक ७१ ते ८०

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक ७१ ते ८०

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा , वेदांनी ज्याची महती गायली आहे , सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो .


आखु - केतन : आशापूरक : आखुमहारथ : ।

इक्षुसागरमध्यस्थ : इक्षुभक्षणलालस : ॥७१॥

३७७ ) आखुकेतन --- केतन म्हणजे पताका . ध्वज निशाण . आखु म्हणजे मूषक . उंदीर . मूषकचिन्ह असलेला ध्वज धारण करणारा .

३७८ ) आशापूरक --- भक्तांच्या आशा पूर्ण करणारा . किंवा आशा म्हणजे दिशा . सर्व दिशांना पुरून उरणारा . सर्वव्यापी . चराचरातील समग्र जगताच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे त्यास ‘ आशापूरक ’ म्हणावे . असा एक गणेशमात्रच आहे . जो पूर्णब्रह्मस्वरूप आहे , सर्वथा आप्तकाम असल्याने त्याच्या ठिकाणी कसल्याच आशेचा संभव कधीही नसतोच म्हणूण तोच एक मात्र सर्वांच्या आशा पूर्ण करण्यास समर्थ असतो इतर कोणीही तसा नसतोच . हे विशेष रहस्य .

सूर्याचा पुत्र जो यमधर्म त्याला त्याच्या आईचा शाप लागून तो मोठया आपत्तीत सापडला . तिने यमाला ‘ तू घाणेरडा दिसशील ’ असा शाप दिला . त्यामुळे यम अतिशय कुरूप झाला , मलीन झाला . सूर्यनारायणाला त्याने यावर उश्शाप विचारला . सूर्य म्हणाला - ‘ भगवंताने जे कार्य तुझ्यावर सोपविले आहे ते तुला करावेच लागणार आहे . परंतु आता तुला शापामुळे आलेले मालिन्य दूर व्हावे अशी तुझी जी आशा आहे , ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य फक्त आशापूरक गणेशातच आहे . तू नामल क्षेत्री जा तेथे सुबुद्धिप्रत तीर्थकुंडात स्नान करून त्याची मनोभावे सेवा कर .’ यम तत्काळ तेथे गेला . पित्याच्या म्हणण्याप्रमाणे सर्व केले . त्याचा कुरूपपणा व व्याधी संपूर्ण नष्ट झाल्या .

दंडकारण्यातील नंदक गावात दुष्ट नावाचा एक कोळी राहत असे . तो गावात चोर्‍यामार्‍या , लोकांची हत्या करू लागला . त्याच्या त्रासाला कंटाळून लोकांनी संघशक्तीने त्याला गावाबाहेर काढले . तरीही त्याची दुष्कृत्ये थांबेनात . एकदा रस्त्याने मुद्‌गल ऋषी चालले असता त्याने त्यांच्यावरही खड्‌ग उगारले पण त्याचा हात एकदम लुळा पडला मुद्‌गलांनी त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला . दुष्टाचा हात पूर्ववत्‌ झाला . दुष्ट कोळी अवाक्‌ झाला . हा कोणीतरी परमेश्वरी अवतार आहे असे जाणून आपला उद्धार करावयास त्याने मुद्‌गलांना विनविले . त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्याने गणेशतीर्थात स्नान केले . यथासांग गणेशपूजा केली . ‘ पुत्रा ’ असे संबोधून ऋषींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला . तेथे जमिनीत एक वाळलेली काटकी पुरली व त्या काटकीला हिरवी पालवी फुटेपर्यंत पद्मासनात बसून ‘ श्रीगणेशाय नम :’ या मंत्राची अनुष्ठाने करावयास सांगितलि . वर्षामागून वर्षे सरली . दुष्टाच्या अंगावर वारूळ तयार झाले . त्या फांदीला हिरवी पालवी फुटली . एकदा अचानक मुद्‌गल ऋषी तेथून जात असता वारुळातून ॐॐॐ असा नाद ऐकू आला . वारुळाची माती दूर करताच कृश झालेला दुष्ट नजरेस पडला पण आता त्याच्या दोन भुवयांमध्ये त्याला एक सोंड निर्माण झाली होती . मुद्‌गलांच्या पायी त्याने मस्तक ठेवले . मुद्‌गलांनी त्याचे भृशुंडी असे नामकरण केले . त्या ॐ या एकाक्षरी मंत्राची दीक्षा दिली . आता त्याला साक्षात्‌ गणेशाचेच रूप प्राप्त झाले होते . भृशुंडीने नामलक्षेत्री गणेशमूर्तीची होमहवन करून प्रतिष्ठापना केली . जप - जाप्य . अनुष्ठाने केली . खूप वर्षांनी साक्षात्‌ गणपतींनी त्याला दर्शन दिले . त्याने ‘ आशापूरक ’ असे म्हणत गणपतींच्या चरणी माथा टेकविला . मातापितादी पितरांना कुंभीपाक नरकातून सोडविण्याची त्याची आशाही गणेशाने पूर्ण केली . श्रीगणेशाने या तीर्थक्षेत्रीच भृशुंडींना ना - मल केले . असल केले .

आशापूरक - अमलाश्रम - नामलक्षेत्र अशी या तीर्थभूमीची नावे आहेत . महाराष्ट्रातील मराठवाडयात बीड शहरापासून सुमारे १० कि . मी . वर हे क्षेत्र आहे . कर्पूरा - बिंदुसुरा आणि नारदा या तीन नद्यांच्या संगमावर आशापूरक गणपतीचे दगडी बांधणीचे मंदिर आहे . मूर्ती साधारण सव्वा फूट रुंद व सव्वा दोन फूट उंचीची आहे . पेशव्यांनी या गणपतीला नवस केला होता .

३७९ ) आखुमहारथ --- मूषक हाच ज्याचा महान्‌ रथ आहे .

३८० ) इक्षुसागरमध्यस्थ --- इक्षु म्हणजे ऊस , ऊसरसाच्या सागरात राहणारा .

३८१ ) इक्षुभक्षणलालस --- ऊस खाण्याची ज्याला अतिशय आवड आहे .

इक्षुचाप - अतिरेकश्री : इक्षुचापनिषेवित : ।

इन्द्रगोपसमानश्री : इन्द्रनीलसम - द्युति : ॥७२॥

३८२ ) इक्षुचापातिरेकश्री --- इक्षुचाप ( इक्षुधन्वा , मदन ) मदनापेक्षाही ज्याचे सौंदर्य अधिक आहे .

३८३ ) इक्षुचापनिषेवित --- कामदेव ज्याची सेवा करतो असा .

३८४ ) इन्द्रगोपसमानश्री --- मृगाच्या पावसात वनात लालचुटुक मखमली कीटक दिसू लागतात त्या इंद्रगोप कीटकांप्रमाणे ज्याची कांती लालचुटुक आहे असा .

३८५ ) इन्द्रनीलसमद्युति --- इन्द्रनीलमण्याप्रमाणे श्यामलकांती असणारा . मयूरेश्वर अवतारात श्रीगणेश नीलवर्णी आहे . ( कामनाभेदाने भिन्न रंगरूपात श्रीगणेशाचे ध्यान असते . भिन्न भिन्न युगात अवतार घेऊन तो अरुण . श्याम वगैरे कान्ती धारण करतो .)

इन्दीवरदलश्याम : इन्दुमण्डलनिर्मल : ।

इध्मप्रिय : इडाभाग : इराधामा इन्दिराप्रिय : ॥७३॥

३८६ ) इन्दीवरदलश्याम --- नीलकमलपत्राप्रमाणे जो श्यामवर्णाचा आहे .

३८७ ) इन्दुमण्डलनिर्मल --- पूर्णचन्द्राप्रमाणे ज्याची निर्मल कांती आहे .

३८८ ) इध्मप्रिय --- इध्म म्हणजे समिधा ज्याला प्रिय आहे असा .

३८९ ) इडाभाग --- ऋत्विक्‌ आणि यजमान रूपात यज्ञकर्मात भाग घेणारा . ( इडा म्हणजे पृथ्वीची अधिष्ठात्री देवता ).

३९० ) इराधामा --- इरा म्हणजे पृथ्वी . पृथ्वी हेच ज्याचे धाम म्हणजे निवासस्थान असणारा .

३९१ ) इन्दिराप्रिय --- इन्दिरा म्हणजे लक्ष्मी . लक्ष्मीला प्रिय . पूजनीय असणारा .

इक्ष्वाकुविघ्न - विध्वंसी इतिकर्तव्यता - ईप्सित : ।

ईशानमौलि : ईशान : ईशानसुत : ईतिहा ॥७४॥

३९२ ) इक्ष्वाकुविघ्नविध्वंसी --- राजा इक्ष्वाकूच्या विघ्नांचा नाश करणारा .

३९३ ) इतिकर्तव्यतेप्सित --- इतिकर्तव्यता म्हणजे यज्ञकर्माच्या अंगभूत सामग्रीची अपेक्षा ठेवून यजमानाच्या कामना पूर्ण करणारा .

३९४ ) ईशानमौलि --- नरेश , भूतेश आणि सुरेश आदी ईश्वरांचा शिरोमणी . ऐश्वर्ययोगी . किंवा सम्राट , भूपति , राजेरजवाडे यांना शिरोधार्य .

३९५ ) ईशान --- स्वामी . देवतांनाही जीवन देणारा .

३९६ ) ईशानसुत --- ईशान म्हणजे शंकर . शंकराचा सुत म्हणजे पुत्र .

३९७ ) ईतिहा --- ईति म्हणजे उपद्रव . अतिवृष्टी . अनावृष्टी , उंदीर , टोळ , किडे , परचक्र व स्वसैन्यपीडा या उपद्रवांचा नाश करणारा .

ईषणात्रय - कल्पान्त : ईहामात्र - विवर्जित : ।

उपेन्द्र : उडुभुन्मौलि : उण्डेरक - बलिप्रिय : ॥७५॥

३९८ ) ईषणात्रयकल्पान्त --- ईषणात्रय म्हणजे लोकैषणा ( स्वर्गादि लोकेच्छा ), पुत्रैषणा ( स्त्रीपुत्रादिंबद्दल आसक्ती ) व वित्तैषणा ( द्रव्याची अभिलाषा ). या ईषणात्रयाचा पूर्ण निरास करणारा .

३९९ ) ईहामात्रविवर्जित --- ईहा म्हणजे इच्छा . ज्याने सर्व इच्छा - अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत असा .

४०० ) उपेन्द्र --- कश्यप - अदिती यांचे येथे अवतीर्ण महोत्कट विनायक . वामनरूप - बटुरूप .

४०१ ) उडुभृन्मौलि --- उडु म्हणजे नक्षत्र . भृत्‌ म्हणजे भरण भोषण करणारा राजा . उडुभृत्‌ म्हणजे नक्षत्रांचा राजा अर्थात चंद्र . मौलि म्हणजे मस्तक . चन्द्रास मस्तकावर धारण करणारा .

४०२ ) उण्डेरकबलिप्रिय --- उण्डेरक म्हणजे पिठाचा पिठाचा गोळा . उंडा . गोल गोल खाद्यपदार्थ . उदा . लाडू वगैरे मिष्टान्न ज्याला आवडतात . उंडेरकाचा बलि ( नैवेद्य ) ज्याला प्रिय आहे असा .

उन्नत - आनन - उत्तुङ्ग : उदार - त्रिदश - अग्रणी : ।

ऊर्जस्वान्‌ ऊष्मल - मद : ऊहापोह - दुरासद : ॥७६॥

४०३ ) उन्नतआनन --- ज्याला कोणासमोरही मान खाली घालावी लागत नाही . नेहमीच ताठ मानेने जगणारा . सर्वांना आदरणीय़ व पूजनीय असणारा .

४०४ ) उत्तुङग --- उंच . सर्वोच्च वराहरूपधारी भगवानाच्या दाढेपासून तुङ्गा नावाची नदी प्रकट झाली . त्यावरून वराहाहून अभिन्न असणार्‍या गणेशास हे नाव पडले .

४०५ ) उदारत्रिदशाग्रणी --- त्रिदश म्हणजे ज्यांना तीनच अवस्था असतात . बाल - कुमार व तरुण . म्हणजे देव . देवांना माणसासारखी वृद्धावस्था नसते . उदार देवतांमध्ये प्रथमस्थानी असणारा . श्रेष्ठ .

४०६ ) ऊर्जस्वान्‌ --- तेजस्वी आणि बलवान .

४०७ ) ऊष्मलमद --- ज्याच्या गण्डस्थलातून गरम मद वाहत आहे असा .

४०८ ) ऊहापोहदुरासद --- ऊह म्हणजे तर्क , अनुमान , सिद्धांत आणि अपोह म्हणजे वाटाघाट , शंकासमाधान . ऊहापोह म्हणजे तर्कयुक्त विचार . अशा गोष्टींनी प्राप्त न होणारा .

ऋग्‌ - यजु :- साम - सम्भूति : ऋद्धि - सिद्धि - प्रवर्तक : ।

ऋजु - चित्त - एक - सुलभ : ऋणत्रयविमोचक : ॥७७॥

४०९ ) ऋग्यजुस्सामसम्भूति --- ऋक्‌ . यजुस्‌ व साम हे तीन वेद ज्याच्या नि : श्वासातून प्रकट झाले आहेत .

४१० ) ऋद्धिसिद्धिप्रवर्तक --- राजवैभव , ऐश्वर्य आणि अणिमादी अष्टसिद्धींचा प्रवर्तक . अणिमा - महिमा - लधिमा - गरिमा - प्राप्ति - प्राकाम्य - ईशित्व आणि वशित्व या अष्टसिद्धी आहेत . अणिमा ( शरीर सूक्ष्म करणे ), महिमा ( शरीर मोठे करणे ), लधिमा ( शरीर कापसाहूनही हलके करणे ), गरिमा ( शरीर जड करणे ), प्राप्ति ( चराचरातील कोणत्याही वस्तूचा संपर्क करण्याची क्षमता ) प्राकाम्य - इष्टवस्तुप्राप्ती . ईशित्व ( सर्व चराचरावर ताबा ठेवणे ) वशित्व ( विषय भोगून इन्द्रियांवर स्वामित्म ठेवणे ).

४११ ) ऋजुचित्तैकसुलभ --- केवळ सरळ आणि निर्मळ चित्ताद्वारे प्राप्त होणारा , आकळणारा .

४१२ ) ऋणत्रयविमोचक --- देवऋण , पितृऋण , ऋषिऋण या तिन्ही ऋणातून मुक्त करणारा . मनुष्य जन्मास येतो तो ही तीन ऋणे घेऊन येतो . ती अनुक्रमे यज्ञ , स्वाध्याय व पुत्रोत्पादन इत्यादींनी फेडायची असतात .

लुप्तविघ्न : स्वभक्तानां लुप्तशक्ति : सुरद्विषाम्‌ ।

लुप्तश्री :- विमुख - अर्चानां लूता - विस्फोटनाशन : ॥७८॥

४१३ ) स्वभक्तानां लुप्तविघ्न --- आपल्या भक्तांची संकटे दूर करणारा .

४१४ ) सुरद्विषां लुप्तशक्ति --- देवद्रोही दैत्यांची शक्ती नष्ट करणारा .

४१५ ) विमुखार्चानां लुप्तश्री --- गणेशोपासनेपासून विन्मुख होणार्‍यांचे ऐश्वर्य हरण करणारा .

४१६ ) लूताविस्फोटनाशन --- दन्त - लूतादी , आन्तर्‌बहिर गळवे , अर्बुदे यांचा तसेच कोडादी व्याधींचा नाश करणारा . ( लूता = कातडीवरील व्रण , अर्बुद = गाठ , टयूमर , फोड )

एकारपीठ - मध्यस्थ : एकपादकृतासन : ।

एजित - अखिलदैत्यश्री : एधितअखिलसंश्रय : ॥७९॥

४१७ ) एकारपीठमध्यस्थ --- एकारपीठ त्रिकोणचक्राच्या मध्यभागी विराजमान .

४१८ ) एकपादकृतासन --- काशीक्षेत्री एका पायावर उभा राहणारा .

४१९ ) एजिताखिलदैत्यश्री --- दैत्यांची संपत्ति हिरावून घेणारा . दैत्यसंपत्तीला हादरे देणारा .

४२० ) एधिताखिलसंश्रय --- शरणागतांच्या वैभवात नित्य वृद्धी करणारा .

ऐश्वर्यनिधि : ऐश्वर्यम्‌ ऐहिक - आमुष्मिकप्रद : ।

ऐरम्मद - समोन्मेष : ऐरावतनिभ - आनन : ॥८०॥

४२१ ) ऐश्वर्यनिधि --- समस्त ऐश्वर्यांचा परमसंग्रह . भक्तांचे ठायी ऐश्वर्यनिधी ठेवणारा .

४२२ ) ऐश्वर्यम्‌ --- साक्षात्‌ ऐश्वर्यच असणारा . परम ऐश्वर्य .

४२३ ) ऐहिकामुष्मिकप्रद --- ऐहिक म्हणजे येथील . या पृथ्वीलोकावरील . आमुष्मिक म्हणजे पारलौकिक . स्वर्गातील . ऐहिक आणि पारलौकिक गोष्टींचा लाभ मिळवून देणारा .

४२४ ) ऐरम्मदसमोन्मेष --- ज्याच्या दृष्टिचा उन्मेष ( तेज , चमक ) विद्युत‌प्रकाशाप्रमाणे आहे असा .

४२५ ) ऐरावतनिभानन --- ऐरावतहत्तीच्या मुखाप्रमाणे ज्याचे मुख आहे असा .

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP