वटसावित्री कथा

सौभाग्य पतीपासून प्राप्त होते म्हणून वटसावित्रीची पूजा सुवासिनी मनोभावे व श्रद्धेने करुन आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत करतात.


वटसावित्री कथासार

श्रीः ॥ सनत्कुमारउवाच ॥ कुलस्त्रीणांव्रतंदेवमहाभाग्यंतथैवच ॥ अवैधव्यकरं स्त्रीणांपुत्रपौत्रप्रवर्धनम् ॥१॥

ईश्वरउवाच ॥आसीन्मद्रेषुधर्मात्माज्ञानीपरमधार्मिकः नाम्राचाश्वपतिर्वीरोवेदवैदांगपारगः ॥२॥

अनपत्योमहाबाहुःसर्वैश्वर्यसमन्वितः ॥ सपत्नीकस्तपस्तेपेसमाराधयतेनृपः ॥३॥

सावित्रींचप्रसावित्रींजपन्नास्तेमहामनाः ॥ जुहोतिचैवसावित्रींभक्त्यापरमयायुतः ॥४॥

ततस्तुष्टातुसावित्रीसादेवीद्विजसत्तमः ॥ सावित्रीग्रहवतीदेवीतस्यदर्शनमागता ॥५॥

श्रीगणेशाय नमः ॥ अथ स्कंदपुराणांतर्गत वटसावित्रीकथा लिख्यते ॥ सनत्कुमारमुनी शिवाप्रत प्रश्न करितात , की , हे देवा ! कुलीन स्त्रियांना महाभाग्य देणारे , पुत्रपौत्रादिक वाढविणारे असे व्रत कोणते ते मला सांगा ॥१॥

असा सनत्कुमाराचा प्रश्न ऐकून ईश्वर सांगतात , हे सनत्कुमारा ! मद्रदेशामध्ये शूर , ज्ञानसंपन्न व परम धार्मिक आणि वेदवेदांगामध्ये पारंगत असा अश्वपति या नावाचा एक राजा होऊन गेला ॥२॥

तो महाबाहु अश्वपति राजा सर्वेश्वर्यसंपन्न असून अपत्यरहित असल्यामुळे पत्नीसहवर्तमान तप करिता झाला ॥३॥

तो उदार असा राजा सावित्रीमंत्राचा जप करीत होत्साता सावित्रीप्रीत्यर्थ हवन करुन परमभक्तीने त्याने आराधना केली ॥४॥

त्यामुळे सावित्रीदेवी प्रसन्न होऊन त्या राजाला प्रत्यक्ष दर्शन देती झाली ॥५॥

भूर्भुवः स्वरवत्सयेषासाक्षसूत्रकमंदलुः ॥ तांतुट्टष्टाजगद्वंद्यांसावित्रींचनृपोत्तमः ॥६॥

प्रणिपत्यनृपोभक्त्याप्रह्रष्टेनांतरात्मना ॥ तंट्टष्टापतितंभूमौतुष्टादेवीजगादह ॥७॥

सावित्र्युवाच ॥ तुष्टाहंतवराजेंद्रवरंवरयसुव्रत ॥ एवमुक्तस्तदराजाप्रसन्नांतामुवाचह ॥८॥

अनपत्योह्यहंदेविपुत्रमिच्छामिशोभने ॥ नान्येवृणोमिसाविचित्रपुत्रमेवजगन्मये ॥ अन्यदस्तिसमग्रंमेक्षितौयच्यापिदुर्लभं ॥९॥

प्रसादात्तवदेवेशितत्सर्वंविद्यते गृहे ॥ एवमुक्तातुसादेवीप्रत्युवाचनराधिपं ॥१०॥

समस्त व्याह्यती देवतांसहित जिचे स्वरुप युक्त आहे आणि अक्षसूत्र व कमंडलु धारण करणारी व सर्व जगतास वंद्य अशा सावित्रीप्रत अवलोकन करुन ॥६॥

राजाने हर्षयुक्त अंतःकरणाने भक्तिपुरःसर साष्टांग नमस्कार केला . त्याकाळी त्या राजाला अवलोकन करुन प्रसन्न होत्साती देवी बोलती झाली ॥७॥

सावित्री म्हणते , " हे राजेंद्रा तुला मी प्रसन्न झाले आहे . तरी हे सुव्रता ! तू इष्ट वर मागून घे . " सावित्रीने असे सांगितले असता सुप्रसन्न अशा त्या देवीला राजा बोलता झाला ॥८॥

राजा म्हणतो , " हे सावित्री देवी ! मला अपत्य नाही , यास्तव हे शोभने ! मी पुत्राची इच्छा करीत आहे . हे जगन्माये ! एक पुत्रावाचून अन्य वर मी मागत नाही ॥९॥

कारण पृथ्वीवर जे दुर्लभ ते सर्वही तुझ्या प्रसादाने माझ्या घरी आहे , " राजाचे असे भाषण ऐकून देवी म्हणाली , ॥१०॥

सावित्र्युवाच ॥ पुत्रस्तेनास्तिराजेंद्रकन्यैकातेभविष्यति ॥ कुलद्वयंतुसाराजन्नुद्धरिष्यतिभामिनी ॥११॥

मन्नाम्राराजशार्दूलतस्यानामभविष्यति ॥ इत्युक्त्वातंमुनिश्रेष्ठराजानंबह्मणः प्रिया ॥१२॥

अंतर्धानंगतादेवीसंतुष्टोसौमहीपतिः ॥ ततःकतिपयाहोभिस्तस्यराज्ञीमहीभुजः ॥१३॥

ससत्वसमजायेतेपूर्णेकालेसुषावहि ॥ सावित्र्यतुष्टयादत्तासावित्र्याजप्तयातथा ॥१४॥

सावित्रीतेनवरदास्यानमा बभूवह ॥ राजतेदेवगर्माभाकन्याकमललोचना ॥१५॥

" हे राजेंद्रा ! तुला पुत्र होणार नाही , परंतु एक कन्या होईल . ती दोन्ही कुळांचा ( भर्तृकुल व पितृकुल यांचा ) उद्धार करील ॥११॥

व हे राजश्रेष्ठा । ती कन्या माझ्या नावानेच विख्यात होईल . शिव म्हणतात , " हे मुनिश्रेष्ठा सनत्कुमारा , ती ब्रह्मदेवाची भार्या राजाशी असे भाषण करुन अंतर्धान पावली . त्यावेळी राजा संतुष्ट झाला . नंतर काही दिवसांनी राजाची पट्टराणी गर्भवती होऊन ॥१२॥ ॥१३॥

पूर्ण दिवस झाले असता प्रसूत झाली . तिला सावित्रीच्या प्रसादाने व सावित्रीमंत्राच्या जपाने जी कन्या झाली ॥१४॥

तिचे नाव वरदासावित्री असे ठेविले व कमळासारखे नेत्र असलेली ती कन्या देवगर्भासमान शोभती झाली ॥१५॥

ताट्टष्टाहेमगर्भाभांराजचिंतामुपेयिवान् ॥ अयाच्यमानांचवररुपेणाप्रतिमांभुवि ॥१६॥

तस्यारुपेणतेसर्वेसंनिरुद्धामहीभुजः ॥ ततःसराजाचाहूयउवाचक मलेक्षणां ॥१७॥

पुत्रिप्रदानकालस्तेनयाचंतिचकेवचन ॥ वरंवरयह्रद्यंतेपतिंगुणसन्वितम् ॥१८॥

मनःप्रह्रादकरणंशीलेनाभिजनेनच ॥ इत्युक्त्वातांचराजेंद्रो वृद्धामात्यैःसहैवताम् ॥१९॥

वस्त्रालंकारसहितांधनरतैःसमन्विता ॥ विसृज्यच क्षणंतत्रयावत्तिष्ठतिभूपिपः ॥२०॥

तिची कांती सुवर्णासारखी असल्याने व सर्व पृथ्वीत ती रुपाने अप्रतिम असल्यामुळे कोणीही वर तिची याचना करीना ! तेव्हा राजास मोठी चिंता लागली ॥१६॥

वरांनी तिची याचना न करण्याचे कारण तिच्या रुपाने सर्व राजे चकित झाले होते . नंतर अश्वपती राजाने त्या तिला जवळ बोलावून सांगितले की ॥१७॥

हे कन्ये , तुझा विवाहकाळ प्राप्त झाला असून तुला कोणी मागणी घालीत नाही . याकरिता तुझ्या मनाला आवडेल तो गुणसंपन्न पती तू वर ॥१८॥

मात्र तो तुझ्या मनाला आनंद देणारा , कुलीन आणि शिलाने उत्तम असावा , असे सांगून राजाने वृद्ध अमात्य बरोबर देऊन ॥१९॥

वस्त्र अलंकारांसहित आणि धनरत्नांसह तिला वर पहाण्याकरिता पाठविली . नंतर राजा स्वस्थ राहिला ॥२०॥

तावत्तत्रसमागच्छन्नारदोभगवानृषिः ॥ संपूज्यचततोराजाअर्घ्यपाद्येनंतंमुनिम् ‍ ॥२१॥

आसनेचसुखासीनः पूजितस्तेनभूभुजा ॥ पूज्ययित्वामुनिंराजाप्रोवाचेदंद्विजोत्तमम् ‍ ॥२२॥

पावितोऽहंत्वयाविप्रदर्शनेनाद्यनारद ॥ यावदेवंवदनराजातावत्साकमलेक्षणा ॥२३॥

आश्रमादागतादेवीवृद्धामात्यैःसमन्विता ॥ अभिवाद्यपितुःपादौ ववंदेसामुनिंततः ॥२४॥

नारदोऽपिचतुष्टांतादृष्ट्वप्रोवाचभूमिपं ॥ कन्यांच देवगर्भाभांकिमर्थं नप्रयच्छसि ॥२५॥

तो भगवान नारदऋषी तेथे आले . त्या नारदमुनीची राजाने अर्द्यपाद्यादीकेकरुन पूजा केली ॥२१॥

आसनाचे ठायी पूजित असे नारद सुखाने बसले असता त्यांस तो राजा पुढीलप्रमाणे बोलता झाला ॥२२॥

राजा म्हणतो - " हे नारदमुने ! आज मला आपण आपल्या दर्शनाने पुनीत केल . " असे राजा बोलत आहे तोच ती कमलनयना सावित्री ॥२३॥

आश्रमापासून वृद्ध अमात्यांसह तेथे येऊन पोहोचली . तिने पित्याच्या चरणांना वंदन करुन नंतर नारदमुनीना वंदन केले ॥२४॥

त्याकाळी त्या संतुष्ट अशा राजकन्येप्रत अवलोकन करुन नारदानी राजास प्रश्न केला की , " हे महाबाहो राजा ! ही उपवर झालेली देवगर्भासारखी सुंदर कन्या अद्यापि वराला का देत नाहीस ? " असे नारदांनी विचारले असता राजा म्हणतो ॥२५॥ ॥२६॥

वरायत्वंमहाबाहोवरयोग्यांहिंसुंदरीं ॥ एकमुक्तस्तदातेनमुनिनानृपसत्तमः ॥२६॥

उवाचतंमुनिंवाक्यमनेनार्थेनप्रेषिता ॥ आगतेयंविशालाक्षीमयासंप्रेषितासती ॥२७॥

अनयाचवृतोभर्तापृच्छत्वंमुनिसत्तम ॥ सापृष्टातेनमुनिनातस्मैचाचष्टभामिनी ॥२८॥

सावित्र्युवाच ॥ द्युमत्सेनस्यराज्यंवैवैरिणारुक्मिणाह्रतं ॥ दैवादंधःस्त्रीसहितः सत्यवान्‍तत्सुतोवने ॥२९॥

आश्रमेसत्यवान्नामद्युमत्सेनसुतोमुने ॥ भर्तेतिमनसाविप्रवृतोऽसौराजनंदनः ॥३०॥

याच कार्याकरिता मी ही पाठविली होती , ती ही आत्ताच वर पसंत करुन आली आहे ॥२७॥

तरी हे मुनिसत्तमा , हिने कोण पती निवडला तुम्ही विचारा . असे राजाने सांगितले असता नारदांनी तिला प्रश्न केला . त्यावेळी ती सावित्री नारदाप्रत बोलती झाली ॥२८॥

नारदा , द्युमत्सेन राजाचे राज्य त्याचा वैरी जो रुक्मी त्याने हरण केले व तो दैववशात अंध होत्साता पत्नीसहित वनात राहात आहे . त्याचा पुत्र सत्यवान् ॥२९॥

नावाचा आश्रमामध्ये आहे . तो मी अंतःकरणाने वरिला आहे ॥३०॥

नारद उवाच ॥ कष्टंकृतंमहाराजदुहित्रातवसुव्रत ॥ अजानंत्यावो भर्ता गुणवानिति विश्रुतः ॥३१॥

सत्यवदत्यस्यपितासत्यंमाताप्रभाषते ॥ स्वयंसत्यंप्रभाषेतसत्यवानितितेनसः ॥३२॥

तथाचाश्वाःप्रियास्तस्य अश्वैह्क्रीडतिमृन्मैः ॥ चित्रेपिविलिखत्यश्रांवश्चित्राश्वस्तनेचोच्यते ॥३३॥

रुपवान्गुणावांश्चैवसर्वशास्त्रविशारदः ॥ नतस्यसट्टशोलोके विद्यतेचेहमानवः ॥३४॥

सर्वैर्गुणेश्चसंपन्नोरतैरिवमहार्णवः ॥ एकोदोषोमहानस्यगुणानावृत्यतिष्ठति ॥ संवत्सरेणक्षीणायुर्देहत्यागंकरिष्याति ॥३५॥

असे तिचे भाषण ऐकून नारद म्हणतात , " हे महाराजा ! तुझ्या कन्येने फार वाईट केले ; ते असे की , सत्य्वान् ‍ गुणांनी प्रसिद्ध पाहून त्याचा दोष न कळल्यामुळे त्याला भर्ता वरिला ॥३१॥

त्याचा पिता सत्य भाषण करितो व त्याची माताही सत्य भाषण करिते आणि स्वतः तोही सत्य बोलतो , त्यामुळे त्याला सत्यवान् ‍ असे म्हणतात ॥३२॥

तसेच त्या सत्यवंताला अश्व प्रिय असून तो बाळपणी मृत्तिकेच्या घोडयांनी क्रीडा करीत असे व अश्वांची चित्रेही काढितो . यास्तव त्याला चित्राश्व असेही म्हणतात ॥३३॥

आणि तो रुपगुणसंपन्न असून सर्व शास्त्रांमध्ये निपुण आहे . त्यासारखा या लोकीत कोणी मनुष्य नाही ॥३४॥

जसा सर्व रत्नांनी समुद्र पूर्ण आहे तद्वत् ‍ तो सर्व गुणांनी परिपूर्ण आहे ; परंतु याला त्या सर्व गुणांचे आवरण करणारा एक महान दोष आहे , तो असा की , एक वर्षाने तो क्षीणायु होत्साता देहत्याग करील ! ॥३५॥

अश्वपतिरुवाच ॥ अन्यंवरयभद्रंतेवरंसावित्रीगम्यता ॥ विवाहस्यतुकालोऽयंवर्तते शुभलोचने ॥३६॥

सावित्र्युवाच ॥ नान्यमिच्छाम्यहंतातमनसापिवरंप्रभो ॥ योमयाचवृतोभर्तासमेनान्योभविष्याति ॥३७॥

विचिंत्यमनसापूर्ववाचापश्चात्समुच्चरेत् ‍ ॥ क्रियतेचततःपश्चाच्छुभंवायदिवाशुभं ॥३८॥

तस्मात्पुमांसंमनसाकथं चान्यंवृणोम्यहं ॥ सकृज्जल्पंतिराजानः सकृज्जल्पंतिपंडिताः ॥३९॥

सकृत्कन्या प्रदीयेतत्रीण्येतानिसकृत्सकृत् ‍ ॥ पतिंमत्वानमेबुद्धिर्विचलेच्चकथंचन ॥४०॥

असे नारदाचे वचन ऐकून अश्वपतिराजा कन्येला म्हणतो - हे शुभलोचने सावित्री । अद्यापि तुझा विवाहाच काळ आहे . तरी तू दुसरा पती वर ॥३६॥

तेव्हा सावित्री म्हणते " हे ताता । मी आता दुसरा भर्ता मनानेही करु इच्छीत नाही . जो मी एकवेळ मनाने भर्ता वरिला तोच माझा भर्ता होईल , दुसरा होणार नाही ॥३७॥

कारण कोणत्याही कार्याचा आधी मनात विचार करावा ; नंतर ते वाचेने बोलावे , मग ते शुभ असो किंवा अशुभ असो , बोलल्याप्रमाणे करावे ॥३८॥

तस्मात् ‍ अन्य पुरुषाप्रत मनानेही म्या कसे वरावे आणि असे आहे की , राजे व पंडितजन एकच वेळ भाषण करीत असतात ॥३९॥

तशीच कन्या एकवार दिली जाते , अशा तीन गोष्टी एकेकवारच होत असतात ; तस्मात् ‍ सत्यवंतावाचून अन्य पुरुषाप्रत पती मानण्यास माझी मति चलित होणार नाही ॥४०॥

सगुणोनिर्गुणोवापिमूर्खःपंडितएवच ॥ दीर्घायुरथचाल्पायुः सवैभर्ताममप्रभो ॥४१॥

नान्यंवृणोमिभर्तारंयदिवास्याच्छचीपतिः ॥ इतिमत्वात्वयातातयत्कर्तव्यंसुखेनच ॥४२॥

नारदउवाच ॥ स्थिराबुद्धिश्चराजेंद्रसार्वित्र्याः सत्यवान्पतिः ॥ त्वरयस्वविवाहायभर्त्रासहकुरुत्विमां ॥४३॥

ईश्वरउवाच ॥ निश्चितातुमुनिर्ज्ञात्वा स्थिराबुद्धिश्चनिश्चला ॥ सावित्र्याचमहाराजःप्रतस्थेऽसौवनंप्रति ॥४४॥

गृहीत्वातुधनं राजाद्युमत्सेनस्ययन्निधौ ॥ स्वल्पानुगोमहराजोवृद्धामात्यैःसमन्वितः ॥४५॥

आता तो गुणवान असो किंवा गुणहीन असो , मूर्ख असे किंवा पंडित असो , दीर्घायुषी अथवा अल्पायुषी असोः हे प्रभो ! तोच माझा भर्ता होय ॥४१॥

हे ताता ! आता जरी शचिपती इंद्र प्राप्त झाला तरी मी अन्य भर्ता वरणार नाही . असा माझा निश्चय जाणून कर्तव्य असेल ते करावे ॥४२॥

असे तिचे भाषण ऐकून त्याकाळी नारद म्हणाला , " हे राजेंद्रा ! या सावित्रीची मति सत्यवंताचे ठिकाणी अत्यंत स्थिर झाली आहे . यास्तव सत्यवंतासहवर्तमान हिचा विवाह करण्याविषयी तू त्वरा कर " ॥४३॥

शिव म्हणतात - हे सनत्कुमारा ! सावित्रीचा दृढ निश्चय नारदांनी जाणला . नंतर तो अश्वपती राजा सावित्रीसह वनास जाण्याकरिता निघाला ॥४४॥

त्याने आपल्याबरोबर द्र्व्य घेऊन व थोडे सैन्य व वृद्ध अमात्य यांसहवर्तमान द्युमत्सेनाच्या सान्निध येऊन पोहोचला ॥४५॥

नारदस्तुततःखेवैतत्रैवांतरधीयत ॥ सगत्वाराजशार्दुलोद्यमत्सेनेनसंगतः ॥४६॥

वृद्धश्चांधश्चराजासौवृक्षमूलमुपाश्रितः ॥ सावित्र्यश्वपतीराजापादौजग्राहवीर्यवान् ॥४७॥

स्वनामचसमुच्चार्यतस्थौतस्यसमीपतः ॥ उवाचराजातंभूपंकिमागमनकारणं ॥४८॥

पूजयित्वार्ध्यदानेनवन्यमूलफलैश्चसः ॥ ततःपप्रच्छकुशलंसराजा मुनिसत्तम ॥४९॥

अश्वपतिरुवाच ॥ कुशलंदर्शनेनाद्यवराजन्ममाद्यव ॥ दुहिताममसावित्रीतवपुत्रमभीप्सति ॥५०॥

इकडे नारदमुनी आकाशमार्गी अंतर्धान पावले व अश्वपतिराजा जाऊन द्युमत्सेनास भेटला ॥४६॥

तो द्युमत्सेन राजा वृद्ध व अंध होता आणि एका वृक्षाच्या मुळाचा आश्रय करुन बसला होता , त्याला सावित्री आणि अश्वपती राजा यांनी वंदन केले ॥४७॥

आपले नाव कथन करुन अश्वपती राजा उभा राहिला असता द्युमत्सेन राजा म्हणतो की , " हे राजन् ! आपले येणे कोणत्या कारणाने झाले ? " ॥४८॥

असे भाषण करुन अरण्यातील फुले , मुळे व अर्घ्य इत्यादिकांनी त्याचे पूजन केले . शंकर म्हणतात - हे मुनिसत्तमा सनत्कुमारा ! नंतर त्याने अश्वपतीराजास कुशलवर्तमान विचारिले ॥४९॥

त्यावेळी अश्वपती म्हणतो - " हे राजन् ! आज आपल्या दर्शनाने माझे कुशल अहे . माझ्या आगमनाचे कारण माझी सावित्री नामक कन्या तुमच्या पुत्राची इच्छा करीत आहे " ॥५०॥

भर्तारंराजशार्दूलप्राप्रोत्वियमनिंदिता ॥ ममेदंकांतिक्षतंपूर्वंभर्तारमनयाविभो ॥ आवयोश्चैवसंबंधोभवत्वद्यममेप्सितः ॥५१॥

द्युमत्सेन उवाच ॥ वृद्धश्चांधश्चराजेंद्रफलमुलाशनोनृप ॥ राज्याच्च्युतश्चमेपुत्रोवन्येनान्ने नजीवति ॥५२॥

साकथंसहतेदुःखंदुहिता तवकानने ॥ अनभिज्ञाचदुःखानामित्यहंनाभिकांक्षये ॥५३॥

अश्वपतिरुवाच ॥ अनयाचवृक्षतोभर्ताजानंत्याराजसत्तम ॥ अनेनसहवासस्तुतवपुत्रेणमानद ॥५४॥

स्वर्गतुल्योमहाराजभविष्यतिनसंशयः ॥ एकमुक्तस्तदातेनराजाराजर्षिसत्तम ॥५५॥

त्याकरिता हे राजश्रेष्ठा , तुमचा पुत्र या सुंदरीला पती म्हणून प्राप्त होवो आणि मलाही हे योग्य वाटत आहे . यास्तव मला प्रिय असा हा तुमचा आमचा संबंध जडो ॥५१॥

द्युमत्सेन म्हणतो , हे राजेंद्रा ! मी तर वृद्ध आणि अंध असून राज्यभ्रष्ट झालेला , फळे , मुळे भक्षण करुन राहतो ; तसाच माझा पुत्रही वनातील फलादीकांवर उपजीविका करितो ॥५२॥

त्यासाठी तुझी कन्या जिला दुःख कसे ते ठाऊक नाही - अरण्यात दुःख कसे सहन करील ? यास्तव हा संबंध मला योग्य वाटत नाही ॥५३॥

त्यावर अश्वपती म्हणतो - हे राजश्रेष्ठा , हे सर्व जाणूनच हिने तुमच्या पुत्रास वरिले आहे , तस्मात् ‍ तुमच्या पुत्रसहवर्तमान वनवासही हिला स्वर्गतुल्य होईल यात संशय नाही , असे अश्वपती राजाने द्युमत्सेनराजर्षीला म्हणाला असता ॥५४॥ ॥५५॥

तथेतिसप्रतिज्ञायचकारोद्वाहमुत्तमं ॥ कृत्वाविवाहंराजेंद्रंसंपूज्यविविधैर्धनैः ॥५६॥

अभिवाद्यद्युमत्सेनंजगामनगरंप्रति ॥ सावित्रीतुवरंलव्ध्वाइंद्रप्राप्यशचीयथा ॥५७॥

सत्यवानपिराजर्षिस्तयापल्याभिनंदितः ॥ क्रीडतेतद्वनोद्देशेपौलोम्यामघवानिव ॥५८॥

नारदस्यतुतद्वाक्यंह्रदयेतुमनस्विनी ॥ वहंतीनियमंचक्रेव्रतस्यास्य चभामिनी ॥५९॥

गणयंतीदिनान्येवनलेभेहर्षमुत्तमं ॥ अस्मिनदिनेचमर्तव्यमितिसत्यवतामुने ॥ ज्ञात्वा तंदिवसंविप्रभर्तुर्मरणकारणं ॥६०॥

त्याने ते मान्य केले . नंतर सावित्री - सत्यवंताचा विवाह उत्तमप्रकारे केला . अश्वपतीने द्युमत्सेनाचा अनेक प्रकारच्या द्रव्यांनी सत्कार केला ॥५६॥

नंतर त्याला वंदन करुन आपल्या नगरास परत आला . इकडे सावित्रीला सत्यवंत भर्ता झाला ; तेव्हा इंद्रायणीला इंद्र प्राप्त होऊन जसा आनंद झाला त्याप्रमाणे सावित्रीला आनंद झाला ॥५७॥

सत्यवंतही त्या सावित्रीसहवर्तमान आनंदित होत्साता इंद्रायणीसहवर्तमान जसा इंद्र तसा तो वनात क्रीडा करु लागला ॥५८॥

परंतु सावित्री मनामध्ये नारदाचे वाक्य आठवीत होत्साती या व्रताचा म्हणजे वटसावित्री व्रत्राचा नियम करिती झाली ॥५९॥

आपल्या पतीच्या आयुष्याचे दिवसांची मोजणी करीत असल्यामुळे तिला कशानेही आनंद होत नसे . कारण नारदांनी सांगितलेला तो दिवस पतीचा मरणकाळ आहे हे तिला समजले होते ॥६०॥

व्रतंत्रिरात्रमुद्दिश्यदिवरात्रौस्थिराभवत् ॥ ततस्त्रिरात्रंनिर्वर्त्यसंतर्त्यपितृदेवताः ॥ श्र्वश्रूश्वशुरयोः पादौववंदेचारुहासिनी ॥६१॥

असत्यंतेनियमंकृत्वात्रिदेनस्यमनस्विनी ॥ अस्मिनदिनेचमर्तव्यामितीसत्यवतामुने ॥६२॥

कुठारंपरिगृह्याथकठिनंचैवसुव्रत ॥ प्रतस्थेसवनायैवसावित्रीवाक्यमब्रवीत् ‍ ॥६३॥

नगंतव्यंवनंत्वद्यममवाक्येनमानद ॥ अथवागम्यतेसाधोमयासहवनंव्रज ॥६४॥

संवत्सरोऽभवत्पूर्ण आश्रमेस्मिन्ममप्रभो ॥ तद्वनंद्रष्टुमिच्छामिप्रसादंकुरुमेप्रभो ॥६५॥

नंतर त्रिरात्र व्रताचा संकल्प करुन रात्रंदिवस स्वस्थ चित्त राहून तीन दिवस घालविले . नंतर पितर व देवता यांचे संतर्पण करुन तिने सासुसासर्‍यांना वंदन करुन ॥६१॥

नंतर तिने आपला नियम पूर्ण केला आणि विचार करीत आहे की , आज सत्यवंताच्या मृत्यूचा दिवस आहे ॥६२॥

त्या दिवशी सत्यवान कुर्‍हाड व फळे ठेवण्याचा करंडा घेऊन वनात जाण्यास निघाला , तेव्हा सावित्री म्हणाली ॥६३॥

की , आज आपण वनात जाऊ नये ; अथवा जर जाणारच असाल तर मला बरोबर घेऊन जावे ॥६४॥

कारण हे प्रभो ! मला या आश्रमात येऊन एक वर्ष पूर्ण झाले . परंतु अद्यापि मी अरण्य पाहिले नाही , याकरिता अरण्य पाहावे अशी माझी इच्छा आहे , आपण ही माझी इच्छा पूर्ण करावी ॥६५॥

सत्यवानुवाच ॥ नाहंस्वतंत्रःसुश्रोणिपृच्छस्वपितरौमम ॥ ताभ्यांप्रस्थापितागच्छमयासहशुचिस्मिते ॥६६॥

एवमुक्तातदातेनभर्त्रासाकमलेक्षणा ॥ श्र्वश्रूश्वशुरयोःपादावभिवाद्येदमब्रवीत् ‍ ॥६७॥

वनंद्रष्टुमभीच्छेयमाज्ञमह्यंप्रदीयताम् ‍ ॥ उवाचवचनंसाध्वीवरमेकंप्रयच्छमे ॥६८॥

भर्तासहवनंगंतुमेतत्त्वरयतेमनः ॥ तस्यास्तद्वचनंश्रुत्वाद्यमुत्सेनोऽब्रवीदिदम ॥६९॥

व्रतंकृतत्वयाभद्रेपारणंकुरुसुव्रते ॥ पारणांतेततोभीरुव नंगंतुंत्वमर्हसि ॥७०॥

असे सावित्रीचे भाषण ऐकून सत्यवान् म्हणतो , हे सुंदरी मी तुला बरोबर नेण्यास स्वतंत्र नाही ; मातापितरांस विचार आणि त्यांनी पाठविले तर माझ्याबरोबर ये ॥६६॥

सत्यवंताने असे सांगितल्यावर ती कमलनयना सावित्री सासूसासर्‍यांचे चरणांस वंदन करुन म्हणाली ॥६७॥

की , आज मी वनशोभा पाहण्याकरिता जाते ; मला आपण परवानगी द्यावी . मला आपण आशीर्वाद द्यावा ॥६८॥

कारण माझे मन पतीसह वनशोभा पाहाण्यास जाण्यासाठी फार उत्सुक झाले आहे . सावित्रीचे हे वचन ऐकून द्युमत्सेन राजा म्हणाला ॥६९॥

हे शुभांगी , तू व्रत केले आहेस तस्मात् त्या व्रताची पारणा कर आणि नंतर तू अरण्यात जा ॥७०॥

सावित्र्युवाच ॥ नियमश्चकृतोस्माभीरात्रौचचंद्रोदयेसति ॥ जाते मयाप्रकर्तव्यंभोजनंतात मेश्रृणु ॥७१॥

वनदर्शनकामोस्तिभर्तासहममाद्यवै ॥ नमेतत्रभवेद्‍ग्लानिर्भात्रार्यसहन रात्रधिप ॥७२॥

इत्युक्त्स्तुतयाराजाद्युमत्सेनोमहीपतिः ॥ यत्तेऽभिलषितं पुत्रितत्कुरुष्वसुमध्यमे ॥७३॥

नमस्कृत्वातुसावित्रीश्वश्रूंचश्वशुरंतथा ॥ सहिता साजगामाथतेनसत्यवतामुने ॥७४॥

विलोकयंतीभर्तारंप्राप्तकालंमनस्विनी ॥ वनंचफलितंट्टष्टापुष्पिद्रुमसंकुलम् ॥७५॥

हे द्युमत्सेनाचे वचन ऐकून सावित्री म्हणते , हे ताता , मी असा नियम केला आहे की , रात्रौ चंद्रोदय झाल्यानंतर भोजन करीन . त्यासाठी माझे हे ऐका ॥७१॥

आज पतीसहवर्तमान वनशोभा पाहण्याची माझी इच्छा आहे . हे नराधिपा ! भर्त्याच्या समागमेकरुन मला ग्लानी निश्चयेकरुन येणार नाही ॥७२॥

हे सावित्रीचे भाषण ऐकून द्युमत्सेन राजा म्हणतो , हे मुली , तुझी इच्छा असेल तसे कर ॥७३॥

त्यावेळी सावित्रीने सासुसासर्‍यांस नमस्कार केला . शिव म्हणतात , हे मुनिश्रेष्ठा , सनत्कुमारा , नंतर तिने त्या सत्यवंतासह वनात गमन केले ॥७४॥

त्याकाळी रस्त्याने जात असता , भर्त्याचा काळ जवळ आला आहे हे जाणून त्याकडे वारंवार पाहात आणि फुलांनी बहरलेल्या अशा वृक्षांनी व्याप्त अशा वनात पाहून ॥७५॥

द्रुमाणांचैवानमानिमृगाणांचैवभामिनी ॥ पश्यंतीमृगयूथानिह्रदयेनप्रवेती ॥७६॥

तत्र गत्वासत्यवान्वैफलान्यादायसत्वरं ॥ काष्ठानिचसमादायबबंधभारकंतदा ॥७७॥

कठिनं पूरयामासकृत्वावृक्षावलंबनम् ॥ वटवृक्षस्यसासाध्वी उपविष्टामहासती ॥७८॥

काष्ठ पातयतस्तस्यजाताशिरसिवेदना ॥ ग्लानिश्चमहतीजातागात्राणांवेपथुस्तदा ॥७९॥

आगत्यवृक्षसामीप्यंसावित्रीमिदमब्रवीत् ॥ ममगात्रेऽतिकंपश्चजाताशिरसिवेदना ॥८०॥

वृक्षांची व मृगांची नावे विचारीत हरीणांचे कळप पाहात आहे ; परंतु ह्रदयात थरथर कापते आहे ॥७६॥

नंतर सत्यवंताने अरण्यात जाऊन फळे आणिली आणि लाकडेही जमवून भारा बांधिला ॥७७॥

तो भारा क्षणात बांधून पुन्हा वटवृक्षाच्या फांदीवर सत्यवान् चढला व ती साध्वी त्या वृक्षाखाली बसली ॥७८॥

इतक्यात सत्यवान् लाकडे तोडीत असता , अकस्मात् त्याच्या मस्तकात वेदना उत्पन्न झाली आणि शरीरामध्ये ग्लानी उत्पन्न होऊन त्याची गात्रे थरथर कापू लागली ॥७९॥

त्यावेळी तो वृक्षाखाली उतरुन सावित्रीस म्हणाला , " हे सुंदरी , माझ्या शरीरामध्ये मोठा कंप व मस्तकात वेदना होत आहे " ॥८०॥

कंटकैर्भिद्यतेभद्रेशिरोमेशूलसंमितैः ॥ उत्संगेतवसुश्रोणिस्वप्तुमिसुव्रते ॥८१॥

विश्रमस्वमहाबाहोसावित्रीप्राहदुःखिता ॥ अभिज्ञातद्विशालाक्षीतस्यमृत्योर्मनस्विनी ॥८२॥

प्राप्तकालंमन्यमानातस्थौतत्रैवभामिनी ॥ सत्यवानपिसुप्तस्तुकृत्वोत्संगेशिरस्तदा ॥ तावत्तत्रसमागच्छत्पुरुषःकृष्णपिंगलः ॥८३॥

जाज्वल्यामानं वपुषाददर्शाथमनस्विनी ॥ उवाचवाक्यंवाक्यज्ञाकस्त्लोंभयंकरः ॥८४॥

नाहंधर्षयितुंशक्यापुरुषेणापिकेनचित् ॥ इत्युक्तः प्रत्युवाचेदंयमोलोकभयंकरः ॥८५॥

" हे भद्रे , ती वेदना शूलासारख्या काट्यांनी जसे टोचावे तशी होत आहे ; यास्तव तुझ्या मांडीवर डोके ठेवून झोपण्याची इच्छा करीता आहे " ॥८१॥

हे ऐकून , त्याचा मृत्युकाळ आला असे जाणून ती विशालनेत्रा सावित्री दुःखित होऊन सत्यवानास म्हणाली " हे महाबाहो , आपण विश्रांती घ्या . " ॥८२॥

त्यावेळी सत्यवान तिच्या मांडीवर मस्तक ठेवून निजला . इतक्यात तेथे एक कृष्णपिंगट वर्णाचा असा उग्र पुरुष आला ॥८३॥

स्वरुपाने उग्र अशा त्या पुरुषाला पाहून वागयज्ञा अशी सावित्री त्यास म्हणाली की , " सर्व लोकांस भयंकर दिसणारा असा तू कोण आहेस " ? ॥८४॥

कोणत्याही पुरुषास पाहून मी घाबरणे शक्य नाही . हे ऐकून सर्व लोकभयंकर यम बोलता झाला ॥८५॥

यमउवाच ॥ क्षीणायुस्तुवरारोहेभर्तातवमनस्विनि ॥ नैष्याम्येनमहंबध्वाह्येतन्मेच चिकीर्षितं ॥८६॥

सावित्र्युवाच ॥ श्रूयतेभगवनदूतास्तवागच्छन्तिमानवान् ॥ नेतुंकिलभवान्कस्मादगतोस्वियंप्रभो ॥८७॥

इत्युक्त्वापितृराजेनतांतदास्वचिकीर्षितं ॥ यथावत्सर्वमाख्यातुंतत्क्रियार्थंप्रचक्रमे ॥८८॥

अयंहिधर्मसंयुक्तोरुपवान्गुणसागरः ॥ नार्होमत्पुरुषैर्नेतुमतो स्मिस्वयमागतः ॥८९॥

ततःसत्यवतःकायात्पाशबद्धंचसत्वरं ॥ अंगुष्ठमात्रंपुरुषंनिश्चकर्षयमोबलात् ॥९०॥

यम म्हणतो , " हे सुंदरी , तुझ्या भर्त्याचे आयुष्य सरले आहे . मी याला बांधून नेतो ; हेच माझे कर्तव्य आहे " ॥८६॥

असे यमाचे हे भाषण ऐकून सावित्री म्हणाली , " हे भगवन् ‍, मनुष्यांना नेण्याकरिता तुमचे दूत येतात आणि आज आपण स्वतः आला , याचे कारण काय ? " ॥८७॥

त्यावर यमाने आपले कर्तव्य सांगून स्वतः येण्याचे कारण तो सांगू लागला ॥८८॥

यम म्हणाला , " हा सत्यवान धर्मयुक्त , स्वरुपवान व गुणांचा केवळ सागर आहे ; हा माझ्या दूतांनी नेण्यास योग्य नव्हे म्हणून मी स्वतः यास नेण्यास आलो " ॥८९॥

नंतर सत्यवंताच्या शरीरापासून अंगुष्ठमात्र जीवाला पाशांनी बद्ध करुन यमाने बलात्काराने ओढिला ॥९०॥

ततःसमुद्धतप्राणंगतश्वासहतप्रभं ॥ निर्विचेष्टंशरीरंतद्वभूवाप्रियदर्शनम् ॥९१॥

यमस्तुतंतथाबध्वाप्रययौदाक्षिणामुखः ॥ सावित्रीचापिदुःखार्तायममेवान्वगच्छत ॥ नियमव्रतसंपन्नामहाभागायतव्रता ॥९२॥

यमउवाच ॥ निवर्त्यगच्छसावित्रीकुरुष्वास्यौदर्ध्वदेहिकम् ॥ कृतंभर्तुस्त्वयानृण्यंयावद्वशगतंतव ॥९३॥

सावित्र्युवाच ॥यत्रमेनीयतेभर्तास्वयंवायत्रगच्छति ॥ मयापितत्रंगतव्यमेषधर्मःसनातनः ॥९४॥

तपासागुरुवृत्त्याचभर्तुस्रेहाद्वतेनच ॥ तवचैवप्रसादेननमेप्रतिहतागतिः ॥९५॥

नंतर प्राणरहित , श्र्वासरहित आणि निस्तेज व चेष्टारहित असे ते सत्यवंताचे शरीर फार वाईट दिसू लागले ॥९१॥

यमधर्म सत्यवंताला पूर्वी सांगितल्याप्रमाणे बांधून दक्षिणेकडे चालला . त्यावेळी नियमव्रतसंपन्ना अशी महाभाग्यवती सावित्री यमामागून जाऊ लागली ॥९२॥

तेव्हा यमधर्म म्हणाला , " हे सावित्री ! तू आता परत जा आणि याचा क्रियाकर्म कर . तुझ्या स्वाधीन होती तितकी पतीची सेवा तू केलीस , त्यामुळे तू पतीच्या ऋणातून मुक्त झालीस " ॥९३॥

असे यमाचे भाषण ऐकून सावित्री म्हणते , " माझा पती जिकडे जाईल किंवा माझ्या भर्त्याला कोणी जिकडे नेईल तिकडे मीही जावे हा सनातनधर्म होय ॥९४॥

आणि स्वधर्माचरणाने व वडिलांचे सेवेमुळे , भर्तृस्नेहास्तव , व्रतप्रभावाने व तुमच्या प्रसादाने माझ्या गतीला प्रतिबंध होणार नाही " ॥९५॥

प्राहुःसाप्तपदंमैत्रबुधास्तत्त्वार्थदर्शिनः ॥मित्रतांतुपुरस्कृत्यकिंचिद्वक्ष्यमितच्छुणु ॥९६॥

नानात्मवंतोहिवनेचरंतिधर्मंचवासंचपरिशमंच ॥ विज्ञानतोधर्ममुदाहरंति तस्मात्संतोधर्ममाहूः प्रधानम् ॥९७॥

एकस्यधर्मेणसतांमतेनसर्वेस्मतंमार्गमनुप्रपन्नः मावैद्वितीयंतृतीयचंवांच्छेत्तस्मत्संतोधर्ममाहुःप्रधानम् १ ॥९८॥

यमउवाच ॥ निवर्ततुष्टोऽस्मितवानयागिरास्वराक्षरव्यंजनहेतुयुक्तया ॥ वरंवृणीष्वेहविनास्यजीवितंददामितेसर्वमनिंदितेवरं ॥९९॥

सावित्र्युवाच ॥ च्युतःस्वराज्याद्वनवासमाश्रितोविनष्टचक्षुःश्र्वशुरोममाश्रमे ॥ सलब्धचक्षुर्बलवान्भवेन्नृपस्तवप्रसादाज्वलनार्कसन्निभः॥१००॥

ज्ञाते सत्पुरुष असे म्हणतात की , सज्जनांबरोबर सात पावले चालले असता मैत्री घडते . याकरितां मित्रत्वाने मी काही बोलते ते ऐका ॥९६॥

" चित्ताला जिंकणारे असे अनेक मुनी वनात वास करुन धर्म व सत्य पाळून आणि कष्ट करुन स्वानुभवाने सर्वांस धर्मोपदेश करितात , यास्तव धर्म हाच श्रेष्ठ आहे असे संत म्हणतात " ॥९७॥ ॥९८॥

असे तिचे भाषण ऐकून यम म्हणतो , " हे सुंदरी ! तू आता माघारी फिर . तुझ्या वर स्वर , अक्षर , व्यंजन व हेतू यांनी युक्त अशा बोलण्याने मी संतुष्ट झालो आहे ; म्हणून जीवितावाचून कोणता पाहिजे तो वर मागून घे ; मी देतो " ॥९९॥

असे यमाचे वाक्य ऐकून सावित्री म्हणते , " माझा सासरा राज्यभ्रष्ट झाला असून आश्रमामध्ये वनवास भोगीत आहे आणि अंध आहे , त्याला तुमच्या प्रसादाने दृष्टी प्राप्त व्हावी आणि तो अग्नी व सूर्यासारखा तेजस्वी व्हावा " ॥१००॥

यमउवाच ॥ ददरमितेसर्वमनिंदतेवरंयथात्वयोक्तभविताचतत्तथा ॥ तवाध्वनोग्लानि मिवोपलक्षयेनिवर्तगच्छस्वनतेश्रमोभवेत् ॥१०१॥

सावित्र्युवाच ॥ कुतःश्रमोभर्तृसमीपतोद्यमेयतो हिभर्तामम सागतिर्ध्रुवा ॥ यतःपतिंनेष्यसितत्रमेगत्तिः सुरेशभूयश्चवचो निबोधमे ॥१०२॥

संतासकृत्संगतमीप्सितंपरैस्ततःपरंमित्रमितिप्रचक्षते ॥ नचाफलंसत्पुरुषणसंगतं ततःसतांसंनिवसेत्समागमे ॥१०३॥

यमउवाच ॥ मनोनुकूलंबुधबुद्धिवर्धनंत्वयायदुक्तंवचनंहिताश्रयं ॥ विनापुनःसत्यवतोहिजीवितंवरं द्वितीयंवरयस्वभामिनी॥१०४॥

सावित्र्युवाच ॥ ह्रतंपुरामेश्वशुरस्यधीमतःस्वमेवराज्यंलभतासपार्थिवः ॥ नचस्वधर्मंप्रजहीतमेगुरुर्द्वितीयमेवंवरयामितेवरं ॥१०५॥

यम म्हणतो , " हे अनिंदिते , हा सर्व वर मी तुला दिला . जसे तू म्हणतेच तसे होईल . आता तुला चालून ग्लानी आली आहे असे दिसते , यास्तव तू परत जा . तुला हे श्रम न होवोत " ॥१०१॥

असे यमाचे वचन ऐकून सावित्री म्हणते , " हे सुरश्रेष्ठा ! पतीचे सान्निध्य असता मला श्रम कसे होतील ? ज्या मार्गाने माझा पती जाईल तोच माझा मार्ग . जिकडे माझ्या पतीला नेता तिकडे मलाही गेले पाहिजे . आणखी माझे भाषण ऐका ॥१०२॥

की सत्संगती एकवार व्हावी अशी सुजन इच्छा करितात ; कारण एकवार संगती झाली असता साधू मित्रत्व करितात आणि साधूंची संगती कधी निष्फल व्हावयाची नाही . यास्तव साधूंच्या समागमे वास करावा " ॥१०३॥

हे तिचे भाषण ऐकून यमधर्म म्हणाला , " हे भामिनी ! तू जे भाषण केलेस ते मनोरंजक असून ज्ञात्यांच्या बुद्धीस पटणारे व हितकारक आहे , यास्तव या सत्यवंताच्या बुद्धीस पटणारे व हितकारक आहे , यास्तव या सत्यवंताच्या जीवितावाचून पुन्हा दुसरा वर मागून घे " ॥१०४॥

सावित्री म्हणते , " माझ्या सासर्‍याचे राज्य पूर्वी शत्रूंनी हरण केले आहे . ते त्याला प्राप्त होवो आणि त्याच्या हातून स्वधर्मत्याग न घडो हा दुसरा वर मी तुम्हाजवळ मागते " ॥१०५॥

यमउवाच ॥ स्वमेवराज्यंप्रतिपत्स्यतेऽचिरान्नचस्वधर्मात्परिहास्यतेनृपः ॥ कृतेनकामेनमयानृपात्मजे निवर्तगच्छस्वनतेश्रमोभवेत् ॥१०६॥

सावित्र्युवाच ॥ प्रजास्त्वयैतानियमेनसंयुतानियम्यचैतनायसेनकाम्यया ॥ येतो यमत्वंतवदेवविश्रुतंनिबोधयेमांगिरमीरितांमया ॥१०७॥

अद्रोहःसर्वभूतानांकर्मणामनसागिरा ॥ अनुग्रहश्चदानंचसताधर्मःसनातनः ॥१०८॥

एवंप्रायश्च लोकेहिमनुष्याःशक्तिपेशलाः ॥ संतःस्वेष्यप्यमित्रेषुदयांप्राप्तेषुकुर्वते ॥१०९॥

यमउवाच ॥ पिपासितस्येवयथाभवेत्पयास्तथात्वयावाक्यमिदंसमीरितं ॥ विनापुनः सत्यवतोस्यजीवितंवरंवृणीष्वेहशुभेयदीच्छसि ॥११०॥

त्यावर यम म्हणाला , " हे राजकन्ये , तुझ्या श्वशुराला थोड्याच दिवसात आपले राज्य प्राप्त होईल व तो राजा धर्मत्याग करणार नाही . आता तू पूर्ण मनोरथा अशी माघारी जा ; म्हणजे तुला श्रम होणार नाहीत " ॥१०६॥

पुन्हा सावित्री भाषण करिते की , " हे देवा ! स्वधर्माने बद्ध झालेल्या सर्व प्रजांचे तू नियमन करितोस , केवळ स्व इच्छेने तू वर्तन करीत नाहीत , यास्तव तुझे यम हे नाव प्रसिद्ध आहे , तर आता माझे भाषण श्रवण कर ॥१०७॥

कर्माने , मनाने किंवा वाणीनेही कोणाही भुताशी द्रोह न करणे , त्यांच्यावर अनुग्रह करणे आणि यथाशक्ती दान करणे हा सत्पुरुषांचा सनातन धर्म होय ॥१०८॥

असेच या लोकी जे समर्थ , सज्जन आहेत ते आपल्या शत्रूवरच दया करितात " ॥१०९॥

यम म्हणतो , " हे सावित्री ! तृषिताला जसे उदक तसे हे वाक्य तू बोललीस , तरी आता पुन्हा या सत्यवंताच्या जीवितावाचून जो वर पाहिजे असेल तो मागून घे " ॥११०॥

सावित्र्युवाच ॥ ममानपत्यःपृथिवीपतिःपिताभवेत्पितुःपुत्रशतंच औरसं ॥ कुलस्यसंतानकरंचतद्भवेत्तृतीयमेवंवरयामितेवरं ॥१११॥

यम उवाच ॥ कुलस्यसंतानकरंसुवर्चसंशतंसुतानांपितुरस्तुतेशुभे ॥ कृतेनकामेननराधिपात्मजेनिवर्तदूरंहिपथस्त्वमागता ॥११२॥

सावित्र्युवाच ॥ नदूरमेतजन्ममभर्तृसन्निधौमनोहिमेदूरतरंप्रधावति ॥ अथव्रजत्रेवगिरं समुद्यतांमयोच्यमानांश्रृणुभूय एवच ॥११३॥

विवस्वतस्त्वंतनयःप्रतापवांस्ततोहि वैवस्वत उच्यतेबुधैः ॥ समेनधर्मेणचरंतिताःप्रजास्ततस्तवेहेश्र्वरधर्मराजता ॥११४॥

आत्मन्यपिनविश्वासस्तावद्भवतिसत्युयः ॥ तस्मात्सत्सुविशेषेणसवःप्रणयमृच्छति ॥११५॥

असे यमाचे वाक्य ऐकून सावित्री म्हणते , " माझा पिता पृथ्वीपती आहे ; परंतु त्याला पुत्र नाही , तर कुलवृद्धी करणारे असे औरस शंभर पुत्र त्याला व्हावेत , हा तिसरा वर मी मागत " ॥१११॥

यम म्हणतो , हे राजकन्ये , तुझ्या पित्याला कुलवृद्धी करणारे व तेजस्वी असे शंभर पुत्र होतील . हा तुझा मनोरथ मी पूर्ण केला . तू फारच दूर आलीस तर आता परत जा . ॥११२॥

असे यमाचे भाषण ऐकून सावित्री म्हणते , " पतीचे सान्निध्याने हे मला काहीच दूर नाही . माझे मन याहूनही दूर धावत आहे . हे यमधर्मा ! आपण चालत असता मी बोलते आहे ते माझे वचन श्रवण करा ॥११३॥

आपण प्रतापवान असे विवःस्वताचे ( सूर्याचे ) पुत्र आहा , म्हणून आपणास वैवसवत असे म्हणतात व आपल्या सत्तेने सर्व प्रजा स्वधर्माने चालतात म्हणून आपणास धर्मराज असे म्हणतात ॥११४॥

हे यमधर्मा ! असे आहे की , आपला आपले ठिकाणीही जो विश्वास नसतो तो साधूंचे ठिकाणी असतो . यास्तव सर्व लोक साधूंविषयी विशेषतः नम्रता धरितात ॥११५॥

सौह्रदात्प्रणयाच्चापिविश्वासोनामजायते ॥ तस्मात्सत्सुविशेषेणविश्वासं कुरुतेजनः ॥११६॥

यम उवाच ॥ उदाह्रतंतेवचनंयदंगनेशुभंनताट्टक्त्वट्ट्ते मयाश्रुतं ॥ अनेनतुष्टोऽस्मिविनास्यजीवितंवरंचतुर्थवरयस्वगच्छच ॥११७॥

सावित्र्युवाच ॥ ममात्मजंसत्यवतस्तथौरसंभवेदुभाभ्यामिहयत्कुलोद्भवं ॥ शंत सुतानांबलिनांमहात्मनामिमंतचतुर्थंवरयामितेवरं ॥११८॥

यम उवाच ॥ शतंसुतानांबलवीर्यशालिनां भविष्यतिप्रीतिकरंतवाबले ॥ परिश्रमस्ते नभवेन्नृपात्मजेनिवर्तदूरंहिपथ स्त्वमागता ॥११९॥

सावित्र्युवाच ॥ सतांहिया शाश्वतधर्मवृत्तिः संतोनसीदंतिनचव्यथंति ॥ सतांसिद्भिर्नाफलःसंगमोस्तिसभ्द्यो भयंनानुभवंतिसंतः ॥१२०॥

ह्रदयामध्ये निष्कटपणा व विनयसंपन्नता येणेकरुन विश्वास उत्पन्न होतो . यास्तव साधूंचे ठायी विशेषेकरुन जन विश्वास धरितात " ॥११६॥

यम म्हणतो - हे अंगने , जे तू शुभ वचन बोललीस असे आजपर्यंत मी कोणाकडूनही ऐकले नाही , याकरिता मी संतुष्ट झालो आहे ; तर याच्या जीवितावाचून आणखी चवथा वर मागून घे आणि परत जा " ॥११७॥

तेव्हा सावित्री म्हणते , " माझे ठिकाणी सत्यवंताला शंभर औरस पुत्र व्हावेत ते असे की , बलवान व महात्मे आणि ज्यापासून इहलोकी आमचे कुळ वृद्धिंगत होईल ; हा चवथा वर मी आपणाशी मागते . " ॥११८॥

यम म्हणतो , " हे राजकन्ये ! बलाने व पराक्रमाने शोभणारे व प्रीती करणारे असे शंभर पुत्र तुला होतील , आता तू परत जा , बहुत दूर आलीस . तुला चालण्याचे परिश्रम न होवोत " ॥११९॥

असे यमाचे भाषण ऐकून सावित्री म्हणते , " साधूंची वृत्ती धर्माविषयी निरंतर असते . साधू कधीही दुःख पावत नाहीत व व्यथाही पावत नाहीत . आणि सज्जनांच्या साधूंशी समागम निष्फळ होत नाही ॥१२०॥

संतोहिसत्येननयंतिसूर्यंसंतोभूमिंतपसाधारयंति संतोगतिर्भूतभव्यस्यराजव्सतांमध्येनावसीदंतिसंतः ॥१२१॥

आर्यजुष्टमिदंवृत्तमितिविज्ञायशाश्वतं ॥ संतःपरार्थं कुर्वाणानावेक्षंतेप्रतिक्रियां ॥१२२॥

नचप्रसादःसत्पुरुषेषुमोघोनचाप्यर्थोनश्चतिचाभिमानः ॥ यस्मादेतन्नियतंसत्सुनित्यतस्मात्संतोरक्षितारोभवंति ॥१२३॥

यम उवाच ॥ यथायथाभाषसिधर्मसंतिंमनोनुकूलंसुपदंमहार्थवत् ॥ तथातथामेत्वयिभक्तिरुत्तमावरंवृणीष्वाप्रतिमंप्रतिव्रते ॥१२४॥

सावित्र्युवाच ॥ नतेऽपवर्गः सुकृताद्विनाकृतस्तथान्यथान्येषुरेषुमानद ॥ वरंवृणेजीवतुसत्यवानयंयंथामृताह्येवमहंविनापतिं ॥१२५॥

संत सत्यानेच सूर्याची आराधना करतात व संत आपल्या तपाने भूमीप्रत धारण करतात . संत हे मागे झालेल्या व पुढेही तारक आहेत . साधूंबरोबर राहाणारे सज्जन कधीही दुःख पावत नाहीत ॥१२१॥

असे हे श्रेष्ठ जनांनी सेवन केलेले शाश्वतव्रत जाणून साधू परोपकार करितात ; पण प्रत्युपकाराची इच्छा करीत नाहीत ॥१२२॥

याकरिता सत्पुरुषांचा प्रसाद कधीच व्यर्थ होत नाही . या गोष्टी सत्पुरुषांचे ठिकाणी निश्चयेकरुन नित्य आहेत , याकरिता साधू सर्वांचे रक्षण करणारे आहेत " ॥१२३॥

हे सावित्रीचे भाषण ऐकून यम म्हणतो , " हे पतिव्रत , जसे जसे तू माझ्या मनास अनुकूल व धर्मयुक्त आणि शुभ फळ देणारे असे भाषण करितेस तशी तशी तुझे ठिकाणी माझी भक्ती वाढत आहे . म्हणून तू आता अप्रतिम वर मजपासून मागून घे " ॥१२४॥

तेव्हा सावित्री म्हणते , " हे मानद , आपणाकडून मी मोक्ष किंवा अन्य कोणताही वर मागत नाही , तरी हा सत्यवान् ‍ जिवंत होवो , हाच वर मी मागते ; कारण पतीवाचून मी मृततुल्य आहे ॥१२५॥

नकामयेभर्तृविनागतंसुखंनकामयेभर्तृविनायगतांदिवं ॥ नकामये भर्तृविनागतांश्रियं नभर्तृहीनाव्यवसामिजीवितुं ॥१२६॥

वरातिसर्गःशतपुत्रताममत्वयेवदत्तो ह्रियतेचमपतिः ॥ वरंवृणेजीवतुसत्यवानयंतवैवसत्यवचनंभविष्यति ॥१२७॥

तथेत्युक्त्वातुतान्पाशान्मुक्त्वावैवस्वयतोयमः ॥ धर्मराजःप्रह्रष्टात्मासावित्रीमिदमब्रवीत् ॥१२८॥

एषभद्रेमयामुक्तोभर्तातेकुलनंदिनी ॥ आरोग्यवयसीप्राप्यसिद्धार्थश्चभविष्यति ॥१२९॥

चतुर्वर्षशतंचायस्त्वयासार्धमुपैष्यति ॥ सागतावटसामीप्यकृत्वोत्संगेशिरस्ततः ॥१३०॥

भर्त्यावाचून प्राप्त झालेले सुख वा स्वर्गलोक किंवा संपत्ती मी इच्छित नाही ; भर्त्यावाचून मी जिवंत राहाणार नाही ॥१२६॥

आणि आपण मला दयाळूपणे शंभर औरस पुत्र होतील असा वर दिला आहे तर मी हाच वर मागते की , हा सत्यवंत जिवंत होवो आणि जिवंत होईल तेव्हाच तुमचे वचन सत्य होईल " ॥१२७॥

असे सावित्रीचे भाषण ऐकून " तू म्हणतेस तसेच होवो , " असे म्हणून सत्यवंताला पाशमुक्त करुन यमधर्म आनंदाने सावित्रीप्रत बोलता झाला ॥१२८॥

ते असे की , हे स्वकुलानंददायिनी कल्याणशीले सावित्री ! हा तुझा भर्ता मी सोडिला , याला आरोग्य आणि तारुण्य प्राप्त होऊन त्याचे मनोरथ पूर्ण होतील ॥१२९॥

आणि चारशे वर्षेंपर्यंत तुजसह दीर्घायुषी होऊन हा सर्व सुखांचा अनुभव घेईल " असे यमधर्माने सांगताच सावित्री त्या वटवृक्षाखाली जाऊन सत्यवंताचे शिर आपल्या मांडीवर घेऊन बसली ॥१३०॥

प्रबुद्धस्तुततोब्रह्मन्सत्यवानिदमब्रवीत् ‍ ॥ मयास्वन्पोवरारोहेट्टष्टोद्यैवच भामिनि ॥१३१॥

तत्सर्वंकथितंतस्यैयदवृत्तंसर्वमेवतत् ‍ ॥ तथाचकतिथःसर्वः संवादश्चयमेनहि ॥१३२॥

अस्तंगतेततःसूर्येद्युमत्सेनोमहीपतिः ॥ पुत्रस्यागमनकांक्षीइतश्र्चेतश्चधावति ॥१३३॥

आश्रमादाश्रमंगच्छन्पुत्रदर्शनकांक्षया ॥ आवयोरंधयोर्यष्टिः क्वगतोसिविनावयोः ॥१३४॥

एवंसविविधंक्रोशन्सपत्नीकोमहीपतिः ॥ चकारदुःखसंतप्तःपुत्रपुत्रेतिचासकृत् ॥१३५॥

इतक्यात सत्यवान् ‍ जागा होऊन सावित्रीप्रत पुढीलप्रमाणे बोलता झाला . " हे सुंदरी ! आता मी एक स्वप्न पाहिले " ॥१३१॥

असे म्हणून झालेला सर्व वृत्तांत त्याने कथन केला व यमाशी झालेला संवादही सांगितला ॥१३२॥

इकडे आश्रमामध्ये द्युमत्सेनराजा पुत्राची मार्गप्रतीक्षा करीत आहे ; तो सूर्य अस्तास गेला तेव्हा इकडे तिकडे धावू लागला ॥१३३॥

पुत्रदर्शनाच्या इच्छेने या आश्रमातून त्या आश्रमात जाऊन म्हणू लागला की , " हे पुत्रा ! आम्हा आंधळयांची काठी असा तू आम्हांस टाकून कोठे गेलास ? " ॥१३४॥

असा आक्रोश करुन तो पत्नीसहवर्तमान दुःखी होऊन " हे पुत्रा ! हे पुत्रा ! " असा शोक करिता झाला ॥१३५॥

अकस्मादेवराजेंद्रोलब्धचक्षुर्महीश्वरः ॥ तट्टष्टापरमाश्चर्यंचक्षुःप्राप्तिंद्विजोत्तमाः ॥ सांत्वपूर्वंतदावाक्यमूचुस्तेतापसाभृशं ॥१३६॥

चक्षुःप्राप्त्यामहाराजसूचितंते महीपते ॥ पुत्रेणचसमं योगंप्राप्स्यसेनृपसत्तम ॥१३७॥

ईश्वर उवाच ॥ यावदेवं वदंत्येत तापसाद्विजसत्तमाः ॥ सावित्रीसहितःप्राप्तःसत्यवान् ‍ द्विजसत्तम ॥१३८॥

नमस्कृत्यद्विजान्सर्वान्मातरंपितरंतथा ॥ सावित्रीचततोब्रह्मन्ववंदेचरणौ मुदा ॥ श्वश्रूश्वशुरयोस्तांतुपप्रच्छुर्मुनयस्तदा ॥१३९॥

मुन यऊचुः ॥ वटसावित्रीजानासिकारणंवरवर्णिनि ॥ वृद्धयोश्चक्षुषःप्राप्तेःश्वश्रूश्वशुरयोःशुभे ॥१४०॥

तो अकस्मात् ‍ त्या राजाला दृष्टी प्राप्त झाली . ते नेत्रप्राप्तीचे परम आश्चर्य पाहून तेथील तापसी ब्राह्मण त्या राजाचे सांत्वन करुन बोलते झाले ॥१३६॥

ब्राह्मण म्हणतात , " हे राजा ! या नेत्रप्राप्तीच्या लक्षणावरुन असे वाटते की , तुझी व पुत्राची लवकर भेट होईल " ॥१३७॥

शिव म्हणतात , " हे द्विजोत्तमा सनत्कुमारा ! असे त तापसी ब्राह्मण बोलत आहेत इतक्यात सावित्रीसह सत्यवान् ‍ तेथे आला ॥१३८॥

त्या सत्यवंताने सर्व ब्राह्मणांना व मातापितरांना नमस्कार केला . नंतर कमलनयना सावित्रीने सासूसासर्‍यांना वंदन केले ; तेव्हा सर्व मुनिजनांनी तिला विचारले , ॥१३९॥

" हे सुंदरी सावित्री ! या वृद्ध अशा तुझ्या सासूसासर्‍यांना नेत्र प्राप्त झाले याचे कारण तू जाणतेस काय ? " ॥१४०॥

सावित्र्युवाच ॥ नजानामिमुनिश्रेष्ठाश्चक्षुषःप्राप्तिकारणं ॥ चिरंसुप्तस्तुमेभर्तातेनकालव्यतिक्रमः ॥१४१॥

सत्यवानुवाच ॥ अस्याःप्रभावात्संजातंट्टश्यतेकारणंनच ॥ तत्सर्वंविद्यतेविप्राः सावित्र्यास्तपसःफलं ॥ व्रतस्यैवतु माहात्म्यंट्टष्टमेतन्मयाधुना ॥१४२॥

ईश्र्वर उवाच ॥ एवंतुवदतस्तस्यतदासत्यवतोमुने ॥ दूताःसमागतास्तस्याअचरन्नृपतेर्हितं : ॥१४३॥

दूताऊचुः ॥ येनराज्य बलाद्राजन्ह्रतंक्रूरेणमंत्रिणा ॥ अमात्येनहतःसोपिइति पौराः समागताः ॥१४४॥

पौरा ऊचुः ॥ उत्तिष्ठराजशार्दूलस्वराज्यपालयप्रभो ॥ अभिषिंचस्वराजेंद्रपुरेमंत्रिपुरोहितैः ॥१४५॥

असे ऋषींनी विचारले असता सावित्री म्हणते , " हे मुनिश्रेष्ठहो , नेत्रप्राप्तीचे कारण मी काहीच जाणत नाही . माझा पती दमून फार वेळ निजल्यामुळे , आम्हास येण्यास विलंब लागला " ॥१४१॥

हे तिचे भाषण ऐकून सत्यवान् ‍ म्हणाला , " हे विप्रहो ! हे सर्व हिच्या प्रभावाने झाले ; दुसरे काही कारण नाही . हे सावित्रीच्या तपाचे फळ होय ; कारण हिच्या व्रताचे माहात्म्य मी प्रत्यक्ष पाहिले " ॥१४२॥

शिव म्हणतात , " असे सत्यवान् ‍ बोलत आहे तो द्युमत्सेनराजाचे हित इच्छिणारे दूत नगराकडून येऊन राजास सांगू लागले की , ॥१४३॥

" हे राजा ! ज्या शत्रूने आपले राज्य बलाने हरण केले होते , त्याला आपल्या प्रधानाने मारिले . " असे दूत सांगत आहेत तोच पुरवासी लोकही तेथे आले ॥१४४॥

ते लोक म्हणू लागले की , " हे , राजश्रेष्ठा ! चला , आपले राज्य पालन करा आणि मंत्रिपुरोहितकरवी आपणास अभिषेक करुन घ्या " ॥१४५॥

ईश्वर उवाच ॥ तछुत्वाराजशार्दूलःस्वपुरंजनसंवृतः ॥ पितृपैतामहंराज्यसंप्राप्यमुदमन्वभूत् ‍ ॥१४६॥

सावित्रीसत्यवांश्र्चैवपरांमुदमवापतुः ॥ जनयामासपुत्राणांशतंवैबाहुशालिनां ॥१४७॥

व्रतस्यैवतुमाहात्म्यात्तस्याःपितुरजायत ॥ पुत्राणांचशतंब्रह्मसत्राच्चयमात्तथा ॥१४८॥

एतत्तेकथितंसर्वंव्रतमाहात्म्यमुत्तमं ॥ क्षीणायुर्जीवितोभर्ताव्रतस्यास्यप्रभावतः ॥ कर्तव्यंसर्वनारीणांवैधव्यफलप्रदं ॥१४९॥

इतिश्रीस्कंदपुराणेशिवसनत्कुमारसंवादेवटसावित्रीकथासंपूर्णा ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

शिव सांगतात , हे ऐकून द्युमत्सेनराजा पौरजनांसह आपल्या नगरात येऊन वडिलार्जित राज्य घेऊन आनंदित झाला ॥१४६॥

सावित्री आणि सत्यवान् ‍ यांसही फार आनंद झाला . नंतर पराक्रमी असे शंभर पुत्र सावित्रीला झाले ॥१४७॥

आणि याच व्रताच्या प्रभावाने व यमाच्या प्रसादाने सावित्रीचा पिता जो अश्वपतिराजा त्यालाही शंभर पुत्र झाले ॥१४८॥

शिव म्हणतात , " हे सनत्कुमार ऋषे , हे तुला उत्तम असे व्रताचे माहात्म्य मी सांगितले . याच व्रताच्या प्रभावाने सावित्रीचा भर्ता क्षीणायु असून दीर्घायु झाला ! असे हे सौभाग्य देणारे व्रत सर्व स्त्रियांनी अवश्य करावे ॥१४९॥ अशी सार्थवटसावित्रीकथा समाप्ता ॥ श्रीकृष्णर्पणमस्तु ॥

॥ सार्थ वटसावित्रीपूजा व कथा समाप्त ॥

N/A

References :

संग्राहक - वे० मू० उ. ग. सोमणगुरूजी
Last Updated : January 29, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP