श्रीदत्त विजय - अध्याय पांचवा

स्वामी दत्तावधूतांनी लिहिलेली ही पोथी म्हणजे श्रीदत्त प्रभूंजवळ जाण्याचा अतिसुलभ मार्ग होय.


श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । ईश्वर प्राप्तीचे साधन । तो हा मनुष्य जन्म जाण । नर करणी करे तो नारायण । आपैसे जाण होतसे ॥१॥

मनुष्य जन्म हे वाहन । मिळाले आत्म्याकारण । या वाहनात बैसोन । मोक्ष मुक्काम गाठावा ॥२॥

ईश्वरभक्ती आणि दान । परोपकार नम्रता हे सदगुण । देती ईश्वरप्राप्ती करोन । होई सार्थक जन्माचे ॥३॥

भाऊ टिकेकर नामे भक्त । श्रीस्वामींसी विनवीत । पत्नी असे व्याधिग्रस्त । कृपा करावी म्हणोनिया ॥४॥

वर्षे झाली तीन । असे अंथरुणावरी पडोन । विविध उपाय झाले करोन । परी गुण काही येईना ॥५॥

कधी रात्री न झोपत । आम्हासही न झोपू देत । तीन वर्षे झाली असत । त्रास आम्ही भोगतसो ॥६॥

स्वामी तीर्थ देती । रोज पाजा म्हणोनी सांगती । त्याच रात्री गाढ झोपे ती । आनंद सर्वां होतसे ॥७॥

पंधरवडयात ठीक होत । आणि स्वामी दर्शना येत । ऐसा प्रताप अदभुत । श्रीस्वामी दत्ताचा ॥८॥

वासुदेव नामे एक युवक । असे रत्नागिरीत राहात । दूर खेडे गावात जात । लग्न समारंभाकारणे ॥९॥

नात्यातील लग्न असत । तेथे भाग घेण्या जात । एक युवती तेथे दिसत । बोलवीतसे वासुला ॥१०॥

रात्रीची वेळ असत । वासु युवती मागे जात । ती युवती उडी घेत । एका विहिरी माझारी ॥११॥

युवती पडली विहिरीत । म्हणोनी वासुही उडी घेत । वासु जलात पोहत । पोहत वरती पाहतसे ॥१२॥

विहिरीच्या काठावरती । बैसली दिसे ती युवती । हे पाहोनी तेथ वरती । वासु बेशुद्ध होतसे ॥१३॥

अनेक लोक होते तेथ । धावोनी वासुशी काढीत । शुद्धिवरी येता विचारत । का टाकिलीस तू उडी ? ॥१४॥

सांगता युवतीची हकिकत । सर्व म्हणती तयाप्रत । कोणी युवती येथे नसत । परी यक्षिणी ती असे ॥१५॥

ऐशापरी यक्षिणी बाधा । लागे वासुशी आपदा । रोज नेई फिरावयाला । निशिमाजी येवोनिया ॥१६॥

रात्रीचे बारा जव वाजत । यक्षिणी वासुते उठवीत । वासु होवोनी मोहीत । पाठूनी तिच्या जातसे ॥१७॥

ऐसी झाली वर्षे सात । उपाय केले बहुत । परी ती पाठ न सोडत । झोपूही त्यासी देईना ॥१८॥

एके दिनी त्यासी म्हणत । मारीन तुज पंधरवडयात । आणि मज समवेत । अखंड तुजला ठेवीन मी ॥१९॥

वासु होई भयभीत । सांगे आपुल्या स्नेह्यांप्रत । मृत्यू पंधरा दिवसात । होईल माझा म्हणोनिया ॥२०॥

तव कोणी त्यासी म्हणत । न होई तू भयभीत । आहे स्वामी श्रीदत्त । शरण जाई तयालागी ॥२१॥

स्वामी पाशी येवोन । वासु करी सर्व कथन । त्यासी विभूति देवोन । स्वामी म्हणती तयाला ॥२२॥

तू चिंता न करी मानसी । न येईल ती तुजपासी । ती यक्षिणी मजपासी । आली आहे भिऊ नको ॥२३॥

तीज मी मुक्ती देईन । तू सुटलासी येथोन । ऐकोनी हे समाधान । झाले पाहा वासुचे ॥२४॥

त्या क्षणापासोन । गेली बाधा निघोन । वासु कष्टाचे निवारण । केले पाहा स्वामींनी ॥२५॥

तदनंतर श्रीदत्त । गेले पाहा अरण्यात । एक भक्त होई व्याधिग्रस्त । तो स्वामीसी प्रार्थित । बरे करावे म्हणोनिया ॥२७॥

दवाखान्यात ठेवीत । केस असे अत्यवस्थ । डॉक्टर आशा सोडीत । भक्त प्रार्थी स्वामींना ॥२८॥

अकस्मात स्वामी प्रकटत । भक्त शिरावरी ठेविती हात । भक्त होई ठणठणीत । दूसरे दिनी घरी जाई तो ॥२९॥

ऐसे परी स्वामीनाथ । सदैव भक्तांसी रक्षित । राहोनिया चराचरात । साथ देती भक्तांना ॥३०॥

रामचंद्र टकले स्वामी भक्त । पत्नी दवाखान्यात असत । तिसी सदैव दिसत । स्वामी जवळ बसलेले ॥३१॥

मंत्र देती स्वप्नात । फोटोतूनी प्रकटत । सदैव लोका सांभाळत । ऐसे करिती कार्य ते ॥३२॥

स्मरणगामी दत्त । प्रार्थनेसी धावोनी येत । जरी भाग शुद्ध असत । सदैव जवळी राहातसे ॥३३॥

शेंडेबाई नामे भक्त । सदैव दत्तभक्ती करीत । एकदा स्वामींचा फोटो पाहात । ध्यान करीत बसलेला ॥३४॥

ध्यानस्थ फोटो पाहोन । बाई म्हणे स्वामी लागोन । स्वामी नका मिटू नयन । कैसे होईल विश्वाचे ॥३५॥

ऐसे म्हणता तत्क्षण । उघडले स्वामींचे नयन । सर्व विस्मित होवोन । म्हणती अदभुत प्रकार हा ॥३६॥

ऐशा लीला अनंत । झाल्या असती होत असत । चराचरात श्रीदत्त । राहे पाहा भरोनिया ॥३७॥

स्वामी आले अरण्यात । औदुंबर तळी तप करीत । एक वाघ येई नित्य । प्रदक्षिणा करी स्वामींना ॥३८॥

सुमती नामे स्त्री असत । पुत्र असे व्याधिग्रस्त । अनेक उपचार करीत । बरी व्याधी होईना ॥३९॥

त्यातची भर पडत । पती होई व्याधिग्रस्त । मेंदूत पाणी होत । ऐसे म्हणती डॉक्टर ते ॥४०॥

घरी दारिद्रय असत । पुत्र - पती व्याधिग्रस्त । सुमती होवोनी दुःखित । प्रार्थना पाहा करितसे ॥४१॥

लीला विग्रही दत्त । तिची प्रार्थना ऐकत । रुप विचित्र घेत । प्रकटती पाहा दारी तिच्या ॥४२॥

टोपी असे डोक्यावर । नेसले असे धोतर । जाकिट शोभे अंगावर । ऐसा वेश दिसतसे ॥४३॥

प्रकटोनी सुमतीच्या दारात । म्हणती रडसी का व्यर्थ । ही विभूति घे हातात । पुत्र पती होती बरे तुझे ॥४४॥

विभूति घेवोनी हातात । सुमती त्यासी विचारत । आपण कोण आहात । कृपा करोनी सांगावे ॥४५॥

तव म्हणती श्रीदत्त । तीन मासांती भेटत । येईन या अरण्यात । तप करण्या लागोनिया ॥४६॥

असो विभूति भक्षण करिता । आरोग्य लाधले व्याधिग्रस्ता । पुत्र पती सुखी होत । दत्तकृपे करोनिया ॥४७॥

सुमती आणि ग्रामस्थ । प्रतिक्षा करु लागत । तीन मासांती कोण येत । अरण्यात या म्हणोनिया ॥४८॥

स्वामी अरण्यात पोचत । ते दिनी सुमती पाहे अदभुत । निळा आवर्त दिसत । अरण्यातून येताना ॥४९॥

पाहूनी निळा आवर्त । सुमती सांगे लोकांप्रत । अरण्यात या दत्तावधूत । असती पाहा आलेले ॥५०॥

मिळोनी दहा वीस ग्रामस्थ । येती पाहा अरण्यात । सुमतीही सवे असत । शोध घेती स्वामींचा ॥५१॥

तव औदुंबर वृक्षातळी । ध्यानस्थ देखती मंडळी । पाहोनी दत्तावधूत चंद्रमौळी । आनंद झाला तयांना ॥५२॥

सर्व सेवा करु लागले । आसन सर्व स्वच्छ केले । पर्णकुटी बांधू लागले । स्वामी कारणे तेथवरी ॥५३॥

येणे परी ग्रामस्थ । स्वामी सेवा करु लागत । सर्वांसी सुख होई प्राप्त । स्वामी सेवा करोनिया ॥५४॥

अन्नदान धनदान । वस्त्रदान औषधदान । सर्वांचे तृप्त मन । स्वामी जवळी होतसे ॥५५॥

सर्वांसी नवल वाटत । स्वामी कैसे दान करत । कोठोनी धन औषध येत । कोण देते स्वामींना ॥५६॥

आपापसात बोलत । म्हणती स्वामी श्रीदत्त । देवता सेवा करीत । आणोनी देती जे हवे ॥५७॥

एक धनगर तेथ । येवोनी स्वामीसी प्रार्थित । मम कन्या होई गुप्त । तीन दिवसा पासोनिया ॥५८॥

कोठे गेली न कळत । तीन दिन असे शोधीत । कोठेही न सापडत । काय करावे कळेना ॥५९॥

विभूति देवोनी स्वामी म्हणत । उभा राहोनी दरवाजात । पूर्वेकडे पाहोनी फुंक म्हणत । येईल घरी तव कन्या ॥६०॥

विभूति घेवोनी गृहा जाई । दरवाज्यात उभा राही । पूर्व दिशेकडे फुंकोनी देई । विभूति पाहा जोराने ॥६१॥

घरासमोर वृक्ष असत । वृक्षावरी कन्या दिसत । ती म्हणे मी येथे असत । तीन रात्री बैसोनिया ॥६२॥

तिसी खाली काढत । स्वामी पाशी घेवोनी येत । तीर्थ विभूति देत । श्रीस्वामी तियेलागी ॥६३॥

स्वामी संर्वां सांगत । वृक्षावरी यक्ष असत । त्याने या मुलीप्रत । नेवोनी वृक्षी ठेविले ॥६४॥

तव मुलगी सर्वां सांगत । मी पाहे सर्वांप्रत । परी झाले स्तंभित । खाली उतरता येईना ॥६५॥

बाबा जव विभूति फुंकीत । अंगी नवचैतन्य येत । मुखस्तंभ निघोनी जात । म्हणोनी हाक मारली मी ॥६६॥

स्वामींसी म्हणती ग्रामस्थ । करा यक्षाचा बंदोबस्त । चिंता नको स्वामी म्हणत । करितो त्याची सोय मी ॥६७॥

यक्षासी त्या पाचारित । आज्ञा देती तयाप्रत । अरण्यातील जे ग्रामस्थ । त्यासी तुवा रक्षावे ॥६८॥

यक्षासी आज्ञा देत । आणि कामासी लावीत । श्रीस्वामी दत्तावधूत । अतर्क्य महिमा तयांचा ॥६९॥

भावी काळात अनेक भक्त । स्वामींची विभूति नेत । अपघात स्थळी टाकीत । अपघात होणे थांबतसे ॥७०॥

वाहनांचे अपघात । दुष्ट शक्ती घडवोनी आणित । स्वामी विभूति पडता तेथ । मुक्ती त्यांसी मिळतसे ॥७१॥

गावातील गरजवंत । स्वामी पाशी मागती मदत । धन देवोनी तयाप्रत । मदत नित्य करताती ॥७२॥

मुलांसवे खेळत । अभ्यास त्याते शिकवीत । ऐसा आनंद उत्सव चालत । अरण्यात पाहा तेथवरी ॥७३॥

हे सर्व दिवसा चालत । कोणी न राही रात्री तेथ । वाघ पहारा देत । नित्य निशी समयासी ॥७४॥

रात्री देवता प्रकटत । स्वामीसवे करिती बातचीत । विश्वकल्याण योजीत । देवतांसवे बैसोनिया ॥७५॥

इंद्र आणि लोकपाळ । गणपती कार्तिकेय अतुर्बळ । योगी योगिनी महाकाळ । चर्चा करण्या येताती ॥७६॥

महालक्ष्मी महासरस्वती । महाकाली आणि उमापती । ब्रह्मा विष्णू सिद्ध यती । येती स्वामी पाशी ते ॥७७॥

आकाशी निलबिंदू चमकत । असंख्य काजव्यासम दिसत । भूमीसी स्पर्शिता दिव्य देहात । प्रकट देवता होताती ॥७८॥

असो ऐशा लीला होत । लोकांचा उद्धार होत । एक येवोनी विनवीत । स्वामी लागी तेधवा ॥७९॥

बाबू नाम त्याचे असत । लग्नासी झाली वर्षे सात । परी न संतान होत । कृपा करावी स्वामींनी ॥८०॥

स्वामी विभूति देत । पुत्र होईल म्हणोनी सांगत । स्वामी कृपे एक वर्षात । पुत्र जाणा होतसे ॥८१॥

जाधव नामे मूढ भक्त । येवोनी स्वामींसी म्हणत । स्वामी मुंबईसी जावे लागत । काय करावे कळेना ॥८२॥

जवळी पैसे नसत । कधी मुंबई न पाहिली म्हणत । मी पूर्ण अशिक्षित । अक्षरशत्रू मी असे ॥८३॥

स्वामी म्हणती भक्तासी । तू का चिंता करिसी । हे घे पैसे जा मुंबईसी । सांगाती देव असे तुझ्या ॥८४॥

पैसे घेवोनी जाधव जात । मुंबईच्या बैसती गाडीत । मनी म्हणती दतावधूत । नेतील मजला मुक्कामी ॥८५॥

बस दादर स्थानकावर थांबत । जाधव खाली उतरत । तव एक व्यक्ती येत । तंबाखू आहे का ? म्हणतसे ॥८६॥

जाधव तंबाखू देत । तो म्हणे जाधवाप्रत । कोठे जाणे असत । म्हणोनिया पुसतसे ॥८७॥

पत्ता काढोनी दाखवीत । येथे मम बंधू राहत । तेथे जाणे असत । म्हणोनी जाधव म्हणतसे ॥८८॥

पत्ता वाचोनी तो म्हणत । हे माझ्या शेजारी राहात । चला मजसवे म्हणत । जाऊ आपण तेथवरी ॥८९॥

तात्काळ टॅक्सी बोलावीत । जाधवासी घेवोनी बैसत । टॅक्सी जावोनी थांबत । जाधव बंधूच्या दाराशी ॥९०॥

दोघेही टॅक्सीतून उतरत । जाधव बंधूच्या घरी जात । बरोबर जो मनुष्य असत । गुप्त तेव्हा होतसे ॥९१॥

जाधव त्यासी शोधू पाहत । परी तो होता दत्त । मुक्कामी जाधवासी पोचवीत । आणि गुप्त झाला तो ॥९२॥

ऐसा स्वामी समर्थ । श्रीपादवल्लभ महादत्त । सगुण रुपे राहात । तया अरण्या माझारी ॥९३॥

हळूहळू त्या अरण्यात । लोक येवो लागले बहुत । वाघ येणे बंद करीत । राहाती लोक रात्री ते ॥९४॥

काही भक्त गायी देत । गोशाळा बांधोनी देत । भजन पूजन चालत । लोक येती दूरोनिया ॥९५॥

देसाई नामे एक येत । येवोनी स्वामींसी म्हणत । चार खून केले असत । महापापी मी असे ॥९६॥

होईल माझा उद्धार । ऐसा करा उपकार । स्वामी म्हणती येथवर । राहोनी सेवा तू करी ॥९७॥

देसाई राही गोठयात । गायींची सेवा करत । एक दिनी रात्री पाहात । अदभुत प्रकार तेथवरी ॥९८॥

प्रत्यक्ष भगवान दत्त । स्वामी रुपे प्रकटत । गायींवरुनी हात फिरवीत । आणि होती गुप्त ते ॥९९॥

उदय होता प्रभात । देसाई सर्वांसी सांगत । मी पाहिले श्रीदत्त । कालरात्री म्हणोनिया ॥१००॥

ऐसे काही दिवस जात । चामुण्डादेवी प्रकट होत । देसाई बहु भयभीत । पाहोनी तीते जाहले ॥१०१॥

चामुण्डादेवी प्रकटत । सर्व गायींसी ओवाळीत । आणि दिव्य प्रकाशात । गुप्त पाहा ती होतसे ॥१०२॥

राहता दत्त सहवासात । देवदेवता प्रसन्न होत । काही न जरी साधन करीत । देवता देती दर्शन ते ॥१०३॥

ऐसा महिमा अदभुत । येथे वर्णिला संक्षिप्त । श्रीदत्त विजय ग्रंथ । अदभुत महिमा येथीचा ॥१०४॥

या अध्यायाचे करिता पठण । महालक्ष्मी होई प्रसन्न । रक्षिती देवता भक्तां लागोन । उणे न पडे काहीही ॥१०५॥

ही दत्ताची अक्षरमूर्ती । देवदेवता येथे राहती । करिता पारायण एकचित्ती । दर्शन देतील देवता ॥१०६॥

॥ अध्याय पाचवा ॥ ॥ ओवी संख्या १०६ ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP