संसदेचे अधिकारी - कलम ८९ ते ९२

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


राज्यसभेचा सभापती व उपसभापती .

८९ . ( १ ) भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल .

( २ ) राज्यसभा , शक्य तितक्या लवकर , राज्यसभेच्या एखाद्या सदस्यास आपला उप सभापती म्हणून निवडील आणि , उप सभापतीचे पद रिक्त होईल त्या त्या वेळी , राज्यसभा अन्य एखाद्या सदस्यास आपला उप सभापती म्हणून निवडील .

उपसभापतिपद रिक्त होणे , त्याचा राजीनामा देणे आणि त्यावरुन दूर करणे .

९० . राज्यसभेचा उप सभापती म्हणून पद धारण करणार्‍या सदस्यास ---

( क ) त्याचे राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर , आपले पद रिक्त करावे लागेल ;

( ख ) सभापतीस संबोधून कोणत्याही वेळी आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देता येईल ; आणि

( ग ) राज्यसभेच्या त्या वेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या , राज्यसभेच्या ठरावाद्वारे त्याच्या पदावरुन दूर करता येईल :

परंतु , खंड ( ग ) च्या प्रयोजनार्थ असणारा कोणताही ठराव , तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान चौदा दिवसांची नोटीस देण्यात आल्याखेरीज , मांडला जाणार नाही .

उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापतिपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार .

९१ . ( १ ) सभापतीचे पद रिक्त असताना अथवा जेव्हा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून काम करीत असेल किंवा त्याची कार्ये करीत असेल अशा कोणत्याही कालावधीमध्ये , त्या पदाची कर्तव्ये , उप सभापतीला , किंवा उप सभापतीचे पदही रिक्त असेल तर , राष्ट्रपती त्या प्रयोजनाकरता ज्याला नियुक्त करील अशा राज्यसभेच्या सदस्याला करावी लागतील .

( २ ) राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत सभापती अनुपस्थित असताना उप सभापती , किंवा , तोही अनुपस्थित असल्यास , राज्यसभेच्या कार्यपद्धतिनियमांद्वारे ठरवण्यात येईल अशी व्यक्ती , किंवा अशी व्यक्ती उपस्थित नसल्यास , राज्यसभा ठरवील अशी अन्य व्यक्ती सभापती म्हणून कार्य करील .

सभापतीस किंवा उप सभापतीस पदावरुन दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे .

९२ . ( १ ) राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत , उप राष्ट्रपतीस त्याच्या पदावरुन दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना सभापती , अथवा उप सभापतीस त्याच्या पदावरुन दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना उप सभापती , उपस्थित असूनही , अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही . आणि अशा प्रत्येक बैठकीच्या संबंधात अनुच्छेद ९१ च्या खंड ( २ ) च्या तरतुदी , जशा त्या सभापती किंवा , यथास्थिति , उप सभापती अनुपस्थित असलेल्या बैठकीच्या संबंधात लागू होतात , तशाच लागू होतील .

( २ ) उपराष्ट्रपतीस त्याच्या पदावरुन दूर करण्याचा कोणताही ठराव राज्यसभेत विचाराधीन असताना , त्या बाबतीत सभापतीस राज्यसभेमध्ये भाषण करण्याचा आणि तिच्या कामकाजात अन्यथा भाग घेण्याचा हक्क असेल , पण अनुच्छेद १०० मध्ये काहीही असले तरी , असे कामकाज चालू असताना अशा ठरावावर किंवा अन्य कोणत्याही बाबीवर मतदान करण्याचा त्याला मुळीच हक्क असणार नाही .

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP