समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय अकरावा

ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्तारून सांगतात.


आता अकरावे अध्यायात । कथा आहे दोन्ही रसीं युक्त । पार्थाची विश्वरूपाशी जेथ । होईल भेट ॥१॥

जेथ शांतरसाचे घरा । अद्‍भुत आला पाहुणचारा । आणि लाभला अन्यही रसवरां । पंक्तीचा मान ॥२॥

अहो, वधुवरांचिये मीलनीं । जैसी वर्‍हाडयांसिहि लुगडीलेणी । तैसे मराठीचिये सिंहासनीं । निरविले रस ॥३॥

परि शांत अद्‌भुत बरवे । डोळियांचे अंजुळीत घ्यावे । जैसे हरि- हर प्रेमभावें । आलिंगिण्या आले; ॥४॥

अथवा अवसेचे दिवशी । भेटली दोन्ही बिंबे जैशी । तैसा एकोपा दोन्ही रसीं । केला येथ ॥५॥

गंगा-यमुनेचे ओघ मिळत । तैसे रसां जाहले प्रयागतीर्थ । म्हणोनि जग होतसे सुस्नात । अवघे येथ ॥६॥

मध्ये गीता ही सरस्वती गुप्त । आणि दोन्ही रस ते मूर्त । यालागी त्रिवेणी ही उचित । लाभली सर्वां ॥७॥

श्रवणद्वारें येथ- । तीर्थीं शिरणे सोपे होत । ज्ञानदेव म्हणे, श्रीनिवृत्तनाथ-। श्रीगुरूंनी केले ॥८॥

तीर तोडूनि संस्कृतचे गहन । धर्मनिधान श्रीनिवृत्तिदेवें महान । रचुनी मराठी शब्दसोपान । घाट बांधिला ॥९॥

कोणीही येथ सद्‌भावें नाहावे । प्रयागमाधव विश्वरूप पाहावे । इतुक्यानेही संसारा द्यावे । तिलोदक ॥१०॥

हे असो, ऐसे मूर्तिमंत । बहरती  रसभाव येथ । श्रवणसुखाचे लाभत । साम्राज्य जगा ॥११॥

येथ शांत, अद्‌भुत विराजमान । अन्य रसांही बहुमान । हेही अल्पचि गुणवर्णन । हे तर उघड कैवल्य; ॥१२॥

तो हा अकरावा अध्याय । देवां विसावावया ठाव । परि अर्जुन दैववंतांचा राव । येथही पावला ॥१३॥

येथ अर्जुनचि काय म्हणू पातला । आज कोणाही सुकाळ जाहला  । जो गीतार्थ हा आला- । मराठी भाषेत ॥१४॥

याचिलागी मनोभावें-। विनविले, ते ऐकावे । मज अवधान द्यावे । सज्जनहो तुम्ही ॥१५॥

तुम्हा संतांचिये सभेत । ऐसी सलगी नच शोभत । परि जाणावे जी, तुम्ही येथ । मज अपत्या लोभें ॥१६॥

अहो, पोपटा आपणाचि पढवावे कौतुकें । मग बोले तर डोलावे सुखें । जैसे शिकवियले करिता बालकें । रिझावे माऊलीने; ॥१७॥

तैसे मी जे जे बोले । ते प्रभु, तुम्हीचि शिकवियले । म्हणोनि ऐकावे आपुले । आपण देवा ॥१८॥

हे सारस्वताचे गोड । तुम्हीचि लाविले जी, झाड । तर आता अवधानामृतें वाढ-। शिंपोनि करावी ॥१९॥

मग हे रसभावफुलीं फुलेल । नानाअर्थफळभारें फळेल । तुमचेचि धर्में होईल । सुकाळ जगा ॥२०॥

या बोलें संत रिझले । म्हणत, तोषलो गा भले । आता सांग, जे बोलिले-। अर्जुनें तेथ ॥२१॥

तेव्हा निवृत्तिदास म्हणे-। जी, कृष्णार्जुनांचे बोलणे । मी सामान्य काय सांगू जाणे । परि मज बोलते करावे तुम्ही ॥२२॥

रानपाला खाणार्‍या वानरां । बळ दिले नमविण्या लंकेश्वरा । एकटा अर्जुन, परि अक्षौहिणी अकरा । जिंकविल्याचि ना? ॥२३॥

म्हणोनि समर्थ जे करी । ते कैसे न हो चराचरीं? । तुम्ही संतांनी त्यापरी । बोलते करावे मज ॥२४॥

आता बोलतसे, ऐका । हा गीताभाव नेटका । जो वैकुंठनायकाचे देखा । मुखातुनि निघाला ॥२५॥

धन्य धन्य ग्रंथ गीता । जी वेदात प्रतिपाद्य देवता, । तो श्रीकृष्ण असे वक्ता- । ज्या ग्रंथीं ॥२६॥

अर्थगौरव कैसे वानावे तेथले । जे शंभूचे मतीसीही न आकळले । आता नमस्कारावे हेचि भले । जिवेभावें ॥२७॥

मग ऐका, तो किरीटी । विश्वरूपीं ठेवुनि दृष्टी । पाहिल्या काय त्या गोष्टी । करू लागला ॥२८॥

हे सर्वही जग सर्वेश्वर । ऐशा प्रतीतीसि आला जो परमेश्वर । तो बाहेरी व्हावा गोचर । लोचनांसी; ॥२९॥

हे जिविंचे इतुके निकट । परि देवा सांगावया संकट । कारण विश्वरूप गूढ गोष्ट । कैसे पुसावे? ॥३०॥

म्हणे, मागे कधी कोणीही । पुशिले न प्रिय भक्तेंही । ते अवचित कैसे काही । सांगा म्हणू? ॥३१॥

मी चांगला सलगीचा जरी । का आईहुनिहि अंतरंगींचा तरी? । तीही हे पुशिण्या परी । भ्यालीचि ना? ॥३२॥

मी कितीही सेवा केली । तरि का गरुडाइतुकी भली? । परि तोही ही बोली । करीचिना ॥३३॥

काय मी सनकादिकांहूनि जवळ? । परि तयाही न सुचला हा खेळ । मी आवडेन काय प्रेमळ । गोपगोपींऐसा? ॥३४॥

तयांतेही लोकरूपणे चकविले । अंबरीषाचे गर्भवासहि साहिले । परि विश्वरूप गुह्य ठेविले । न दाविले कोणा ॥३५॥

हे इतुके ऐसे गुज । याचिये अंतरीचे निज । कैसे अवचित मज । पुसता येई? ॥३६॥

आणि न पुसेचि जरि म्हणे । परि विश्वरूप देखिल्याविणे-। सुख नोहेचि, परि जिणे-। तेही दुर्घट ॥३७॥

म्हणोनि आता पुसावे अल्पसे । मग करू देवा आवडे तैसे । ऐशापरी भीतभीत ऐसे । बोलू लागे पार्थ ॥३८॥

परि तेचि ऐशा भावें । की एकदोन उत्तरांसवे । विश्वरूप दावील आघवे । झाडुनि सारे ॥३९॥

वासरा देखे न देखे कोठे । तों धेनू प्रेमें खडबडुनि उठे । मग आचळा मुख भेटे- । तर काय पान्हा न ये? ॥४०॥

पहा गा त्या पांडवांचे नावें । जो कृष्ण रानींही रक्षिण्या धावे । तया हे अर्जुनें पुसावे । तर राहवेल काय? ॥४१॥

तो सहजी स्नेहचि मृर्त होय । आणि हा स्नेहा घातले खाद्य । ऐशा प्रसंगी वेगळेपण काय-। उरे हेचि बहु ॥४२॥

म्हणोनि अर्जुनाचे बोलासरिसा । देव विश्वरूप होई सहजसा । तोचि पहिला प्रसंग ऐसा । ऐकाव तरी ॥४३॥

अर्जुन म्हणालाः

करूनि करुणा माझी बोलिलास रहस्य जे
त्या थोर आत्मविद्येने माझा हा मोह फेडिला ॥१॥

मग पार्थ देवासी म्हणे । जी, तुम्ही मजकारणें । वर्णिले वाणीने, जे अशक्य बोलणे । कृपानिधे ॥४४॥

जेव्हा महाभूते ब्रह्मीं आटती । जीव-महत्‌तत्त्वादींचे ठाव फिटती । तेव्हा देव जे होऊनि ठाकती । ते विश्रांतिस्थान शोवटचे ॥४५॥

होते हृदयाचे घरीं । साठविले कृपणापरी । वेदांपासुनीही चोरुनि उरीं । ठेविले जे ॥४६॥

ते तुम्ही आज आपुले । मजपुढे गुह्य फोडिले । ज्या अध्यात्मावरुनि ओवाळिले । ऐश्वर्य हरें ॥४७॥

ती वस्तू मज स्वामी । क्षणार्धांत दिधली तुम्ही । हे बोलू, परि आम्ही-। तुजपासून भिन्न कैसे? ॥४८॥

परि खरेचि महामोहाचे पुरीं-। बुडालो देखोनि, माथ्यावरी । आपणचि उडी घालोनि श्रीहरी, । काढिले मज ॥४९॥

एके तुजवाचूनि काही । विश्वीं दुज्याची भाषा नाही । हे आमुचे कर्म पाही- । की आम्ही आहो म्हणतो ॥५०॥

मी जगीं एक अर्जुन । ऐसा देहीं वाहे अभिमान । आणि कौरवां या स्वजन । आपुले म्हणे ॥५१॥

याहीवरी यांसी मारीन । तर त्या पापातुनि कैसा निघेन । ऐसे देखत होतो दुःस्वप्न-। तों जाग आणिली प्रभूने ॥५२॥

देवा, गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालो, लक्ष्मीपती । होतो उदकाचे इच्छेप्रती । मृगजळ पीत ॥५३॥

किरडू कापडाचे जरी । भ्रमें साचचि गमल्या विषलहरी । ऐसे मरत्या जीवा वाचविण्याचे, हरी, । श्रेय तुवा घेतले ॥५४॥

आपुले प्रतिबिंब न जाणावे-। सिंहाने आडात डोकावावे । ते देखोनि तया धरावे-। तैसे रक्षिले मज तुवा ॥५५॥

एरवी माझा तरि इतुक्यावर- । निश्चय होता खरोखर । की आताचि सातही सागर । एकत्र मिळावे; ॥५६॥

हे युगचि अवघे बुडावे- । वरि आकाशही तुटोनि पडावे । परि झुंजणे न घडावे । गोत्रजांसी मज ॥५७॥

ऐसा अहंकार वाढून । आग्रहजळीं राहिलो बुडून । भलाचि तू जवळी म्हणून-। एरवी कोण काढी मज? ॥५८॥

मी कोणी नसता मज एका मानिले । नसत्यासी नाव गोत्र दिले । घोर पिसे होते लागले । परि रक्षिले तुम्ही ॥५९॥

जळत्या लाक्षागृहातुनि काढिले आम्हा । भय होते देहासीचि तेव्हा । आता मोहाग्नीचे भय, देवा, । चैतन्यासकट ॥६०॥

दुराग्रहरूप हिरण्याक्षें तेथ । मम बुद्धिवसुधा घेतली काखेत । मग मोहसागरगवाक्षात । शिरोनि राहिला; ॥६१॥

तेथ तुजेचि सामर्थ्याचे । पुनरपि बुद्धिचे ठावा येणे । हा दुसरा वराहअवतार घेणे-। पडले तुज ॥६२॥

ऐसे अपार तुवा केले । एके वाचेने काय मी बोले? । परी पंचप्राणही अर्पिले । मजप्रती ॥६३॥

ते काही न जाय वाया । भले यश लाभले देवराया, । जी, साद्यंत अज्ञानमाया । निरसिली माझी ॥६४॥

आनंदसरोवरीची कमळे । तैसे तुझे हे डोळे । आपुल्या प्रसादाची राउळे । जयासी करिती ॥६५॥

अहो तोही जाय भ्रांतीचे भेटीसी । ही दुबळी गोष्ट कायसी? । काय करी वडवानलासी । मृगजळाची वृष्टी? ॥६६॥

आणि मी तर गुरुवरा, पाहे-। तव कृपेचे गाभार्‍यात शिरुनि राहे । चारा घेत आहे । ब्रह्मरसाचा ॥६७॥

तेणें जी, मोह जाय । यात विस्मय तो काय? । सांगे शिवुनि तुझे पाय । उद्धरलो मी ॥६८॥

उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर
कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥२॥

हे कमलनयना, हृषीकेशा । कोटिकोटि सूर्याऐशा तेजसा । मी तुजकडुनि महेशा, । ऐकिले आज ॥६९॥

ही भूते ज्यापरी होती । आणि लया जैसी जाती । ती मजपुढे प्रकृती । विवेचिली देवें ॥७०॥

आणि प्रकृतीचा हिशेब दिधला । परमात्म्याचा ठाव दाविला । जयाचा महिमा पांघरुनी जाहला- । सवस्त्र वेद ॥७१॥

अहो, वेद उत्कर्ष पावे । वा धर्माऐशा रत्ना प्रसवे । तो आपले प्रभेचे आश्रयें । राहे म्हणोनि ॥७२॥

ऐसे अगाध माहात्म्य । जे सकळ मार्गांनी जाणण्यायोग्य । जे आत्मानुभवरम्य । ते यापरी दाविले ॥७३॥

मेघविरल्या आभाळीं जैसी । दृष्टी सूर्य़मंडलीं प्रवेशी । वा हाते सारुनि शेवाळासी । जळा दावावे जैसे; ॥७४॥

नातरि उकलिता सापाचे वेढे । चंढनाची भेट घडे । वा पिशाच्च पळे, मग पडे । द्रव्य हातीं ॥७५॥

तैसे अज्ञान आड होते आले । देवेंचि ते दूर सारिले । मग परतत्त्वा शेजघर केले । मतीसि माझे ॥७६॥

म्हणोनि याविषयीं मज देवा । भरवसा खचित जाहला जिवा । परि एक मनोरथ नवा । उपजला असे ॥७७॥

हे राहो, म्हणू भिडेस्तव । तर पुसावे कोणा अन्य? । काय तुजवाचून ठाव । आम्हासी देवा? ॥७८॥

जलचर जळाचा संकोच धरी । बाळहि पिण्यासि अंगावरी । तर तया जगण्या श्रीहरी, । अन्य उपाय काय? ॥७९॥

म्हणोनि भीड संकोच न धरवे । जिवा आवडे ते तुजपुढे बोलावे । तेव्हा राहू दे म्हटले देवें- । इच्छा काय ती सांग ॥८०॥

तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे
तेचि मी इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरुषोत्तमा ॥३॥

मग बोलिला तो किरीटी- । म्हणे, तुम्ही केल्या ज्या गोष्टी । त्यायोगें प्रतीतीची दृष्टी । निवाली माझी ॥८१॥

आता जयाचे संकल्पें । ही लोकपरंपरा जन्मे-हरपे । ज्या स्थाना तू आपुल्यारूपें । मी ऐसे म्हणसी ॥८२॥

ते तुझे स्वरूप मूळ । जेथूनि द्विभुज वा चतुर्भुज केवळ । देवकार्यास्तव निर्मळ । घेउघेउनि येसी ॥८३॥

क्षीराब्धीतिल शेषशयनापासून । तों मत्स्यकूर्मादि अवतार घेऊन । तो खेळ सरता गारुडी तू कृष्ण । सर्व साठविसी जेथा; ॥८४॥

उपनिषदे जया गाती । योगी हृदयीं शिरोनि पाहती । जयाते सनकादिक राजे असती । कवटाळुनिया; ॥८५॥

देवा, ऐसे अगाध तुझे-। विश्वरूप कानीं ऐके जे । ते देखावया चित्त माझे । उतावीळ जाहले ॥८६॥

संकोच फेडूनि देवाने । पुशिली आस जर प्रेमाने । तर हीचि एक गाढ म्हणे-। इच्छा जी, मज ॥८७॥

तुझे विश्वरूप आघवे । माझे दिठीसी गोचर व्हावे । ऐसी थोर आस जिवें । बांधोनि आहे ॥८८॥

तू जरी मानिशी शक्य मज ते रूप पाहणे
तरी योगेश्वरा देवा दाखवी तेचि शाश्वत ॥४॥

परि आणिक एक देवा, । तुज विश्वरूपा देखावया । योग्यता माझे अंगीं राया, । असे की नाही;? ॥८९॥

हे मी न जाणे आपण आपले । का न जाणे देवें म्हटले । तर रोग्यासि काय उमगले । निदान रोगाचे कधी? ॥९०॥

आणि जी, इच्छाभरें । आर्त आपुली योग्यता विसरे । तहानेला न म्हणे, पुरे-। समुद्रही ॥९१॥

ऐसे प्रबळ इच्छेने भुलोनि । स्वभळ मज न ये आकळोनि । म्हणोनि माउलि जैसी असे जाणोनि । योग्यता बाळाची; ॥९२॥

त्यापरी हे जनार्दना । माझी पात्रता येत तुझ्या मना । तर विश्वरूपर्शना । आरंभावे ॥९३॥

तरि ऐसी कृपा करा । वा नाही म्हणा, अवधारा-। व्यर्थ पंचमालापें  बधिरा । सुख कोठले देणे? ॥९४॥

एरवी एकल्या चकोराचे तृषेस्तव । मेघ जगापुरते न वर्षे काय? । परि जाहली वृष्टीहि व्यर्थ जाय । जर खडकावरी होय ॥९५॥

चकोरा चंद्रामृत पावले । तर इतरां काय शपथेवरि वारिले? । परि डोळ्यांविना उजाडले । वाया जाय ॥९६॥

म्हणोनि विश्वरूप तू सहसा । दाविसी हा भरवसा । करण जाणत्या नेणत्या ऐसा । नित्य नवा तू ॥९७॥

तुझे औदार्य स्वतंत । देता न म्हणसी पात्र-अपात्र । अगा कैवल्याऐसे पवित्र । परि वैर्‍यांही दिधले ॥९८॥

मोक्ष दुराराध्य खचित होय । परि तोही आराधी तुझे पाय । म्हणोनि धाडिसी तेथ जाय । पाईक जैसा ॥९९॥

दिली तुवा सनकादिकांसरिसी । सायुज्य मुक्ति पूतनेसी । जी विषाचे स्तनापनें तुजसी । मारण्या आली ॥१००॥

राजसूय यज्ञमंडपात । उभे त्रैलोक्य असता पाहत । कैसा जाहलासि अपमानित । सहस्त्र दुर्वचनांनी ॥१०१॥

ऐशा अपराधी शिशुपाला । आपणांतचि ठाव दिला गोपाळा, । आणि उत्तानपादाच्या बाळा-। काय ध्रुवपदी आस? ॥१०२॥

तो वना आला याचिलागी, श्रीहरी, । की बैसावे पित्याचे अंकावरी । तया चंद्रसूर्यांहूनिहि परी । स्तुत्य केलेसि जगीं ॥१०३॥

ऐशा दुःखितां सकळ । तूचि एक दाता सढळ । मृत्युसमयीं पुत्रमिषें आळविता, अढळ- । मुक्तिपद दिलेसि अजामिळा ॥१०४॥

भृगूने लाथ हाणिली उरासी । तयाची खूण तू वाहसी । अजून शंखा न विसंबिसी । जे वैर्‍याचे कलेवर ॥१०५॥

ऐसा अपकारा तुझा उपकार । तू अपात्रांसीहि उदार । दान मागोनि द्वार । रक्षिलेस बळीचे ॥१०६॥

तुझे गुणगान न ऐके । तव नावे हाकारी पोपटा कौतुकें । तुवा वैकुंठी त्या गणिके । सुखवास दिधला ॥१०७॥

पोकळ निमित्ते पाहुनि ऐसी । निजपद सहज देऊ लागलासी । तो तू काय मजलागी करिसी । वेगळे काही? ॥१०८॥

गाती जिचे दुभत्याचे पवाडे । जी जगाचे फेडी साकडे । त्या कामधेनूचे पाडे । काय उपाशी राहती? ॥१०९॥

म्हणोनि मी जे विनविले काही । ते देव न दावी हे होणेचि नाही । परि देखावयालागी देई । पात्रता मज ॥११०॥

तुझे विश्वरूप आकळे । ऐसे जर जाणसी माझे डोळे । तर आर्ताचे डोहाळे । पुरवी देवा ॥१११॥

ऐसी चतुराईची विनंती । करू सरसावे सुभद्रापती । तोंचि तो षड्‌गुणचक्रवर्ती-। ती साहू न शके ॥११२॥

तो मेघ कृपामृतसजळ । आणि हा जवळी वर्षाकाळ । अथवा श्रीकृष्ण कोकिळ । अर्जुन वसंत; ॥११३॥

वा देखोनि चंद्रबिंब वाटोळे । क्षीरसागर उचंबळे । तैसा दुणावल्या प्रेमबळें । उल्हसित जाहला ॥११४॥

प्रसन्नतेचे आवेशात- । गर्जोनि म्हणे तो कृपावंत । पार्था, देख देख अनंत । स्वरूपे माझी ॥११५॥

एकचि विश्वरूप देखावे । ऐसा मनोरथ केला पांडवें । की विश्वरूपमय आघवे । जग करोनि ठेविले ॥११६॥

तो उदार अपरिमित । याचकेच्छेचे सदोदित- । सहस्त्रपटींनी असे देत । धन्य श्रीकृष्ण परमात्मा ॥११७॥

सहस्त्रनेत्र शेषाहि दृष्टि न पडले । वेदांसीही जयालागी चकविले । लक्ष्मीपासूनहि चोरुन ठेविले । जिवींचे गुह्य जे; ॥११८॥

ते आता अनेकरीतींनी प्रकटतील । प्रभु विश्वरूप दावितील । धन्य अगाध भाग्य किती उजळेल । पार्थाचे या ॥११९॥

जागता स्वप्नावस्थेत जाई । तो जैसा स्वप्नीचे आघवे होई । तैसा अनंत ब्रह्मांडे ठायी ठायी- । जाहला कृष्णा स्वये ॥१२०॥

तेथ अवचित कृष्णरूप सोडिले । आणि स्थूळदृष्टिचे झापड सारिले । किंबहुना प्रकटविले । योगवैभव आपुले ॥१२१॥

परि हा हे देखे की नाही । ऐसे मनीं न आणी काही । एकसारखा म्हणे पाही पाही । स्नेहातुर ॥१२२॥

श्रीभगवान् म्हणाले:

पहा दिव्य तशी माझी रूपे शतसहस्त्र तू
नाना प्रकार आकार वर्ण ज्यात विचित्रचि ॥५॥

अर्जुना, तुवा एक दावा म्हटले । आणि तेचि दावू तर काय दाविले? । आता देखे आघवे भरले । माझेचि रूपीं ॥१२३॥

काही कृश काही स्थूळ । काही र्‍ह्स्व काही विशाळ । जाड सडपातळ । अमर्याद काही ॥१२४॥

काही अनावर, प्रांजळ । सक्रिय, निश्चल । उदासीन, स्नेहाळ । तीव्र काही ॥१२५॥

काही धुंद, सावध । उथळ काही अगाध । काही कंजूष, क्रुद्ध । उदार काही ॥१२६॥

काही शांत, मदधुंद । स्तब्ध काही सानंद । गर्जते, निःशब्द । सौम्य काही ॥१२७॥

काही साभिलाष, काही विरक्त । जागृत काही निद्रित । परितुष्ट काही आर्त । प्रसन्न काही; ॥१२८॥

काही सशस्त्र, अशस्त्र । काही रौद्र, अतिमित्र । भयानक, काही पवित्र । समाधिस्थ काही ॥१२९॥

काही जनलीलाविलासात । काही पालनशील लालनात । काही संहारक आवेशात । साक्षीभूत काही ॥१३०॥

ऐसी नानाविध परि अगणित । आणि दिव्यतेजप्रकावंत । तेवीचि एकाऐसी एक नव्हेत । वर्णही तयांचे; ॥१३१॥

काही तावल्या सोन्याऐसी झळाळत । पिंगट वर्णाची अनंत । काही सर्वांगी शेंदूरचर्चित । जैसे शेंदरी आकाश ॥१३२॥

काही तेजस रूपवेंत । जैसे ब्रह्मांड रत्नखचित । काही कुंकुम वर्णात । अरुणोदयाऐसी ॥१३३॥

काही शुभ्र स्फटिकधवल । काही इंद्ननील सुनील । काही काळी जणु काजळ । रक्तवर्ण काही; ॥१३४॥

काही निखळ सोन्यासम पिवळी । काही नवमेघासम सावळी । काही गौरांग चाफेकळी । हरित काही ॥१३५॥

तप्तताम्रतांबडी कित्येक । काही श्वेत चंद्रापरी चोख । ऐसी नानावर्णी देख । रूपे माझी ॥१३६॥

जैसे का अन्य अन्य वर्ण । तैसे आकृतींचेही वेगळेपण । लाजूनि मदन आला शरण । ऐशा सुंदर काही ॥१३७॥

काही अतिलावण्यसाकार । काही नितळवपुमनोहर । शृंगारश्रियेचे भांडार । उघडिले जैसे; ॥१३८॥

काही पुष्ट अवयव मांसल । काही शुष्क अतिविक्राळ । काही दीर्घकंठ शिरविशाल । विकट काही ॥१३९॥

ऐशा नानाविध आकृती । पाहता पार नाही सुभद्राप्रती । जयांचे एकेका अंगप्रांतीं । देख बा जग ॥१४०॥

वसु वायु पहा रुद्र तसे आदित्य अश्विनी
पहा अनेक आश्चयें कधी कोणी न पाहिली ॥६॥

जेथ उघडिता दृष्टी । पसरती आदित्यांच्या सृष्टी । पुढे मिटता दिठी । त्या लय पावती ॥१४१॥

वदनींचिये वाफेसवे । होत ज्वालामय आघवे । जेथ अग्नी आदि पावे । समूह वसूंचा ॥१४२॥

आणि भ्रूलतांचे शेवट । कोपें मिळू पाहती एकवट । रुद्र्गणांचे संघ बलिष्ठ । अवतरती पहा ॥१४३॥

सौम्यतेचे ओलाव्यात । अश्विनीदेव अगणित । आणि श्रवणी उद्भवत । अनेक वायू ॥१४४॥

यापरि अवयवांचे लीलेमुळे । जन्मती सुरसिद्धांची कुळे । ऐसे अपार विशाल सगळे । पाही रूप ॥१४५॥

जयां वर्णाया वेद बोबडे । काळाचेही आयुष्य थोडे । ब्रह्मदेवाही । न सापडे । ठाव जयांचा ॥१४६॥

देवत्रयींचे न कानीही येती । देख प्रत्यक्ष अनेक रूपे ती । भोगी कवतिके अती । ऐश्वर्य आश्चर्य आश्चर्याचे ॥१४७॥

इथे आज पहा सारे विश्व तू स्चराचर
माझ्या देहात एकत्र इच्छादर्शन हे तुज ॥७॥

या विश्वरूपाचे रोमरंध्रीं किरीटी । देख बा अनेक सृष्टी । कल्पतरूतळवटी । तृणांकुर जैसे ॥१४८॥

आणि झरोक्याचे प्रकाशात । परमाणू उडतांना दिसत । तैशी ब्रह्मांडे भ्रमत । अवयवांचे सांध्यांमाजी ॥१४९॥

एकेक प्रादेशीं येथवर । पार्था, देख विश्वविस्तार । आणि विश्वहीपार जर । देखावे वाटे; ॥१५०॥

तर त्याहीविषयी काही । येथ सर्वथा संकट नाही । सुखें आवडे ते माझे देहीं । देखसी तू ॥१५१॥

ऐसे विश्वमूर्ति श्रीकृष्ण । बोलता प्रेमपूर्ण । देखण्याचे काही न म्हणे अर्जुन- । उगाचि राहिला ॥१५२॥

येथ का हा उगा राहिला? । म्हणोनि श्रीकृष्णें जो पाहिला । तों उत्कंठालेणे लोईला । तैसाचि आहे ॥१५३॥

परी तू चर्मचक्षूने पाहू न शकसी मज
घे दिव्य दृष्टि ही माझा ईश्वरी योग तू पहा ॥८॥

मग म्हणे उत्कंठेसी ओहोटी न पडे । अजुनि सुखाची सोय न सापडे । परि साच दाविले तेथ अडे । आकळेनाचि यास ॥१५४॥

हे बोलोनि देव हासले । हासोनि बोलणार्‍या म्हटले । आम्ही विश्वरूप तर दाविले । परि न देखसीचि तू ॥१५५॥

यावरि म्हटले विचक्षण अर्जुनें- । हां जी, कोणाचे ते उणे? । तुम्ही बगळ्याकरवी चांदणे- । चरऊ पाहता ना? ॥१५६॥

हां हो, पुसोनिया आरसा- । अंधा दाविता बैसा । बहिर्‍यापुढे हृषिकेशा । गायन करा ॥१५७॥

मकरंदकणांचा चारा फुका- । भ्रमरा न घालिता, बेडुका- । वाया दवडिता देखा । कोपता कोणा? ॥१५८॥

जे अतींद्रिय म्हणोनि वर्णिले । केवळ ज्ञानदृष्टिचे विभागा आले । ते तुम्ही चर्मचक्षूंपुढे ठेविले- । कैसे म्यां देखावे? ॥१५९॥

परि हे तुमचे उणे न बोलावे । मी साहे तेचि बरवे । तेथ म्हटले देवें । होय बाबा; ॥१६०॥

स्वरूप जर आम्ही दावावे । तर आधी देखाया सामर्थ्य द्यावे । परि बोलत बोलत प्रेमभावें । विसरोनि गेलो ॥१६१॥

भुईंत पेरिले न नांगरता । तर तो वेळ वायाचि सर्वथा । माझे निजरूप पाही आता । ती दृष्टि देतो तुज ॥१६२॥

त्या दृष्टीने पांडवा मग । अवघा आमुचा ऐश्वर्ययोग । देखोनिया अनुभवीं, यथासांग । साठवुनि ठेवी ॥१६३॥

ऐसे जो वेदान्ता जाणण्या विषय । सर्व लोकांचा पुरुष आद्य । सर्व जगा पूजनीय- । तो श्रीकृष्ण बोलला ॥१६४॥

संजय म्हणाला:

महायोगेश्वरें कृष्णें राया बोलूनि ह्यापरी
दाविले तेथ पार्थास थोरले रूप ईश्वरी ॥९॥

हे कौरवकुळचक्रवर्ती, । मज हाचि विस्मय अती । की लक्ष्मीहुनी त्रिजगतीं । दैववान असे कोण? ॥१६५॥

नातरि तत्त्व वानावयालागी । वेदावाचुनि कोण जगीं? । अथवा सेवकपणा तरि अंगीं । शेषाचेचि असे ॥१६६॥

अहो, जयाचे सोसें- । शिणत अष्टौप्रहर योगी पैसे । वा अनुसरते गरुडाऐसे । कोण आहे? ॥१६७॥

ते आघवेचि एकीकडे राहिले । कृष्णासुख पार्थातचि एकवटले । ज्या दिवशी जन्मले । पांडव हे ॥१६८॥

पाचातहि जो अर्जुन । कृष्ण तयाचे सहजी आधीन । कामुका स्त्री जैसी स्वाधीन । कारुनी घेई ॥१६९॥

पढविले पाखरूही ऐसे न बोले । पाळला प्राणीही ऐसा न चाले । कैसे अर्जुनाचे दैव बहरले । ते न कळे ॥१७०॥

आणि प्रब्रह्म हे सगळे- । भोगाया सुदैवी याचेचि डोळे । कैसे वाचेचे लळे । पुरवीत असे ॥१७१॥

हा कोपे तर निवांत साहे । हा रुसे तर बुझावीत राहे । नवल. पिसे लागले आहे । पार्थाचे देवा ॥१७२॥

एरवी विषय जिंकोनि जन्मले । जे शुकादिक समर्थ जाहले । ते रासक्रीडा वानिता शोभले । भाट याचे ॥१७३॥

हा योगियांचे समाधिधन । होउनि राहिला पार्थाआधीन । यास्तव विस्मय माझे मन । करितसे ॥१७४॥

तैसेचि संजय म्हणे कायसा- । विस्मय येथ कौरवेशा? । कृष्णा स्वीकारी तयाचा ऐसा । भाग्योदय होय ॥१७५॥

म्हणोनि म्हणे तो देवांचा राव । तुज देऊ दिव्य दृष्टीची ठेव । जेणें विश्वरूपाचा ठाव । देखसी तू ॥१७६॥

श्रीमुखातुनि अक्षरे ऐशी । निघती न निघती एकसरशी । तों ज्ञानाचे प्रकाशीं । अंधार जावोचि लागे ॥१७७॥

देखा ती अक्षरे नव्हती । ब्रह्मसाम्राज्यदीपचि ती । त्या अर्जुनास्तव दीपज्योती । उजळिल्या देवें ॥१७८॥

मग दिव्य चक्षू प्रकटला । ज्ञानदृष्टिचा परीघ फाकला । यापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुले ॥१७९॥

हे अवतार जे सकळ । ते ज्या समुद्रींचे की कल्लोळ । विश्व हे मृगजळ । ज्या किरणांनी दिसे; ॥१८०॥

ज्या अनादिसिद्ध भूमीत । चराचराचे चित्र उमटत । ते स्वस्वरूप वैकुंठनाथ । दाविती तया ॥१८१॥

मागे बाळपणीं हे श्रीपती । एकवेळ खात होते माती । तेव्हा कोपोनिया हातीं- । यशोदेने धरिले; ॥१८२॥

मग जैसे भीत भीत । मुखीं झाडा देण्याचे करुनि निमित्त । चौदाही भुवने विस्तारत । दाविली तिज: ॥१८३॥

वा मधुवनीं ध्रुवा जैसे केले । गाला शंखें स्पर्शिले । आणि वेदही जेथ कुंठित जाहले । ते लागला बोलू; ॥१८४॥

तैसा अनुग्रह हे धृतराष्ट्रराया,- । श्रीहरीने केला धनंयजा । आता कोठेही माया- । ही भाष न जाणे तो ॥१८५॥

एकाएकी ऐश्वर्यतेज प्रकटले । आणि चमत्कारांचे प्रळय जाहले । विस्मयडोहीं बुडोनि गेले । तयाचे चित्त ॥१८६॥

जैसा  ब्रह्मलोकापावत । मार्कंडेय ऋषी पोहत । तैसा विश्वरूपकौतुकांत । पार्थ लोळे ॥१८७॥

म्हणे केवढे गगन येथ होते । कोणें नेले बा कोठे ते? । ती चराचरे महाभूते । काय जाहली ॥१८८॥

दिशांचे ठावही हरपले । अध-ऊर्ध्व काय न जाणे जाहले । जागे होता स्वप्न जैसे गेले । तैसा सृष्टीचा आकारही ॥१८९॥

अथवा सूर्यतेजप्रतापें । चंद्रासह तारांगण लोपे । तैसी गिळिली विश्वरूपें । सृष्टिरचना ॥१९०॥

तेव्हा मना मनपण न स्फुरे । बुद्धि आपण आपणा न सावरे । इंद्रियांचे किरण फिरुनि माघारे । हृदयीं दाटले ॥१९१॥

तेथा आली स्तब्धतेसी स्तब्धता । एकाग्रतेसी एकाग्रता । जैसे घातले विचारजाता । मोहनास्त्र ॥१९२॥

तेव्हा विस्मित पाहे कोडें । तो पुढे उभे चतुर्भुज रुपडे । तेचि नानारूपें चहूकडे । नटोनि ठाकले ॥१९३॥

वर्षाकाळीं मेघ चोहीकडे । की महाप्रलयीं तेज वाढे । तैसे आपणाविण कोणीकडे । उरोचि न दे काही ॥१९४॥

श्रीकृष्णस्वरूपें पावे समाधान । संतुष्ट जाहला अर्जुन । त्यासवेचि उघडी लोचन । तेव्हा विश्वरूप देखे ॥१९५॥

याचि डोळ्यांनी केवळ । पाहावे विश्वरूप सकळ । श्रीकृष्णें तोहि सोहला पुष्कळ । पुरविला ऐसा ॥१९६॥

बहु डोळे मुखे ज्यात दर्शने बहु अद्‌भुत
बहु दिव्य अलंकार सज्ज दिव्यायुधे बहु ॥१०॥

मग तेथ असंक्य देखे वदने । जैसी रमानायकाची । राजभुवने । अथवा प्रकटली निधाने । लावण्यश्रियेची ॥१९७॥

वा आनंदवने बहरली । जैसी सौंदर्यसाम्राज्ये फुलली । तैसी मनोहर देखिली । हरीची वदने ॥१९८॥

तयांमाजी अनेक । साचचि भयानक । जैसी सैन्य उठली एकेक । काळरात्रीची; ॥१९९॥

की मृत्यूसीचि मुखे उपजली । भयाची दुर्गशते बांधिली । वा महाकुंडे उघडली । प्रळयाग्नीची; ॥२००॥

तैसी अद्‌भुत भेसूर । तेथ वदने देखे वीर । आणिक असाधारण अलंकार । सौम्यही बहुत ॥२०१॥

तो ज्ञानदृष्टिने अवलोके । परि वदनांचा अंत न लागू शके । मग लोचन ते कौतुकें । पाहू लागे ॥२०२॥

तेव्हा नानावर्ण कमळवने- । जणु विकसली ऐसे अर्जुनें- । देखिली तेथ लोचने । जैसे हारीने सूर्य ॥२०३॥

तेथेचि कृष्णमेय दाट । कल्पांतविजेचा लखलखाट । तैशी दिठी पिंगट । चढल्या भिवयांतळीं ॥२०४॥

हे एकेक आश्चर्य पाहता- । त्या एकेचि रूपीं पांडुसुता । दर्शनाची अनेकता । फळा आली ॥२०५॥

म्हणे चर्ण ते कोणीकडे, कोठे? । कोठे मुकुट, बलदंड बाहुटे? । ऐसी देखावयाची आस प्रकटे । ती वाढवी अर्जुन ॥२०६॥

तेथ भाग्यनिधी त पार्थ । का विफल होती त्याचे मनोरथ? । काय पिनाकपाणीचे भात्यात । निष्फळ बाण असती? ॥२०७॥

नातरि ब्रह्मदेवाचे वाचेत । काय लटिक्या अक्षरांचे साचे वसत? । म्हणोनि अपार विश्वाचे आदि-अंत । देखिले अर्जुनें ॥२०८॥

जयाचा मार्ग वेदाही न कळे । तयाचे सकळ अवयव एकेचि वेले । अर्जुनाचे दोन्ही डोळे । पाहते जाहले ॥२०९॥

चरणापासुनि मुकुटापावत । विश्वरूपाची थोरवी देख्त । नाना रत्नअलंकारीं जे मिरवत । शोभे हरी ॥२१०॥

आपुले अंगी लेईण्यासाठी । देवचि लेणी होय पाठी-पोटी । तर ती कशासारिखी मोठी- । म्हणूनि सांगू? ॥२११॥

ज्या प्रभेचा झळाला । उजळे चंद्रसूर्यमंडळा । जे महातेजाचा जिव्हाळा । जेणें विश्व प्रकटे; ॥२१२॥

तो दिव्यतेजशृंगार । कोणाचे मतीसी होय गोचर? । देवें जो अंगावर । धारण केला ॥२१३॥

आपण अंग, आपण अलंकार । आपण हात आपण हत्यार । आपण जीव आपण शरीर । देखे चराचर कोंदर देवें ॥२१४॥

मग ज्ञानाचे डोळ्यांनी तेथ । सरळ करपल्लवां पाहत- । तेव्हा कल्पांताच्या ज्वाळा जणु कापित- । तैसी झळकती शस्त्रे देके ॥२१५॥

जयाचे किरणांचे प्रखरपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे । तेजें पोळला अग्नि म्हणे- । समुद्रीं शिरावे ॥२१६॥

मग कालकूटकल्लोळीं कवळिले । महाविजांचे अरण्य प्रकटले । तैसे अपरिमित कर देखिले । उगारल्या आयुधीं ॥२१७॥

दिव्य वस्त्रे फुले गंध लेउनी सर्वतोपरी
आश्चर्यें भरला देव विश्वव्यापी अनंत तो ॥११॥

भिऊनि तेथुनि काढिली दृष्टी । मग मुगुट पाहतसे किरीटी । तेव्हा सुरतरूंची की सृष्टी । जयापासोनि जाहली ॥२१८॥

जी मूळपीठे महासिद्धींची । विश्रांतिस्थळे शिणल्या लक्ष्मीची । सुगंधित निर्मळ जणु कमळेचि । हुंगिली श्रीकृष्णांनी ॥२१९॥

मुकुटावरि घोस कितीक । ठायी ठायी पूजाबंध अनेक । कंठीं रुळती अलौकिक । पुष्पमाळा ॥२२०॥

स्वर्गें सूर्यतेज वेढिले । जैसे सुवर्णें मेरूसी मढविले । तैसे नितंबावरी कसिले । पीतांबर झळके ॥२२१॥

श्रीशंकरा कापुराचे उटणे लावावे । की कैलासपर्वता पार्‍याने लिंपावे । अथवा क्षीरसमुद्रा लपेटावे । क्षीरोदकाने ॥२२२॥

जैसी चंद्रम्याची घडी उलगडिली । ती गगना शाल पांघरिली । तैसी चंदनउटी देखिली । सर्वांगीं तयाने ॥२२३॥

जेणें स्वप्रकाशा कांति चढे । ब्रह्मानंदाचाही दाह मोडे । जयाचे सौरभें जीवित जोडे । गंधवती पृथ्वी ॥२२४॥

चंदनउटी ब्रह्महि लेई आपण । मदनही अंगीं करी धारण । त्या चंदनाची थोरवी कोण । वर्णिल गा? ॥२२५॥

ऐशा एकेक शृंगारशोभेसी पाहत । अर्जुन भांबावला तेथ । देव अभा की बैसला की निद्रित । हे न कळे ॥२२६॥

बाहेरी दिठी उघडोनि पाही । तर आघवे मूर्तिमय देखत जाई । मग आता न पहावे म्हणोनि उगा राही । तर आतहि तैसेचि ॥२२७॥

अनावर मुखे समोर देके । त्या भयें उभाचि ठाके । तर तिकडेही श्रीमुखे । कर चरण तैसेचि ॥२२८॥

अहो पाहता तर आभासे । त्यात नवल कायसे? । परि न पाहताहि दिसे । कौतुक आहे ॥२२९॥

कैसे अनुग्रहाचे करणे । पार्थाचे पाहणे आणि न पाहणे । तयाहिसकट नारायणें । व्यापूनि टाकिले ॥२३०॥

म्हणोनि पडला आश्चर्याचे पुरीं । तो तात्काळ लागे न लागे तीरी । तोंचि चमत्कारांचे महासागरीं । पडे आणिक ॥२३१॥

ऐसे अर्जुना कुशलपणे । आपुल्या अलौकिक दर्शनें । कवळुनि घेतले तयाने । अनंतरूपें ॥२३२॥

तो विश्वव्यापी सर्वतोमुख स्वभावें । आणि तेचि दावाया प्रार्थिले पांडवें । तो आता विश्वचि आघवे । होऊनि नटला ॥२३३॥

आनी प्रकटे सूर्याने वा दिपाने । वा मिटता खुंटेचि दिसणे । ऐसी दृष्टि नव्हे, जी श्रीकृष्णें । दिधली आहे ॥२३४॥

म्हणोनि किरीटी दोन्हीपरी । ते देखतसे उजेहीं की अंधारीं । हे संजय हस्तिनापुरीं । सांगतसे धृतराष्ट्रासी ॥२३५॥

म्हणे, अहो ऐकिले? । पार्थे विश्वरूप देखिले । नाना आभरणीं भरले । सर्वत्र सन्मुख ॥२३६॥

प्रभा सहस्र सूर्यांची नभीं एकवटे जरी
तरी त्या थोर देवाच्या प्रभेशी न तुळेचि ती ॥१२॥

त्या प्रभेचा अद्‌भुत देखावा । कैसा वर्णावा देवा? कल्पांती एकचि मेळावा । बारा सूर्यांचा होय; ॥२३७॥

तैसे सहस्रवरी सूर्य तेजस । उदयले जरि एकेचि वेळेस । तरि त्या विश्वरूपाचे थोरवीस । उपमा नसे ॥२३८॥

अवघ्याचि विजांचे मेळावीं । प्रळयाग्नीची सामुग्री आणावी । त्यातचि दहाही एकवटावी । महातेजें; ॥२३९॥

तरी त्या अंगकांतीपुढे । हे तेज असेल काही थोडे । परि शुद्ध विश्वरूपाएवढे । त्रिवार नव्हे ॥२४०॥

ऐसे माहात्म्य हरिचे सहज । फाके सर्वांगींचे तेज । ते व्यासमुनिकृपें मज । दृश्य जाहले ॥२४१॥

सारे जगातले भेद तेव्हा कालवले जसे
देहात देव-देवाच्या देखिले तेथ अर्जुनें ॥१३॥

आणि त्या विश्वरूपीं सामावले । जग विस्तारासह आपुले । जैसे महोदधीत वेगवेगळे । बुडबुडे दिसती ॥२४२॥

आकाशीं मेघांचे गंधर्वनगर । भूतळीं मुंगी बांधी घर । अथवा मेरूपर्वतावर । सूक्ष्म परमाणू बैसले ॥२४३॥

विश्व आघवेचि त्यापरी । त्या देवचक्रवर्तीचे शरीरीं । अर्जुन त्या अवसरीं । देखता जाहला ॥२४४॥

मग विस्मित तो झाला अंगीं रोमांच दाटले
प्रभूस हात जोडूनि बोलिला नतमस्तक ॥१४॥

तेथ एक विश्व आपण । ऐसे अल्पसे होते जे दुजेपण । तेही आटोनि, अंतःकरण । विरले एकाएकी ॥२४५॥

अंतर्याम अति आनंदले । बाहेरी गात्रांचे बळ हरपले । शरीर आपादमस्तक जाहले । पुलकित ॥२४६॥

वर्षाकाळीं प्रारंभी सर्वदूर । भिजल्या नगाचे सर्वांगावर । फुटती कोमल अंकुर । ऐसे रोमांच आले ॥२४७॥

स्पर्शिताचि चंद्रकिरणांनी । पाझरे चंद्रकांतमणीं । तैशा देहीं आल्या दादुनी । स्वेदकणिका ॥२४८॥

आत सापडता भृंगकुळे । जळीं कमळकळी आंदोळे । तैसे आतल्या सुखोर्मींचे बळें । बाहेरी कापे ॥२४९॥

कर्पुरकेळीचे सोपटे । आतल्या कापुराचे भरें उतटे । तेथ कण गळती, तेवि थेंबुटे  नेत्रांतुनि पडती ॥२५०॥

ऐसा सात्त्विकासह आठाही भावां । परस्परांचा वाटतसे हेवा । तेथ ब्रह्मानंदाचे जीवा । वैभव लाभले ॥२५१॥

उगवल्या सुधाकरें । भरलाचि समुद्र भरे । तैसा वेळोवेळा ऊर्मिभरें । उचंबळतसे ॥२५२॥

तैसाचि अनुभविता सुखकल्लोळ । केला द्वैताचा सांभाळ । मग उसासोनि वेल्हाळ । पाहू लागे ॥२५३॥

ज्या बाजूसि होता बैसला । तिकडेचि नतमस्तक जाहला । जोडुनि करसंपुटाला । बोलतसे बरवा ॥२५४॥

अर्जुन म्हणालाः

देखे प्रभो देव तुझ्या शरीरीं
कोंदाटले सर्वचि भूतसंघ
पद्मासनीं ध्यान करी विधाता
ऋषींसवे खेळत दिव्य सर्प ॥१५॥

म्हणे, जय जय जी स्वामी । अद्‌भुत कृपा केली तुम्ही । जे हे विश्वरूप आम्ही । सामान्यही देखतो ॥२५५॥

परि साचचि भले केले गुरुवरा । मज परितोष जाहला पुरा । की या सृष्टीसी तू आसरा- । मी देखिला, जी, ॥२५६॥

देवा, मंदार पर्वताचे आश्रयें । ठायी ठायी श्वापदांची अरण्ये । तैसी भुवने देहीम या तुझिये । देखतसे अनेक ॥२५७॥

अहो खोळीत आकाशाचिये । ग्रहगणांचे मेळावे । की महावृक्षांचे आश्रयें- । कोटरे पक्षीगणांची; ॥२५८॥

त्यापरी हे श्रीहरी, । तुझ्या विश्वात्मक या शरीरीं । देखतसे अवधारी, । सुरगणांसह स्वर्ग ॥२५९॥

पंचमहाभूतांपासुनि जाहले अनेक । येथ देखतसे कितीएक । आणि भूतसमूह असंख्य अलौकिक । भूतसृष्टीचे ॥२६०॥

जी, सत्यलोक तुजमाजी आहे । देखिला तो ब्रह्मदेव तर नव्हे? । आणि अन्यत्र पाहे । तेव्हा कैलासही दिसे ॥२६१॥

पार्वतीसह श्रीशिवासी । देखे तुझिये एके अंशीं । आणि तुजही गा हृषीकेशी । तुजमाजी देखतसे ॥२६२॥

तुझिया रूपीं देखे सगळे । कश्यपादि ऋषिकुळे । तैसीचि सप्तपाताळे । सर्पांसह ॥२६३॥

किंबहुना हे मुरारी । तुझ्या अवयवांच्या भिंतींवर । ही चौदाही भुवने चित्राकृतींपरी । अंकुरली दिसती ॥२६४॥

आणि तेथिंचे जे जे लोक । त्याचि चित्ररचना जी, अनेक । ऐसी देखतसे अलौकिक । थोरवी तुझी ॥२६५॥

लेऊनि डोळे मुख हात पोट
जिथे तिथे तूचि अनंतमूतें
विश्वेश्वरा शेवट मध्य मूळ
तुझ्या न मी देखत विश्वरूपीं ॥१६॥

या दिव्यचक्षुबळें । चहूकडे पाहे सगळे । बलदंड बाहूत अंकुरले । आकाश जैसे; ॥२६६॥

तैसे एकेक निरंतर । देवा देखतसे तुझे कर । करीत आघवे व्यवहार । एकेचि काळीं ॥२६७॥

मग ब्रह्माचे विस्तारें । उघडली ब्रह्मांडाची भांडारे । तैसी देखतसे उदरे । अपार तुझी ॥२६८॥

सहस्त्र मस्तकांवरी । मुखे तेथ कोटीवरी । परब्रह्मवृक्ष वदनफळांनी ज्यापरी । लहडुनी लवावा; ॥२६९॥

तैसी मुखे जेथ तेथ । हे विश्वमूर्तीं, तुझी देखत । आणि तयाचिपरी दिसत । नेत्रपंक्ती अनेक ॥२७०॥

हे असो, स्वर्ग-पाताळ । की भूमि दिशा अंतराळ । ही भाषा सरली, सकळ । मूर्तिमय देखतसे ॥२७१॥

अगा, तुझे आसपास तेथ । परमाणूइतुकी जागा शोधित । परी न गवसत । ऐसे व्यापिले तुवा ॥२७२॥

या नाना प्राण्यांसहित । साठविली पंचमहाभूते अनंत । तो सर्व विस्तार तुझ्यात । कोंदला देखे ॥२७३॥

ऐसा कवण स्थानाहुनि आलासी? । बैसलासी की उभा आहेसी? । आणि कोणे मायेपोटी होतासी? । तुझा आकार केवढा? ॥२७४॥

तुझे रूफ वय कैसे । तुजपैल काय असे । तू कशावरी आहेस ऐसे । पाहिले मी? ॥२७५॥

तेव्हा पाहिले जी, सर्व । आता तुज देवा तूचि ठाव । तू कोणाचा नव्हेस ऐसाचि एकमेव । अनादि आयता ॥२७६॥

तू उभा ना बैसला ना । उंच ना ठेंगणा । तुज खाली-वरी श्रीकृष्णा । तूचि आहेसी ॥१७७॥

तू रूपें स्वतःचिऐसा । तूचि तुझे वय लोभसा । पाठ-पोट परमेशा । तुझे तू गा ॥२७८॥

किंबहुना आता । तुझे तूचि आघवे अनंता, । हे पुन्हापुन्हा पाहता । देखिले मी ॥२७९॥

परि या तुझ्या रूपाआत ॥ जी, उणीव एक असे देखत । की आदि मध्य अंत- । तिन्ही नाही ॥२८०॥

शोधिले अवघेठायी । परि थांग न लागे काही । म्हणोनि त्रिवार हे नाही । तिन्ही येथ ॥२८१॥

ऐशा आदि-मध्य-अंतरहिता । विश्वेश्वरा अपरिमिता । तुज देखिले जी, तत्त्वता । विश्वरूपा ॥२८२॥

हे महामूर्ते, तुजअंगी । उमटल्या मूर्ती अनेकांगी । वस्त्रे नानारंगी । ऐसा शोभत आहेसी ॥२८३॥

वा वृक्षवेलीरूप मूर्ति श्रीहरी, । तुझे स्वरूपाचलावरी । फुले फळे या दिव्य अलंकारीं । विनटल्या ॥२८४॥

वा महासागर देवा जाहलासी । मूर्तिरूप लाटांनी उसळलासी । की तू वृक्ष एक फळलासी । मूर्तिफळांनी बरवा ॥२८५॥

भूतांनी भूतळ व्यापिले । जैसे नक्षत्रांनी गगन मढविले । तैसे मूर्तिमय भरले । देखतसे तुझे रूप ॥२८६॥

एकेक मूर्तीचे अंगप्रांती । त्रैलोक्ये होती-जाती । एवढया तुझे अंगीं मूर्ती । रोमरोम जाहल्या ॥२८७॥

ऐसा विस्तार मांडूनि विश्वाचा । तू कोणा बा, येथ कैचा? । हे पाहिले तों आमुचा- । सारथी तोचि तू ॥२८८॥

तरि पाहता तुज मुकुंदा । तू ऐसाचि व्यापक सर्वदा । भक्तानुग्रहास्तव रूपसंपदा । धारण करिसी साजिर्‍या ॥२८९॥

कैसे चहुभुजांचे सावळे । पाहता निवती मन डोळे । गळामिठी पडता आकळे । दोन बाहूंनी ॥२९०॥

ऐसी भक्तांवरि करुनि कृपा । गोजिरी मूर्त होसि विश्वरूपा । परि आमुचे सदोषदृष्टीं बापा । तुज सामान्य लेखितो ॥२९१॥

आता दृष्टीचा विटाळ गेला । सहजे तुवा दिव्यचक्षू दिला । म्हणोनि यथारूपें देखवला । महिमा तुझा ॥२९२॥

मकरमुखामागे रथीं । होतासि तोचि तू सारथी । येथ पावलासी विश्वरूपासह कीर्ती- । ओळखिले मी ॥२९३॥

प्रभो गदा-चक्र-किरीटधारी
प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड
डोळे न पाहू शकती अपार
ज्यातूनि हे पेटत अग्नि-सूर्य ॥१७॥

तोचि हा नव्हे काय शिरीं- । मुकुट लेइलासि श्रीहरी । आताचे तेज, थोरवी परी । नवलाईचे बहु ॥२९४॥

तेचि हे चक्र हाती- । फिरवण्यासि विश्वमूर्ती- । तुम्ही सावरिता, ती- । न पुसे खूण ॥२९५॥

पलीकडे तीचि गदा ना? । तळच्या भुजा आयुधाविना । अश्वां सावराया नारायणा । सरसावलेल्या ॥२९६॥

आणि त्याचि वेगें सहसा । माझिया मनोरथासरिसा । जाहलासि विश्वरूप विश्वेशा । म्हणोनि जाणे ॥२९७॥

परि कायसे याचे चोजले । विस्मयाहि न अवकाश मिले । चित्त गोंधळून गेले । आश्चर्यें या ॥२९८॥

हे येथ आहे की नाही । ऐसा विश्वासही न येई । अंगप्रभेची नवलाई । कैसी कोंदली सर्वत्र ॥२९९॥

येथ अग्नीचीही दिठी करपे । सूर्य काजव्याऐसा हरपे । ऐसे तीव्रपण अद्‌भुतरूपें । तेजाचे या ॥३००॥

अहो, महातेजाचे महार्णवीं । बुडोनि गेली सृष्टि आघवी । की युगान्तविजांचे पल्लवीं । झाकले गगन? ॥३०१॥

वा संहारतेजाच्या ज्वाळा तोडुनिया । मांडव घातला अंतराळा या । आता दिव्य ज्ञानाचेही डोळ्यांनी पहाया- । सापडेना ॥३०२॥

दीप्ती अधिकाधिक चढे । अतिदाहकपणे धडाडे । दिव्य चक्षूंसही त्रास पडे । न्याहाळिता ॥३०३॥

अथवा महाप्रळयींचा भडाड । होता काळाग्निरुद्राआड । तो तृतीयनेत्राचा कळा गूढ । फुटला जैसा; ॥३०४॥

तैसे पसरले प्रकाशें । पंचाग्निज्वाळांचे वळसे । सर्वत्र ब्रह्मांडाचे कोळसे । होत आहेती ॥३०५॥

ऐसी अद्‌भुत जणु तेजाची रास । जन्मात नवल मज दिसलास । नाही व्याप्तीस, कांतीस- । पार जी तुझिये ॥३०६॥

तू थोर ते अक्षर जाणण्याचे
तुझाचि आधार जगास अंतीं
तू राखिसी शाश्वत धर्म नित्य
मी मानितो तू परमात्मतत्त्व ॥१८॥

देवा तू अक्षर । आदि ॐ कारापार । वेद जयाचे घर । शोधित असती ॥३०७॥

जे आकारमात्राचे सदन । जे विश्वरूपीं ठेव्याचे एक निधान । ते अव्यय तू गहन- । अविनाश, जी ॥३०८॥

तू धर्माचा ओलावा । अनादिसिद्ध तू नित्य नवा । छत्तीस तत्त्वांपार सदतिसावा- । विशेष पुरुष तू ॥३०९॥

किती भुजा वीर्य किती पसारा
डोळे कसे उज्ज्वल चंद्र सूर्य
हा पेटला अग्नि तुझ्या मुखात
तू ताविसी सर्वचि आत्मतेजें ॥१९॥

तू आदि-मध्य-अंत-रहित । स्वसामर्थ्यें तू अनंत । कर चरण तुज अपरिमित । तुझे रूप असीम ॥३१०॥

अगा चंद्रसूर्यांचे डोळ्यांनी ऐसी । कृपा-कोप-प्रसादलीला दाविसी । तमाचे डोळ्यांनी एकावरि रुससी । एका पाळिसि कृपादृष्टीने ॥३११॥

ऐसा तुझा स्वरूपसाज । मी देखे जी, आज । पेटल्या प्रळयाग्नीचे तेज । तैसे मुख हे तुझे ॥३१२॥

जैसे वणव्याने पर्वत पेटले- । ज्वाळांचे भडके उडाले । तैसी जीभ लोळे- । चाटित दाढा दात ॥३१३॥

या वदनींच्या प्रखर उष्याने । सर्वांगकांतीचे प्रभेने । विश्व तावले, अतिक्षोभाने- । होय कासावीस ॥३१४॥

दाही दिशा विस्तृत अंतराळ
व्यापूनि तू एकचि राहिलासी

पाहून हे अद्‌भुत उग्र रूप
तिन्ही जगे व्याकुळली उदारा ॥२०॥

आता भूलोक पाताल । पृथ्वी आणि अंतराळ । अथवा दशदिशा सकळ । क्षितिजचक्र; ॥३१५॥

ते आघवेचि तुवा भरले देखे । न्याहाळीत राहे कौतुकें । परि गगनासकट पुरीं एके । बुडवावे जैसे ॥३१६॥

नातरि अद्‌भुत रसाचे कल्लोळात । चौदाही भुवने वेढिली जात । तैसे आश्चर्येचि, मग येथ । आकळावे काय मज? ॥३१७॥

नावरे व्याप्ती ही असाधारण । न साहवे रुपाचे उग्रपण । सूख दूर गेले, परि प्राण । कष्टें धरी जग ॥३१८॥

तुज देखोनिया देवा । कैसा भयाचा पूर यावा? । आता दुःखकल्लोळीं विरेल वा । त्रिभुवन ॥३१९॥

एरवी तुज महात्म्यासी देखावे । तर भय-दुःखा का आमंत्रावे? । परि ज्या गुणें हे सुख न गमावे । ते जाणवती मज येथ ॥३२०॥

जोवरि तव रूप न देखिले मोठे । तोवरी जगा सांसारिकचि गोमटे । आता देखिले तर विषयीं विटे । उपजला उद्वेग ॥३२१॥

तेवीचि तुज भेटण्यासाठी । काय देता येइल मिठी? । आणि द्यावी, तर संकटीं- । राहावे कैसे? ॥३२२॥

म्हणोनि मागे सरावे तर संसार । अडवीत येतसे अनिवार । आणि पुढे तू तर अनावर । न येसी कवळिता ॥३२३॥

ऐशा संकटीं सापडत- । बापुडया त्रैलोक्याचा हुरडा होत । ऐसा विचार जी, मनात । माझेही ठाकला ॥३२४॥

जैसा होरपळला आगीत । निवावया ये समुद्रात । तो अधिकचि भीत । खवळत्या तरंगीं; ॥३२५॥

तैसे या जगासि जाहले । तुज देखोनि तळमळत राहिले । त्यामाजी पैल गेले भले । ज्ञानसुरांचे मेळावे ॥३२६॥

हे देव सारे रिघती तुझ्यात
कोणी भयें प्रार्थित बद्धहस्त
मांगल्यगीतें तुज सिद्ध संत
परोपरी आळविती समस्त ॥२१॥

हे तुझे आंगिक तेजें । जाळुनि सर्व कर्मांची बीजे । मिळोनि जात तुजआत सहजे । सद्‌भावासह ॥३२७॥

आणिक कित्येक भयभीत । सर्वस्वें धरुनि तुझा पथ । तुज ते प्रार्थितात । जोडोनिया कर ॥३२८॥

देवा, अज्ञानसागरीं पडलो । विषयजाळ्यात गुंतलो । स्वर्ग-संसाराचे अडकलो । दोन्ही भागीं ॥३२९॥

ऐशा आमुची मुक्तता । तुजविण कोण करिल आता? । तुज जिवें प्राणें शरण अनंता, । म्हणती देवा ॥३३०॥

आणि महर्षी अथवा सिद्ध । की विद्याधरसमूह विविध । हे तुज स्वस्तिवचनें शुद्ध । करिती स्तवन ॥३३१॥

आदित्य विश्वें वसु रुद्र साध्य
कुमार दोघे पितृदेव वायु
गंधर्व दैत्यांसह यक्ष सिद्ध
सारे कसे विस्मित पाहताती ॥२२॥

हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु, साध्यदेव आघवे । अश्विनीदेव, विश्वदेव बिभवें । वायुदेवही जी; ॥३३२॥

अवधारा, अग्नि आणि गंधर्व । पैल यक्ष-राक्षसगण सर्व । इंद्र जेथ मुख्य देव । आणि सिद्धादिक ॥३३३॥

हे आघवेचि आपुलाले लोकीं । प्रभो, तू अवलोकी, । तुझी महामूर्ती दैवी की । पाहती सोत्कंठित ॥३३४॥

मग पाहत पाहत प्रतिक्षणीं । विस्मित होउनि अंत:करणीं । करिती ओवाळणी । प्रभुजी तुमची ॥३३५॥

ते जय जय घोष कलरवें । स्वर्ग गाजविती आघवे । ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट नमनीं ॥३३६॥

त्या विनयतरूंचे वनात । फुलला अष्टसात्त्विकभाववसंत । म्हणोनि करसंपुटपल्लवीत । तू होसी फळ ॥३३७॥

अफाट हे रूप असंख्य डोळे
मुखे भुजा ऊरु असंख्य पाय
असंख्य पोटे विकराळ दाढा
ह्या दर्शनें व्याकुळ लोक मीहि ॥२३॥

जी, लोचनां भाग्य उदेले । जिवा सुखाचे सुकाळ झाले । जे अगाध तुझे देखिले । विश्वरूप यांनी ॥३३८॥

रूपडे हे त्रैलोक्यव्यापक । पाहता देवांही वाटे धाक । हा दृष्टीसि पडे सन्मुख । कोठूनहि पाहता ॥३३९॥

ऐसे एकचि परि विचित्र । बहु मुख आणि अनेक नेत्र । अति भयंकर सशस्त्र । अनंत भुजांचे हे रूप ॥३४०॥

हे अनंत चारुचरण । बहु उदरे आणि नानावर्ण । कैसे प्रतिवदनीं मातलेपण । आवेशाचे ॥३४१॥

होता महाकल्पांत । यमाने होऊनि संतप्त । प्रळयाग्नीचे भडके जेथ । पसरविले जैसे ॥३४२॥

अथवा संहारत्रिपुरारींची अस्त्रे । की प्रळयभैरवांची क्षेत्रे । वा युगान्तशक्तीची शस्त्रे । भूतनाशा ठाकली ॥३४३॥

तैसी जी, जेथ तेथ । तुझी प्रचंड तोंडे दिसत । न समावे सिंह दरीत- । तैसे रागीत दात ॥३४४॥

जैसी काळरात्रीचे अंधारात । संहारपिशाच्चे उल्हासें संचरत । तैशा प्रळयकाळच्या संहार-रुधिरात । किटलेल्या दाढा ॥३४५॥

काळाने पाचारिले रण । की सर्वसंहारें मातले मरण । तैसे अति भेसूरपण । वदनीं तुझिया ॥३४६॥

किंचित् टाकिली दृष्टी । आणि बापुडी ही सृष्टी । दुःखरूप कालिंदीचे तटीं । झाड होऊनि राहिली ॥३४७॥

तुज महामृत्यूचे सागरीं । ही त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरींवरी । आंदोळतसे ॥३४८॥

वैकुंठनाथा, कोपोनि येथ । ऐसे म्हणाल जरि क्वचित्- । तुज लोकांचे काय इतुके वाटत? । तू ध्यानसुख भोगी ॥३४९॥

जी, लोकांचे सर्वसाधारण । उगा आड ठेवी कारण । कैसे सहसा म्हणू, प्राण- । माझेचि कापती ॥३५०॥

ज्या मज भिउनि संहाररुद्र थोपे । मम भयें मृत्यू लपे । तो मी थरथर कापे । ऐसे तुवा केले ॥३५१॥

नवल बापा हे अरिष्ट परी । यास नाव विश्वरूप जरी । याचे भेसूरपण धाडी माघारी । भयासीही ॥३५२॥

भेदूनि आकाश भरूनि रंगीं
फाडूनि डोळे उघडूनि तोंडे
तू पेटलासी बघ जीव माझा
भ्याला न देखे शम आणि धीर ॥२४॥

महाकाळाशी अटीतटीने झुंजणारे । किति एक कुद्ध चेहरे । जयांनी आपुल्या विस्तारें । आकाशा धाकुटे केले ॥३५३॥

गगनाचे विस्तारा न आकळे । त्रिभुवनीचा वाराहि न वेटाळे । मुखींचे वाफेने अग्नि जळे । ऐशा ज्वाळा धडाडती ॥३५४॥

तेविचि एकसारखी नव्हेत मुखे । रंगारंगांचा भेद देखे । प्रळयीं साहाय्य लागे एके । अग्नीसी यांचे ॥३५५॥

जयाचे अंगींची दीप्ती एवढी । त्रैलोक्याची करी राखाडी । तयाही तोंडे आणि तोंडीं । दातदाढ ॥३५६॥

कैसा वार्‍या धनुर्वात जाहला । की समुद्र महापुरीं पडला । विषाग्नी नाशा प्रवर्तला । वडवानलाच्या ॥३५७॥

हलाहल अग्नी प्याले । अहो नवल, मरण मारण्या पेटले । तैसे संहारतेजा या फुटले । मुखांचे मोहोळ ॥३५८॥

परि केवढे म्हणावे विशाळ । जैसे की तुटोनिया अंतराळ । आकाशा भगदाड विक्राळ । पडले जैसे; ॥३५९॥

काखेत घेउनि वसुंधरे । दैत्य हिरण्याक्ष विवरीं शिरे । तेव्हा उघडिली खाटकेश्वरीं । पाताळरूप गुहा ज्यापरी; ॥३६०॥

तैसा मुखांचा विकास । त्यात जिव्हांचा आगळा आवेश । विश्व न पुरे, म्हणोनि घास- । न भरीचि कौतुकें ॥३६१॥

आणि पाताळसर्पांचे फूत्कारीं । गरळज्वाळा लागती अंबरीं । तैशा वदनदरीअंतरीं । पसरल्या या जिव्हा ॥३६२॥

काढुनि जुडगे प्रळयविजांचे । बुरूज शृंगारिले नभाचे । तैसे ओठीं धगधगीत दाढांचे । आकडे दिसती ॥३६३॥

आणि ललाटीचिये खळगीत । कैसे भयाही डोळे भिववीत । की महामृत्यूचे उमाळे तेथ । अंधारीं राहिले ॥३६४॥

ऐसे करुनि महाभयाचे चोज । काय साधू पाहसी काज? । ते न जाणे, परि मज- । मरणभय आले ॥३६५॥

विश्वरूप पाहायाचे डोहाळे- । पुरविले, तयाची पावलो फळे । बा देखिले, आता डोळे- । निवावे तैसे निवले ॥३६६॥

अहो पार्थिव देह जाय । त्याची काळजी कोणा होय? । परि आता माझे चैतन्य- । वाचे की न वाचे ॥३६७॥

एरवी भयाने अंग कापे- । क्षणैक वाढे तरि मन तापे । आणि बुद्धीहि भयें दडपे । अभिमान विसरे; ॥३६८॥

परि या सर्वांहून वेगळा । केवळ आनंदकळा । तो अंतरात्माहि शहारला । निश्चल जो ॥३६९॥

अहो केवढे दर्शनाचे वेध । परि देशोधडीसि लाविला बोध । हा गुरुशिष्यसंबंध । क्वचितचि नांदे ॥३७०॥

देवा तुझे या दर्शनीं । विकलता उपजली अंतःकरणीं । ती सावराया गवसणी । धैर्याची करितसे; ॥३७१॥

तों माझे नावचे धैर्य हरपले । याहीवरी विश्वरूपदर्शन घडले । असो, परि मज भले गुंतविले । उपदेशामधे ॥३७२॥

विसाव्यासाठी जीव । बापुडा करी धावाधाव । परि तया ठाव । कोठेही न लाभे; ॥३७३॥

ऐसे विश्वरूपाचे संकटें । चराचरातील चैतन्य आटे । जी, हे न बोले तर राहे कोठे । काय करी? ॥३७४॥

कराळ दाढा विकराळ तोंडे
कल्पांत-अग्नीसम देखताचि
दिङ्‌मूढ झालो सुख ते पळाले
प्रसन्न हो की जग हे तुझेचि ॥२५॥

अहो, अखंड डोळ्यांपुढे । फुटले की महाभयाचे भांडे । तैसी तुझी प्रचंड तोंडे । उघडली देखे ॥३७५॥

दातदाढांची दाटी । न झाके दोन ओठीं । प्रळयशस्त्रांची दाटीवाटी । काटेरी कुंपणे जैसी; ॥३७६॥

जैसे तक्षकात विष भरले । काळरात्रीं भूत संचरले । की अग्नेयास्त्र परजिले । वज्राग्नीने; ॥३७७॥

तैसी तुझी भयंकर तोंडे । आवेश बाहेरी ओसंडे । आले मरणरसाचे लोंढे । आम्हावरी ॥३७८॥

संहारसमयींचा प्रचंड अनिल । आणि महाकल्पांतीचा प्रळयानल । दोहोंचा होता मेळ । काय न जळे? ॥३७९॥

तैसी संहारक तुझी मुखे । देखोनि धैर्य आम्हा पारखे । भूल पडे, दिशा न देखे । स्वतःसीच न जाणे ॥३८०॥

थोडके विश्वरूप देखिले । आणि सुखाचे अवर्षण पडले । आता आवरी आवरी आपुले । अस्ताव्यस्त हे रूप ॥३८१॥

ऐसे करिसी, जर आधी जाणे । तर ही गोष्ट दावा का म्हणे? । आता एकवेळ वाचवीं जी, प्राणें । स्वरूपप्रळयापासोनि या ॥३८२॥

जर तू स्वामी आमुचा अनंता, । तर ढाल करी माझिया जीविता । साठवी पसारा हा मागुता । विश्वरूपाचा ॥३८३॥

ऐके देवांचिये परमदेवते । तुझिये चैतन्यें विश्व वसते । हे विसरलासि, उलट ते- । संहारसत्र आरंभिले ॥३८४॥

म्हणोनि वेगें प्रसन्न हो देवा । आवरी आवरी आपुली माया । या महाभयापासोनिया- । वाचवी मज ॥३८५॥

हा वारंवार येथ म्हणे । तुज बहुत काकुळतीने । ऐसा काय न जाणे- । मी भेकड जाहलो ॥३८६॥

अमरावतीवरी धाड आली । ती मी एकटयाने परतविली । तो मी भीत न मुळी । काळाचेही तोंडीं ॥३८७॥

परि तैसे हे नव्हे देवा । येथ मृत्यूवरी करुनि चढाया । ठाकलासि आमुचाचि घोट घ्यावया । सकळ विश्वासह ॥३८८॥

नव्हती प्रळयाची वेळ । मध्ये तूचि भेटलासि काळ । बापुडा हा त्रिभुवनगोल । अल्पाय़ू ठरला ॥३८९॥

अहो, काय भाग्य विपरीत । विघ्न उद्‌भवले करिता शांत । अरेरे, विश्व आता जात- । तू लागलासि ग्रासू ॥३९०॥

हे नव्हे काय रोकडे । सर्वत्र पसरून तोंडे । गिळीत अससी चहूकडे । सैन्ये येथ ॥३९१॥

अहा कसे हे धृतराष्ट्रपुत्र
घेऊनिया राजसमूह सारे
हे भीष्म हे द्रोण तसाचि कर्ण
हे आमुचे वीरहि मुख्य मुख्य ॥२६॥

हेचि की कौरवकुळींचे वीर । आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमार । हे गेले गेले सहपरिवार । तुझिये वदनीं ॥३९२॥

आणि साहाय्या यांचे जे जे- । आले देशोदेशींचे राजे । त्यांची वार्ताहि न सांगू धजे । ऐसे सरसकट ग्रासिसी ॥३९३॥

मदोन्मत्त हत्तींसी । घटघटा गिळितोसी । आणि गळाघटीत घालिसी । माहुतांही ॥३९४॥

तोफा डागणारे सैनिक । तैसेचि पायदळातिल एकेक । हरपले भारंभार देख । तुझिये मुखीं ॥३९५॥
    
यमाची भावंडेचि जणु जुळी । तयांतिल एकही विश्वा गिळी । ऐसी कोटयवधी सगळी । गिळिसी शस्त्रे; ॥३९६॥

तैसेचि चतुरंग परिवारा । अश्वांसकट रथवरां । दातहि न लाविता परमेश्वरा, । कैसा तुष्टलासि बरवा? ॥३९७॥

अहो, भीष्माचार्यांऐसे कोण । सत्यप्रिय, शौर्यनिपुण? । अरेरे तेही आणि गुरुवर द्रोण । ग्रासिलेसी ॥३९८॥

अहा हा सहस्त्ररश्मीचा कुमार । येथ गेला गेला कर्ण वीर । आणी आमुच्या योद्‌ध्यांचा केर । झाडिला देखे ॥३९९॥

विश्वधारणकर्त्या हे ब्रह्मदेवा । कैसे जाहले अनुग्रहें या । प्रार्थूनि म्यां, जगा बापुडया । आणिले मरण ॥४००॥

मागे थोडीबहुत करुनि युक्ती । देवें सांगितल्या विभूती । त्यावरि न थांबता पुढती । बैसलो पुशित ॥४०१॥

परि प्रारब्धभोग न चुके देख । बुद्धीही ठाके होष्यमाणासन्मुख । खापर फोडितील मजमाथीं लोक । ते कैसे टळेल मग? ॥४०२॥

समुद्रमंथनीं अमृतही हाती आले । परी देव तृप्त न जाहले । मग काळकूट निपजले । शेवटी जैसे ॥४०३॥

परि ते एकेपरी थोडे । निराकरण करण्याएवढे । आणि त्या अवसरीं ते साकडे । निवारिले शंभूने; ॥४०४॥

हे जळते वारे कोणा आवरेल । कोण बिषभरले गगन गिळेल । आता या महाकाळाशी खेळेल । ऐसे अंगबळ कोणा? ॥४०५॥

ऐसा अर्जुन शिणे; दुःखें । मग्न हो जिवाआत शोकें । परि तो सांप्रतचा न देखे । अभिप्राय देवाचा ॥४०६॥

मी मारणारा हे कौरव मरणारे । ऐसा घेरिला पार्थ मोहभरें । तो फेडण्यास्तव शारंगधरें । दाविले निजरूप ॥४०७॥

अरे, कोणी कोणाते न मारी । येथ मीचि सर्व संहारी । हे विश्वरूपनिमित्तें हरी । प्रकटीत असे ॥४०८॥

परि व्यर्थचि व्याकुळता । ते न कळेचि पांडुसुता । मग उगाचि कंप नसता । वाढवीत असे ॥४०९॥

जाती त्वरेनेचि तुझ्या मुखात
भयाण जी भ्यासुर ज्यात दाढा
दातात काही शिरली शिरे जी
त्यांचे जसे पीठचि पाहतो मी ॥२७॥

तेथ म्हणे, पहा हो एकेवेळे । खड्‌ग-चिलखतांसह दोन्ही सैन्यदळे । वदनीं गेली, गगनीं, की विरले । अभ्र जैसे ॥४१०॥

की महाकल्पाचे शेवटी । कृतांतकोपें जैसी कापे सृष्टी । तेव्हा एकविसाही स्वर्गा मिठी । पाताळासकट देत यमराज ॥४११॥

नातरी उदासीन दैवें- । कृपणाची वैभवे । जेथल्या तेथ स्वभावें । विलया जाती; ॥४१२॥

तैसी साचली सैन्ये एकवट । या मुखीं होत प्रविष्ट । परि एकाही न सुटण्या वाट । कैसे कर्म देखा ॥४१३॥

अशोकाचे टहाळे । उंटाने चघळिले । मुखामाजी गेले । वाया जैसे ॥४१४॥

मस्तके मुकुटासकट । दाढांचे सांडशीत घट्ट । कैसी होताना पीठ । दिसत आहेती ॥४१५॥

मुकुटींची रत्ने दंतफटीत सापडली । रत्नकूट लागले जिभेखाली । काही काही अग्रे माखली । दातांची तेथ ॥४१६॥

अथवा विश्वरूप काळें । ग्रासिली लोकांची शरीरे बळें । परि जीवदेहींची शिरकमळे । अवश्य ती रक्षिली; ॥४१७॥

तैसी शरीरीं प्रत्येक । मस्तके होती चोख । म्हणोनि या महाकाळाचेही मुखीं कित्येक- । उरली शेवटी ॥४१८॥

मग पार्थ म्हणे हे काय । जन्मल्या गतीचि नाही अन्य? । जग आपोआपचि वदनडोह । गाठताहे ॥४१९॥

अवघ्याचि सृष्टी या । वदनाचे वाटेसि लागल्या । आणि जेथल्यातेथचि जाती गिळिल्या । निवांतपणें ॥४२०॥

ब्रह्मादिक समस्त । उंच मुखामाजी धावत । अन्य सामान्य पडत । अलिकडले वदनीं ॥४२१॥

आणिकही भूतजात । उपजल्याचिठायीं ग्रासित । याचिये मुखातुनि खचित । न सुटेचि काही ॥४२२॥

जसे नद्यांचे सगळे प्रवाह
वेगें समुद्रातचि धाव घेती
तसे तुझ्या हे जळत्या मुखात
धावूनि जाती नर बीर सारे ॥२८॥

जैसे महानदीचे ओघ । वेगें गाठिती सागराचे अंग । तैसे अवघेचिकडुनी जग । प्रवेशे मुखीं ॥४२३॥

आयुष्यपंथें प्राणिगण । करोनि दिवस-रात्रीचे सोपान । वेगें वदनमीलन । साधन आहेती ॥४२४॥

भरूनिया वेग जसे पतंग
घेती उडया अग्निमुखीं मराया
तसेचि हे लोक तुझ्या मुखात
घेती उडया वेगभरें मराया ॥२९॥

जळत्या गिरीचे दरीत । पतंग उडया घेत । तैसे समग्र लोक पडत । ह्या वदनीं देखा ॥४२५॥

परि जितुके येथ प्रवेशले । ते तप्त लोहें पाणीचि की गिळिले । व्यवहारातुनि पुसले । नाव रूप तयांचे ॥४२६॥

समस्त लोकांस गिळूनि ओठ
तू चाटितोसी जळत्या जिभांनी
वेढूनि विश्वास समग्र तेजें
भाजे प्रभो उग्र तुझी प्रभा ही ॥३०॥

आणि इतुकेही करिता भोजन । भुकेसी नाही उणेपण । कैसे उद्दीपन असाधारण । जठराग्नींत याचिया? ॥४२७॥

जैसा रोगी ज्वरातुनि उठला । की भणंगा दुष्काळ उजाडला । तैसा जिभांचा लळलकाट देखिला । ओठ चाटिता ॥४२८॥

तैसे आहाराचे नावे काही । तोंडापासुनि सुटलेचि नाही । कैसी वखवखली नवलाई । भुकेलेपणाची? ॥४२९॥

सागराचा घोट भरावा । की पर्वताचा घास करावा । ब्रह्मकटोरा घालावा । अवघाचि दाढेत; ॥४३०॥

दिशा सगळ्याचि गिळाव्या । चांदण्या चाटूनपुसुन खाव्या । ऐसे दिसत आहे तुझिया । जिव्हेचे लौल्य ॥४३१॥

भोगीं काम वाढे । इंधनें आगीसी चेव चढे । तैसी खाताखाताचि तोंडे । खाखा करिती ॥४३२॥

एकचि वदन केवढे पसरले । त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकले । जैसे की कवठ घातले । वडवानली; ॥४३३॥

ऐसी अपार वदने । आता इतुकी कैसी त्रिभुवने । आहार न मिळता येणेप्रमाणे । वाढविली असह्य ॥४३४॥

अगा, हे त्रैलोक्य बापुडे । वदनज्वाळांचे भडक्यात सापडे । जैसे वणव्याने वेढिता चहूकडे । सापडती मृग ॥४३५॥

आता तैसे विश्वा जाहले । हा देव नव्हे कर्म ओढवले । जगीं जलचरां पसरिले । काळजाळे ॥४३६॥

आता या अंगप्रभेचे जाळ्यातून । हे चराचर सुटेल कोठुन । ही तोंडे नव्हेत, लाक्षागृहे पेटुन । ओढवली जगा ॥४३७॥

आग आपुल्या दाहकपणें । कैसे पोळे ते ज जाणे । परि जया लागे तया जिवंतपणें- । सुटका नाही ॥४३८॥

आपुले तीक्ष्णपण घातक । शस्त्र काय जाणे एक । की आपण प्राणघातक । हे विष जाणे?; ॥४३९॥

तैसे तुज आपुल्या काही । उग्रपणाचे भानचि नाही । परि अलिकडले मुखीं खाई । होतसे जगा ॥४४०॥

अगा आत्मा तू एक । सकळ विश्वव्यापक । परि यमराजासम का अंतक । आम्हा ओढवलासी? ॥४४१॥

म्यां सोडिली जीविताची चाड । आणि तूही न धरावी भीड । मनीं आहे ते उघड । बोल बा सुखें ॥४४२॥

किती वाढविसी या उग्ररूपा । अंगींचे भगवंतपण आठवी बापा । नाहीतरी देवा, कृपा- । मजपुरती पाही ॥४४३॥

सांगा असा कोण तुम्ही भयाण
नमू तुम्हा देववरा न कोपा
जाणावया उत्सुक आदिदेवा
ध्यानीं न ये की करणी कशी ही ॥३१॥

देवा, तू वेदांसी वंद्य । त्रिभुवनींचा तू आद्य । सकळ विश्वारी पूजनीय । ऐके विनवणी माझी ॥४४४॥

अर्जुनें ऐसे म्हटले । चरणावरि शिर ठेविले । मग नम्रपणें विनविले । अवधारावे सर्वेश्वरा ॥४४५॥

मज लाभावया समाधान । जी, पुशिले विश्वरूपध्यान । आणि एकेचि काळीं त्रिभुवन । गिळितचि सुटलासी ॥४४६॥

तर तू कोण? का एवढाली । भेसूर मुखे जमविली? । अवघ्यांचिवरी परजली । शस्त्रे कासया? ॥४४७॥

जी, जेव्हा तेव्हा वाढवोनि रागीटपण । गगना आणिसी उणेपण । वटारुनि खडिरांगार लोचन । का भेडसावीत आहेसी? ॥४४८॥

येथ कृतांताचा देवा । कशासि करिसी हेवा? । आपुला तुवा सांगावा । हेतू मज ॥४४९॥

या बोलावरि म्हणे अनंत । मी कोण हे आहेसी पुशित । आणि कशास्तव वाढवीत । उग्रपण ॥४५०॥

श्रीभगवान् म्हणाले:

मी काळ लोकांतक वाढलेला
भक्षावया सिद्ध इथे जनांस
हे नष्ट होतील तुझ्याविनाहि
झाले उभे जे उभयत्र वीर ॥३२॥

मी काळ गा, जाण एवढे । लोकसंग्रहासाठी वाढे । सर्वत्र पसरीत तोंडे । आता ग्रासीन हे आघवे ॥४५१॥

अर्जुन म्हणे, काय कर्म ललाटा । उबगलो या संकटा । म्हणोनि आळविला तो उलटा- । उसळला हा ॥४५२॥

तेव्हा बोलांनी या कठीण । कष्टी होईल अर्जुन । म्हणोनि तात्काळ म्हणे कृष्ण । परि अन्य एक असे- ॥४५३॥

येथ तुम्ही पांडव पाच । संहारसंकटाबाहेरी साच । तेथ पंचप्राणच । सावरिले पार्थाने ॥४५४॥

होता मरणसंकटीं सापडला । तो पुन्हा सावध जाहला । मग श्रीकृष्णाचिया बोला- । लगला चित्त देऊ ॥४५५॥

ऐसे म्हटले देवें- । पार्था, तुम्ही माझे हे जाणावे । अन्य येथ मी आघवे । सरसावलो ग्रासाया ॥४५६॥

प्रळ्याग्नीचे कुंडीं । घालावी लोण्याची उंडी । तैसे जग हे माझे तोंडीं । देखिले तुवा जे;  ॥४५७॥

तर त्यामाजी काही । त्रिवार उरणार नाही । ही सैन्ये पाही । व्यर्थ वल्गना करिती ॥४५८॥

जमवुनि सैन्यांचे मेळे । वीरवृत्तीचे बळें । यमाहुनी वरचढ आपुली गजदळे । ऐसी वाखाणिती ॥४५९॥

म्हणती प्रतिसृष्टी करू । आण वाहूनि मृत्यूसी मारू । जगाचा भरू । घोट या पुरा ॥४६०॥

पृथ्वी सगळीचि गिळू । आकाश वरच्यावरी जाळू । बाणांवरूनि न देऊ ढळू । खिळवू वार्‍यासी ॥४६१॥

चतुरंग सैन्यसंपदा धुरेवरी । महाकाळाशी स्पर्धा करी । स्वार ऐशा पराक्रममदावरी । योद्धे जे; ॥४६२॥

जयांचे बोल शस्त्राहुनि तीक्ष्ण । अग्नीसमचि दाहकपण । मारकपणात काळकूटाचे विषपण । मधुर म्हणावे लागे ॥४६३॥

हे ढगांचे महाल । जाण भेंडोळी पोकळ । अगा मातीचे खेळ । तैसे वीरे हे देख ॥४६४॥

हा मृगजळाचा जैसा पूर आला । दळ नव्हे, कापडाचा साप केला । येथ शृंगारुनी जणु मांडिला । बाहुला पहा ॥४६५॥

म्हणूनि तू ऊठ मिळीव कीर्ति
जिंकूनि निष्कंटक राज्य भोगी
मी मारिले हे सगळेचि आधी
निमित्त हो केवळ सव्यसाची ॥३३॥

यांना हालविते जे बळ । ते मी मागेचि ग्रासिले सकळ । आता मातीचे वेताळ । तैसे निर्जीव हे ॥४६६॥

हालविती दोरी तुटली । तर ती कळसूत्री बाहुली । कोणीही जरी लोटिली । उलथोनि पडे; ॥४६७॥

तैसा सैन्याचा डोलारा या । वेळ न लागेला मोडाया । म्हणोनि ऊठ वेगें धनंजया, । शहाणा होई ॥४६८॥

तू गोहरणाचे अवसरे । घातले मोहनास्त्र एकसरे । मग विराटापुत्र महाभेकड उत्तरें । नागविले कौरवां ॥४६९॥

आता हे त्याहूनि निःसत्त्व जाहले । निपटण्या आयते रण सापडले । घेई यश कई रिपु जिंकिले । एकल्या अर्जुनें ॥४७०॥

आणि कोरडे यशचि नाही । समग्र राज्यहि आले पाही । तू निमित्तमात्रचि होई । सव्यसाची ॥४७१॥

द्रोणास भीष्मास जयद्रथास
कर्णादि वीरांस रणांगणात
मी मारिलेल्यांस फिरूनि मारी
निःशंक झुंजे जय तो तुझाचि ॥३४॥

द्रोणाची पर्वा न करी । भीष्माचे भय न धरी । कैसे शस्त्र परजू कर्णावरी । ऐसे न म्हणावेस ॥४७२॥

काय उपाय जयद्रथास्तव करावा । हे न चिंतो तुझे चित्त पांडवा, । आणिकही जे जे या ठावा- । नामांकित वीर असती; ॥४७३॥

तेही एकेक आघवे । भित्तिचित्रींचे सिंहाडे मानावे । ओल्या हाते घ्यावे । पुसोनिया ॥४७४॥

यावरी हा आघवा । कायसा युद्धाचा मेळावा? । हा आभास गा जाणावा । अन्य सकळ मी ग्रासिले ॥४७५॥

जेव्हा तू देखिले । हे माझे वदनीं पडले । तेव्हाचि यांचे आयुष्य सरले । आता पोकळ सोपटी ॥४७६॥

म्हणोनि झडकरी ऊठ । मी मारिले तू निपट । न मानी शोकसंकट । भलतेचि ऐसे ॥४७७॥

आपणचि निशाण उभारावे । ते कौतुकें विंधोनि पाडावे । तैसे गा हे निमित्तचि आहे । गवसले तुज ॥४७८॥

अगा, विरुद्ध जे जाहले । ते उपजताचि वाघाने नेले । आता राज्यासह आपुले । सुख तू भोगी ॥४७९॥

स्वभावें उतले भाऊबंद । बलाढय जगीं दुर्मद । ते वधिले संबंध । विनायास; ॥४८०॥

ऐशा या गोष्टी । विश्वाचिया वाक्पटीं । लिहूनि ठेवी किरीटी । जगामाजी ॥४८१॥

संजय म्हणाला:

ऐकूनि हे अर्जुन कृष्णवाक्य
भ्याला जसा कापत हात जोडी
कृष्णास वंदूनि पुनश्च बोले
लवूनिया तेथ गळा भरूनि ॥३५॥

आघवीचि ही कथा ऐसी । धृतराष्ट्रा-अपूर्णमनोरथियासी । संजय सांगे कुरुनाथासी । ज्ञानदेव म्हणे ॥४८२॥

सत्यलोकातुनि गंगाजळ । सुटता वाजत खळाळ । तैसी वाचा विशाळ । बोलता तयाची; ॥४८३॥

अथवा महामेघांचे लोट येत । एकेवेळी गडगडत । मंदराचळें घुमघुमत । क्षीराब्धी जैस; ॥४८४॥

तैसा गंभीर महानाद । करोनि तो विश्वकंद । बोलिला वाक्य अगाध । श्रीकृष्णनाथ ॥४८५॥

ते अर्जुनें थोडे ऐकिले । आणि सुख की भय दुणावले- । हे न जाणे, परि कापले । सर्वांग तयाचे ॥४८६॥

लीनपणे वळली अंगाची मोट । तैसेचि जोडिले करसंपुट । वेळोवेळा ललाट । चरणीं ठेवी ॥४८७॥

तेवीचि काही बोलू जाय । तों गळा भरलाचि होय । हे सुख की भय, काय- । विचार करा तुम्ही ॥४८८॥

परि तेव्हा देवाचे बोलें । अर्जुना हे ऐसे जाहले । मी पदांवरुनि देखिले ॥ गीताश्लोकांचिया ॥४८९॥

तैसाचि भिऊभिऊन । पुन्हा वंदूनिया चरण । मग म्हणे जी, आपण- । ऐसे बोलिलात; ॥४९०॥

अर्जुन म्हणाला:

जगीं तुज्या युक्तचि कीर्तनाने
आनंद लोटे अनुराग दाटे
भ्याले कसे राक्षस धाव घेती
हे वंदिती सिद्धसमूह सारे ॥३६॥

की अर्जुना मी काळ । आणि ग्रासणे हा माझा खेळ । हा बोल तुझा साचचि अढळ । मानू आम्ही ॥४९१॥

परि आज तुवा जी, काळें । प्रळय नव्हे तर स्थिरवेळे । ग्रासावे हे न कळे । विचारासी ॥४९२॥

अंगींचे तारुण्य मोडावे । कैसे नसते वार्धक्य आणावे? । म्हणोनि करू म्हणसी ते होणे नव्हे । बहुतकरुनी ॥४९३॥

अहो, चार प्रहरही न होता । कोणतेही वेळी श्रीअनंता । का माध्यान्ही सविता । मावळत असे? ॥ ४९४॥

देवा, तू काळ अखंडित । तुज जी, तीन वेळा आहेत । परि त्या तिन्ही सबळ निश्चित । आपुलाले समयीं ॥४९५॥

ज्यावेळीं होऊ लागे उत्पत्ती । तेव्हा स्थिति प्रळय हरपती । आणि स्थितीकाळीं नसती । उत्पत्ति प्रळय ॥४९६॥

मग प्रळयाचे वेळे । उत्पत्ति स्थिति मावळे । हे कशानेही न ढळे । अनादि ऐसे ॥४९७॥

म्हणोनि आज तरी भरात भोगाचे । स्थितीकाळीं जगासी कैचे । तू ग्रासावे हे न रुचे । माझ्या जिवा ॥४९८॥

तेव्हा संकेतें देव बोले । अगा, या दोन्ही सैन्यांसीचि मरण ठेपले । ते प्रत्यक्ष तुज दाविले । इतरां यथाकाल मरण ॥४९९॥

हा संकेत करण्या अनंता । वेळ लागला बोलता । तोंचि पार्थें सर्व लोक मागुता । देखिला यथास्थिती ॥५००॥

मग म्हणतसे देवा । तू सूत्रधार विश्वलाघवा । लोक आला ना आघवा । पूर्वस्थितीसी ॥५०१॥

परि पडता दुःखसागरीं । तू काढिसी ज्यापरी । ती कीर्ति तुझी श्रीहरी । आठवीत असे ॥५०२॥

वेळोवेळीं कीर्ति आठवी । महासुखाचा सोहळा सेवी । हर्षामृतकल्लोळीं सर्वस्वी । लोळत आहे जी ॥५०३॥

देवा, जगलेपणें जग । धरी तुजठायी अनुराग । आणि दुष्टांचा त्या भंग । अधिकाधिक ॥५०४॥

अगा, त्रिभुवनींच्या राक्षसांचे वर । तू महाभय हे शारंगधर । म्हणोनि दाहीदिशांचे पार । पळती ते ॥५०५॥

इतर सुर सिद्ध किन्नर । किंबहुना अवघे चराचर । ते तुज देखोनि हर्षनिर्भर । नमस्कारित असती ॥५०६॥

प्रभो न का हे तुज वंदितील
कर्त्यास कर्ता गुरु तू गुरूस
आधार तू अक्षर तू अनंता
आहेस नाहीस पलीकडे तू ॥३७॥

येथ गा कवण कारणास्तव । राक्षस हे श्रीकृष्णराय । न लागतीचि चरणा तव । पळते जाहले ॥५०७॥

हे तुज काय पुसावे । ऐसे आम्हाही जाणवे । सूर्योदयीं राहावे । तमाने कैसे? ॥५०८॥

तू स्वप्रकाशाचे आगर । आणि जाहला आहेसी गोचर । म्हणोनि निशाचरांचा केर । उडाला सहज ॥५०९॥

हे इतुके दिवस आम्हा । काही न कळेचि श्रीरामा । आता देखत आहे महिमा । अगाध तव ॥५१०॥

जेथुनि नाना सृष्टींच्या ओळी । पसरती भूतग्रामांच्या वेली । तया महद्‌ब्रह्मा प्रसवली । दैवी इच्छा ॥५११॥

देवा, आपण निस्सीम तत्त्व सदोदित । देवा निस्सीम गुण अनंत । देवा निस्सीम ऐक्य सतत । नरेंद्र देवांचे ॥५१२॥

जी, तू त्रिजगता आसरा । अविनाश तू शंकरा । तूचि व्यक्त-अव्यक्त परमेश्वरा । तयाही अतीत ते तू ॥५१३॥

देवादि तू तूचि पुराण आत्मा
जगास ह्या अंतिम आसरा तू
तू जाणतोसी तुज मोक्षधामा
विस्तारिसी विश्व अनंतरूपा ॥३८॥

प्रकृति-पुरुषांचा आदि तू देवा । अंतही जी, तू महत्‌तत्त्वा । स्वयें अनादि तू विश्वलाघवा । पुरातन ॥५१४॥

तू सकळ विश्वा जीवन । जीवांसी तूचि निधान । भूत-भविष्याचे ज्ञान । तुझेचि हातीं ॥५१५॥

जी, श्रुतीचे ज्ञानलोचना । स्वरूपसुख तव अभिन्न कृष्णा । त्रिभुवनाचे आधारस्थाना । आधार तू ॥५१६॥

म्हणोनि जी, तू परम- । तुज म्हणती महाधाम । कल्पांतीं महद्‍ब्रह्म । तुजअंकीं लीन ॥५१७॥

किंबहुना तुवा देवें । विश्व विस्तारिले आघवे । तर अनंतरूपा वानावे । कोणी तुज? ॥५१८॥

तू अग्नि तू वायु समस्त देव
प्रजापते तूचि पिता वडील
असो नमस्कार सहस्त्रवार
पुन्हा पुन्हा आणि पुन्हापुन्हाहि ॥३९॥

समोर मागे सगळीकडेचि
असो नमस्कार जिथे जिथे तू
उत्साह सामर्थ्य तुझे अनंत
तू सर्व की सर्व तुझ्याचि पोटीं ॥४०॥

जी, काय एक तू नव्हेसी? । तू कवणे ठायी नससी? । तू जैसा अससी । तैसिया तुज नमो ॥५१९॥

वाय़ू तू अनंता । यम तू नियमकर्ता । प्राणिगणीं वसता । अग्नि तो तू ॥५२०॥

चंद्र तू, वरुणदेवता । ब्रह्मा तू सृष्टिकर्ता । तयाचाही पिता । आदिजनक तू ॥५२१॥

आणिकही जे जे काही । जया रूप आहे वा नाही । तया नमो तुज तैसियाही । जगन्नाथा ॥५२२॥

ऐसे प्रेमोत्कट चित्तें । स्तवन केले पांडुसुतें । मग पुन्हा म्हणे, नसस्ते । नमस्ते प्रभो ॥५२३॥

मग तो साद्यंत । न्याहाळी श्रीमूर्त । मग पुन्हा नमस्कारित । म्हणे नमस्ते प्रभो ॥५२४॥

पाहता एकेक अवयवाते । समाधान पावे चित्तें । मग पुन्हा म्हणे तूते । नमस्ते प्रभो ॥५२५॥

या चराचरीं जी भूते । सर्वत्र देखे तयांते । आणि पुन्हा म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥५२६॥

ऐसी रूपे ती अद्‍भुत । जो जो आश्चर्ये स्फुरती अनंत । तों तों नमस्ते म्हणत । वारंवार ॥५२७॥

आणिक स्तुतीही न आठवे । आणि निवांतही न बैसवे । न जाणे कैसा प्रेमभावें । गर्जूचि लागे ॥५२८॥

किंबहुना यापरी ।  नमन केले सहस्त्रवरी । पुन्हा म्हणे श्रीहरी, । तुज सन्मुखा नमो ॥५२९॥

देवा पाठपोट आहे की नाही । याचे प्रयोजन आम्हा न काही । तरी ऐशा तुज पाठमोर्‍याही । नमो स्वामी ॥५३०॥

उभे माझिये पाठीशी । म्हणोनि पाठमोरे म्हणावे तुम्हासी । सन्मुख-विन्मुख होणे जगासी । न घडे तुज देवा ॥५३१॥

आता वेगळाल्या अवयवां । न जाणे वर्णिण्या देवा । म्हणोनि नमो तुज सर्वा- । सर्वात्मका ॥५३२॥

तू अनंतबळविश्रास । तू अपरिमितविक्रम । सकळकाळीं सदा सम । नमो सर्वदेवा ॥५३३॥

अवघ्या अवकाशीं जैसे । आकाशचि अवकाश होऊनि असे । तू सर्वपणें तैसे । व्यापिले सर्व ॥५३४॥

किंबहुना गा, केवळ । हे सर्व तूचि अखिल । क्षीरार्णवी कल्लोळ । दुधाचे जैसे ॥५३५॥

म्हणोनिया देवा, तू वेगळा नव्हेसि जगा सर्वा । हे आले मज अनुभवा । आता तूचि सर्व ॥५३६॥

समान मानी अविनीतभावें
कृष्णा गडया हाक अशीचि मारी
न जाणता हा महिमा तुझा मी
प्रेमें प्रमादें बहु बोल बोले ॥४१॥

परि ऐसिया तुज स्वामी । काहीचि जाणिले न आम्ही । म्हणोनि आप्तसंबंधधर्मीं वागलो तुजसी ॥५३७॥

अरेरे, बहुत वावगे जाहले । अमृतें संमार्जन म्यां केले । शिंगरू घेऊनि दिधले । कामधेनूसी ॥५३८॥

देवा तू परीसखडकचि लाभलासि । परि फोडोनि पाया घातला घरासी । कल्पतरू मोडोनि कुंपणासी- । लाविला शेताचे ॥५३९॥

चिंतामणींची खाण लागली- । त्या रत्नें गुरे वाळिली । तैसी तुजी जवळीक गमावली । अतिस्नेहें ॥५४०॥

हे प्रत्यक्षचि पहा आजचे । युद्ध हे कवडीमोलाचे । परि परब्रह्म तू उघड आमुचे । तुज सारथी केले ॥५४१॥

तुज या कौरवांच्या घरा । शिष्टाईसी धाडिले कृपासागरा । ऐसे व्यवहारास्तव जागृतेश्वरा । तुज विकले आम्ही ॥५४२॥

तू योगियांचे समाधिसुख । कैसे जाणेचिना मी मूर्ख । उपरोधें जी, तुजसन्मुख । बोलिलो तुजसी ॥५४३॥

खेळे निजे स्वैरचि खात बैसे
चेष्टा करी सर्व तुझ्यासमोर
जनीं मनीं वा तुज तुच्छ लेखे
क्षमा करी भान तुझे कुणास ॥४२॥

तू विश्वाचा अनादि आदि । बैससी ज्या सभासदीं । तेथ सोयरिकीचे शब्दीं । बोलिलो विनोदें ॥५४४॥

क्वचित् तव मंदिरीं आलो । तुझिया आतिथ्यें तोषलो । उणे पडले तर निघालो । रुसून सलगीने ॥५४५॥

आमुचे ठायी हे शारंगपाणी । पाया लागुन हवी मनधरणी । ऐसी बहुत करणी । केली आम्ही ॥५४६॥

सजणपणाचे नात्याने ज्येष्ठा । तुजपुढे बैसलो उफराटा । काय आमुचा पाड मोठा? । परि चुकलो कृष्णा ॥५४७॥

देवाशी दांडपट्टा खेळलो । आखाडयात हिरीरीने झोंबलो । धिक्कारूनि निकरें भांडलो । सारीपाट खेळता ॥५४८॥

चांगल्याचुंगल्यास्तव हट्ट केले । देवा शहाणपण शिकविले । वरि काय लागतो म्हटले- । तुझे आम्ही ॥५४९॥

ऐसे हे अपराध सगळे । जे त्रिभुवनींही न सामावले । परि अजाणताचि घडले । पाय शिवुनि सांगे ॥५५०॥

देव भोजनाचे अवसरीं । प्रेमें आठवण करी । परि मम निलाजरा गर्व श्रीहरी । की फुगूनचि बैसे ॥५५१॥

देवाचिये शयनस्थानीं- । खेळता, शंका नसे मनीं । जी, शिरोनिया शयनीं । निकट पहुडे ॥५५२॥

कृष्णा म्हणोनि हाकारणे । यादवचि तुज लेखने । आपुली आण घालणे । जाता तुज ॥५५३॥

तुजसवे एके आसनीं बैसणे । तुझा बोल न मानणे । हे ओळखीचे दाटपणे । बहुत घडले ॥५५४॥

म्हणोनि काय काय आता । निवेदावे येथ अनंता । मी डोंगरचि पुरता । समस्त अपराधांचा ॥५५५॥

यालागी तुजसमक्ष वा पश्चात । जे काही घडले रांगडे, विपरीत । ते प्रेमापोटीं तुजआत । सामावुनि घेई प्रभो ॥५५६॥

वर्षाकाळीं नद्या खळाळत- । गढूळ जळ घेऊनि येत । सामावुनि घेई सागर शांत । अन्य उपाय नाही; ॥५५७॥

तैसे प्रेमें वा प्रमादें । देवा, मजकडुनि विरोधें । बोलिले गेले ते मुकुंदें । साहावे जी; ॥५५८॥

आणि देवाचे क्षमत्वें क्षमा । आधार जाहली भूतग्रामा । म्हणोनि जी, पुरुषोत्तमा, । विनवू ते थोडे ॥५५९॥

अगम्य तू, परि आता- । मज, आपुल्या शरणागता । क्षमा करावी जी, अनंता । अपराधांसी ॥५६०॥

आहेस तू बाप चराचरास
आहेस मोठी गुरुदेवता तू
तुझी न जोडी तुज कोण मोडी
तिन्ही जगीं ह्या उपमाचि थोडी ॥४३॥

जी, जाणिले मी साचे । महिमान आता देवाचे । देव होय चराचराचे । जन्मस्थान ॥५६१॥

हरि-हरादि समस्तांत । देवा, तू परम दैवत । वेदातेही पढविणारा येथ । आदिगुरु तू ॥५६२॥

गंभीर तू मेघश्याम । नाना भूतीं सम । सकळ गुणीं अप्रतिम । अद्वितीय ॥५६३॥

तव तुलनेसी कोणी नसे । हे प्रतिपादनचि कायसे? । तुवा निर्मिल्या आकाशें । सामाविले जग ॥५६४॥

तुझी तुलना दुज्यासि व्हावी । या बोलाचीही लाज वाटावी । तेथ अधिकाची करावी- । गोष्ट कैसी? ॥५६५॥

म्हणोनि त्रिभुवनीं तू एक । न तुजसरिसा न अधिक । तुझा महिमा अलौकिक, । वानू न जाणे ॥५६६॥

म्हणूनि लोटांगण घालितो मी
प्रसन्न होई स्तवनीय मूतें
क्षमा करी बा मज लेकराते
सखा सख्याते प्रिय तू प्रियाते ॥४४॥

ऐसे अर्जुनें म्हटले । मग पुढती दंडवत घातले । अष्टसात्त्विक भावांचे आले । भरते तया ॥५६७॥

मग वाचा सद‌गदित होउनि । म्हणे प्रसन्न होई शारंगपाणी । काढी अपराधसमुद्रातुनी । मजसी जी, ॥५६८॥

तुज विश्वसुहृदा काही । सोयरेपणें मान न दिला पाही । तुज ईश्वराठायी । धनीपण केले ॥५६९॥

तूचि वर्णनीय परि प्रेमलोभाने । वर्णिलेसि मज भरसभेत मोदाने । तरि मी वल्गिले गर्वक्षोभाने । अधिकाधिक ॥५७०॥

ऐशा ऐशा अपराधां । साचचि नाही मर्यादा । म्हणोनि रक्ष रक्ष प्रसादें मुकुंदा । प्रमादांपासुनि लक्ष लक्ष ॥५७१॥

जी, हेचि विनवावयासी । योग्यता माझे अंगीं कैसी? । परि अपत्य जैसे बापाशी । सलगीने बोले ॥५७२॥

पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध । पिता साहे, न मानी खेद । तैसे साहावे जी ॥५७३॥

सख्याचे औद्धत्य पाहत । सखा साहे निवांत । तैसे तुवा समस्त । साहावे जी ॥५७४॥

प्रिय स्नेह्याकडूनी सन्मान । स्नेही न इच्छी सर्वथा जाण । परि उष्टी काढिली आपण । क्षमा करावी जी ॥५७५॥

नातरि जिवलग स्नेही भेटे । मग जीवें भोगिली संकटे । सांगता न वाटे । संकोच काही ॥५७६॥

जिने सर्वस्वी आंगेजिवें । स्वतःसि दिधले मनोभावें । कांत भेटता तिज न राहवे । मनींची गोष्ट बोलिल्याविण ॥५७७॥

त्यापरी जी, विनविण्या । प्रवर्तलो मी देवराया । आणि काही एक म्हणावया । कारण असे ॥५७८॥

अपूर्व पाहूनि अपार धालो
परी मनीं व्याकुळता न जाय
पुन्हा बघू दे मज तेचि रूप
प्रसन्न होई जगदीश्वरा तू ॥४५॥

तर देवासी सलगी केली । विश्वरूपाची आस धरिली । ती मायबापें पुरविली । स्नेहाळांचे ॥५७९॥

कल्पतरू लावावे अंगणीं । कोडकौतुकें भरभरुनी । कामधेनूचे वासरू कोणी । खेळाया द्यावे ॥५८०॥

नक्षत्रीं डाव मांडावा । चंद्र चेंडूऐसा खेळाया घ्यावा । हा छंद सिद्धीसि नेला आघवा । माउलिये तुवा ॥५८१॥

ज्या अमृतलेशास्तव पडती सायास । तयाचा पाऊस पाडिला चारी मास । पृथ्वी नांगरुनी वाफ्यावाफ्यास । चिंतामणी पेरिले ॥५८२॥

ऐसे कृतकृत्य मज जी, केले । स्वामी, बहुत लाड पुरवियले । जे शिव-ब्रह्मदेवेंहि न ऐकिले । ते दाविले मज ॥५८३॥

मग देखावयाची कसली गोष्ट? । जयाची उपनिषदां नाही भेट । ती जीवींची गाठ । मजसाठी सोडिली ॥५८४॥

जी, कल्पारंभापासून- । तों आजची घडी धरून । माझे जितुके गेले होउन- । जन्म अगा-; ॥५८५॥

त्या अवघ्यांचे आत आत । झाडा घेऊनि असे पाहत । परि ही देखिली, ऐकिली गोष्ट । आढळेचिना ॥५८६॥

बुद्धीची जाण । देखू न शके याचे अंगण । याची सादही अंतःकरण । अनुभवीना ॥५८७॥

तेथ डोळ्यांनी देखिली व्हावी । ही गोष्टचि कासया करावी? । किंबहुना कोणी कधी पूर्वी । देखिली न ऐकिली ॥५८८॥

हे विश्वरूप आपुले । तुम्ही मज डोळ्यांनी दाविले । तर माझे मन जाहले । हर्षित देवा ॥५८९॥

आता ऐसी आस जीवीं । तुजसी गुजगोष्ट करावी । जवळीकही भोगावी । आलिंगुनी ॥५९०॥

ते याचि स्वरूपीं करू म्हणावे । तर बोलावे कोण्या एका मुखासवे? । आणि कोणा आलिंगावे? । तुज सीमा नाही ॥५९१॥

म्हणोनि वार्‍यासवे धावणे । गगना आलिंगिणे । जलक्रीडा खेळणे । समुद्रीं कैसे? ॥५९२॥

यामुळे जी, देवा । येथले भय उपजे जीवा । म्हणोनि आर्ताचा बोल ऐकावा । जी, पुरे हे आता ॥५९३॥

चराचर आनंदें पाहावे । मग तेणे सुखें घरी राहावे । चतुर्भुज रूप तुझे न्याहाळावे । तो विसावा आम्हा ॥५९४॥

आम्ही योगजात अभ्यासावे । तेणें याचि अनुभवासी ठाकावे । शास्त्रांचे अध्ययन करावे । परि सिद्धांत तो हाचि ॥५९५॥

आम्ही यज्ञ करावे सकळ । परि तयाचे लाभावे हेचि फळ । तीर्थे व्हावी सफळ । याचिसाठी ॥५९६॥

आणिकही जे जे काही । आम्ही दान पुण्य करावे पाही । हेचि फळ मिळावे त्या ठायी । तव चतुर्भुज रूप ॥५९७॥

ऐसे जे जिवा आवडे । म्हणोनि तेचि देखाया लगबग उडे । देवा माझे हे साकडे । फेडी वेगें ॥५९८॥

अगा जीविचे जाणिसी । सकळ विश्व वसविसी । प्रसन्न होई पुजनीया विश्वासी । हे देवांचिया देवा ॥५९९॥

घेई गदा चक्र किरीट घाली
तसेचि पाहू तुज इच्छितो मी
अनंत बाहूंस गिळूनि पोटीं
चहू भुजांचा नट विश्वसूतें ॥४६॥

अंगकांति तव नीलकमला रंगवी । आकाशाही रंग लावी । तेजाचे ओज दावी । इंद्रनीला; ॥६००॥

जैसा पाचूसी परिमळ सुटला । भुजा फुटल्या आनंदाला । आणि मदनबाळ शोभला । जयाचे अंकीं ॥६०१॥

मस्तकीं मुकुटा ठेविले । की मस्तकचि मुकुट जाहले । शृंगारलेणे लाधले । अंगाचेचि ज्या ॥६०२॥

इंद्रधनुष्याचे कमानीत । जैसे मेघ गगनरिंगणात । तैसे शोभले श्रीअनंत । वैजयंती माळेने ॥६०३॥

केवढी ती उदार गदा । असुरा मोक्ष देत सदा । कैसे सुदर्शनचक्र गोविंदा । सौम्य तेजें मिरवे; ॥६०४॥

किंबहुना हे स्वामी । ते देखाया उत्कंठित गा मी । म्हणोनि आता तुम्ही । तैसेचि व्हावे ॥६०५॥

हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवले जी, डोळे । आता अधीर जाहले । कृष्णमूर्तीसाठी ॥६०६॥

ते साजिरे कृष्णरूपडे । त्याविण अन्य पाहणे नावडे । त्यापुढे विश्वरूपही थोडे । मानिती हे डोळे ॥६०७॥

आम्हा भोगमोक्षाचेही ठायी । श्रीमूर्तीवाचूनि न काही । म्हणोनि ते सगुणरूपचि घेई । हे विश्वरूप आवरी आता ॥६०८॥

श्रीभगवान् म्हणाले:

प्रसन्न होऊनि रचूनि योग
हे दाविले मी तुल विश्वरूप
अनंत तेजोमय आद्य थोर
जे पाहिले आजवरी न कोणी ॥४७॥

या अर्जुनाचिया बोलामुळे । विश्वरूपा आश्चर्य वाटले । म्हणे ऐसे नाही देखिले । अरसिक कोणी ॥६०९॥

कोणती ही वस्तू पावलासी । त्या लाभाचा तोष न घेसी । भिऊनि काय न जाणे बोलसी । एककल्ली ऐसा ॥६१०॥

आम्ही सहज प्रसन्न होतो । तेव्हा आमुचे अंगही देतो । परि काय जीव वेचितो । कवणालागी? ॥६११॥

ते हे तुझियास्तव । आज जिवाचेचि सारसर्वस्व । जमवुनी एवढे सर्व । रचिले ध्यान; ॥६१२॥

ऐसी काय न जाणे तुजविषयी गोडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी । म्हणोनि गौप्याचीही गुढी । उभारिली जगीं; ॥६१३॥

हे अपारां अपार । स्वरूप माझे मायेपार । येथूनि ते अवतार । कृष्णादिक ॥६१४॥

हे ज्ञानतेजाचे निखळ । विश्वात्मक केवळ । अनंत हे अढळ । आद्य सकळां ॥६१५॥

अर्जुना, हे तुजवाचोनि । पूर्वी पाहिले न ऐकिले कोणी । कारण हे कोण्या साधनीं । लाभण्याजोगे नव्हे ॥६१६॥

घोकूनिया वेद करूनि कमें
यजूनि वा उग्र तपे तपूनि
देऊनि दाने जगतीं न शक्य
तुझ्याविना दर्शन हे कुणास ॥४८॥

याचे मार्गी लागले । आणि वेदांनी मौनचि घेतले । यज्ञही माघारी फिरले । स्वर्गापासोनी ॥६१७॥

साधकांनी देखिला सायास । म्हणोनि टाकिला योगाभ्यास । आणि या विश्वरूपप्राप्तीस । अध्ययन न पुरे ॥६१८॥

शिगेची सत्कमें । धावली थोरवीचे भ्रमें । तयांनी बहुत परिश्रमें । सत्यलोक गाठिला ॥६१९॥

तपांनी विश्वरूपऐश्वर्य देखिले । आणि उग्रपण उभ्यानेचि टाकिले । ऐसे तपसाधन राहिले । अपार अंतरीं ॥६२०॥

ते हे तुवा अनायासे । विश्वरूप देखिले जैसे । या मनुष्यलोकीं तैसे । न लाभेचि कोणा ॥६२१॥

आज ध्यानसंपत्तीलागी । तूचि एक अससी जगीं । ब्रह्मदेवाचेही अंगीं । हे परमभाग्य नाही ॥६२२॥

होऊ नको व्याकुळ मूढभावें
पाहूनि हे रूप भयाण माझे
प्रसन्नचित्तें भय सोडुनी तू
पहा पुन्हा ते प्रिय पूर्वरूप ॥४९॥

म्हणोनि विश्वरूपें होई धन्य । सोड सोड येथले भय । त्यावाचुनि काही निःसंशय । भले न मानी ॥६२३॥

भरला समुद्र अमृतें ओतप्रोत । अगा जर लाभे अवचित । तर कोणी का तो त्यागित । बुडेन म्हणुनी? ॥६२४॥

अथवा सोन्याचा डोंगर । एवढा कैसा न्यावा थोर? । ऐसे म्हणोनि का अव्हेर- । करणे पडे? ॥६२५॥

दैवें चिंतामणीरत्न ल्यावे । आणि हे ओझे म्हणूनि टाकावे । कामधेनूसी दवडावे । न पोसवे म्हणुनी; ॥६२६॥

चंद्रमा येता घरा- । म्हणावे, नीघ, करितोसि उबारा । सावली पाडिसी दिनकरा । पलीकडे सर;  ॥६२७॥

तैसे ऐश्वर्य हे महातेज । तुजहाता आले सहज । मग येथ कासाविस तू आज । का गा व्हावे? ॥६२८॥

परि न जाणसीचि गांवढया । काय कोपू आता धनंजया,? । अंग सोडोनि छाया । आलिंगिसी ना? ॥६२९॥

काय हे रूप न मम साचे । परि साशंक होऊनि फुकाचे । प्रेम धरिसी नगण्याचे । चतुर्भुज जे ॥६३०॥

परि अजूनिही पार्था, । सोडी ही मनोवस्था । त्या सगुण रूपाविषयीं आस्था । नये धरू ॥६३१॥

हे रूप जरी घोर । विक्राळ आणि थोर । तरी तव कृतनिश्चयाचे घर । हेचि करी ॥६३२॥

कृपण चित्तवृत्ती जैसी । रोवुनि ठेवी ठेव्यापाशी । मग नुसत्याचि देहानिशी । आपण असे ॥६३३॥

पंख न फुटल्या पिलांवरी । जीव बैसवुनी कोटरीं । पक्षिणी जाय दुरी । उडोनि अंतराळा ॥६३४॥

गाय चरे डोंगरीं । परि चित्त बांधले वत्सें घरीं; । तैसे प्रेम तव करी । स्थिर येथ ॥६३५॥

तर वरवरचे चित्तें । बाह्य सख्यसुखापुरते । भोगावे गा श्रीमूर्तीते- । चतुर्भुज ॥६३६॥

परि पुन्हा पुन्हा सांगतो पांडवा, । हा एक बोल न विसरावा । या स्वरूपातुनि तव सद्‌भावा । न द्यावे निघो ॥६३७॥

हे कधी नव्हते देखिले । म्हणोनि भय जे तुज उपजले । ते सोडी, येथ संचले । असू दे प्रेम ॥६३८॥

आता करू तव मनासारिखे । ऐसे म्हटले विश्वतोमुखें । तर मागील रूप सुखें । न्याहाळी बा तू ॥६३९॥

संजय म्हणाला:

बोलूनि ऐसे मग वासुदेवें
पार्थास ते दाखविले स्वरूप
भ्याल्यास आश्वासन द्यावया तो
झाला पुन्हा सौम्य उदार देव ॥५०॥

ऐसे वाक्य बोलताक्षणीं- । मनुष्यरूप घेतले भगवंतांनी । परि नवल न यात मानावे कोणी । नवलाई तयांचे प्रेमाची ॥६४०॥

श्रीकृष्णचि उघड कैवल्य । वरी विश्वरूपाएवढे सर्वस्व- । हातीं दिधले, परि सर्वथैव । नावडे अर्जुनासी ॥६४१॥

वस्तु घेऊनि सांदीत टाकावी । वा रला दूषणे द्यावी । कन्या पाहूनिया नाकारावी । मना न ये म्हणुनी ॥६४२॥

केला विश्वरूपाऐसा विस्तार । इतुके देवाचे प्रेम अपार । दिधला शेलका उपदेश त्यावर । किरीटीसी देवांनी ॥६४३॥

सोन्याची लागड मोडूनिया । हौसेऐसा दागिना घडवावा । मग नावडे जर जिवा । आटवावा पुन्हा ॥६४४॥

तैसे शिष्याचिये प्रेमें जाहले । कृष्णत्व होते ते विश्वरूप केले । ते मना न येचि, मग आणिले- । कृष्णपण मागुते ॥६४५॥

येथवरी त्रास शिष्याचा साहती । ऐसे गुरू कोणे देशीं असती? । परि न जाणे कैसी तयावरि प्रीती । संजय म्हणे ॥६४६॥

मग विश्वरूप व्यापुनी सभोवते । जे दिव्य योगतेज प्रगटले होते । तेचि सामाविले मागुते । कृष्णरूपीं तयें ॥६४७॥

त्वम् हे पद आघवे । तत् या पदीं सामावे । वा वृक्षाकार साठविला जाये । बीजकणिकेत जैसा ॥६४८॥

वा स्वप्नसंभ्रम पुरता- । गिळी जीवाची जागृतावस्था । तैसा श्रीकृष्णें विश्वरूपयोग आता । सामाविला आपणात ॥६४९॥

जैसी सूर्यप्रभा सामावे बिंबीं । की जलदसंपत्ती नभीं । अथवा भरती सिंधुगर्भीं । विरूनी जाई ॥६५०॥

अहो जी कृष्णाकृती- । घडी विश्वरूपाची होती । अर्जुनाचे आवडीस्तव ती । उकलुनी दाविली ॥६५१॥

ते वाण रंग अर्जुन देखे । परि आवड न दाविली ग्राहकें । म्हणोनि पुनरपि रमानायकें । घडी करुनि ठेविली ॥६५२॥

तैसे वाढीचे अवाढव्यपणें । विश्व जिंकिले होते जयाने । ते सौम्य गोजिरवाणे । रूप साकार जाहले ॥६५३॥

श्रीकृष्णांनी किंबहुना । सान रूप घेतले पुन्हा । आणि आश्वासिले अर्जुना । घाबरलेल्या ॥६५४॥

जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अकस्मात जागा झाला । तैसा विस्मयीं बुडाला । किरीटी तेथ ॥६५५॥

अथवा गुरुकृपेसवे । ओसरता प्रपंचज्ञान आघवे- । स्फुरे ब्रह्मतत्त्व, तैसी पांडवें । श्रीमूर्ती देखिली ॥६५६॥

त्या पांडवा ऐसी चित्तीं । विश्वरूपाची गवसणी आड होती । ती फिटोनि गेली पुरती । ते भले जाहले ॥६५७॥

जणु काळासि जिंकुनि आला । महावात मागुता वळविला । आपुल्या बाहूंनी पार जाहला । सात समुद्र ॥६५८॥

ऐसा चित्तीं बहु संतोष- । जाहला पांडुसुतास । विश्वरूप ओसरता श्रीकृष्णास । देखोनिया ॥६५९॥

मग सूर्याचिये अस्तमानीं । तारका उगवती गगनीं । तैसा देखो लागला अवनी । लोकांसहित ॥६६०॥

पाहे तों तेचि कुरुक्षेत्र । तैसेचि दोन्ही भागीं गोत्र । वीर वर्षताती शस्त्रास्त्र । धुवांधार ॥६६१॥

त्या बाणांच्या मांडवात । तैसाचि रथ देखे निवांत । धुरेवरी बैसला लक्ष्मीकांत । आपण तळीं ॥६६२॥

अर्जुन म्हणाला:

पाहूनि हे तुझे सौम्य मानुषी रूप माधवा
झालो प्रसन्न मी आता आलो भानावरी पुन्हा ॥५१॥

मागे रूप होते तैसे । त्याने देखिले शौर्यविलासें । मग म्हणे, जगलो ऐसे । जाहले पुन्हा ॥६६३॥

बुद्धीसी सोडोनि ज्ञान । भयें धुंडित गेले रान । अहंकारासवे मन । देशोधदीसी लागले ॥६६४॥

इंद्रिये प्रवृत्ति चुकली । वाचा प्राणासी मुकली । ऐसी दुर्दशा झाली । शरीरग्रामीं; ॥६६५॥

ती आघवीचि मागुती- । आली आपुले प्रकृतीप्रती । आता जिवंतपण हे श्रीमूर्ती । लाभले तयां ॥६६६॥

ऐसे सुख जीवीं घेतले । मग श्रीकृष्णाते जी, म्हटले । मी तुमचे रूप देखिले । मानुष हे ॥६६७॥

हे रूप दाविले देवराया,- । की मज अपत्या चुकलिया । तुवा मायेने गोंजारुनिया । अमृतपान दिधले ॥६६८॥

विश्वरूपाचे सागरीं । होतो लाटांशी झुंजत बाहूंवरी । तो या श्रीमूर्तीचे तीरीं । लागलो आता ॥६६९॥

हे द्वारकापुरसुहुदा, ऐके । मज सुकत्या झाडा जी, एके । ही भेट नव्हे, वर्षाव सुखें । मेघांचा केला ॥६७०॥

तृषेने जो मी पीडिला । त्या मज अमृतसिंधू हा भेटला । आता जिण्याचा जाहला । भरवसा मज ॥६७१॥

माझिये ह्रदयरंगणी । होतसे हर्षलतांची लावणी । सुखांसह बुझावणी । जाहली माझी ॥६७२॥

श्रीभगवान् म्हणाले:

हे पाहिलेस तू माझे अति दुर्लभ दर्शन
आशाचि राखुनी ज्याची झुरती नित्य देवहि ॥५२॥

या पार्थाचिया बोलासवे । हे काय गा, म्हटले देवें । तुवा प्रेम ठेवुनी यावे । विश्वरूपीं ॥६७३॥

मग श्रीमूर्तीसी या । भेटावे देहाने नुसत्या । ती शिकवण धनंजया, । विसरलासी का? ॥६७४॥

अगा आंधळ्या अर्जुना, । हातीं आला मेरूहि होय साना । ऐसा असे तव मना- । चुकीचा भाव ॥६७५॥

तर विश्वात्मक रुपडे हे सार्थ । जे दाविले आम्ही तुजपुढे येथ । ते शंभूसीहि न होय प्राप्त । तपे करिता ॥६७६॥

आणि अष्टांगयोगादि संकटीं । योगी शिणताती किरीटी, । परि योगचि नाही ललाटीं । जयाचे भेटीचा ॥६७७॥

हे विश्वरूप क्वचित । आम्ही पाहू किंचित । ऐसे चिंतित चिंतित । काळ जाय देवांचा ॥६७८॥

आशेची अंजुळी । ठेवुनि ह्रदयाचे निढळीं । चातक गा अंतराळीं । दिठी लावुनी बैसे ॥६७९॥

तैसे उत्कंठानिर्भर । होऊनिया सुरवर । घोकिती आठही प्रहर । भेटीसाठी जयाचे; ॥६८०॥

परि विश्वरूपासारिखे । स्वप्नींही कोणी न देखे । ते प्रत्यक्ष तुवा सुखें । देखिले हे ॥६८१॥

यज्ञ-दान-तपे केली वेदाभ्यासहि साधिला
तरी दर्शन हे माझे न लाभे लाभले तुज ॥५३॥

साधनांस्तव नाहीत । वाटा येथ निश्चित । वेदांही साही शास्त्रांसहित । मागे सरावे लागे ॥६८२॥

मम विश्वरूपाचे मार्गा या । चालावया धनंयजा, । संभाराही तपांचिया । नसेचि बळ ॥६८३॥

आणि दानांनी हातीं न येई । तैसा न गवसे यज्ञींही । सुखे निवांत ठायी ठायी । देखिला तुवा; ॥६८४॥

तैसा मी एकेचि परी । गवसे गा अवधारी । जर भक्ती येऊनि वरी । चित्ताते, गा ॥६८५॥

लाभे अनन्यभक्तीने माझे हे ज्ञानदर्शन
दर्शनें होय माझ्यात प्रवेश मग तत्त्वता ॥५४॥

परि तीचि भक्ति कैसी? । पर्जन्याची वृष्टि जैसी । भूमीवाचुनि अन्य ऐसी । गतीचि न जाणे ॥६८६॥

अथवा सकळ जळसंपत्तीसी । घेऊनि शोधी समुद्रासी । अनन्यगती गंगा जैसी । मिळोनिचि मिळे; ॥६८७॥

तैसे सर्व संभारें । अनावर प्रेम एकसरें । मजमाजी संचरे । मीचि होउनि ॥६८८॥

आणि तेवीचि मी ऐसा । तीरीं अंतरीं सरिसा । क्षीराब्धी की जैसा । क्षीराचाचि ॥६८९॥

तैसे मजपासुनि मुंगीपावत । किंबहुना चराचरात । भजना की अन्य येथ । परीचि नाही ॥६९०॥

त्याचि एके क्षणासवे । मी विश्वरूप हे जावणे । जाणवले तर स्वभावें । दृश्यमानही होय ॥६९१॥

मग इंधनीं अग्नि उद्दीपे । आणि इंधन ही भाषा हरपे । ते अग्नीचि होउनि ठेये । मूर्त जैसे ॥६९२॥

न उदयता चंद्र-सूर्य जैसे । गगनीं अंधार असे । मग उद्‌यता एकसरिसे । प्रकाश होय; ॥६९३॥

तैसे माझिये साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी । अहंकारलोपीं, अवधारी- । द्वैत जाय ॥६९४॥

मग मी, तो, हे आघवे । एक मीचि असे स्वभावें । किंबहुना मजमाजी सामावे । समरसें तो ॥६९५॥

माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे
जगीं निःसंग निर्वैर मिळे तो मज मत्पर ॥५५॥

जो मजचि एका । कर्मे वाहतसे देखा । तया मज्वाचोनि अन्य असे का- । गोमटे काही जगीं ? ॥६९६॥

दृष्ट-अदृष्ट सकळ । जयाचे मीचि केवळ । जयाचे जिण्याचे फळ । मीचि असे ॥६९७॥

भूते ही भाष विसरला । दिठीसी मीचि आहे बांधिला । म्हणोनि निर्वैर जाहला । सर्वत्र मज भजे ॥६९८॥

ऐसा भक्त जो काय । तयाचा देह जेव्हा जाय । तेव्हा तो मीचि होय । सांगणे कशासी? ॥६९९॥

उदरीं जग सामावे सकळ- । तो करुणारसें रसाळ । श्रीकृष्णदेव बोलिला बोल । संजय म्हणे ॥७००॥

यावरि तो पांडुकुमर- । जाहला आनंदसंपदा थोर । आणि कृष्णभक्त चतुर । एक तो जगीं ॥७०१॥

तयें देवचिया दोही मूर्ती । नीट न्याहाळिल्या चित्तीं । तेव्हा विश्वरूपाहुनि कृष्णाकृती । देखिली लाभदायक ॥७०२॥

परि जाणिवेसि तयाचिये । मान न दिलाचि देवें । कारण विश्वरूपाहुनी बरे नव्हे । एकदेशी रूप ॥७०३॥

हेचि समर्थावया । एक दोन भल्या- । उपपत्ती दाविल्या । श्रीकृष्णांनी; ॥७०४॥

त्या ऐकोनि, सुभद्रापती- । हेचि आहे म्हणे चित्तीं । काय बरवे ते पुढती- । पुसू दोहीत ॥७०५॥

ऐसी आलोचना करुनि जीवीं । पुसण्याची रीत बरवी- । अनुसरेल ती परिसावी । पुढे कथा ॥७०६॥

श्रीनिवृत्तिपदप्रसादें । प्रांजळ ओवीप्रबंधें । गोष्टी सांगेन आनंदें । ज्ञानदेव म्हणे ॥७०७॥

भरोनि सद्‌भावाची अंजुळी । म्यां ओवीफुले मोकळी । वाहिली चरणयुगुलीं । विश्वरूपाचिया ॥७०८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP