भाग २ - लीळा ३३१ ते ३४०

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा ३३१ : लाखाइसां राणाइसां भेटि : क्षेमालिंगन
एकुदीस : गोसावीयाचेया दरिसना लाखाइसें राणाइसें आली : गोसावी लाखाइसासि क्षेमालिंगन दीधलें : राणाइसांसि नेदीतीचि : तेंहीं दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागली : मग तीये रात्रीं व माहालक्षीमीचिया देउळासि गेलीं : तेथ लाखाइसें निजैलीं असति : राणाइसें दुख करीतें बैसलीं असति : तवं गोसावीया पस्यांत पाहारीं बीजें केलें : तेथ पटिसाळेवरि बैसलीं असति : सर्वज्ञें ह्मणीतले : ‘राणाइ : बाइ : वर्तत : असे : इया’ : ह्मणौनि दोन्हीं श्रीकर पसरूनि क्षेमालिंगन दीधलें : क्षेमालिंगन देवों सरलें : तवं लाखाइसें उठीलीं : ‘हें काइ राणाइ : गोसावी बीजें केलें : तरि सांघसि ना : मातें उठविसीचि ना’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : हे आतांचि आले’ : मग गोसावी तैसेंचि बीढारा बीजें केलें : ॥

लीळा ३३२ : ब्राह्मणाचा दधीभातु आरोगण
एकु दीस : गोसावीयांचेया दरिसना ब्राह्मणु एकु आला : दधीभातु आणिला : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : बैसलें : मग आरोगणेलागि विनवीलें : गोसावी वीनवणी स्विकारीली : दधीभातु वाढीला : आलें वीसरलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ऐसेनि दधीभातेसीं : आलें कां होए’ : तेंहीं ह्मणीतलें : ‘जी : असे : मी विसरलां जी’ : मग आलें वोळगवीलें : आरोगण : गुळळा : ब्राह्मणु निगाला : ॥

लीळा ३३३ : नवगावीं उपाहारू : ॥ रात्रीं इंद्रभय प्रश्नु
एकुदीस : गोसावीयांसि आरोगण : गुळळा : वीडा : आसनीं उपवीष्ट जाले : तेया उपरि गोसावी बाहीरि आंगणा बीजें केलें : तव चांदीणें पडत होतें : पासि इंद्रभट होते : गोसावीयां चांदीणें अवलोकीलें : सर्वज्ञं ह्मणीतलें : ‘कैसें चांदणें निर्मळ शुभ्र’:॥ गोसावी इंद्रभटातें ह्मणीतलें : ‘इतुलेयां वेळां ग्रामांतर किजैल : तरि भियानां कीं’ : इंद्रभटीं ह्मणीतलें : ‘जी जी : गोसावीयांपासि असतां : कैसें भीउनि जी’ : ‘जा : बाइसां करवि आइत करवा’ : मग बाइसीं आइत केली : मग गोसावी तेथौनि बीजें केलें : विंझुगा वोहळीं : इंद्रबाचिया खांदावरि श्रीकरू घातला : श्रीकरें पोटीं बोंबीयपासि दाटीले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘इंद्रेया एथौनि तैसोनि तैसें गा’ : तेंहीं ह्मणीतलें : ‘जी जी : एथे देहाची माणुसें मारिजती’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘भियाना’ : मग तैसाचि चंद्रु मावळला : इंद्रभट भेवों लागले : थरथरां कापति : गोसावी आपेगावीं ऐलींकडे वोहोळ पातले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘भीयाना’ : ॥

लीळा ३३४ : श्‍वानध्वनि अभयदान
मग मांउगांवी सूनीं भुंकीनलीं : ते वोहळ गोसावी पातले : वोहळांतु बीजें केलें : तवं इंद्रभट सावेया भेवों लागले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘भीया ना उगेचि या’ : ॥

लीळा ३३५ : नी:कळंकीं वस्ति
तैसेंचि गोसावी निकळंकासि बीजें केलें : तवं वाति जाति होती : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ वाति आंबूथा : डोइचें तुप घाला’ : बाइसें पुढां गेलीं : वाति आंबूथीली : डोचें तुप घातलें : ॥ गोसावीयांसि वोटेयावरि शयनासन रचीलें : गोसांवीयांसि आसन : बाइसीं चरणक्षाळण केलें : गुळळा : वीडा : पहुड : ॥

लीळा ३३६ : प्रातःकाळीं इंद्रभटा सीक्षापण
गोसावी पश्र्चांत पाहारीं परीश्रया बीजें केलें : परिश्रयो सारूनि आले : चौकीं आसन : तेव्हळिचि दंतध्वन : उदीयांचि इंद्रभट गंगेसि गेले : संध्या करूनि आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘इंद्रया : देवतेसि नमस्कारू केला कीं नाहीं’ : ‘जी जी वीसरला : जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘पोरें हो : आपुला माहात्मा न विसरा देखों’ : ‘जी जी : तें गोसावीयांचें त्यां कैसे वीसरौनि’ : ॥

लीळा ३३७ : मंडळिका तिथवारू
मग गोसावीयांसि चौकीं पुजावस्वरू जाला : अवघे भक्तजन गंगे गेले होते : ते संध्या करूं करूं आले : परि टिळे न लवीतिचि : गोसावीयांपासि बैसले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मंडळिका : तुह्मी निच या अवघेया टिळा उगाळुनि दीयावा : येथ तीथवारु जाणवावा’ : ऐसा वीधि वीहीला : ॥ मग तेंहीं टिळा उगाळिला : एरि आवघां टिळे लावीले : गोसावीयां पूढां : तिथवारू जाणविला : मग ते दीसवडि तैसेंचि करीति : ॥

लीळा ३३८ : वडवाळिये अवधुताचें भिक्षान्न आरोगण
मग तीये दीसीं वडवाळिये ऐलीकडे : निंबायासि गोसावी उभे राहीले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘अवधुता : मढीएची खापरी : नगरीं भीक्षा कां कीजे ना’ : ‘हो जी’ : मग नावेक पुढारें बीजें केले : मग ह्मणीतलें : ‘अवधुता : ब्राह्मण ब्राह्मण असति’ : ‘जी जी : तें मी जाणत असे’ : मग ते तैसेचि भिक्षे गेले : आपुलें आवरण केलें : मढीयेचें पात्र घेतलें : मग नगरामध्यें भिक्षा करूं निगाले : तवं गोसावी मळेयासि बीजें केलें : मळां आसन : गोसावीयांसि पुजावस्वर : तवं अवधुत भिक्षा करूनि आले : गोसावीयां पुढां पात्र ठेवीलें : गोसावी अवलोकिलें : भिक्षेसि आंबीलभातु : दीवसी : भाकरि : तरि लोणसणें : ऐसें आलें होतें : तें गोसावी अवलोकिलें : मग ह्मणीतलें : ‘अवधुता मिठ असे’ : ‘ना जी : मीं मागों विसरलां : जी जी : आतां आणुं जाइन’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तें तेव्हळिसीचि मागिजे कीं’ : मग गोसावी इंद्रभटातें ह्मणीतलें : ‘इंद्रेया आपुली उंडी : उगुमुगु कां साराना’ : मग ते गंगेसि गेले : गंगेचां काठीं देउळ होतें : गोसावी इंद्रबातें ह्मणीतलें : ‘उगुमुगु’ : ह्मणौनि भिक्षान्नाचिया हेतु पुसिलें : मग बाइसीं पदार्थुं निवडुं आदरिला : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ  : कोरके नको : निवडुं कालवा’ : मग बाइसीं बहीरवासावरि काला केला : मिठ घातलें : मग आवघे वाटे केले : गोसावीयांसि अर्धवाटा ताटीं वोळगवीला : अर्ध ठेवीला : अवघेया भक्तजनां वांटे दीधले : प्रसादु केला : अवघेया प्रसादु दीधला : आधीं प्रसादु घेतला : मग जेउं लागले : इंद्रभट प्रसादें घांसू घोळती : मग जेवीति : जेवीत प्रसादु सरला : मग उगेचि होते : गोसावी पालमांडें तेयाकडे घातलें : मग पालमांडा घासु घोळिति : मग जेवीति : ऐसी गोसावीयांसि आरोगण : गुळळा : वीडा : पहुड : उपहुड : मग गोसावी तेथौनि बीजें केलें : ॥

लीळा ३३९ : मार्गी गोपाळभोजन दाखवणें
मार्गी बीजें करीतां गोसावी तें सेत पावलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हें तुम्हां एथौनि गोपाळभोजन दाखवीजैल : कोळवी कुसंबी : ते चणेन घोळुनि आणा’ : मग शेतीं आसन : तेंहीं घोळुनि आणिली : गोसावीयांसि एका मांडखुंतीएवरि आसन : एकु श्रीचरणू उकडू पुढें केला : सोडीला : डावीए श्रीकरीं काला : उजवीए श्रीकरीचीया आंगुळाचिया संदीं कुसुंबीये तीखीयेचे ढेंसे धरिले : आंगुठेनि घांसु घेति : तैसाचि कुसंबीय : तीखीयचा घांसू घेति : आणि गोपाळाचेनि आनुकारें : च्यारी दीसा पाहाति : ऐसी गोसावीयांसि आरोगण : गुळळा : वीडा : आणि गोसावी तेथौनि बीजें केलें :॥

लीळा ३४० : पैठणीं त्रीपुरुखीं काको कपाट देउनि व्रती
तेथौनि गोसावीयांसि पैठणीं त्रीपुरुखीं वस्ती जाली : गोसावी रात्रीं बीजें केलें : तवं देउळीची वाति जाति होती : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : वाति आंबूथा : डोइचें तुप घाला’ : मग बाइसें भितरि गेली : वाति आंबूथीली : डोइचें तुप घातलें : गोसावीयांसि आसन : काको भितरि होते : कांबळेनिसीं : तो वातां कांबळा सीरकला : तें कवाड पडीलें : तें काकोसीं मुर्च्छा आली : ‘काकोवरि कवाड पडिले’ : ह्मणौनि भक्तजन धाविनलें : गोसावी तेथ बीजें केले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ बटो दुखवलेति : सावेया दुखवलेति’ : वेळां दों ह्मणीतलें : गोसावी तेयाची पाठि श्रीकरें स्परिशीली : तेयाचें दुख होते ते निवर्तलें : ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP