भाग २ - लीळा ३०१ ते ३१०

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा ३०१ : घानदरी प्रातपुजा आरोगण
मग उदीयांचि परिश्रया बीजें केलें : तैसेचि गोसावी : घानदरीएसि आसन : घाणेयांपासि आंगणीं कांटी होतीं : तेथ आसन : पटिसाळे दक्षीणीली कडे आसन जालें : मग गोसावी तेथौनि बीजें केलें : मग मार्गी डोंबलांकाटिए तळि आसन : चरणक्षाळण : गुळळा : वीडा : मग तेथौनि बीजे केलें : मार्गीहुनि उपाध्ये पींपळगावां तांबोळ आणुं धाडीले : मग सोमनाथीं रिगतां उजवेया कडे आसन : तथा डावेया कडे गुळळा : ए पानें सीरपुरूनि तेधवांचि आणिलीं : तदा काळीं तीये गावीं सीत भरे : उपाध्ये एति तवं सोमनाथीं होते : ॥

लीळा ३०२ : विज्ञानेश्र्वरा वीडा वाणें
मग तेथौनि गोसावी आपेगावां बीजें केलें : वेशी पासि माहाजन बैसले होते : तेंहीं गोसावीयांतें देखीलें : आणि अवघेचि उठीले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : (हे रामेश्र्वरबास) : मग गोसावी विज्ञानेश्र्वरां बीजें केलें : पटिसाळेवरि आसन : चरणक्षाळण जालें : गुळळा : मग गोसावी भितरि बीजें केलें : चौकीं आंगी टोपरें फेडीलें : मग फुटा प्रावर्ण करूनि भितरि बीजें केलें : गाभारां आसन : मग माधानीचें उदक घेउनि लिंगासि स्तर्पण केलें : मग उपध्यातें ह्मणीतलें : ‘बटिका : वीडा देया’ : तेंहीं साधारणें ऐसीं दोनि असा : आणिकें द्या’ : मग तेंहीं बरवीं पानें : बरवें पोफळ : ऐसा वीडा वोळगवीळा : मग गोसावी माध्यानिसि वीडा वीसूळीला : मग लिंगासि वाइला : दोहीं श्रीकरीं लिंग स्परिशीलें : मग गोसावी बाहीरि बीजें केले : नासी पासि आडदांडी होती : तेथ गोसावी उभे राहीले : तेथ गोसावी निरूपण केलें : उपाधी गोसावीयांतें पूसीलें : ‘जी जी : देववीडा ह्मणीजे : सर्वज्ञे ह्मणीतलें : ‘कव्हणि एक सदर्थ देवा जाति : हडुपीयातें वीडे मागति : तो चोखटु दे : देववीडा देहा ठेवि : मग काळीं पानें : घोटें पोफळ : मग वाये : ते देवते वंचिति : तरि देवता कोणें कामें नाराए’ : तैसेंचि गोसावी देऊळ सव्ये घालुनि बीजें केलें : ॥

लीळा ३०३ : निंबातळि आसन : विष्णु भटां भेटि
मग गोसावी तेथौनि बीजें केलें : निंबातळि आसन : पींपळ असे : तेयाचा वाव्य पालवीं परता ऐसा निंबू होता : तेथ आसन : तवं विष्णुभट गंगेकडौनि विज्ञानेश्र्वरासि जात असति : हातीं तांबवती : तुळसी : तवं गोसावीयातें देखीलें : आणि गोसावीयांकडे आले : दंडवतें घातली : श्रीचरणा लागले : मग गोसावीयांचे श्रीचरण उदकें सींचन केलें : तुळसी वाइलिया : गोसावी श्रीकरें पाठि स्परिशिली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : कैसा ब्राह्मणु तापसू : तीन्हीं रितु साधलिया असति’ : ‘जी जी : गोसावी केव्हळि बीजें केलें’ : ‘हें आतांचि आले’ : गोष्टी : मग वीनवीले : ‘जी जी : आवघेया सांघो जाओ नां : ते नेणति : गोसावी आले : ऐसें सांघों : गोसावी बीजें केले असे’ : मग तैसेचि ते निगाले : महाजन माहालक्ष्मीचां दउळीं बैसले असति : तवं वीष्णुभटीं ह्मणीतलें : ‘हांगा काइ बैसले असा : उठा उठा : गोसावी बीजें केलें असे’ : तेहीं ह्मणीतलें : ‘कोणे ठाइं’ : ‘ना वीज्ञानेश्र्वराचेया निंबातळि बैसले असति’ : तैसेचि ते उठीले : आपुलालेया घरासि गेले : भेटीची आइत केली : ॥

लीळा ३०४ : बल्हेग्रामीं गुंफे वोवाळणी
मग जे जेयातें असे : तेणें तें दरिसनां घेतलें : गावीं घरोघरीं गुढीया उभिलिया : वेसि दारीं तोरण बांधलें : ऐसें नगर श्रींघारुनि थोर मोहोउछावो केला : मग दरिसनां निगाले : गोसावीयांसि दरिसन जालें : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : जेयातें जें होतें : तें तें दरिसन केलें : मंत्रु ह्मणीतलें : मग वीनवीलें : ‘गोसावी बल्हेग्रामासि बीजें करावें : तेथें सत्यादेवीचें देउळ असे : बरवी गुंफा असे : तेथ गोसावी बीजें करावें जी’ : गोसावी वीनवणि स्वीकारीली : मग गोसावी बल्हेग्रामा बीजें केलें : सरिसें भक्तजन : माहाजन : गोसावी उपाध्यांचीया खांद्यावरि श्रीकरू घातला : वरि भक्तजनीं चांदोवा धरिला : ऐसे गोसावी बल्हेग्रामासि बीजें केलें : गुंफेसि पटिसाळेवरि उजवीया कडे आसन : तव लाखाइसे आपूली सून श्रींघारूनि वोवाळणिए लागि आणीलीं : गोसावीयांतें वोवाळीलें : त्यातें देखौनि एरी घरिचिया : एरी घरीचिया : आखेवाणेंसीं वोवाळीति : ऐसीया अवघीयाचि नगरिचीया सोवासनी वोवाळावीया आलीया : गोसावी आसनीचा वीडा : जातां त्याचिये थाळां घालिति : एरांचा वीडा एरां देति : आवघीया गावां आंतु एकीसी गोसावीयांचें दर्शन नाहीं : तीएचा भातारू तीएसि एवों नेदीचि : ऐसी वीळवेर्‍ही वोवाळणी जाली : तथा पाहारू रात्रि : सभा घनदाट बैसली असे : दाटणि जाली : कोनटेया पसौनि गोसावीयाचा अवसरू पाहात होते : ते आले : मग बसले : श्रीचरण गोसावीयांचे चुरूं लागले : गोसावी दोन्ही श्रीचरण दोघांचीया मांडीयां वरि घातले : मग चुरूं लागले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ गा विरोध जाला’ : ‘ना जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘रायाचिए वोळगे : राणे मंडळिक एति : वोळग भरे : आंगाजवळिकेचे धाकुटे परते सरति : पाठवणी होए : मग तेचि : तथा मग तेचि : मां तेचि : मग तेहींचि घेपजे दीजे गा’ : मग लाखाइसीं उपाहारालागि वीनवीले : मग बाइसीं गोसावीयांसि पुजावस्वर केला : रात्री लाखाइसीं ताट आणिलें : गोसावीयांसि व्याळी जाली : गुळळा : वाडा : बाइसीं : वोटेयावरि शएनासन रचीलें : गोसावीयांसि पहुड : गुंफे अवस्थान : दीस सात पाच जाले : ॥

लीळा ३०५ : राणाइ वेशी पावो लावणें
ते दीसींचि राणाइसे गोसावीयांचेया दरिसनांसि आलीं : रात्रीं : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘वेशी पावो लाउनि या’ : ‘हो कां जी’ : मग गेलीं : व्येशी पावो लावीला : तवं बाहीरिला कडे : बाबरू झांटि : गुंजावर्ण डोळे : खांदावरि आगळ : तथा लोहाचा मूदगल : उंच थोरू महाप्रचंडु : ऐसा देखीला : आणि भियालीं : तैसीचि गोसावीयांपासि आली : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागलीं : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : काइ देखीलें’ : सांघीतलें : ‘जी जी मीं तेथें गेलिये : तवं बाबर झांटि : गुंजावर्ण डोळे : खांदावरि लोहाचा मुदगलु : उंच थोरू ऐसा देखीला : जी जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘भियाचि ना’ : ‘जी : जी : तरि तो कोणु’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : तो ब्रह्मनाथु : एथीचीए वोळगे आला होता’: ॥

लीळा ३०६ : हटें राखसेयाचा नमस्कारू घेणें
एकुदीसीं गोसावीयांसि वीळीचां, वेळीं गोसावी सत्यादेवीचां आंगणीं उभे असति : आवघें माहाजन गोसावीयांसि दंडवतें करीति : राखसे रामदेवो ते न करीति : गोसावीयां जवळि उभे असति : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथ येहीं अवघां नमस्कारू केला : तुम्हीं न करा ते काइ’ : तेहीं ह्मणीतलें : ‘जी जी : आह्मीं कव्हणाहीं न करू : माहादेवा करूं : कां माहादेवातें दाखवी तेयां करूं’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तुमचा नमस्कारू एथ घेणें आति’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तुम्हीं माहादेवातें वोळखा’ : ‘हो जी’ : ‘कैसा असे’ : ‘कर्पुर गौरू : व्रषभ वाहान : अर्धांगी पार्वती : पंच वगत्र : त्रीनेत्रू : खड्वांग कपाळ : पींगटा जटै : वाघांबर प्रावर्ण : त्रीशूळ डौर : ऐसा असे जी’ : मग गोसावी वरती वास पाहिली : आणि ह्मणीतलें : ‘हा घेया गा : तुमचा माहादेवो’ सः मग तेहीं पाहीला : तवं गगनमार्गे एतु देखीला : खड्वांग कपाळ : हातीं त्रीशूळ : डबरू : वृषभारूढ : अर्धांगी पार्वती : ऐसा येत देखीला : तेहीं चांग पाहीलें : मग दंडवतें घातली : उठीति तवं न देखति : मग गोसावीयांसि दंडवतें घातलीं : ‘जी जी : गोसावीचि माहादेवो’ : तिये दीउनि गोसावीयांसि दंडवत करीति : ॥

लीळा ३०७ : तथा नामकरण
एकुदी : राखसे गोसावीयांचेया दरिसनासि आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणापासि बैसले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तुह्मा नांव काइ’ : ‘जी जी : मज नांव राखसा रामदेवो’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘लंकानाथु : दशानयन ह्मणा : तथा वदन’ : ‘जी’ : नावेक होते : मग निगाले : ॥

लीळा ३०८ : जोमाइ नृत्यें दपिनशक्ति देणें
एकुदीसीं : गोसावीयां जवळि वीळिचां वेळीं : भक्तजनें चरस्थळीं करीतें होतीं : रूची अरूचीचीया गोष्टी होत होतीया : कव्हणा कांहीं साहे : कव्हणा काइ रूचे : ऐसे गोसावी आवघेयांतें पूसीलें : जोमाइसीं ह्मणीतलें : ‘जी जी : मज लांकाचे दीढरे आवडे : तथा रूचे : परि साहे ना’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘नृत्य करा : मग साहे ऐसें कीजैल’ : तवं एकीं ह्मणीतलें : ‘जी जी : यांतें जाखेरांचा देव्हारा असे : एं सूपलीया नाचवीति : गावां जाणति : नाचां जाणति’ : ॥ मग लाखाइसाचीय घरीचीं ढीडरीं आणवीलीं : एकांचीय घरूनि सूपलिया आणिलिया : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘नृत्य करा पां : घांसू घेया पा : गावें : नाचावें : सूपली वाजवावी : एथीची वास पाहावी’ : मग तीयें नाचों रिगालीं : तीयें नाचों जाति तवं घांसू घेवों जाति : तवं गाणें ठाके : नाचों जाति तवं सूपली वाजवणें ठाके : ऐसे एकेक ठाकत जाए : तवं तवं गोसावी हास्य करिति : तोंडें उसीसां फेणु निगे : गोसावी इखीत हास्य करीति : ऐसी गोसावी लीळा केली : मग गोसावी पुरें केलें : ते श्रीचरणीं लागली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘साहाति’ : मग तीयें दीउनि तेयां लांकाचें अन्न पचे :॥

लीळा ३०९ : तथा नामकरण : कामाइ पंचनामकरण
एकुदीसीं ब्रह्मनाथासि गोसावी बीजें केलें : चौकीं आसन : कामाइसें तिये राणाइसाची बहीण : तीयें दुहवें : आवेया ऐसी डोइ : इउलें ऐसे केस : मग वेखंडे ऐसे दात : मुडीया बाहीयाची चोळी : ऐसीं राणाइसासंसरिसीं : गोसावीयाचेया दरिसना आली : दंडवतें घातली : श्रीचरणा लागलीं : गोसावीयांजवळि बैसलीं : मग गोसावी पूसीलें : ‘यां नांव काइ’ : ‘जी जी : इये नांव कामाइ’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ : कावसना : कामाक्षा : कावीणीचें खेळणें’ : ऐसें गोसावी पांच नांवे ठेवीलीं : ॥

लीळा ३१० मांडवी कथानिरूपण
एकुदीसी गोसावी मांडवखडकासि बीजें केलें : खडकावरि आसन : मग मांडवरिषीची गोष्टि सांघीतली : ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP