भाग २ - लीळा २२१ ते २३०

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा २२१ : करंजखेडीं पानुनाएका हाटग्रहीं अवस्थान
तेथौनि गोसावी करंजखेडा बीजें केलें : मग नगरांपुर्वे वृक्षा एका खालि आसन : पाउसु थोरू येत होता : बाइसें नगरांतु बीढार पाहावेया गेलीं : कव्हणीं एकीं ह्मणीतलें : ‘पानुनायकाचें हाटग्रह असे तें मागा’ : बाइसें तेयाचीया घरासि गेलीं : ह्मणीतलें : ‘बाइ : तुमचें हाटग्रह असे : तें आमचेया बाबासि दीया’ : तेहीं ह्मणीतलें : ‘बाइ : तथा आइ : तेथ देवता असे : ते वसों नेंदी’ : ‘तुम्हीं दीया पां : आमचेया बाबाचां ठाइं तैसें कांहीं नाहीं’ : तेंहीं बीढार दीधलें : बाइसें गोसावीयांपासि आलीं : अवघें सांधितलें : मग गोसावी हाटग्रहा बीजें केलें : पुर्वपसिम हातवटी : हाटवटीचां पसिमिली सिरां उत्तरिले वोळीं घर : तेथ गोसावीयांसि अवस्थान : मास दोनि : दक्षिणिल हाटदार गोसावी बुजवीलें : उत्तरील हाटद्वारें राज्य करिति ॥

लीळा २२२ : पानुनायका वातापनौति
बाइसें प्रतदीनीं पानुनायकाचेया घरा भिक्षे जाति : गोसावी तिये बीढारीं राहीले : तेणें तेयासि थोर आश्र्चर्य जालें : बाइसें जाति : तेव्हळि पाट बैसों घालीति : सोपस्कार भिक्षा देति : एकुदीसीं बाइसीं पुसीलें : ‘हा वो घरधनी दीसेति ना’ : ‘ते वातें तीन वरीखे मोडीखोडी करूनि घातले असति’ : बाइसीं ह्मणीतलें : ‘आमचे गोसावी रोग धाडीति : आमचेया बाबाचेया दरिसना यतु का : आणि वातु जाइल’ : तैयाचिया ब्राह्मणीं ह्मणीतलें : ‘‘हाटघरीचे पुरुषु असति : तेयांची येकें आईसें आलीं : तेंहीं म्हणीतलें : ‘ आमचेया बाबाचेया दरिसना एतु कां : आणि तेयांचा वातु जाइ’’ मग गोसावीयाचेया दरिसनासि आले : दोनी आंगीया : माथां दौडि : तेयावरि पासौडी पांगुतले : वरि जाडीचे कोंगटें : ऐसे गोसावीयांचेया दरिसनासि आले : गोसावियांसि दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग जवळि बैसले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तुमचा देहीं कांहीं रूजा असे’ : ‘हो जी : कांहीं असे : जी जी : वातु असे : इतुलाही वारा न साहे जी : एकी उसीसां सगडी : एकि पाइतां सगडी : दोनि आंगिया : दोनि पासोडिया : दोनि पागा : एकि जाडि : दोनि सगडीया : इतुकें असे जी : परि वायो जाए ना’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आजी सगडीया नको घालूं’ : तेहीं ह्मणीतलें : ‘जी जी : मज न गमे जी’ : सर्वज्ञें म्हणीतलें : ‘उपद्रो उपजैल : तरि मग घाला : तथा उठिल’ : मग तेहीं सगडीया फेडीलीया : मग बीढारासि गेले : च्यारि पाहार सूखेंचि निद्रा केली : उदीयांचि गोसावीयांचेया दरिसना आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : बैसले : मग गोसावी पुसिलें : ‘काली सगडीया न घलाचि तरि उपद्रो उपनला : तथा : नायेको : रात्रीं कांहीं उपद्रो जाला’ : ‘जी जी : कांहींचि नाहीं : सूखेंचि नीद्रा आली जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आजि आतां जाडि नको पांगरो’ : ‘जी जी : जाडि वीण न गमे जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘उपद्रो उपजैल तरि काइ घेवों नैये’ : मग ते घरासि आले : जाडि फेडीली : च्यारि पाहार सूखें निजैले : एरी दीसीं उदीयांचि आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : बैसले : गोसावी पुसिलें : ‘जाडि न पांगुराचि : तरि काइ उपद्रो उपनला’ : ‘जी जी : कांहींचि नाहीं : सूखें निद्रा आलि जी’: सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आजि पासोडी एकी नको पांगरों’ : पासोंडीविण न गमे जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘उपद्रो उठिल : तरि मग पांगुरा’ : ‘हो कां जी’ : मग घरा गेले : निद्रा केली : उदियांचि गोसावीयांचेया दरिसना आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : बैसले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘पासौडी न पांगराचि : तरि कांहीं उपद्रो उपनगला’ : ॥ सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आजि एकि आंगी : एक पांगुरण नको’ : ‘हो कां जी’ : मग ते पासोडी न पांगुरति : पाग बांधति : कदाचीत आंगी लेति : मग गोसावीयाचेया दरिसना एति : नगरांतु हींडति : हाटवटिये जाति : नगरीचा लोकू ह्मणे : ‘हाटघरा पुरुषु आले असति : तेंहीं कैसा पाननायकु उजरिला’ : कांमठ पडिताळुं जाति : मग तेयांचे दाइ ह्मणति : ‘हा कोणें गा उपचारिला : या हातीं खावों न ल्हावों’ : ऐसा गोसावी तेयाचा वातु फेडीलां : ॥

लीळा २२३ : तथा उपहारा दीपनशक्ति देणें
एकदीसु : गोसावीयांतें पानुनायकें वीनवीलें : ‘जी जी : वायो गेला : पर दीपन नाहीं’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एक उपाहारू करा : मग होईल’ : मग तेहीं उपाहारू केला : वडे प्रधान करूनि : कोरडे वडे : आंबिचे वडे : मुख्य करूनि : उपाहारू निफजविला : पुजाद्रव्यें मेळविलीं : मग उपाहारू घेउनि आले : मग गोसावीयांसि पुजा केली : बाइसीं ताट केलें : भक्तजनां ठाये केले : तेयां लागौनि ती वरीसां तांदळाचें सीत आणिलें : तें तेयांसि वाढिलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : अवघेयां सरिसें वाढा’ : बाइसी म्हणीतलें : ‘बाबा : बाधिल’ : सर्वज्ञें म्हणीतलें : ‘न बधी’ : मग भक्तजना सहीत वाढीलें : मग गोसावीयांसि आरोगणा : भक्तजना जेवणें जालीं : पानुनायेक तृप्त परियंत अवघीं अन्नें जेवीलें : मग गोसावीयांसि गुळळा वोळगवीला : ते बीढारासि गेले : रात्रीं म्हणीतलें : ‘अजि आम्हीं सदन्न जेवीलें असों : रात्रीं कांहीं उपद्रो होइल : तरि वीसदेवो दडपौनि ठेवा हो’ मग तेहीं निद्रा केली : मध्यान्हे एके रात्रीं तेया भुक लागली : आणि ते उठिले : ब्राह्मणितें ह्मणीतलें : ‘वाति लावी हो’ : ते भियाली : वाति लाविली : मग पुसीले : ‘कांहीं उपद्रो जाला’ : तेंहीं म्हणीतलें : ‘मज थोर क्षुधा लागली असे : पीडा होति असे : कांही अन्न असे’ : तेंहीं म्हणीतले : ‘अन्न अवघें पाळलें : वडे आणि तुप असें’ : ‘हो कां : घेउनि या’ : मग ते वडे तुप जेवीलें : आंचवले : तांबूळ घेतलें : माघौतें निजैले : उदीयांचि गोसावीयांचीया दर्शना आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : बैसले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘रात्री तुमतें बाधीना की’ : ‘जी जी : तें जाले ऐसें : रात्री थोर भुक लागली : अवघें अन्न पाळलें : वडे होते : ते आठ वडे तुपेंसि जेवीलों : मग निजैलो’ : ऐसा गोसावी तेयासि दीपनशक्ति दीधली : ॥

लीळा २२४ : तथा सितळानंद नामकरण
एकदीसीं : उदयाचा पूजावसर जालेया नंतरें : गोसावी वीहरणा सेंदुराळेया बीजें केलें : तळेयाचिये नृत्यकोणीं पाळीवरि आसन : कामठु पडीताळावेया आले होते : तेहीं आइकीलें : सेतकरी सांधीतलें : जें : गोसावी सेंदुराळेया बीजें केलें असे : आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग गोसावीयां पुढां पालखति घालौनि बैसले : भटोबासिं गोसावीयांसि कमळाची पुजा करावी ऐसें ह्मणौनि कमळें तोडावेया रिगत होते : गोसावी भटोबासातें डोळा घातला : भटोबासीं पानुनाएकातें धरीलें : पालवीं धरूनि वोढिलें : ते बोबाइले : ‘जी जी : मज सीतळोदक न साहे’ : भटोबासीं उदकामध्यें नेले : आणि पाव्हों लागले : जवं जवं पव्हति तवं सूखानंदचि होय : गोसावी बोलावीति : परि न येति : मग वाडुवेळां निगाले : गोसावीयां पूढां सांघितलें : ‘जी जी : जवं जवं हीव ऐसें पाणी लागे : तवं तवं सुखानंदुचि होए : जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तरि तुह्मांसि सितळानंदु ह्मणा’ : मग बाइसीं कमळीं पुजा केली : गोसावीयांसि आरोगण जाली : मग वीळीचां गोसावी बिढारा बीजें केलें : ॥

लीळा २२५ : आबाइसा : महदाइसां भेटि
देव : भट अबाइसें : महदाइसें : गोसावीयांचिया दरिसना आलीं : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागलीं : भेटि जाली : ॥

लीळा २२६ : महादाइ वस्त्राची आंगी भटोबासा देणें
गोसावी महादाइसातें पुसीलें : ‘बाइ : हें तुमचें वस्त्रा कीतुलें एकु दी पांगुरलें : आणि आंगीं सिवीली : मग आंगीं लेइलें : आतां ते आंगी वानरेसासि दीजो’ : महदाइसीं ह्मणीतलें : ‘हो कां जी : दीजो कां जी’ : महदाइसां सूख जालें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘घेया गा वानरेया’ : भटोबासीं आंगी घेतली : लेइले : श्रीचरणा लागले : ॥ (हे लीळा : हीराइसपाठ : हीवरळिये) मग रिधपुरासि निगाले : ॥

लीळा २२७ : आबैसां मयोररेखी ह्मणीयें
गोसावी आबैसातें पुसिलें : ‘बाइ : एथ तुह्मी दीसवडि दोनि मोरें लेहा : मासा दीसा’ : मग तेहीं वान मेळवीले : दीसवडि दो दो मोरें लेखति : गोसावी वीहरणाहुनि बीजें करिति : मोरें पाहाति : निकी नव्हति तरि चुकि ठेविती : एकाधें दीसीं एक उणे लीहीति : मग गोसावी ह्मणति : ‘बाइ : एक मोर एथीचें लागा’: अधीक लीहीति तरि ह्मणति : ‘हें तुमचें लागे’ : ऐसीया परी च्यार्‍हीं भीतीं मोरें भरीलीया : उमाइसा : महादाइसा : भेटिं : ॥

लीळा २२८ : भट हटें अदृश्य होणें
एकुदीसीं गोसावी रामतीर्थाकडे बीजें केलें : मग बाइसे सरीसीं असति : वीहरण सारूनि बीढारा बीजें करीतां : मार्गी चालतां : गोसावी ह्मणीतलें : ‘हां गा : हें उठिताए : उठीतां हें बैसताए : बैसतां : हें धावैल तरि टाकाल’ : भटीं ह्मणीतलें : ‘हो जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘वानरेश चळवळे दीसताति : हे टाकीति’ : मग गोसावी बहीरवासू खोवीला : आंगी खोवीली : आंगीचीया बाहीया वरतीया केलीया : गोसावी गजगति बीजें केलें : भटीं वोली काखे सूदलीं : गोसावीयां पाठीं धांवत जाति : गोसावी हातावीहाती पूढें जाति : भट गोसावीयांतें टाकीत जाति : परि टाकतिना : वोहळापासि गोसावीयातें सीओं गेलें : आणि अदृश्ये जाले : भट गोसावीयांतें पाहों लागले : तवं न देखति : आणि बाइसें पडिलीं : मग प्रगट जालें : तवं बाइसें पडीलीं देखीली : गोसावी बाइसातें हातीं धरीलीं : उठवीलें : सावधे जालीं : मग पुसीलें : ‘बाबा : आपण के होतेयां’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : हें ए रींगणीए तळिं होतें’ : मग बाइसां भटां आश्र्चर्ये जालें : मग गोसावी बीढारा बीजें केलें ॥

लीळा २२९ : प्रकाशदेवां गुंफे गमन
 एकूदीसीं गोसावी प्रकाशदेवांचिए गुंफेसि बीजें केलें : सरीसे भट असति : गावां उत्तरे पैलाडि गुंफा होति : प्रकाश होती : प्रकाशदेवो आपूलेयां सिक्षांसीं नगरांमध्ये गेले होते : गोसावी गुंफा उघडवीली : भीतरीला वोटेयावरि आसन : चरणक्षाळण करवीलें : साहाणेवरि चंदन होतें : तेयाचा आपणेयांसि आडा रेखविला : सुकली ऐसी माळ होती : ते श्रीकंठीं घातलि : अक्षेता लाविलीया : पाणिभातु पाहाविला : गोसावीयांसि पाणिभाताची आरोग  णा दीधली : सूकलीं ऐसीं पानें : घोटीं येसी फोडि होति : तेयाचा गोसावी विडा घेतला : मग गोसावी गुंफेचे कवाड बांधविलें : गोसावी बीजें केलें : तवं मार्गी प्रकाशदेव एत देखीलें : गोसावी भटोबासातें ह्मणीतलें : ‘तुह्मीं यांसि नमस्कारू करा गा’ : तेहीं ह्मणींतलें : ‘यांचे जरि आह्मांसि करीती तरि आह्मीं यांसि करूनि’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘उपाधि मानिजे’ : तवं ते आले : गोसावीयांचे दर्शन जालें : प्रकाशदेवीं दंडवतें घातलीं : भटीं प्रकाशदेवां नमस्कारू केला : तथा भक्तजनीं गोसावीयां अवघें सांघीतलें : खुंटिएची माळ पुजा करवीली : पाणीभातु आरोगीले : प्रकाशदेव तोखों लागले : ‘जी जी :
दैवाचा : भाग्याचा : मीं कृत्याकृत्य केलां : सूखीया केलां’ : ऐसे शब्दप्रति तोखति जाति : मग प्रकाशदेवीं सीक्षांतें ह्मणीतलें : ‘देखीलें गा कैसी निराभिंमानिनि वस्तु’ : मग गोसावी बीढारासि बीजें केलें : ॥

लीळा २३० : तथा गर्वानुवाद
भट नदीं धोत्रें धुआवेया गेलें होतें : तेथ प्रकाशदेव भेटले : गुंफे घेउनि गेलें : मग भटातें ह्मणीतलें : ‘नागदेया तुवां संसारू सांडीला : निकें केलें : तरि पुस कांहीं : बोलता असे : परि पुसता नाहीं : एर्‍हवी आचार्या नावें कांकण बांधीलें असे’ : मग गोसावीयांपासि आलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘केउते गेले होतेति’ : ‘‘जी जी : प्रकाशदेवाचीए गुंफेते : ऐसें ह्मणति : ‘जी जी : आचार्या नावें कांकण बांधलें असे : ब्रह्म सांघता असे परि पूसता नाहीं’ :’’ ह्मणौनि आवघें सांधीतलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आज्ञानाचेनि प्रसादें : तेहींचिं कां न ह्मणावें’ : ‘आज्ञानाचेनि प्रसादें हा जनु सुखींया होउनि’ ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP