विराटपर्व - अभिमन्यु विवाह

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


अच्युतपदासि चिंतुनि सानुज धर्म स्ववेष घेऊनी, ।
सुदिनी वसे नृपपदी त्या मत्स्याच्या सभेंत येऊनी ॥१॥
मागुनि विराट येउनि हांसोनि ह्नणे, ' सभासदा ! कंका !
भद्रासनी बसाया आजि तुज कसी न वाटली शंका ? ॥२॥
अर्जुन ह्नणे, ' नृपा ! हा हरिच्या अर्धासनी बसायाचा, ।
आहे प्रतापमहिमा विख्यात जगतत्रयी असा याचा ॥३॥
गंधर्वासि हरि ह्नणे, ' याचीच यशें करुनि तांडर्व गा ' ।
हा पुण्यश्लोक प्रभु सम्राट् सद्गुणसमुद्र पांडव गा ! ' ॥४॥
मत्स्य ह्नणे, ' पांडव हा तरि भीमप्रमुख बंधु जे चवघे ।
कोठें ? कृष्णा कोठें ? जीस क्षणहि न विसंबिती अवघे ' ॥५॥
पार्थ ह्नणे, ' सूद तुझा बल्लव मगधेंद्रकाय हा चिरिता, ।
करिता झाला सूतान्वयसागर भीमकाय हाचि रिता ॥६॥
हयपाळ जो नकुळ तो गोपाळक तोचि होय सहदेव, ।
अर्जुन बृहन्नडा मी भिडला ज्या चापपाणिसह देव ॥७॥
सैरंध्री हे कृष्णा, मेले कीचक इला अनादरिते, ।
हे किति ? हरमुरजे उदधि व्हावे क्षोमें इच्या अनाद रिते ॥८॥
अज्ञातवास दुर्घट परि निर्विघ्न त्वदाश्रयें घडला, ।
होतों सुखरुप तुझ्या गर्माते श्रम न लेशही पडला ' ॥९॥
उत्तरहि पांडवांतें वर्णुनि, कळवी पुन्हा स्वजनकास ।
कीं, ' हेचि घालणारे व्यसनी तारावया स्वजन कास ' ॥१०॥
भूप ह्नणे, ' त्वां अर्जुन पूजावा सर्वकाळ, भीमहि म्यां, ।
न असत्य, हरिजनाच्या सोडुनियां गर्व काळ भी महिम्या ॥११॥
वत्सा ! काय वदों रे ! धर्मात्मा धर्म हा असा मान्य, ।
म्यां ताडिला ललाटी अक्षें, अपराध हा असामान्य ॥१२॥
सचिवांही म्यां त्वांही प्रार्थावा धर्मराज, कन्या या ।
द्यावी धनंजयाला पोटी घालावयासि अन्याया ' ॥१३॥
उत्तर ह्नणे, ' बहु बरें, न कळत अपराध घडति, परि सांचे
साधु क्षमी यशस्कर, घनहि सुभूषेंत पडति परिसाचे ' ॥१४॥
भेटे विराट राजा त्या पांचां पांडवांस गुरुसाच, ।
व्यसनांत आश्रयप्रद अन्नप्रद होय वृद्ध गुरु साच ॥१५॥
धर्मासि ह्नणे ' बा ! गा ! साधो ! जोडा नसेचि या दिवसा ।
स्वपदी मच्चित्ती ही संपादुनि सुकृतजय दयादि वसा ॥१६॥
' तारुनि परासि तरति हरिजन ' जें वर्णिलें असें कविनीं ।
तें दाविलें मज तुह्मी कुरुकुलसंततिसरोजिनीरविनी ॥१७॥
राज्यादि सर्व दिधलें, तुज म्यां, हें आपुलें असें ह्नण, गा !  ।
शशिचूड ' नको ' न म्हणे धुतर्‍याचें फूल वाहत्या भणगा ॥१८॥
धर्मा ! धनंजयवधू होउ ह्नणे धन्य भाग्य मत्तनया ।
देसील मान वचना तूंचि प्रभु, अन्य भाग्यमत्त न या ' ॥१९॥
पाहे धर्म धनंजयवदनातें तेधवां नर वदे तो, ।
ते परिसिते ह्नणति, ' सुख याहुनि हरिवेणुचा न रव देतो ' ॥२०॥
' प्रेम तुझें आह्मांवरि ऐसेंचि दयासुधानदा ! राहो, ।
अभिमन्युची वधू हो, ती माझी बा ! बुधा ! न दारा हो ॥२१॥
केंवि वरावी ? वर्तत होती की एकवर्ष कन्यासी, ।
हरिजनकथेंत शिरतां न विशंकावे शुकादि संन्यासी ॥२२॥
तो साधुजनां तोखदे, ओखदसा होय खलजनां भाचा, ।
योग्य तुला जामाता बहिश्वर प्राण जलजनामाचा ' ॥२३॥
मत्स्य ह्नणे, ' बा ! धर्मा ! वंद्य तुझें नंदना वना शील, ।
त्रिजगदधतें तुमचें पुण्यलताकंद नांव नाशील ॥२४॥
देवा ! सौमद्रार्थ स्वीकारावी तुह्मींच कन्या, हो ! ।
घ्या पदरी, हे संतति या संबधें जगांत धन्या हो ' ॥२५॥
धर्म ह्नणे, ' बहु उत्तम, हें मज अश्लाघ्य काय हो ! नातें ?  ।
मिळतां सुवर्णमुद्रा अर्थी इच्छील काय होनातें ? ' ॥२६॥
धाडूनि दूत धर्मे आप्तांला हा विवाह जाणविला, ।
अभिमन्यु राम कृष्ण द्रुपद स्वकुमारवर्ग आणविला ॥२७॥
अभिमन्युविवाहोत्सव जग निववी, जेंवि चंद्र पुनिवेची, ।
धर्म ह्नणे, ' हूं, कनकें मणि वहु वस्त्रान्नराशिहुनि वेंचा '  ॥२८॥
नटनर्तकीगणातें धर्म ह्नणे, ' रामकृष्णगानाचा ।
नृत्याचा रस शिवसे जाणति, जा त्यांपुढेंचि, गा नाचा ' ॥२९॥
भीम ह्नणे, ' वाढा हो ! देवि ! अहो ! भूमिदेव ! जेवा जी ! ।
चालों नको, बसा या न्या, व्हावे जे महेभ जे वाजी ' ॥३०॥
राम ह्नणे, ' घालाव्या कुडक्या चारीहि याच कानी की ' ।
मुनि भूषवितां भासे मूर्तस्वर्वृक्ष याचकानीकी ॥३१॥
सहदेव नकुळ अर्जुन अच्युत बळ भीम धर्म नव्याही ।
त्या नात्यासि न मिरविति, ते गमति विराटबंधु, न व्याही ॥३२॥

उपसंहार

वदवि मयूराकरवी श्रीराम ' विराटपर्व ' चवथें, बा ! ।
स्वल्प ह्नणोनि न सोडी अमृताची शक्ति सर्व चव थेंबा ॥१॥
रामघन सत्प्रसादामृत जों जों बहु वळोनि वर्षतसे, ।
तों तों भक्तमयूर स्वार्याकेका करुनि हर्षतसे ॥२॥


N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP