विराटपर्व - विराटभ्रमनिरास

मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.


विजयी विराट इकडे ये, पूजिति पौर विप्रजन यातें, ।
येतांचि सभेंत पुसे प्रेमें त्या उत्तरा स्वतनयातें ॥१॥
जन कथिति, ' धेनु कुरुनी वळिल्या, येऊनि उत्तराशेला, ।
त्वत्कीर्तिनें पसरिला स्वपरित्नाणार्थ उत्तरा शेला ॥२॥
गेला कुरु जिंकाया, आहे सारथि बृहन्नडा, गमला ।
सत्य कुमारचि, वदला ' लागो अपकीर्तिचा न डाग मला ' ॥३॥
भूप ह्नणे, ' कुरु होतिल वारे, करितील आजि अभ्र मुला,  ।
दुःख सुदेष्णेला जें, शिरतां सिंहांत कलभ अभ्रमुला ' ॥४॥
हांसुनि धर्म ह्नणे, ' हो ! विजयिसुतातें पहाल नयनांही ।
आहे बृहन्नडा जरि सारथि, तरि गोधनासि भय नाही ' ॥५॥
ऐसे धर्म वदे तों, करिती येउनि सभेंत दूत नती, ।
कथिती विजयकथा जी देणारी हर्ष नित्य नूतन ती ॥६॥
' देवा ! कुमार आला, सोडविल्या धेनु, पळविली कटकें,  ।
न वय प्रमाण तेजस्विजनी ह्नणती कवी न तें लटकें ' ॥७॥
धर्म ह्नणे, ' आयकिलें दूतांचे वचन चांगलें कानें, ।
राया ! सुखरोमांचित केलें की आजि आंग लेंकानें ? ॥८॥
सारथि बृहन्नडा ज्या, तद्विजयें करुत बायका नवला, ।
चिंतामणिगल बालक जो, दुर्लभ त्यासि काय कानवला ? ' ॥९॥
दूतातें सुखवुनि, नृप सचिवांसि ह्नणे, ' गुढ्या उभारा हो !  ।
पुर शोभवा, पुढें जा, राजपथी विप्रजन उभा राहो ॥१०॥
गाजत वाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो !  ।
मजमागें मत्स्याचा हा रिपुशशिराहुबाहु राणा हो ' ॥११॥
यापरि वदोनि हर्षे, सामोरे सर्व लोक पाठवुनी, ।
आजि करावी अक्षक्रीडा ऐसें मनांत आठवुनी, ॥१२॥
सर्वस्व समर्पी या धर्मासि, ब्राह्मणासि वाणकसें, ।
नृप कृष्णेसि ह्नणे ' गे ! सैरंध्रि ! मदक्षपांत्र आण कसें ' ॥१३॥
धर्मासि म्हणे, ' हुं, था, मांडा उकलूनि रम्यतळर्पट हो ! ।
कृष्णाहि ह्नणे, ' मेल्या अक्षकरांचे समूळ तळपट हो ' ॥१४॥
द्यूत प्रवर्ततां, तो भूप म्हणे, ' ऐकिलेंसि कंका ! तें ।
कुरु जिंकिले कुमारें, वय तरि अद्यापि उचित अंकातें ' ॥१५॥
धर्म ह्नणे, ' हे कौरव किति ? सूत बृहन्नडा कुमारा ज्या, ।
समरी अमरीच्याही तो भय देईल कुंकुमा राजा  !' ॥१६॥
मत्स्य ह्नणे, रे ! कंका ! शंका सोडूनि बोलसी भलतें, ।
क्लीवासि मत्सुताधिक ह्नणसी हें वचन मन्मनी सलतें ॥१७॥
कंका ! रंका ! सद्योजातहि हरि भंगितो करिघटातें, ।
ब्रह्मांडाधिकहि घटज सेवुनियां सागरा करि वटातें ॥१८॥
विप्राधमा ! जरि मनी वांचावें हें असेल, हो मूक, ।
न पुन्हा असें वद, सखा ह्नणवुनि ह्नणतों, ' न जीविता मूक ' ॥१९॥
धर्म ह्नणे, ' जिंकाया शक्त न भीष्मादिकां नगाराती, ।
कुरुगुरुपुढें बिरे परशक्ति, नृपा ! होय कां न गारा ती ? ॥२०॥
त्यवरि बृहन्नडाचि प्रौढा, जसि दानवावरि भवानी ।
गावें या दोघीचे यश भूपा ! आदरें हरिभवांनी ॥२१॥
कुरुगुरुसवें झगडतां त्या सुरुगुरुचेहि ओंठ करपावे, ।
विंध्यस्कंधगशिशुचा कां विधुच्या मंडळा न कर पावे ? ॥२२॥
ऐसें सत्य वदे जो तों घाली माळ अक्षमा राया, ।
शिकवी युधिष्ठिराच्या भाळी पाणिस्थ अक्ष माराया ॥२३॥
अक्षप्रहार होतां, वाहों लागे अशुद्ध नाकानें, ।
तें स्वाजळीत धरिलें, त्या शांतिक्षांतिविजितनाकानें ॥२४॥
धर्माभिप्रायज्ञा कृष्णा ताटांत तें धरी रगत, ।
पतिहद्गत साध्वीनें, नाडीनें जाणिजे शरीरगत ॥२५॥
तों तो उत्तर आला, द्वरस्थानी नृपासि जाणविला ।
तेणें अत्युत्कंठित होउनि भेटावयासि आणविला ॥२६॥
तेव्हां कंक हळूच क्षत्त्यासि ह्नणे, ' बृहन्नडा राहो, ।
पाहो न हें, सभेंत न तत्क्षोंमे रक्त नृपतिचें वाहो ॥२७॥
रण नसतां, मद्देही जो क्षत की क्षतजलेश काढील, ।
तो तत्काळ वधावा, जरि त्याला अमृत शक्र वाढील ॥२८॥
ही सत्य तत्प्रतिज्ञा, या राजाचें ह्नणोनि हो हित रे ! ।
मारील विराटातें हें माझें देखतांचि लोहित रे ! ' ॥२९॥
क्षत्त्यानें गुंतवितां, जरि सक्षत तरि निराकुलक्षणसा ।
राहे बाहेर प्रभु, परम सुलक्षणहि तो कुलक्षणसा ॥३०॥
उत्तर पित्यासि वंदुनि, पाहे कंकासि तो सभा कोणी, ।
तातासि पुसे, ' ऐसा केला अन्याय हा महा कोणी ? ॥३१॥
भूप ह्नणे, ' पुत्ना ! म्यां केला स्वकरेंचि दंड या कंका, ।
की हा करी प्रशंसा षंढाची, नच धरी मनीं शंका ' ॥३२॥
उत्तर ह्नणे, ' अहाहा ! केला अन्याय हा ! धरा पाय, ।
ब्रह्मक्षोम स्वर्गापायहि केवळ नव्हे धरापाय ' ॥३३॥
नमुनि विराट म्हणे, ' बा ! कंका ! चुकलों महायशा ! पावें, ।
न मला सख्या ! तुवां या मदघा घेउनि सहाय शापावें ॥३४॥
कंक ह्नणे, ' सोड चरण, मज सोसावें असें जरि न कळतें,  ।
गळतें रक्त महीवरि, तरि हें त्वदराष्ट्र तत्क्षणी जळतें ' ॥३५॥
शमतां शोणितधारा, संपादी धर्मराज तो शुचिता; ।
तों ये बृहन्नडा, मग दावी जी रीति आपणा उचिता ॥३६॥
राजा ह्नणे, ' कुमारा ! या वृत्तें लाज त्या कुमारा हो, ।
निंदुनि इंदुनिभयशा क्षण मानव्रतपरा उमा राहो ॥३७॥
त्वां जिंकिला कसा तो अश्वत्थामा ? तसाचि तो कर्ण ? ।
तोहि द्रोण महात्मा दिव्यधनुर्वेदशंभुगोकर्ण ? ॥३८॥
केला कसा कृपाचा भर्ग ? कसा पळविला सुयोधन गा ? ।
कैसा भीष्मप्रमुखा स्वभुज अशनि कळविला सुयोधनगा ? ' ॥३९॥
उत्तर ह्नणे, ' पित्या ! कुंरु पाहुनि, झालों भयाकुळ, पळालों,
सिंह प्रेक्षुनि यूथभ्रष्ट कलभसाच मी बहु गळालों ॥४०॥
मरणेच्छुनिर्धना जें दाता, सोडूनि सुजळ, दे वसुतें, ।
जैसें यश, तैसें हें केलें मद्वदन उजळ देवसुतें ॥४१॥
मज सारथि करुनि रथी झाला, विद्या प्रकाम रुद्रा ज्या ।
ठाव्या, त्या देवसुता, बहुमत तो त्र्यंबका मरुद्राजा ॥४२॥
दिव्यदरांच्या नादें निर्मुनि त्या कुरुबळांत आधीतें, ।
हरिलें होतें गोधन जें, सोडविलें पळांत आधी तें ॥४३॥
आधी कर्ण पळविला, मग केला विरथ तो कृपहि, राया ! ।
शकला न एकही त्या देवसुताच्या यश नृप ! हिराया ॥४४॥
अरिसेनेसि न वरतें पाहूं दे, जेंवि साधु कुलटेतें, ।
काय वदूं गुरु गुरुसुत जिंकुनि भीष्मावरीहि उलटे तें ? ॥४५॥
श्रीमदभीष्मासहि तौ निजशस्त्रास्त्रप्रवाणता कळवी, ।
पळवी सुयोधनातें, त्यासकट तदाश्रताननें मळवी ॥४६॥
संमोहनास्त्र योजुनि सर्वासहि देवपुत्र मग मोही, ।
हरिहरलीलेहून न्यूना लीला तुह्मांसि न गमो ही ' ॥४७॥
मत्स्य ह्नणे, ' तद्दर्शन तुज घडलें, तें मलाच कां नाही ? ।
नेत्रें बहु तळमळती, लाभ मिळविला भलाचि कानांही ॥४८॥
सर्वस्वें पूजाया तो आह्मां मायबापसा मान्य, ।
लीलेनें हरिला जरि तेणें हा ताप, काय सामान्य ? ॥४९॥
सांग कसें तुज दिसतें ? तो मज दावील काय पाय सखा ? ।
याहुनि उणाचि दुकळी ह्नणता, ' हो कार्यपुष्ट, पायस खा ' ॥५०॥
उत्तर ह्नणे, ' उद्यां की परवां भेटेल तो असें वाटे, ।
जळकारुण्यहि विनतानुगतचि सोडील तें कसें वाटे ? ' ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP