सुदाम्याचे पोहे - भाग ३६ ते ४०

प्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो


३६

[ सुदाम्याचें घर पेटलें आहे . भैरव - कुक्कुट उगीचच ’ आग - आग ’ असें ओरडत धावपळ करीत असतात . शिपाई आग विझवायला आलेल्या लोकांना अडवितात . ]

लोक : ( शिपायांस ) अहो , असं रोखतां काय आम्हांला ? आग विझवायला नको ?

शिपाई : आतां कसली आग विझवतां ? पार राखुंडी झाली घराची !... चला , गर्दी करूं नका . बाजूला व्हा ... लांब उभे राहा ...

[ झोपडी मोडून तोडून टाकतात . चंपाराणी आपल्या वाड्याच्या सज्जांत उभी असते . विकट हस्य करते . इंद्रसेन बाळटासारखा तिच्याकडे व सुदाम्याच्या जळत्या झोपडीकडे आळीपाळीनें पहात राहातो . इतक्यांत सुदामा , सुशीला , श्रीधर , धनशेठी , वगैरे येतात . ]

चंपाराणी : ( सुदाम्याला पाहून ) आला मेला झोपडीची राख सावडायला !

सुदामा : श्रीहरि ! श्रीहरि ! ( जळत्या ढिगार्‍यांतून मूर्ति उचलतो . )

धनशेठी : आश्चर्य आहे ! भयंकर आगींतून मूर्ति अभंग राहिली !

सुशीला : देवा ! देवा ! काय रे केलंस हें ( रडूं लागते . )

सुदामा : अग खुळे , रडतेस काय अशी ? आपला संसार कृष्णार्पण झाला ! सोन्याचा झाला ! चल आतां .

सुशीला : कुणीकडे ?

सुदामा : वाट फुटेल तिकडे ! चल बाळ !

[ श्रीधरचा हात धरून चालूं लागतो . ]

धनशेठी : थांबा . कुठं चाललांत अशा अपरात्रीं ? बायकोचा - मुलाचा तरी विचार करा , आजची रात्र माझ्या घरीं काढा ... उद्याचं उद्यां पाहता येईल .

सुदामा : आपल्याला उगीच तसदी कशाला ?

धनशेठी : ह्यांत तसदी कसली ? साधी माणुसकी आहे ही . चला मुकाट्यानं .

[ सर्वांना परत घरीं घेऊन जातो . ]

३७

[ धनशेठीचें घर . सुदामा कृष्णमूर्ति घेऊन स्वस्थ डोळे मिटून भिंतीला टेकून बसला आहे . जवळच सुशीला व श्रीधर झोपलीं आहेत . पहाटेचा कोंबडा आरवतो . ]

सुदामा : ( हलक्या आवाजांत सुशीलेस ) अग , उठ ... उठ ... श्रीधरला उठव . उजाडायच्या आंत आपण इथून जाऊं या .

सुशीला : पण कुठं जायचं ?

सुदामा : मग काय , इथंच दुसर्‍याच्या दारीं पडून राहायचं ?

[ सुदामा वगैरे घराबाहेर पडतात . सर्वत्र सामसूम असतें . ]

३८

[ सुदामा श्रीधर हात धरून रस्त्यानें चालला आहे . मागें जरा अंतरावर जड पावलांनीं सुशीला चालत असते . श्रीधर एकदम थांबतो . ]

श्रीधर : बाबा !

सुदामा : दमलास ? माझ्या खांद्यावर बैस .

श्रीधर : बाबा , कुठं निघालोंय् आपण ? द्वारकेला ? कृष्णदेवाकडे ?

सुदामा : नाहीं रे बाळ !

श्रीधर : मग कुठं ? बाबा आपण जाऊं याना कृष्णदेवाकडे !

[ सुशीला जवळ येते . ]

सुदामा : तूंही दमलीस वाटतं ? ( सुशीला डोळे पुसते . ) चला , त्या झाडाखालीं थोडी विश्रांति घेऊ या .

[ एका झाडाखाली जाऊन बसतात . श्रीधर सुदाम्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपतो . ]

सुशीला : खरंच मी म्हणतें .... एवींतेवीं आपला गांव सुटलाच आहे .. मग कृष्णदेवांच्या आश्रयाला तरी जाऊं या .

सुदामा : काय करायचं तिकडे जाऊन ? पृथ्वीच्या पाठीवर कुठही गेलं तरी आपला कर्मभोग थोडाच चुकणार आहे !

सुशीला : कर्मभोग कोणाला चुकला आहे ? देवादिकही सुटले नाहींत नशिबाच्या फेर्‍यांतून .....

( तितक्यांत घोड्यांच्या टापा ऐकूं येतात . ) कुणीतरी येतंय् घोड्यावरून ....

सुदामा : असेल कुणीतरी . वाटेचे वाटसरू काय थोडे आहेत ?

सुशीला : इंद्रसेनाचे शिपाईतर नसतील ?

सुदामा : ते कशाला येतील ?

सुशीला : आमचा आणखी कांहीं सूड उगवायचा राहिला असेल ....

सुदामा : हे तर धनशेठी दिसताहेत !

[ धनशेठी कांहीं लोकांसह येतो . घोड्यावरून उतरून एकदम सुदाम्याचे पाय धरतो . ]

सुदामा : हें काय धनशेठी ? माझे पाय सोडा ...

धनशेठी : नाहीं सोडणार ! आधीं मला वचन द्या .... हा गांव सोडणार नाहीं म्हणून !

सुदामा : वचन ?

धनशेठी : सुदामदेव ! हें काय केलंत ? एकदम गुपचुप गांवाबाहेर्ची वाट धरलीत !

सुदामा : ( हसून ) आतां बारा वाटा मोकळ्याच आहेत कीं आम्हांला !

सुशीला : गांवांत आमचं उरलंय् काय आतां ?

१ गृहस्थ : म्हणजे ! आम्ही नाहीं वाटतं गांवांत ?

२ गृहस्थ : तुम्ही तर कपिलानगरीचं भूषण ! आमचा एकमेव आधार ! अन् आम्हांला सोडून चाललांत ?

सुदामा : पाठाशाला बंद पडली . चरितार्थाचं मुख्य साधन गेलं ...

सुशीला : सत्तेचं छप्पर होतं डोईवर ...

सुदामा : त्याचीही अग्निनारायणानं आहुति घेतली ! आम्हीं गांव सोडावा अशी श्रीहरीचीच इच्छा दिसते .

धनशेठी : नाहीं - नाहीं ... आम्हीं नाहीं तुम्हांला गांव सोडून जाऊं देणार !

१ गृहस्थ : अन् जायचंच असेल तर ....

२ गृहस्थ : तर आमच्या देहाच्या पायघड्या तुडवूनच तुम्हांला जावं लागेल !

[ लोक रस्त्यावर आडवे पडतात . ]

सुशीला : ( सुदाम्यास ) रावाची मर्जी मोडावी पण गांवाची अर्जी मानली पाहिजे !

सुदामा : उठा . उठा . तुमचं अंतः करण मी जाणतों . पण तुम्हांसारख्या सज्जनांना भार होऊन गांवांत राहाण्याची माझी इच्छा नाहीं .

सुशीला : कुठंही काबाडकष्ट करून पोट भरायचं ...

धनशेठी : होय ना ? मग उठा . चला माझ्याबरोबर .

सुदामा : कुठ ? गांवांत ?

धनशेठी : गांवांत नव्हे . मझ्या मळ्यांत ! जवळच आहे इथून माझा मळा ! मळ्यांत झोपडी आहे . राहायची उत्तम व्यवस्था आहे . खुशाल आनंदानं राहा तिथं !

१ गृहस्थ : गांवांत यायचं नसेल तर नका येऊं ...

२ गृहस्थ : आम्हीच रोज मळ्यावर तुमच्याकडे भजनाला येत जाऊं

३९

[ इंद्रसेन व चंपाराणी आपल्या दिवाणखान्यांत . ]

चंपाराणी : इतक्या दिवसांत तुमच्याच्यानं झालं नाहीं , तें मी चुटकीसरशी बिनबोभाट साधलं कीं नाहीं ?

इंद्रसेन : वा ! वा ! काय विचारावा आपला पराक्रम !

चंपाराणी : औषधाशिवाय खरूज गेली !

[ भैरव - कुक्कुट येतात . ]

भैरव : नाहीं - नाहीं . खरूज गेली नाहीं तर जास्तच विघळली आहे .

कुक्कुट : तो सुदाम्या धनशेठीच्या मळ्यांत मोठ्या आरामांत राहिला आहे . सहकुटुंब ... सहपरिवार !

भैरव : सार्‍या गांवानं आडवं पडून त्याला परत आणला . आतां अष्टौप्रहर भाजनाचा हैदोस ...

कुक्कुट : कृष्णाच्या नांवाचा जयघोष चालला आहे !

चंपाराणी : काय म्हणतां ?

इंद्रसेन : कृष्णाच्या नांवाचा जयघोष ? आमच्या कालयवनमहाराजांना कपटानं मारणार्‍या त्या कृष्णाच्या नांवाचा जयघोष ?

चंपाराणी : मग ? इतके दिवस मी सांगतेंय् काय नि तुम्ही ऐकतांय् काय ? तुमच्या वैर्‍याचा जयघोष राजरोस चालला आहे ! आतां तरी पडला का टाळक्यांत प्रकाश ? कालयवनमहाराज गेले म्हणून त्यांची सत्ता कांहीं अजून संपुष्टांत आलेली नाहीं .

भैरव : मुळींच नाहीं . कालयवनांचे प्रतिनिधि ...

कुक्कुट : महापराक्रमी इंद्रसेनमाहाराज ....

इंद्रसेन : हो - हो . आम्ही अजून जिवंत आहोंत ! कोण आहे रे तिकडे ? ( एक सेवक येतो . )

सेवक : ( हात जोडून ) आज्ञा महाराज !

इंद्रसेन : आत्तांच्या आत्तां दवंडी पिटा ...

भैरव : कृष्णाला देव समजून त्याचं भजनपूजन करणं ....

कुक्कुट : कृष्णाचं नुसतं नांव घेणंही ....

चंपाराणी : भयंकर राजद्रोह आहे !

इंद्रसेन : भयंकर राजद्रोह आहे ! दवंडी पिटा ! दवंडी पिटा !

४०

दवंडीवाला : ऐका हो ऐका ! आजपासून कृष्णाचं नुसतं नांव घेणारालाही राजद्रोही समजून भयंकर शासन करूयांत येईल हो !

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP