सुदाम्याचे पोहे - भाग २६ ते ३०

प्रस्तुत प्रकार हा चित्रकथा आहे , हे वाचल्यावर प्रत्यक्ष त्या काळाचा भास होतो


२६

[ सुदाम्याचें भजन चालू असतें . लोकांची गर्दी जमलेली दिसते . भजन ऐन रंगांत येतें . त्याच वेळीं तिकडे इंद्रसेनाच्या वाड्यांत नाचगाणें सुरू होतें . ]

२७

[ इंद्रसेनाच्या वाड्यांत रंगा नर्तकीचें नाचगाणें चालू आहे . चंपाराणी , इंद्रसेन , कुक्कुटशास्त्री , भैरवभट , वगैरे अगदीं थोडे लोक हजर आहेत . ]

नर्तकी : छळूं नको उगिच घडी घडी

धरुनि मनिं अढी

सखी भाबडी

तूं लाल , मी लालडी फुलांची घडी

सख्या , तूं हिना नि मी पानडी !

लेवून साज - शिणगार साजरा भारी

पाहतें वाट मी उभी कधींची दारीं

चांदणें थंड हें तरी

भडकली उरीं

आग आसुरी

कशि तुझी सुरत फांकडी ! रीत वांकडी !

प्रीत बेगडी जाळते कुडी !

गाईन गीत कोकिळेपरी मंजुळ

नाचेन तुजपुढें मोरिण मी च्याकुळ

परभारां जाऊ नको रुसून

झुल्यावर बसून

बोल जरा हांसून

तूं बाळपणाचा सवंगडी ; पुरव आवडी

सख्या , तूं सडा नि मी वावडी !

चंपाराणी : बंद करा .... बंद करा हें नाचगाणं ! ( नोकरास ) काय रे , तुला सारा गांव गोळा करून आणायला सांगितलं होतं ना ?

नोकर : आणला कीं सारा गांव गोळा करून .

चंपाराणी : मग ? कुठं उलथले सारे लोक ?

नोकर : ते काय ... तिकडे सुदामदेवांच्या भजनाला बसलेत !

चंपाराणी : भजनाला बसले ?.... बरं आहे म्हणावं ... पाहून घेईल ! ( जळफळत जाते . )

२८

[ सुदाम्याचें घर , धान्य , भाजीपाला , फळफळावळ इत्यादी रूपानें आणलेली दक्षिण विद्याथा ठेवतात . इतक्यांत लाडवाचा डबा घेऊन चंद्रसेन येतो . ]

चंद्रसेन : ( श्रीघरास ) तुझी आई कुठं आहे ?

श्रीघर : बाहेर गेली आहे .... पाण्याला .

चंद्रसेन : हा लाडू घे खायला .

श्रीघर : नको मला . आई रागवेल .

चंद्रसेन : सगळ्याच मुलांना वांटणार आहें मी ....( सर्व मुलांना एक एक लाडू देतो . तितक्यांत रागारागाणें चंपाराणी येते . ) बाप रे ! आई आली ! ( पळून जाऊं लागतो . )

चंपाराणी : पळतोस कुठं ? घरांतले लाडू आणून ह्या माकडांना देतोस ?

चंद्रसेन : सगळ्यांनीं गुरुजींना कांहीं कांहीं दक्षिणा आणली ...

चंपाराणी : म्हणून तूं लाडू आणलेस होय ह्यांच्या नरड्यांत कोंबायला ?

[ मुलांच्या हातांतून , तोंडातून लाडू काढून घेते . तोंच सुदामा येतो . ]

सुदामा : अहो , अहो , काय करतां हें ? मुलांच्या तोंडचा घास काढून मातीला मिळवतां ?

चंपाराणी : होय तर ! बेश मिटक्या मारीत खातील कीं ! मुखत्यार आहें माझी मी ! सारे लाडू मातीला मिळवीन .... नाहींतर अस्से रस्त्यावर फेकून देईन !

चंद्रसेन : आई ! आई ! हें ग काय असं ?

चंपाराणी : चूप ! थोबाड फोडून टाकीन .( सुदाम्यास ) तूं ....... तूं ह्याला अशी चोरी करायला शिकवलंस ?

सुदामा : मी ?

[ पाण्याची गळकी घागर घेऊन सुशीला येते . ]

सुशीला : आम्हांला कांहीं ठाऊक नाहीं ह्यांतलं .

चंपाराणी : तर तर ! मोठे संभावित तुम्ही ! करून सवरून नामानिराळे !

सुशीला : अहो , तुमच्या मुलाला विचार . बाळ चंद्रसेन ....

चंपाराणी : त्याला काय विचारतांय् ? तुमचीच सारी फूस आहे त्याला ....

सुदामा : अहो , तो इथं कधीं येत सुध्दा नाहीं . आजच आलाय् ....

चंद्रसेन : छे छे ! गुरुजी , मी तर इथं रोज येत असतों ....

चंपाराणी : ऐका .... ऐका !

सुदामा : रोज येतोस ?

चंद्रसेन : हो , रोज येतों नि लपून बसतों ... आणि ह्या मुलांना तुम्ही शिकवलेलं चोरून ऐकून पाठ करतों !

सुदामा : श्रीहरि ! श्रीहरि ! म्हणजे दुसरा एकलव्यच तूं !.... गुरूजी विद्या अशा रीतीनं ग्रहण करणार .....

चंद्रसेन : आई येऊं देत नाहीं . मग काय करायचं ?

सुदामा : ( चंपाराणीस ) बघा ; तुम्ही मुलाच्या मनाचा कोंडमारा चालवलांत , त्याचा हा परिणाम !

चंपाराणी : बस्स कर तुझी अक्कल ! चल रे कार्ट्या घरीं ... पुन्हा इथं पाऊल तर टाक .... तुझी तंगडीच मोडतें बघ ....( चंद्रसेनाला दरादरा ओडीत नेऊं लागते . )

सुदामा : अहो , त्याला सरळ तरी घेऊन जा ....

चंपाराणी : ( वेडावून ) ब्यरं - ब्यरं !

सुशीला : पुन्हा त्याला इकडे येऊं देऊं नका .

चंपाराणी : नाहीं , नाहींच येऊं देत . पक्का बंदोबस्त करतें ..... त्याचा नि तुमचा पण .

सुदामा : श्रीहरि ! श्रीहरि !

सुशीला : काय बाई चमत्कार ! नांव मोठं नि लक्षण खोटं !

२९

[ इंद्रसेन झोपाळ्यावर बसला आहे . भैरवभट व कुक्कुटशास्त्री जवळच अदबीनें उभे आहेत . इयक्यांत चंपाराणी चंद्रसेनाला मारीत घेऊन येते . तो रडत असतो . ]

इंद्रसेन : अहो , सोडा त्याला . असं मारतांय् का ? ( उठून चंद्रसेनाला जवळ घेतो . त्यालाही मधल्यामध्ये चारदोन तडाखे बसतात . चंद्रसेन पळून जातो . )

चंपाराणी : कार्टं घरांतले जिन्नास चोरून त्या सुदाम्या नेऊन देतंय् !

भैरव : अन् सुदाम्या ते घेतोय् ?

कुक्कुट : तर मग खरं म्हणजे , शिक्षा सुदाम्याला करायला हवी

चंपाराणी : तेंच - तेंच ! बरे भेटलांत तुम्ही ! बोलावणंच धाडणार होतें मी तुम्हांला .

भैरव : ( हात जोडून लाचारीनें ) काय आज्ञा आहे बाईसाहेबांची ?

चंपाराणी : हा सुदाम्या सर्वांना वेद शिकवितो , खरं ना कुक्कुटशास्त्री ?

कुक्कुट : होय तर महापातक करतोय् तो ... काय भैरवभटजी ?

भैरव : अगदीं त्रिवार सत्य ! जातपात कांहीं पाहात नाहीं तो सुदाम्या ....

कुक्कुट : ब्रह्मवृंद विचार करतोय् ह्या गोष्टीचा .

चंपाराणी : नुसता विचार करीत बसून काय होणार ? झटपट निर्णय केला पाहिजे . तुम्हीदेखील ब्रह्मणच ....

भैरव : ब्राह्मण म्हणजे ? शंका आहे का ? ( जानवें दाखवितात . ) अस्सल दशग्रंथी महाविद्वान् ब्राह्मण आहोंत आम्ही !

कुक्कुट : पण शैव पंथाचे !

भैरव : अन् तो सुदाम्या आहे वैष्णव ! पूर्वापार तंटा आहे त्याचा - आमचा !

इंद्रसेन : त्याचा तुमचा तंटा ?

भैरव : हो ! म्हणजे वैष्णवांचा नि शैवांचा तंटा ! आम्ही शाक्तपंथी ब्राह्मण ....

कुक्कुट : शक्तीचे उपासक ! एरव्हीं आम्हीं कांहींहीं केलं .... कसेही वागलों .... तरी अब्राह्मणाला वेद शिकवणार नाहीं ! काय भैरवभटजी ?

भैरव : प्राण गेला तरी शिकवणार नाहीं .

इंद्रसेन : पण स्वतः तरी वेदपाठण करतां का कधीं ?

कुक्कुट : सारेच ब्राह्मण कुठं बेदपठण करतात ?

भैरव : पण आम्ही ...

चंपाराणी : तुमचं पुराण पूरे ! आजच्या आज पंचांची बैठक बोलवा आणि त्या सुदाम्याला त्यांच्यापुढं उभं करा .

इंद्रसेन : आणि पाजळा तुमची विद्वत्ता त्याच्यापुढं !

चंपाराणी : लागा त्या उद्योगाला ...

भैरव : लागा म्हणजे ... लागलोंच पाहा !

कुक्कुट : शुभस्य शीघ्रम् ! ( दोघेही कगबीनें जातात . )

३०

[ इंद्रसेनाचा वाडा . इंद्रसेन उच्चासनावर बसला असून त्याच्या उजव्या बाजूला शास्त्रीपंडित बसले आहेत . इंद्रसेनाच्या जरा मागें चंपाराणी आहे . भैरव - कुक्कुटही प्रामुख्यानें आहेत . चौकांत धनशेठी सावकार , वगैरे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत . सुदामा येतो व सर्वांना नमस्कार करून एका बाजूस नम्रतेनें उभा राहातो . ]

इंद्रसेन : मान्यवर महाजन हो ! आपल्या कपिलानगरींतल्या सुदामा बराह्मणाचा न्याननिवाडा करण्यासाठीं आजची ही सभा भरली आहे . सुदामा आला आहे . तेव्हां सभेला सुरुवात झाली आहे .

भैरव : ( सुदाम्याकडे हात करून ) हे महापंडित सर्व वर्णांच्या लोकांना वेद शिकवतात ....

सुदामा : सर्वांना नव्हे . फक्त जिज्ञासूंनाच ....

कुक्कुट : पण हें कृत्य धर्मशास्त्राला धरून आहे का ?

सुदामा : होय . कां नाहीं ? जातीवरून वर्ण न ठरवितां ते गुणकर्मावरून ठरवले पाहिजेत .

भैरव : म्हणजे ?

सुदामा : अमूक जातींत एखादा कुणी जन्माला आला म्हणून त्याला वेदाध्यनाचा अधिकार नाहीं , असं मुळींच नाहीं

कुक्कुट : अस्सं ! म्हणजे क्षत्रियांनीं देखील वेद शिकावा , असं तुझं म्हणणं ?

सुदामा : होय , परशुराम जन्मानें ब्राह्मण पण वृत्तीनें क्षत्रिय झाला आणि जन्मानं क्षत्रिय असलेले विश्वामित्र ब्रह्मर्षि झाले !

भैरव : ह्या पुराणींतल्या गोष्टी नकोत .

सुदामा : अगदीं अलीकडली गोष्ट घ्या . गुरुदेव सांदीपनींनीं कृष्ण - बलरामादि क्षत्रियांना वेद शिकवले !

कुक्कुट : थोरामोठ्यांचीं मुलं म्हणून शिकवले असतील कदाचित् ...

भैरव : पण हा अपवाद झाला .

सुदामा : अपवादानंच नियम सिध्द होतो . बदलत्या काळाबरोबर शास्त्रींत बदल घडत आले आहेत आणि तें तसं घडणं समाजधारणेच्या द्दष्टीनं इष्टही आहे .

इंद्रसेन : हें सगळं मुद्दा सोडून चाललंय् .

चंपाराणी : ( हळूंच ) तुम्ही गप्पा बसा . तुम्हांला काय कळतंय् ?

भैरव : सुदामा , क्षत्रियांनाही वेदपठणाचा अधिकार धर्मशास्त्रानीं दिलेली नाहीं .....

कुक्कुट : आणि तू तर सरसकट सर्वांनाच वेदविद्या शिकवतोस .

सुदामा : विद्यादान करणं हेंस माझं पवित्र कर्तव्य आहे आणी तें मी आमरण आचरणार !

[ लोक ’ वाहवा सुदामदेव ! .... धन्य ! धन्य !’ असें ओरडतात . ]

भैरव : हेंच तुझं अखेरचं उत्तर ?

सुदामा : होय .

भैरव : ब्रह्मवृंदानं सुदाम्यानं म्हणाणं ऐकलंच आहे . सुदाम्यासारख्या ब्राह्मणनं दुराग्रहानं शास्त्रबाह्म वर्तन करावं , ह्याचा सभेला फार खेद होत आहे . आतां अधिक वाद न माजवितां पंचांनींच न्यान करावा . बोला कुत्रकुटशास्त्री ! तुम्ही प्रमुख पंच आहांत !

कुक्कुट : न्यान निष्ठुर आहे . मला मोठ्या दुःखानं निर्णय द्यावा लागतोय् . समस्त ब्रह्मवृदानं आजपासून सुदाम्याला बहिष्कृत केलं आहे ! त्यांतूनही अखेरचा निर्णय राजसत्तेच ! ( इंद्रसेनाकडे पाहातो . )

इंद्रसेन : आम्हांला हा निर्णय बिलकूल ...

चंपाराणी : ( डोळे वटारून ) काय ?

इंद्रसेन : ( वरमून दबल्या स्वरांत ) मान्य आहे .

[ लोक गडबड करतात . ’ नाहीं - नाहीं ’. हें आम्हांला मान्य नाही ’...’ हा न्यान नव्हे ... हें न्यानचं नाटक आहे ’...’ हा अन्याय होतोय् सुदामदेवावर ’ असे उदार लोकांच्या तोंडून निघतात . ]

सुदामा : शांत व्हा ! शांत व्हा ! बंधूंनो ! राजसत्तेचा आणि न्यायदेवतेचा असा अपमान करूं नका

धनशेठी : पण सुदामदेव , हा धदधदीत अत्याचर आहे ..... हा निर्णय म्हणजे मूर्तिमंत अन्याय आहे .... आम्हींला मान्य नाहीं ....

सुदामा : पण हा निर्णय मला शिरसावंद्य आहे !

चंपाराणी : आत्तांच्या आत्तां दवंदी पिटून ही वार्ता सार्‍या नगरीला जाहीर करा !

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP