अंक दुसरा - प्रवेश पहिला

‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान्‍ संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जाते.


[ स्थळ : दिल्लीचा एक रस्ता--पहिल्या प्रवेशांतलाच. कलंदरखां हातांत हुक्का,कंबरेला जंबिया, अशा थाटांत गजल किंचाळत प्रवेश करतो. ]

कलंदरखां : इष्कके गहिरे खतरमें बडे भी खा गये ठोकर ।.

[ इतक्यांत हरीराम व बन्सीराम प्रवेश करतात. जगन्नाथांच्या वशिल्यानं दिल्लींत पूजेअर्चेचीं कामं मिळविलेले हे पोटभरू बनारसी ब्राह्मण आहेत. ]

कंलदर :  ( पुन: आपल्याच नादांत ) इष्कके गहिरे खतरेमें .

हरीराम : खा गये मन्सूरखां ठोकर ! क्यों बेटा कलंदर, सच है ना ? आमचे जगन्नाथ पंडित इष्काच्या लढाईंत जिंकले, अन‌ तुमचे उस्ताद मन्सूरखां चारी मौढे चीत झाले !

कलंदर : अबे चूप बैठ जगन्नाथके कुत्ते !

हरीराम : ठीक है, ठीक है, तुझ्या त्या मन्सूरखांचा जूता होणापेक्षां जगन्नाथांचा कुत्ता बनणं वाईट नाहीं ! क्यों भाई बन्सीराम ?

वन्सीराम : बिलकूल बराबर, बेटा कलंदर, जगन्नाथांच्या घरीं सरस्वती देवी पाणी भरते, मग आम्ही त्यांचे कुत्ते झालों तर काय बिघडनार ?

कलंदर : तुमचं कांहींच नाहीं बिघडणार, लेकिन जगन्नाथाचं फार बिघडेला ! तुम्ही पगडीफिरवू ! त्याची चलती आहे, तोंवर त्याची लाळ घोटाळ, लेकिन‌ त्याचं नशीब फिरलं, कीं त्यावर उलटाल, त्याचे लचके तोडाल !

हरीराम : क्या बात करते हो कलंदर ? हम ऐसे वैसे नहीं ! काशीचे ब्राह्मण आहोंत आम्ही !

कलंदर :  तर मग जा पूजा--अर्चा करायल. माझ्या गजलांत कशाला अडथळा आणलांत ?

बन्सीराम : मालूम है, मालूम है,बडा आया है शायर !

हरीराम : कलंदरमियाँ, तुझ्या गजलांची बात कशाला ? तुझ्या उस्तादाचे गजल फिके पाडले आमच्या पंडितराजांनीं. शाहजादीच्या मोहब्बतीचा गड काबीज केला, संस्कृत शायरीचा तोफखाना चालवून ! ऐसे हैं हम वाराणसीके पंडित ! क्या समझें ?

कलंदर : तुमको बेवकूफ बिलंदर समझे, और खुदको बेजार कलंकर समझे ! ( कंबरेच्या जंबियाकडे हात नेऊन ) चलो, रास्ता सुधारो. ( हरीराम--बन्सीराम सटकतात, ) हा: हा: हा: ! डरपोक पगडीफिरावू ! चांगली गजल म्हणत होतों तर हे चांडाळ मधेंच उपटले. कबाबमें हड्डी !. अच्छा. फिरसे गाएंगें. क्या गजल है मेरी--बस. शक्करने झक‌ मारी ! कितनी मीठी ! कितनी लाजवाव !. ( खांकरून गजल म्हणतो . )

इष्कके गहिरे खतरमें बडे भी खा गये ठोकर ।
सिलगती आग सीनेमें जिगरपे गिरते है खंजर ॥
इष्कपर जोर नही चलता, न चलती कोइ छूमंतर ।
नींद आने नही देता, मोहब्बतका बुरा मच्छर ॥
झोपडी जलति है दिलकी, खोपडी खाति है चक्कार
बनता शेरको बकरा , इष्क शैतान जादूगर‌ ॥

जमनलाल :   ( दुसर्‍या बाजूनं प्रवेश करतो. ) ‘ बहोत अच्छा ! बहोत अच्छा ! कलंदर तूं बडा शायर !

कलंदर : कौन जमनलालजी ? आदाब अर्ज, आदाब अर्ज उस्ताद ! दो महिने हुवे, आपका जलवा कहीं दिखा नहीं ? कहाँ थे इतने दिन ?

जमनलाल : इथं, या दिल्लींतच होतों मियाँ, पण हे दो महिने फार गडबडींत गेले. अरे, जगन्नाथपंडितांनीं भर मैफलींत शाहजादीची मागणी केल्यापासून शाही--महालांत एकच गडबड उडाली आहे. तिचं मन संगीतांतच रमवून ठेवा, असा शाही सल्ला आहे माल. इसलिये.

कलंदर : आया खियालमें, जमनलालजी, आम्हीं दोन महिन्यांपूर्वीच हें भाकीत केलं, तेव्हां तुम्हीं या हुशियार कलंदरला पागलांत जमा केलं होतं.

जमनलाल : अरे, अजूनहि पागलच आहेस तूं, पण तुझा तो अंदाज मात्र बराच बराबर ठरला खरा !

कलंदर : ठरणारच ! बडे भय्या, अस्मानांतल्या उडत्या पांखरांचे पर आम्ही ‘ एक, दोन, तीन, चार’ असे मोजून दाखवूं. मग या प्रेमी--पांखरांची काय कथा ?

जमनलाल : त्यांची कथा फार दर्दभरी आहे कलंदरखाँ ! शाहजादी इतकी हुशार, इतकी समजूतदार, इतकी बुद्धिमान‌, पण इष्काच्या आगींत ती पुरती होरपळणार. असं दिसतं खरं, शिवशिव ! हें कांहींतरी भलतंच होत आहे.

कलंदर :  भलतंच ? हें अस्संच व्हायचं, बडे भैय्या, बायकांच्या बेवकूबपणा--इतकंच इष्काचं शास्त्र बेहिसाबी आहे, इष्क जात पाहात नाहीं. पैसा पाहात नाहीं, रूप पाहात नाहीं  ! खानदान नाहीं. उमर नाहीं !. जनाब, तुमच्यासारखा बुजरुख देखील लुसलुशीत कोंवळ्या छबेलीवर प्यार करूं शकेल. आणि ती तुमच्या प्रौढ रूपावर ! कोणी सांगावं, तुमचं गाणं--बजावणंच एखादीला बेहद्द आवडायचं ! ( एक विनोदी तान घेतो. )

जमनलाल : अरे यार, काय थट्टा करतोस ? गेले दिवस ते इषकांत पडण्याचे अन‌ पाडण्याचे ! तरी देखील माझ्यासारका वयस्कार माणूस, कोंवळ्या पोरीच्या प्रेमांत पडेल म्हणतोस ?

कलंदर : हां हां. क्यों नही ? ये देखो. ( आकाशाकडे बोट दाखवून -- ) जमनलालजी, वे क्या है ?

जमनलाल : आसामान‌ !

कलंदर : ठीक ! हें अस्मान किती जुनंपुराणं आहे ! म्हातारपणामुळे जमिनीपर्यंत वांकलं आहे ! पण इकडे जमिनीचं चुंबन घेत असतांनाच, तिकडे रात्रीं कोंवळ्या चंद्रकोरीला छातीशीं घट्ट धरून बसतं--आपले तार्‍यांचे डोळे मिचकावीत !

जमनलाल : वाहवा, शायरीचे तारे त्र छान तोडलेस; पण त्यानं मी गफलतींत येणार नाहीं. तो हुक्का इकडे कर पाहूं.

कलंदर : हां हां लीजिये, नोश फर्माइये ( हुक्का देतो. ) मोहब्बतीच्या हुक्कीहून हा आपला हुक्का बहोत अच्छा !

जमनलाल : बिलकुल बराबर बोललास, कोणीहि यावं आणि या हुक्क्याच्या नळीचं अस्सं चुंबन घ्यावं ! ( हुक्का ओढून घ्रर सोडतो. ) --या आनंदानं मस्तक इतकं तर्र होतं, तर लोक कशाला गोंडा घोळतात मस्तवाल खुबसूस्त पोरींपुढें ?

कलंदर : वे क्या पूछते हो बडे भैय्या ? खुबसूरत पोरीला मोहब्बतीच्या जाळ्यांत ओढून तिच्याशीं शादी करण्यासाठीं ! जमनलालजी, मेरे दिलकी बात कहूं ? संसारांत दुसरं कांहीं नसलं तरी चालेल; लेकिन‌ ; लेकिन‌ औरत खुबसूरत पाहिजे-- हां !

जमनलाल : तुला खुबसुरत औरत पाहिजे काय ? बेटा कलंदर, खुबसूरत औरत मिळण्यापूर्वीं स्वत:चा खरबुजा चेहरा ऐन्यांत बघून ये जरा ! मन्सूरखांसारखा तूंहि पागलच दिसतोस, अरे, शहाण्या माणसानं सुंदर बायको कधीं करूं नये. कारण ‘ सुंदर जोरू और सबकी भाबी !’

कलंदर : याने ? इसका मतलब ?

जमनलाल : या म्हणीचा अर्थ असा, कीं एखाद्याची सुंदर बायको सर्वांची वहिनी होते. म्हणजे पडोसी तिच्याव्र पापी नजर ठेवतात आणि ’ भाबी. भाबी, भावी’ म्हणून तिच्याशीं मीठी मीठी बात करतात ! मग तिच्यावर नजर ठेवतां ठेवतां नाकमें दम आता है ! सुंदर नार म्हणजे चिंतेची तरवर !

कलंदर : वा:, बडे भैय्या , खूब कहा-- ‘ सुंदर जोरू और सबकी भाबी !’ सुंदर नार और आफत‌ की तरवार !’--क्यों जी. मग आपण कुरूप बायकोशीं शादी केली कीं काय ?

जमनलाल : ( जरा गोंधळून ) अलबत‌. अनुभवाचे बोल आहेत हे. शहाण्या माणसानं चक्क कुरूप बायको करावी, म्हणजे तिच्यावा कोणी लट्ट होण्याची चिंता नाहीं; आणि ती कोणावर लट्टू झाली तरी चिंता नाहीं ! कारण, तिल मात्र सर्वजण खरोखरच ‘ भावी ’ म्हणतात; इतकंत काय, ‘ माताजी ’ म्हणून तिच्यापासून चार पावलं दूर राहातात !

कलंदर : आया खियालमें. कुरुप बायको म्हणजे बिलकुल सुरक्षित किल्ला ! त्वावर कोणालाहि तोफ डागणं मुष्कील !

जमनलाल : हो. नवर्‍याला देखील !

कलंदर : नवर्‍याल देखील ?. तर मग बडे भेय्या, ही सारी अक्कल आमच्या उस्तादांना शिकवा ना जरा.

जमनलाल : उसका नाम मत लेना. त्या चहाडखोर आगलाव्याशीं बातचीत करणं सोडून दिलं आहे मीं.

कलंदर :  ( जरा विचार करून ) अच्छा, तो फिर शाहजादी को कहिये. जमनलालजी, जमनलालजी, लवंगी--जगन्नाथाच्या चोरटया मुलाखतींचा बोभाटा आमच्या उस्तादांनों शहेनशहांपाशीं केला आहे. त्याचा बडा खतरनाक अंजाम होईल बरं ! जगन्नाथाला कैदखाना.

जमनलाल: मला कल्पना आहे त्याची.

कलंदर : और तो भी आप खामोश बैठे हो ? ‘ आपली जातपात, खानदान सोडुन त्या दख्खनी पंडिताच्या मोहब्बतींत पंडू नकोस, ’ असा सल्ला तुमच्या शिष्येला द्याच ! कसम आहे तुम्हांला तुमच्या दिलप्यारीची !

जमनलाल : ( आश्चर्यानें ) दिलप्यारी ? कोण आहे माझी दिलप्यारी /

कलंदर : जिला तुम्ही मांडीवर घेतां, छातीशीं धरतां, जिच्या अंगावरून बोटंहि फिरवतां, ती !

जमनलाल :  ( जरा संतापून ) कोण ती ?

कलंदर : तुमची दिलप्यारी सितार ! तिची शपथ घ्या, अन‌ साहजादीला इष्काच्या खिलाफ इशारत देण्याचं कबूल करा.

जमनलाल : ( हंसून ) अच्छा कबूल. कोणाचं नांव न घेतां, मोघम उपदेश करायल हरकत नाहीं. माझे अनुभवाचे बोल शाहजादीला सुनावीन. अरे, सांध्या भाषेंतच नाहीं, तर संगीताच्या भाषेंत सुनावीन ! मग तर तुझा कलेजा थंडा होईल ना ?

कलंदर : जरूर जरूर, लेकिन‌ उस्ताद, इष्काच्या खिलाफ आपण संगीत इशारा कसा देणार ?

जमनलाल : मी त्यांना सांगेन, “शाहजादीसाहिबा, विषम स्थितींतील स्त्री--पुरुषांच्या इष्फाल नेहमीं दुःखाचंच फळ लागतं--आरंमीं थोडं गोड. पण अखेर फार कडू ! त्यांच्या संसाराच्या मैफलींत नव्या नवलाईचा ‘वसंत बहार’ कांहीं दिवसच टिकतो; आणि मग नवराबायकोची ‘ जुगलबंदी ’ सुरु होते,-- ‘ रणधुमाळी ’ च्या तालावर ! म्हणजे भांडाभांडीला ऊत येतो ! प्रीतीच्या ‘ हिंडोल’ तुटतो; अन‌ आदळ--आपटीच्या तालासुरावरा गृहलक्ष्मीचा ‘ दुर्गा’ राग सुरू झाला. कीं बिचार नवरा--एकेकाळचा प्रियकार--‘शंकरा’चा धांवा करूं लागतो ! त्या ‘ दुर्गे ’ ला वठणीवरा आणण्यासाठीं तो‘ भैरव ’ हि होतो कधींकधीं; पण त्यामुळेम फार तर तिच्या नेत्रांत अश्रूंचा ‘ मेघमल्हार तरळतो ! ‘ ललित ’ आनंद ‘ जीवन--पुरी ’ तून हद्दपर होऊन ‘ जंगला ’ चा रहिवासी होतो.  म्हणजे सांसारिक आनंदाला वनवास प्राप्त होतो !. प्रेम. विवाहाची प्रभात म्हणजे प्रसन्न ‘ रामकली ’ राग ! पण पुढें त्यांत ‘ राम’ मुळींच राहात नाहीं. आणि ‘ कली’ मात्र संचारतो ‘ अडाण्या ’ सारखा ! मग हा सारा संसार एक असार निरर्थक ‘ तराना’ वाटूं लागतो आणि ते दोघोहि ‘ जोगी’ बनतात--दुनियेला विटतात.

कलंदर : और ‘ इष्कके गहिरे खतरेमें बडे भी खा गये ठोकर ’ ही ‘ भैरवी ’ आळवीत मरणाचा ‘ अंतरा ’ केव्हां येतो, याची वाट पाहात बसतात !

जमनलाल : असा उपदेश मी जरूर करीन, पण कलंदरखां, त्याचा बिलकूल असर होणार नाहीं. म्हणूनच म्हणतो. शाहजादील उपदेश करण्याच्या भानगडींत मला कशाला पाडतोस ?

कलंदर : सिर्फ फर्जके लिवे ! तुमच्या दाराशुकोहसारखं कर्तव्या विसरून नाहीं चालणार, उस्ताद, शहेनशहांच्या त्या लडक्या लेकाचा--दाराशुकोहचा--या स्वतरनाक‌ इष्कवाजीला पाठिंबा नसता, तर शहेनशहांनीं त्या जगन्नाथाल केव्हांच ‘ शहिदे मुहब्बत ’ करून टाकला असता ! खरंच, हा तुमचा दारा म्हणजे ना धड हिंदु, ना धड मुसलमान ! कंबरूत, राम नि रहीम, गीता नि कुराण, मशीद नि मंदिर यांत तो पागल शाहजादा फरकच मानीत नाहीं !

जमनलाल : अरे, तीच तर त्याची थोरवी. ख्रराखुरा अकबराचा पणतू शोभतो तो. तुमच्या औरंगजेबासारखा फौजी आदमी नाहीं; अन‌ धर्मवेडाहि नाहीं,

कलंदर : क्या बात करते हो उस्ताद ? कोठें औरंगजेब नि कोठें दाराशुकोह ! बिल्ली ती बिल्ली और शेर तो शेर ! औरंगजेब तरूतावर आल, कीं या दाराचा धुव्वा उडवील आणि ( जमनलालनें सोडलेल्या घुराकडे बोत दाखवीत ) या जगन्नाथाचाहि धुव्वा उडेल ऐसा ! ( इतक्यांत प्रहाराचा टोला पडतो. ) देखो, सच है. प्रहराचा टोला पडला.

जमनलाल : अरे, या टोल्यावर काय आहे ? दैवाचा टोला काय करील तें खरं, तो जगन्नाथ-जगाचा स्वामी--या जगन्नाथाला तारील नाहीं तर मारील ! सारं कांहीं त्याच्या मजींवर अवलंबून आहे. जाऊं दे झालं. मला आतां गेलंत पाहिजे .

कलंदर : जा, जरूर शिकवणीला जा. पण उपदेशाची दवा बरोबर घेऊन !

जमनलाल : फिकिर मत करना. ( जातो. )

कलंदर :  ( स्वगत ) एकूण जगन्नाथ, पंडितावर शाहजादी आशक झाली आहे तर ! बहोत अच्छा. बहोत अच्छा. आजकाल सुंदर बायका शूर सरदारांऐवजीं शायरांवर लट्टू होऊं लगल्या, यह अच्छी बात है ! त्या दरिद्री पंडितावर शाहजादीचा दिल जडल , तर या कफल्लक कलंदरखांवर कलियाचा दिल कां जडूं नये ? शाहजादीची ती माषुक सहेली म्हणजे एक नाजुक पहेली आहे-- मस्तक तर्र करणारी ! तिच्या दिलाचा थांगपत्ता अजून लागत नाहीं. लेकिन‌ या बूढया जमनलालमार्फत संधान बांधलं, तर होईल काम फत्ते, आपण इष्काच्या खिलाफ आहोंत असा बहाणा तर आज ठीक जमला. बस्स, अशींच शिताफीनं पावलं टाकलीं पाहिजेत. मग ज्या इष्काच्या खतर्‍यांत जगन्नाथासारख्या शायराच्या हातांत बेडया पडण्याची वेळ आली, बडयाबडयांनीं चक्कर खाल्ली, त्याच इष्कांत हा पठ्ठया कलंदर --

‘ इष्कके गहिरे खतरेमें कलंदर खायेगा शक्कर ।’  ( जातो, )

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP