मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
पुष्पाप्रत

पुष्पाप्रत

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( अंजनीगीत )

पुष्पा ! सुन्दर किती तूं दिससी !
सौकुमार्य माधुर्यहि धरिही !
तुजला बघतां मन माझें तूं-वेडें रे करिसी?
तूं आणिक मी पूर्वी होतों
खेळगडी रे ? स्मरूनि अहा तो !

काळ सुखाचा, आतां चित्ता-खेद फार होतो !

मुग्ध मधुरता चित्तीं घेतां,
पूर्वी अपुली होती समता;

गेला गेला काळ अहह तो ! - फेर किती आतां !

सौकुमार्य तव अजुनी आहे !
हंसतचि आहे हास्य तुझें हे.

परि मम भाळीं ढग अश्रूंचा-हाय ! डवरलाहे !

तुजला पाहुनि मीं नाचावें,
दुडदुड धांवत तुजशीं यावें,

प्रेमें तुजला स्वकरीं घेउनि-सखया चुंबावें !

आतांहि गमे ध्यावें तुजला,
परी सुटतसे कंप कराला !

दिव्यत्वाला स्पर्श कराया-भय वाटे मजला ! ---

रम्य धुक्याची अद्‍भुत सृष्टि
तोंत उघडिसी आपुली दृष्टि,

मग तो भास्वान्‍ तुजवरि करितो---तेजाची दृष्टि !

मरुद्‍गण तुझ्या पाळणियाला
तत्पर आंदोलन द्यायाला,

पक्षिमुखांही स्वर्ग तुझ्यावरि--- गाई गीतांला !

रम्य तुझें बा जिणें कितीतरी,
परिमलयश तव जाय भूवरी,

कालहि तुझिया दिव्यत्वाला---वाटे नमन करी !

चिरतरुणा रे ! चिररुचिरा रे !
तुजसन्निध तो वास बरा रे !

तुजमजमध्यें परी केवढी---आहे रुंद दरी रे !

काळोखाच्या जगामधें या,
मृत आशांच्या चित्तांवरुनि या

पिशाच्चा माझें भटकत आहे---शांति नसेचि तया !

मच्चिताच्या क्षितिजावरती
नृत्याला जीं स्वप्नें करितो

निदान, त्यांच्यामध्यें मजला---भासो तव मूर्ति !

( इंद्रवज्रा )

सौभाग्य पुष्पा ! तव गावयाला
मी पात्र नाहीं गमतें मनाला;
भुंगे तुझे स्त्रोत्र सुरेख गाती
ऐकूनि तें सर्व पळोत खंती !

१६ मार्च १८९२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP