मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ५८ वा

पांडवप्रताप - अध्याय ५८ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ जय जय ब्रह्मानंदा यादवेंद्रा ॥ श्रीपांडुरंग नगर विहारा ॥ श्रीविठ्ठला रुक्मिणीवरा ॥ निर्विकारा निर्द्वद्वा ॥१॥
सच्चिदानंदतनु सगुणा ॥ षड्गुणैश्वर्य संपन्न ॥ परम पुरुषा मधु सूदना ॥ आनंद घना ॥ जगद्नुरो ॥२॥
मागें संपलें शांतिपर्व ॥ पुढें अश्वमेध अति अपूर्व ॥ व्यासशिष्य जैमिनि कृत सर्व ॥ रस सुरस बोलिला ॥३॥
जैमिनीनें केलें भारत ॥ व्यासें शापिलें तें समस्त ॥ अश्वमेध रसिक सत्य ॥ म्हणोनि वंद्य केला हा ॥४॥
रणीं पडले जे सर्व ॥ त्यांचा करू नियां आठव ॥ शोक करी धर्मराव ॥ म्हणे हें दैव कायसें ॥५॥
सर्वांमाजी निश्चितीं ॥ लागली कर्णाची फार खंती ॥ नेत्रांचे अश्रु न सांवरती ॥ म्हणे तपासी जाईन मी ॥६॥
तंव तेथें अकस्मात ॥ पातला सत्यवती सुत ॥ पूजा करोनि समस्त ॥ धर्म दुःख सांगतसे ॥७॥
म्हणे स्थिरता नसे मना ॥ राज्य द्या तुम्ही भीमसेना ॥ मी जाईन तपोवना ॥ दुराचरण केलें म्यां ॥८॥
व्यास म्हणे ते अवसरीं ॥ धर्मा तूं अश्वमेध करीं ॥ पितृगण सर्व परत्रीं ॥ परम सुख पावतील ॥९॥
धर्म म्हणे नाहीं द्रव्यार्थ ॥ पृथ्वीचे राजे मारिले समस्त ॥ त्यांचे पुत्र बाळ अमित ॥ त्यांशीं मागतां न ये आतां ॥१०॥
पापद्रव्य घेऊ नियां ॥ मग याग करावा कासया ॥ जैसी यात्रा नागवूनियां ॥ अन्न सत्र घातलें ॥११॥
गाई मारू नियां वाहाणा ॥ करोनि दिधल्या ब्राहणा ॥ कीं मोडूनियां सदना ॥ मंडप अंगणीं घातला ॥१२॥
देवळाचें पाडूनि शिखर ॥ भोंवतें घातलें आवार ॥ कीं नेसावयाचें सोडूनि वस्त्र ॥ शिरीं जैसें गुंडाळिलें ॥१३॥
तैसें प्रजांसी पीडून ॥ व्यर्थ काय याग करून ॥ यावरी पराशरनंदन ॥ बोलता जाहला धर्मासी ॥१४॥
पूर्वीं मरुत्त राजा विख्यात ॥ तेणें याग केला अद्भुत ॥ विप्रांसी दक्षिणा अमित ॥ न नेववे ऐसी दिधली पैं ॥१५॥
मग कंटाळूनि विप्र ॥ द्रव्य टाकिलें अपार ॥ तें वित्त आणावें समग्र ॥ मग युधिष्ठिर बोलतसे ॥१६॥
म्हणे तें द्रव्य आणितां जाण ॥ हांसती पृथ्वीचे ब्राह्मण ॥ व्यास म्हणे बहुत कठिण ॥ अश्वमेध असे धर्मा ॥१७॥
वीस सहस्त्र ब्राह्मणां ॥ आधीं घालावें अनुष्ठाना ॥ आरंभीं काय द्यावी दक्षिणा ॥ तेंही ऐकें अनुक्रमें ॥१८॥
एकेकासी सव्वा मण सोनें ॥ एक पायली दिव्य रत्नें ॥ एक घोडा एक गज त्यांकारणें ॥ वस्त्रालंकारें देइंजे ॥१९॥
आपण वर्ष पर्यंत ॥ असावें बहू व्रतस्थ ॥ भोग भोगावे समस्त ॥ परी स्त्री वर्ज करावी ॥२०॥
एकशयनीं निजावें तत्त्वतां ॥ परी संग न करावा सर्वथा ॥ ऐसें व्रत हें नृपनाथा ॥ आचरतां बहुत कठिण ॥२१॥
अश्व पाहिजे श्यामकर्ण ॥ मूत्र पुरीष करी जेथें जाण ॥ सहा सहस्त्र गोदान ॥ विधियुक्त तेथें करावें ॥२२॥
धर्म म्हणे परम कठिण ॥ सर्व चमू गेली आटोन ॥ मग म्हणे पराशर नंदन ॥ साह्य श्रीकृष्ण तुज आहे ॥२३॥
भद्रावती नगरीं जाण ॥ यौवनाश्व राजा बलगहन ॥ त्याचे घरीं श्यामकर्ण ॥ सुलक्षण बहु असे ॥२४॥
दहा अक्षौहिणी सेना रक्षीत ॥ वायूसी नव्हे प्रवेश तेथ ॥ तो अश्व आणाल अकस्मात ॥ तरीच कार्यार्थ सर्व साधेल ॥२५॥
भी म्हणे मी आणीन ॥ तों बोले वृषकेत कर्णनंदन ॥ मी समागमे येईन ॥ विभांडीन सर्व सेना ॥२६॥
काळासी मारीन समरांगणीं ॥ पालथी घालीन हे कुंभिनी ॥ मेरु मंदार फोडूनी ॥ स्वर्ग पाडीन खालता ॥२७॥
धर्म भीमांसी म्हणे तत्त्वतां ॥ अश्वमेध आरं भावा आतां ॥ मी उतराई होईन तत्त्वतां ॥ वडिलांचें कांहीम एक ॥२८॥
ऐसें बोलता वृषकेत पूर्ण ॥ धर्म भीमांसी आठवला कर्ण ॥ मग वृषकेतासी ह्रदयीं धरून ॥ धर्म राव शोक करी ॥२९॥
षोडश वर्षांचा वृषकेत ॥ तेजें केवळ दुजा आदित्य ॥ धर्म म्हणे बा रे तुझा तात ॥ आम्हीं मारिला समरांगणीं ॥३०॥
वृषकेत म्हणे जो धर्मद्वेष करी ॥ दुष्टांचा साहाकारी ॥ बरा मारिला तो समरीं ॥ हरिप्रियद्वेषिया तो ॥३१॥
क्षत्रिय होता सबळ ॥ परी अकीर्तीनें भरिलें भूमंडळ ॥ तरी तो डाग काढीन समूळ ॥ श्यामकर्ण आणीन मी ॥३२॥
ऐकोनि वृषकेताचें वचन ॥ ह्रदयीं धरी तया भीम सेन ॥ तों घटोत्कच पुत्र मेघवर्ण ॥ येऊ नियां बोलतसे ॥३३॥
म्हणे मी आणि वृषकेत ॥ गगनपंथें जाऊनि अकस्मात ॥ श्यामकर्ण आणूं त्वरित ॥ पहा पुरुषार्थ बाळकांचा ॥३४॥
दोघे म्हणती भीमासी ॥ तुम्हीं असावें आमुचे पाठीशीं ॥ धर्म म्हणे ह्रषीकेशी ॥ आलियाविण हें कार्य नोहे ॥३५॥
मग धर्में करितांचि ध्यान ॥ तत्काळ प्रकटला भगवान ॥ नमूनि श्रीरंगाचे चरण ॥ पूजा करी आदरें ॥३६॥
जय जय यदुकुल दिनेशा ॥ निज भक्तरक्षका द्वारका निवासा ॥ कैवल्यदायका परम पुरुषा ॥ भक्त वत्सला जगद्नुरो ॥३७॥
तुवां जे उपकार केले जगज्जीवना ॥ न वर्णवती सहस्त्रवदना ॥ धर्म म्हणे रुक्मिणीरमणी ॥ वेदपुराणां वंद्य तूं ॥३८॥
म्हणे व्या सदेव येथें आले ॥ अश्वमेध करा इतुकें सांगीतलें ॥ यावरी पद्मनाभ बोले ॥ कठिण कार्य धर्मा हें ॥३९॥
कित्येक राजे बळवंत ॥ युद्धासी आले नाहीं येथ ॥ कौरव पांडवसेना समस्त ॥ नाहीम द्दष्टींत धरिली तिंहीं ॥४०॥
घोडा कैंचा श्याम कर्ण ॥ मग धर्म राज बोले वचन ॥ यौवनाश्वाचे घरीं जाण ॥ वारू असे सुलक्षण ॥४१॥
प्रतिज्ञा बोलतो भीम सेन ॥ क्षणांत वारू मी आणीन ॥ विश्वव्यापक मन मोहन ॥ विनोदं करून हांसत ॥४२॥
भीमाची बुद्धि साचार ॥ जड असे बहुत आहार ॥ तूं नायकें याचा विचार ॥ स्थूलोदर अत्यंत हा ॥४३॥
श्वशुर गृहीं करणार वास ॥ ज्यासी निद्रा रात्रं दिवस ॥ शिळें अन्न भक्षी सावकाशा ॥ बुद्धि त्यासी असेना ॥४४॥
हांसोनि बोले वृकोदर ॥ हरि तुजइतुकें कोण खाणार ॥ गोकुळीं चोरी केली फार ॥ पूतना शोषिली दुग्धमिषें ॥४५॥
तुझें पोट थोर अत्यंत ॥ मातेसी विश्व दाख विलें मुखांत ॥ द्वादश गांवें अग्नि अद्भुत ॥ तुवां गिळिला स्थूलोदरा ॥४६॥
शेवटीं ब्रह्मांड गिळिसी समग्र ॥ तरी भूक न जाय साचार ॥ विश्व तुझे उदरांत सर्वत्र ॥ स्थूलोदर तूंचि पैं ॥४७॥
श्वशुरगृहीं सावकाश ॥ क्षीराब्धींत करिसी वास ॥ आस्वली स्त्री केली निःशेष ॥ नानावेषधारका ॥४८॥
तूं मासा कांसव डुकर ॥ तूं नरसिंह पोट फाडणार ॥ बलीचे गृहीं तूंचि भीक मागणार ॥ छेदिलेंसी शिर मातेचें ॥४९॥
स्त्री नेली तुझी वनीं चोरें ॥ गोकुळीं उपजतां राखिलीं गुरें ॥ स्त्रीचे बुद्धीनें वर्तसी खरें ॥ पारिजातक हरणवेळे ॥५०॥
तूंचि आमुची सोय राखणार ॥ परात्पर सोयरा साचार ॥ तुझ्या बळें कौरव चमूसागर ॥ अगस्ति होऊन प्राशिला आम्हीं ॥५१॥
आतां यावरी अश्वमेध ॥ सिद्धीस पावविसी तूं ब्रह्मानंद ॥ आमुचे कष्ट नाना खेद ॥ तुवां सोशिले निजांगें ॥५२॥
सबळ काष्ठ भ्रमर कोरी ॥ परी कमल रक्षी नानापरी ॥ तैसी प्रीति भक्तांवरी ॥ माउली होऊनि रक्षिसी त्यां ॥५३॥
तिळमात्र पाषाण ॥ जळीं न तरे जाय बुडोन ॥ परी जळ काष्ठ तारी पूर्ण ॥ आपण वाढविलें म्हणो नियां ॥५४॥
त्या काष्ठांच्या नौका होती ॥ स्वसंगें तारिती आणि कांप्रती ॥ हा जीवनीं अभिमान निश्चितीं ॥ विश्वव्यापका जगज्जीवना ॥५५॥
तैसें तुवांचि वाढ विलें आम्हां ॥ आतां काय बुडविसी पुरुषोत्तमा ॥ यज्ञ करूनि मेघश्यामा ॥ तुजचि शेवटीं अर्पावा ॥५६॥
असो यावरी प्रातःकालीं ॥ नमूनि धर्म वनमाली ॥ तिघे सिद्ध जाहले ते कालीं ॥ वृषकेत भीम मेघवर्ण ॥५७॥
कुंती द्रौपदी सुभद्रेसी पुसोन ॥ पायीं चालिले तिघे जण ॥ गिरिकंदरें ओलांडून ॥ पवनवेगें जाती पैं ॥५८॥
भद्रावतीस ॥ पातले तिघे जण ॥ ग्रामाचे पाठीसी पर्वत चढोन ॥ गुप्तरूपें करून ॥ विलोकिती नगरातें ॥५९॥
अयोध्या कीं द्वारका सुंदर ॥ तैसेंचि दिसे भद्रावती नगर ॥ तेथींची रचना पाहतां सुर नर ॥ परम सौख्य मानिती ॥६०॥
असो ते तिघे लपोन ॥ पाहती नगरांत विलोकून ॥ तों जल पाजावया श्याम कर्ण ॥ बाहेर काढिला यौवनाश्वें ॥६१॥
घोडा रक्षीत दहा सहस्त्र दळ ॥ वाद्यें वाजों लागलीं तुंबळ ॥ गजांचा थाट सबळ ॥ वारू रक्षिती सभोंवते ॥६२॥
व्यूह  रचिलासे बळकट ॥ वायुसी तेथें न फुटे वाट ॥ केशरें चर्चिलासे सुभट ॥ वस्त्राभरणीं पूजिलासे ॥६३॥
वारू पुढें धूप जळत ॥ नृत्यांगना बहु नाचत ॥ तों मेघवर्णें अकस्मात ॥ उडी त्यांत घातली ॥६४॥
निमिष न लागतां श्याम कर्ण ॥ गगन मार्गें नेला उचलोन ॥ जैसी चपळा रूप दाखवून ॥ गुप्त होय अंतरिक्षीं ॥६५॥
शरीरांतूनि जाय प्राण ॥ जवळियासी नव्हे द्दश्यमान ॥ तैसा मेघ वर्णें श्याम कर्ण ॥ नेला सर्वां न कळतां ॥६६॥
जाहला एकचि हाहाकार ॥ अष्टदिशांनिं धांवती दळ भार ॥ मग तो कर्ण पुत्र महावीर ॥ वर्षत शर पुढें आला ॥६७॥
वय लहान अति सुंदर ॥ जैसा केवळ रघुवीर ॥ सिंहनादें गर्जोनि समग्र ॥ केले भार उभे तेथें ॥६८॥
वारू धरिला तो मी येथें असें ॥ कां रे धांवतां वेडियां ऐसे ॥ युद्ध करा पाहों कैसें ॥ शूरत्व तुचचें यावरी ॥६९॥
ऐसें बोलोनि वृषकेतें ॥ दळ जर्जर केलें शरपंथें ॥ जैसें सुटतां चंडवातें ॥ जलदजाळ विध्वंसिजे ॥७०॥
किल्येक कृष्ण नामें करून ॥ दोष जाती दग्ध होऊन ॥ कीं प्रकटतां दिव्य ज्ञान ॥ माया आवरण निरसे जेवीं ॥७१॥
तैसा तो वीर प्रति कर्ण ॥ असंख्य दळ टाकी संहारून ॥ यौवनाश्व आश्वर्य करी पूर्ण ॥ म्हणे तिघे जण दिसती हे ॥७२॥
एकें धरिला श्याम कर्ण ॥ एकें दळ टाकिलें संहारून ॥ एक उगाचि पाहे दुरोन ॥ भोम सेनासन दिसे ॥७३॥
ऐसें देखतां यौवनाश्व ॥ तों बोहरी केली सेनेस ॥ पाहों आला अमरेश ॥ युद्ध कोण करीतसे हा ॥७४॥
देखूनि वृषकेताचें युद्ध ॥ सूर्यासी वाटला परमानंद ॥ इंद्रादि वृंदारकवृंद ॥ आश्वर्य करिती युद्धाचें ॥७५॥
म्हणती हें बाळक कोमळ ॥ युद्ध माज विलें परम तुंबळ ॥ अमर्याद पाडिलें दळ ॥ रक्तापगा वाहविल्या ॥७६॥
शस्त्र उचलतं कोणी ॥ ते भुज टाकिले छेदूनी ॥ यावरी यौवनाश्व क्रोधें करून ॥ समोर युद्धासी पातला ॥७७॥
तों भीम धांवला त्वरित ॥ देखोनि बोले वृषकेत ॥ सेना वधू माझी निश्चित ॥ इयेसी स्पर्श न करावा ॥७८॥
इजपासाव यशनामा अद्भुत ॥ होईल पाहा आतां सुत ॥ तो तुम्हांसी भेटवीन त्वरित ॥ खेळवा मग महा सुखें ॥७९॥
बाण मुखें करून ॥ तीस होतें चुंबन ॥ ध्वज झळकती कनकवर्ण ॥ तोचि तियेचा ॥८०॥
हे युद्ध सुरतीं न तगे जाण ॥ पळेल धैर्य वस्त्र टाकून ॥ इचे स्तन दोन्ही प्रधान ॥ रगडीन पहा यावरी ॥८१॥
श्रृंगारूनि आली बहुत ॥ परी उठोनि पळेल क्षणांत ॥ ऐसें ऐकोनि घटोत्कचतात ॥ उगाचि राहिला ते वेळीं ॥८२॥
यावरी तो कर्ण कुमार ॥ रणमदें जाहला कामातुर ॥ सेनावधू केली जर्जर ॥ युद्धसुरतीं तगेना ॥८३॥
पिता महा सूर्य नारायण ॥ वृषकेत करी तयाचें स्तवन ॥ म्हणे जन कजनका तुज विण ॥ यश कोण देईल येथें ॥८४॥
ऐसा तो वीर वृषकेत ॥ सेने माजी एकला तळपत ॥ परी कोणासी नाटोपे तेथ ॥ विद्युल्लते सारिखा ॥८५॥
यौवनाश्व म्हणे बाळा अवधारीं ॥ रथ देतों बैसोनि युद्ध करीं ॥ तूं नाम गोत्र पिता यावरी ॥ सांग वंश कोण तो ॥८६॥
मग बोले वृषकेत ॥ मी प्रतिपांडव विख्यात ॥ कुंती उदरीं माझा तात ॥ सूर्य वीर्यें जन्मला ॥८७॥
पांडव चुलते विख्यात ॥ पांडवकुलवर्धव मी वृषकेत ॥ परी तूं युद्ध सोडूनि मात ॥ काय व्यर्थ पूससी ॥८८॥
अश्वमेधासी नेतों श्याम कर्ण ॥ तुझा नलगे मजला स्यंदन ॥ तूं वृद्ध मी बाळक जाण ॥ युद्ध करीं पाहूं आतां ॥८९॥
आम्ही आहों श्रीकृष्णो पासक ॥ पाहा समरीं आजि कौतुक ॥ मग संहारिलें सर्व कटक ॥ आपणासी सायक न लागतां ॥९०॥
यौवनाश्व सोडी बाण ॥ ते वृषकेत टाकी छेदून ॥ जैसीं पाखंडियाचीं वचनें जाण ॥ पंडित खंडी एका शब्दें ॥९१॥
अवघें कटक बाणीं ॥ वृषकेतें खिळिलें ते क्षणीं ॥ यौवनाश्वाचा रथ रणीं ॥ छेदोनि ध्वज पाडिला ॥९२॥
मग यौवनाश्व आणिके रथीं ॥ बैसोनि शर सोडी त्वरित गती ॥ असंख्य शस्त्रें टाकूनि कर्णजाप्रती ॥ खिळिलें तेणें ॥ समरांगणीं ॥९३॥
क्षणैक मूर्च्छा येऊन ॥ खालीं पडला कर्ण नंदन ॥ मग उठिला भीम सेन ॥ म्हणे सुनेसी शिक्षा करूं ॥९४॥
वीज पडे अकस्मात ॥ तैसा धांवला वायु सुत ॥ पाळतां गज पायीं धरीत ॥ ते आपटी आणि कावरी ॥९५॥
गदा घायें करूनि जाण ॥ दळ टाकिलें संहारून ॥ तों यौवनाश्वाचा नंदन ॥ सुवेग धांवला भीमावरी ॥९६॥
तेणेंही गदा घेतली ॥ युद्ध करिती महाबळी ॥ चार घटिका ते काळीं ॥ गदा युद्ध माजलें ॥९७॥
भीम गज भिरकावीत ॥ तेचि परतोनि सुवेग टाकीत ॥ इकडे सावध होऊनि वृषकेत ॥ यौवनाश्वासीं युद्ध करी ॥९८॥
कर्ण नंदनें अनिवार ॥ यौवनाश्व केला जर्जर ॥ मूर्च्छा येऊनि तो नृपवर ॥ ध्वजस्तंभीं टेंकला ॥९९॥
त्याचे रथा वरी चढोन ॥ जवळी गेला कर्ण नंदन ॥ त्या राया वरी पदरें करून ॥ वारा घाली वृषकेत ॥१००॥
नवस करी वृषकेत ॥ म्हणे श्रीकृष्णा धांव पाव त्वरित ॥ पुण्यवंत हा नृपनाथ ॥ वांचो एकदां ये वेळे ॥१०१॥
यौवनाश्व पाहे सावध होऊन ॥ तों जवळी देखे कर्ण नंदन ॥ मग तेणें बाहू पसरून ॥ ह्रदयीं द्दढ आलिंगिला ॥१०२॥
त्यावरी राजा धांवोन ॥ द्दढ आलिंगिला भीमसेन ॥ भेटला मेघ वर्ण येऊन ॥ श्याम कर्णा समवेत ॥१०३॥
यौवनाश्वें आपुली कन्या निश्चितीं ॥ लावण्य गंगा नाम ॥ प्रभावती ॥ वृषकेतासी दिधली प्रीतीं ॥ चारी दिवस संपादिले ॥१०४॥
आणोनि संपत्ति अपार ॥ पूजिला मेघ वर्ण वृकोदर ॥ आंदण दिधलें दळ भार ॥ सिद्ध करूनि चालिला स्वयें ॥१०५॥
साह्य चालिला नृपवर ॥ सवें कुटूंब घेतलें समग्र ॥ सहस्त्रस्तं भांचें शिबिर ॥ राहावया घेत समागमें ॥१०६॥
देव सेन प्रधाना सहित ॥ गज पुरा चालिला नृपवर तेथ ॥ बंधूं समवेत धर्म येत ॥ यौवनाश्वासी सामोरा ॥१०७॥
अगोदरचि मन मोहन ॥ गेला होता द्वारके लागून ॥ असो धर्म रायें देखिला श्याम कर्ण ॥ भीमें वर्तमान सांगितलें ॥१०८॥
मग धर्म धांवोनि त्वरित ॥ डोळां आणिले अश्रुपात ॥ वृषकेतासी ह्रदयीं धरीत ॥ कर्ण बंधु आठवूनि ॥१०९॥
भीम म्हणे राया धर्मा ॥ कर्णजें केली युद्धीं सीमा ॥ तों यौवनाश्व धरोनि प्रेमा ॥ पांडवांसी आलिंगी ॥११०॥
असो सुमुहूर्त काढिला पूर्ण ॥ चैत्रमासी पौर्णिमेसी जाण ॥ पृथ्वी वरी श्याम कर्ण ॥ सोडावा हा निश्वय जाहला ॥१११॥
यावरी धर्म म्हणे भीम सेना ॥ तूं वेगें जाऊ नि द्वराका भुवना ॥ सहकुटुंब जग न्मोहना ॥ घेऊनि येईं यागासी ॥११२॥
वसुदेव रेवती रमण ॥ उद्धव अक्रूर उग्र सेन ॥ छप्पन्न कोटी यादव संपूर्ण ॥ कुटुंबां सहित आणावे ॥११३॥
षोडश सहस्त्र कामिनी ॥ रुक्मिणी मुख्य विश्वजननी ॥ एवं भीमा अवघ्यांसी आणीं ॥ रक्षण ठेवणें द्वारके ॥११४॥
आला द्वार केसी भीम सेन ॥ प्रवेशला श्रीकृष्ण भुवन ॥ तों अंतर्गृहीं जगज्जीवन ॥ भोजनासी बैसला ॥११५॥
चौसष्ट वाटया झळकत ताट ॥ देवकी माय स्वयें वाढीत ॥ मुख्य नायिका चवरें ढाळीत ॥ रुक्मिणी दावी पदार्थ कृष्णा ॥११६॥
यशोदा जे नंदराणी ॥ तेही होती द्वारका भूवनीं ॥ ते नाना पदार्थ भोजनीं ॥ आणो नियां पुरवीत ॥११७॥
बाह्रेर बैसला वृकोदर ॥ विनोदें बोलत ॥ सर्वेश्वर ॥ म्हणे आला तो स्थूलोदर ॥ तो येथें येऊं नका ॥११८॥
गर्जोनि बोले वृकोदर ॥ काय तुझें पिकलें नाहीं राष्ट्र ॥ किंवा दुष्काळ पडिला अपार ॥ पोट तुझें भरेना ॥११९॥
मजला टाकूनि बाहेरी ॥ तूं जेवितोसी गृहां तरीं ॥ भुरके तरी हळू मारीं ॥ लोक नगरीं दचकती ॥१२०॥
फेण्या पापड मोडिसी क्षणोक्षणीं ॥ ते मज ऐकों येताती श्रवणीं ॥ गोकुळीं ताक कण्या खाऊनी ॥ उच्छिष्ट भक्षिसी गोवळ्यांचें ॥१२१॥
दधि दुग्ध दुग्ध घृत लोणी ॥ तुवां भक्षिलें चोरूनी ॥ जेवूनि लवकरी चक्र पाणी ॥ बाहेर न येसी अजूनि कां ॥१२२॥
सुईचे वेजाहून ॥ तुझा गळा आहे बहुत लहान ॥ मुसळ गळां टोंचून ॥ थोर न केला सुइणीनें ॥१२३॥
त्या सुइणीचें छेदावें नासिक ॥ तुझा गळा कां केला बारीक ॥ कीं माझे गदेनें तरी देख ॥ कंठ तुझा थोर करूं ॥१२४॥
कीं बल भद्राचा नांगर ॥ सदट ॥ तेणें तुझा गळा करूं नीट ॥ तों न बोले वैकुंठपीठ ॥ म्हणे काय घांस अडकला ॥१२५॥
गदा घालोनि मानेवरी ॥ घांस काढूं काय बाहेरी ॥ पर्वतां सह धरित्री ॥ गिळिसी मज वाटतें ॥१२६॥
मी दुरूनि आलों बहुवस ॥ माझाही करिसील काय ग्रास ॥ एकदां चाल गज पुरास ॥ याचें उसणें घेईन मी ॥१२७॥
मज येथें गिळिसी श्रीपती ॥ तरी सुभद्रा द्रौपदी हांसती ॥ तुज राक्षस नांव ठेविती ॥ न म्हणती देव कोणीही ॥१२८॥
मग श्रीकृष्ण म्हणे भीम सेना ॥ आतां येईं करीं भोजना ॥ भीम  म्हणे मी आंत येईंना ॥ गिळिसी मज मी काय करूं ॥१२९॥
गदगदां हांसे चक्रपाणी ॥ म्हणे खरकटीं उरलीं धुवोनी ॥ तीं उगीच खाईं ॥ येऊनी ॥ आलासी कोठूनि वर्‍हाडिया ॥१३०॥
मग बाहेर येऊनि मोक्षदानी ॥ भीम नेला अंतर सदनीं ॥ वृकोदर बोले हांसोनी ॥ आंत नेऊनि गिळिसी काय ॥१३१॥
द्वादश गांवें अग्न ॥ तुवां गिळिला मुख पसरून ॥ पूतना मारिली शोषून ॥ तुझें भय मज वाटतसे ॥१३२॥
एवढा अश्वमेध होऊं दे वनमाळी ॥ मग तूं सगळा मज गिळीं ॥ ऐसा विनोद ऐकोनि ते वेळीं ॥ हांसती सकळ अष्ट नायिका ॥१३३॥
मग भीमासी विस्तारोनि ताट ॥ भोजन दिधलें यथेष्ट विनोदें बोले वैकुंठपीठ ॥ फुटेल पोट पुरे करीं ॥१३४॥
भीम म्हणे तूं बाहेर जाईं आतां ॥ मज तूं गिळिसील अवचितां ॥ आमुचें कुळ त्वां आटिलें अच्युता ॥ आम्हांही भोंवता लागलासी ॥१३५॥
भोजन करूनि भीम सेन ॥ श्रीरंगाचे धरी द्दढ चरण ॥ म्हणे निघा सर्व कुटुंब घेऊन ॥ धर्म राज वाट पाहे ॥१३६॥
तों गमन संकेत भेरी ॥ ठोकिल्या दूतीं ते अवसरीं ॥ तंत वितंत घन सुस्वरीं ॥ वाद्यें वाजलीं चतुर्विध ॥१३७॥
आपुले कुटुंबां सहित सर्व ॥ छप्पन्न कोटी निघाले यादव ॥ षोडश सहस्त्र पाहावया उत्साह ॥ कृष्ण ललना निघाल्या ॥१३८॥
सोळा सह्स्त्र अष्टोत्तर शत ॥ वहनारूढ तेव्हां निघत ॥ ज्यांच्या वहनां पुढें धांवत ॥ सहस्त्रावधि वेत्रपाणी ॥१३९॥
एक लक्ष साठ सह्स्त्र ॥ सर्व निघाले कृष्ण कुमार ॥ तितुक्यांच्या स्रिया समग्र ॥ वहना रुढ निघाल्या ॥१४०॥
धर्मासी अर्पावया अहेर ॥ वीस सहस्त्र ॥ मत्त कुंजर ॥ द्रव्य वस्त्रें अलंकार ॥ भरो नियां घेतले ॥१४१॥
कित्येक देशींचे भूभुज ॥ सवें निघाले तेजःपुंज ॥ असंख्य त्यांचे झळकती ध्वज ॥ विद्युल्लते सारिखे ॥१४२॥
द्वारकेंत होते ऋषींचे भार ॥ वहनीं बैसूनि समग्र ॥ संगें घेऊनि श्रीधर ॥ गजरें सत्वर चालिले ॥१४३॥
निजरथीं वैकुंठनाथ ॥ गरुड ध्वज प्रतापार्क बैसत ॥ श्रुति माथा खालीं करूनि पाहात ॥ स्वरूप त्याचें वर्णितां ॥१४४॥
श्रीकृष्णा भोंवतीं दाटी अपार ॥ त्रिकाल दर्शना टपती सुरवर ॥ त्यांच्या माथां उडती वेत्र ॥ तेथें पाड काय इतरांचा ॥१४५॥
एक लक्ष साठ सहस्त्र कुमार ॥ पौत्र कन्या संतति अपार ॥ एक कोटी साचार ॥ कृष्ण संतति जाणिजे ॥१४६॥
सवें निघाले बाजार ॥ अष्टादश जाती उदीम करणार ॥ बंदी जन गर्जती अपार ॥ गजा रूढ होऊ नियां ॥१४७॥
वसुदेव बल राम उग्र सेन ॥ मागें द्वारकेसी ठेविले रक्षण ॥ निज भारेंसीं रुक्मिणीरमण ॥ कुंजर पुरा चालिले ॥१४८॥
तों पद्मनाभें पद्मिनी ॥ सरोवरीं देखिल्या ते क्षणीं ॥ रुक्मिणी प्रति कैवल्यदानी ॥ सुहास्यवदनें बोलत ॥१४९॥
अहो पद्माक्षिया पद्मिनी ॥ तमहारक भ्रतार टाकूनी ॥ भ्रमरांहातीं दिनर जनीं ॥ शरीर कैशा भोग विती ॥१५०॥
यावरी मृग शावाक्षी बोलत ॥ मिलिंद बाल कांसी स्तन देत ॥ रात्रि वश जाहल्या आदिल्या ॥ न पाहे सत्य करस्पर्शें ॥१५१॥
मग मिलिंदबालें घेऊनी ॥ निद्रित जाहल्या पद्मिनी ॥ हरि म्हणे कंपित क्षणोक्षणीं ॥ होती केवीं सांग पां ॥१५२॥
भ्रतारवियोगें सत्य ॥ क्षणक्षणां होती कंपित ॥ धर्म संतान ॥ भ्रमर गुप्त ॥ स्तनीं लावूनि झांकिले ॥१५३॥
ऐकोन रुक्मिणीचें वचन ॥ परम संतोषला मधु सूदन ॥ ह्रदयीं तियेसी आलिं गून ॥ समाधान करी तिचें ॥१५४॥
धर्मासी जाण विती दूत ॥ समीप आले द्वारकानथा ॥ यौवनाश्वा सहित कुंती सुत ॥ सामोरा येत हरीतें ॥१५५॥
मिरवीत श्याम कर्ण आणिला ॥ श्रीहरी लागीं दाख विला ॥ द्रौपदी सुभद्रादि स्त्रिया सकळा ॥ सामोर्‍या येती रुक्मिणीतें ॥१५६॥
नमन आलिंगन देख ॥ परस्परें देती सुख ॥ षोडश सहस्त्र कामनींसी हरिख ॥ द्रौपदीस भेटतां ॥१५७॥
सत्यभामा पांचाळीस भेटोन ॥ पुसतसे एकांतीं नेऊन ॥ पांच जणही पंडुनंदन ॥ वश तुज सर्वदा ॥१५८॥
यावरी मन मोहन ह्रषीकेश ॥ तोही तुवां केला वश ॥ सर्वदा ह्रदयीं धरित्येस ॥ रात्रं दिवस न विसंबसी ॥१५९॥
आम्ही षोडश सहस्त्र कामिनी आमुच्यानें वश नव्हे चक्रपाणी ॥ तूं एकली होऊनी ॥ मोहन सर्वांसी घातलें ॥१६०॥
तरी तें वशी करण ॥ सकळी ॥ मज तूं शिकवीं पांचाळी ॥ यावरी ते चातुर्य सरोवर मराळी ॥ प्रत्युत्तर काय देत ॥१६१॥
तुझें निर्मळ नाहीं अंतर ॥ वाढ विसी सवती मत्सर ॥ परमात्मा पूर्ण श्रीधर ॥ त्याशीं भेद करिसी तूं ॥१६२॥
पड्विकार रहित आदि पुरुष ॥ त्यासी तूं भाविसी गे मनुष्य ॥ जो अतर्क्य वेदशास्त्रांस ॥ त्याचें दान तुवां केलें ॥१६३॥
दीन दयाळ माझा बंधु ॥ कौरव सभेसी पडला दुष्ट संबंधु ॥ वस्त्रांचे पर्वत कृपासिंधु ॥ मज पुरविता जाहला ॥१६४॥
रुक्मिणी केवळ ज्ञान कळा ॥ जे प्रण वरूपिणी वेल्हाळा ॥ तिशीं तुवां मत्सर मांडिला ॥ महिमा अपार नेणोनि ॥१६५॥
नारद वेडा म्हणोन ॥ परतोनि तुज दिधला श्रीकृष्ण ॥ तूं अभाविक सदा मलिन ॥ तुजला वश कोण होय ॥१६६॥
अंतरीं निर्मळ भाविक जाण ॥ त्यासी वश होईल त्रिभुवन ॥ अभाविकां स्वप्नींही पूर्ण ॥ सुख नाहीं तत्त्वतां ॥१६७॥
ऐसें बोलतां पांचाळी ॥ सत्यभामा उगी राहिली ॥ वावरी रति उखादि सकळी ॥ वंदिती येऊनि द्रौपदीतें ॥१६८॥
देवकी यशोदा सकळ ॥ रुक्मिणी आदि कृष्ण स्त्रिया वेल्हाळ ॥ तिंहीं श्याम कर्ण तत्काळ ॥ पहावया आणविला ॥१६९॥
पूजोनि वंदिती श्याम कर्ण ॥ तंव उदेलें महा विघ्न ॥ शाल्वबंधु अनुशाल्व जाण ॥ तेणें धाडी घातली ॥१७०॥
पात्यासी पातें न लागतां जाण ॥ इतुक्यांत नेला श्याम कर्ण ॥ दळ भार सिद्ध करून ॥ उणा ठाकला संग्रामा ॥१७१॥
स्वसैन्यासी करी आज्ञा ॥ जो न धरील मेघ श्यामा ॥ त्यासी दंडीन हे प्रतिज्ञा ॥ कदा जनज्जीवन न सोडावा ॥१७२॥
इकडे पांडवदळीं जगज्जीवन ॥ तेणें भारेंशीं प्रेरिला मदन ॥ म्हणे घेऊनि येईं श्याम कर्ण ॥ अनुशाल्वा समवेत ॥१७३॥
वृषभभार सन्मुख देखोन ॥ विचार न करी पंचानन ॥ तैसा श्रीकृष्ण नंदन ॥ निज भारेंशीं धांवला ॥१७४॥
अनुशाल्व आणि मन्मथ ॥ युद्ध करिती तेव्हां अद्भुत ॥ परस्पर वर्में बोलत ॥ बाण सोडीत आवेशें ॥१७५॥
युद्ध जाहलें अत्यंत ॥ रुक्मिणी तनय पडिला मूर्च्छित ॥ युद्धांतूनि परत विला रथ ॥ सैन्य पळत मदनाचें ॥१७६॥
मदनाचा पराजय देखोन ॥ लज्जित जाहला जगज्जीवन ॥ धिक्कारिला मीन केतन ॥ म्हणे वांचून व्यर्थ तूं ॥१७७॥
काळें वदन घेऊन ॥ राहें कानना माजी जाऊन ॥ अनुशाल्वानें तुझा प्राण ॥ कां न घेतला रणामाजी ॥१७८॥
भीम म्हणे ह्रषीकेशी ॥ कां बोलसी व्यर्थ मदनासी ॥ काळ यावना पुढें पळालासी ॥ लपालासी विवरांत ॥१७९॥
मग गदा घेऊनि वृकोदर ॥ करी अनु शाल्व दळाचा संहार ॥ पाडिलें दळ अपार ॥ रक्तगंगा धांवती ॥१८०॥
कृतांतापरी हांक देत ॥ रथा रूढ धांवला वृष केत ॥ भीमासी म्हणे हो हो तात ॥ माझा वचनार्थ ऐकावा ॥१८१॥
सेना हें फळ निश्चित ॥ लेंकरानें केलें हस्तगत ॥ तें वडिलीं घ्यावें हें काय उचित ॥ मग भीम बोलत तयासी ॥१८२॥
सेनाफळ कठिण निश्चितीं ॥ मऊ करूनि देतों तव हातीं ॥ असो वृकोदरें बहु हस्ती ॥ संहारिले तेधवां ॥१८३॥
अनुशाल्वानें बाणें अद्भुत ॥ भीम पाडिला मूर्छागत ॥ मग रथा रूढ मदनतात ॥ शर वर्षत धांविन्नला ॥१८४॥
अनुशाल्व म्हणे ते अवसरीं ॥ माझा शाल्व बंधु निर्धारीं ॥ कृष्णा त्वां मारिला समरीं ॥ त्याचें उसणें घे आतां ॥१८५॥
मग बोले मदनतात ॥ तुझी वल्गना सर्व व्यर्थ ॥ एके लेंकरा हातीं क्षणांत ॥ तुज धरूनि नेईन मी ॥१८६॥
मग यावरी युद्ध तुंबळ ॥ करीत तेव्हां वैकुंठपाळ ॥ तंव तो वीर प्रतापी सबळ ॥ कृष्ण दळभार संहारी ॥१८७॥
बाण अनुशाल्वाचे अद्भुत ॥ श्रीकृष्ण पडला मूर्च्छित ॥ भीमें शिबिरा प्रति त्वरित ॥ मदनतात नेला तेव्हां ॥१८८॥
मूर्च्छा हरलिया समस्त ॥ सत्यभामा मग हांसत ॥ मदनासी हिणा विलें बहुत ॥ तुम्ही कां हो पळोन आलां ॥१८९॥
मग मागुती जगज्जीवन ॥ रणासी गेला परतोन ॥ तों वृषकेत झुंजतसे निर्वाण ॥ सुरवर गगनीं पाहती ॥१९०॥
वृषकेताचा स्यंदन ॥ अनुशाल्वें केला रणीं चूर्ण ॥ यावरी तो कर्ण नंदन ॥ विजे ऐसा धांवला ॥१९१॥
त्या चिया रथा वरी चढोन ॥ अनुशाल्वासी चरणीं धरून ॥ शत वेळां भोवंडून ॥ धरणी वरी आपटिला ॥१९२॥
तैसाचि ओढीत ते वेळां ॥ श्रीरंगाजवळी आणिला ॥ पांचही पांडव निज डोळां ॥ आश्रर्य पाहती कर्ण जाचें ॥१९३॥
जाहला एकचि जय जय कार ॥ हरिनें ह्रदयीं आलिंगिला कर्ण कुमार ॥ सावध जाहला अनुशाल्व वीर ॥ स्तवन करी वृषकेतांचें ॥१९४॥
म्हणे वृषकेता तूं धन्य ॥ मज भेट विला जगज्जीवन ॥ मग अनुशाल्वासी पंडुनंदन ॥ प्रीती करून भेटले ॥१९५॥
अनुशाल्वासी ह्रदयीं धरून ॥ प्रीतीनें बोले जगन्मोहन ॥ आतां धर्मासी साह्य होऊन ॥ अश्वमेध सिद्धीस नेईं ॥१९६॥
तिकडे मदनें दळ संहा रून ॥ घेऊनि आला श्याम कर्ण ॥ मग सर्वही मिळोन ॥ गज पुरांत प्रवेशती ॥१९७॥
जय वाद्यें वाजवीत ॥ आनंद न माये त्रिभुवनांत ॥ नाना उपचार पुरवीत ॥ सर्वही नृपां धर्म राव ॥१९८॥
पूर्वीं सत्यवती ह्रदय रत्न ॥ जो प्रकार गेला सांगोन ॥ चैत्री पौर्णिमा पाहोन ॥ श्याम कर्ण ॥ सोडिती ॥१९९॥
असिपत्र व्रत तेथून ॥ धर्म रायें अंगी कारून ॥ सर्वही भोग त्यागून ॥ स्त्रीसमागस सोडिला ॥२००॥
वीस सह्स्त्र ब्राह्मण ॥ पूर्व संकेतें दक्षिणा देऊन ॥ पूजो नियां श्या कर्ण ॥ आरं भिला दिग्वि जय ॥२०१॥
सर्व रायां सहित पार्थ ॥ धर्मासी नमूनि निघे त्वरित ॥ युधिष्ठिर आशीर्वाद देत ॥ यशवंत होईं सदा ॥२०२॥
पार्था ऐकें एक वचन ॥ पूर्वीं राजे मारिले जाण ॥ त्यांचे बाळ जाहले राव नूतन ॥ त्यांवरी दया करीं बहु ॥२०३॥
ते सांपडले जरी समरीं ॥ पार्था त्यांसी कदा न मारीं ॥ अवश्य म्हणोनि झडकरी ॥ निघता जाहला अर्जुन ॥२०४॥
कुंती गांधारी धृत राष्ट्र ॥ यांसी नमूनि पार्थ वीर ॥ साष्टांगें नमिला याद वेंद्र ॥ म्हणे आज्ञा देईं आतां ॥२०५॥
कुंती म्हणे पार्था ॥ बहुत सांभाळीं वृषकेता ॥ सद्नदित माता पृथा ॥ कर्ण वीरा आठवूनि ॥२०६॥
मागुती बोले वचन ॥ बाळ जतन करीं मेघ वर्ण ॥ कृष्ण पुत्र प्रद्युम्न ॥ तोही रक्षावा समरां गणीं ॥२०७॥
चौघे पांडव आणि मुरारी ॥ राहते जाहले हस्तिना पुरीं ॥ यावरी भार चालिला गज पुरीं ॥ श्याम कर्णा मागुती ॥२०८॥
यावरी पुढें कथा सुरस ॥ जैमिनी सांगे जन मेज यास ॥ प्राकृत भाषेंत पंढरीश ॥ बोल वील ऐका ते ॥२०९॥
श्रीपांडूरंगपुर विहारा ॥ ब्रह्मानंदा रुक्मिणीवरा ॥ श्रीधरवरदा निर्विकारा ॥ जग दुद्धारा अभंगा ॥२१०॥
स्वस्ति श्रीपाडवप्रताप ग्रंथ ॥ अश्वमेधपर्व जैमिनि कृत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ अठ्ठावन्नाव्यांत कथियेला ॥२११॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे अश्वमेधपर्वणि अष्टपंचाशत्तमाध्यायः ॥५८॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ श्रीपांडवप्रताप अश्वमेधपर्व अष्टपंचाशत्तमाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP