खंड ९ - अध्याय २

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्‍गल म्हणती दक्षा सांप्रत । निवृत्त रूपधर गणेशाचें चरित । ब्रह्मभूतप्रद ऐक विनत । चित्त एकाप्र करूनिया ॥१॥
स्वानंद सकलांचा आधार । नाना ब्रह्मांत करी विहार । जगांत गोगभावें संयोगकर । मदात्मक सर्वत्र ॥२॥
तो स्वानंद नानामायायुक्त । नानाभावपरायण पुनीत । भावाभावादिहीन शोभत । नित्यचि यांत न संशय ॥३॥
अनंतकल्पकालें संपोष प्राप्त । निवृत्ति वांछित । मयाहीनकारणें भजत । जगद्‍ब्रह्मांसह तो गणेशासी ॥४॥
संयोगभावनाशास्तव पूजित । एकाक्षर विधानानें भक्तियुक्त । मंत्र जपून विभूस ध्यात । स्वह्रदयांत गजाननासी ॥५॥
द्क्ष विचारी मुद्‍लाप्रद । स्वसंवेद्यात्मक मंत्र ज्ञात । एकाक्षर जो महत्त्वयुक्त । अयोग गणनाथासस प्रिय कसा ॥६॥
मुद्‍गल सांगती तयाप्रत । शब्दशब्दार्थसंयुक्त । मंत्र गणपतीचा ख्यात । स्वसंवेद्यात्मक संमत सर्वशास्त्रीं ॥७॥
नाम एकदेशमात्रें असत । तोच अयोगवाचक जगांत । तेथ शब्दशब्दार्थ नसत । तैसाचि त्यांचा योगादिकही ॥८॥
वर्षशत जातां गणनायक प्रसन्न । आला स्वानंदास देण्या वरदान । निजभक्त सुखप्रदा महान । त्यास पाहून आल्हादित ॥९॥
स्वानंद प्रणाम करून पूजित । गजाननास भक्तिसंयुत । दक्ष विचारी संशय मुद्‍गलाप्रत । देह गजाननाचा सगुण ॥१०॥
मस्तक त्याचें निर्गुण पर । त्यांचा अभेद होतां थोर । गजानन मूर्ति शोभे उदार । निजात्मक हें ज्ञान असे ॥११॥
अयोगांत ना सगुण निर्गुण । त्यांचा संयोग अशक्य जाण । तरी अयोगांत वाचक गजानन । हा संशय दूर करावा ॥१२॥
मुद्‍गल म्हणती तयास । सिद्धि देहमयी माया त्याची सुरस । नाना भ्रम त्यागून एकरस । लीन झाली शरीरीं ॥१३॥
नानाज्ञानप्रभाव सोडून । बुद्धिशिर गणेशाचें शोभन । भ्रंतिधारक भाव होऊन । तल्लीन ती जाहली ॥१४॥
त्यांच्या योगें स्वसंवेद्य । ब्रह्म संयोगधारक ह्रद्य । गजानन आकृतींत आद्य । लीन भावें तें शोभें ॥१५॥
सिद्धिबुद्धिविहीन । हा अयोगवाचक होऊन । गजवक्त्रादि चिन्ह । गणेशाचें ख्यात होई ॥१६॥
शब्दशब्दार्थसंयोगें गजानन । या तिघांहून भिन्न । अयोगांत सदैव शोभन । उभयमायावर्जित सदा ॥१७॥
आतां ऐक चरित्र प्रकृत । शांतिदायक हें पुनीत । स्वसंवेद्य स्तवन करित । गणेशाचें हर्षभरें ॥१८॥
सर्व स्वानंद स्तुति गात । अजपुराणपर अव्यय असत । निवृत्तिमात्र समाधिस्थित । अयोगरूप आद्य गणनाथ ॥१९॥
त्या निर्मायिकास प्रमेयास वंदन । करितों मीं भक्तिभावें नमन । जो जारज नसे स्वेदज न । अंडज वा उद्‍भिद नसे ॥२०॥
ना स्थावर जंगम । अनादिमध्यांतरूप मनोरम । अमोघरूपा करितों नमन । निर्मायिका अप्रमेयासी ॥२१॥
न भूस्वरूप न जल । न प्रकाश न वायुरूप उज्ज्वल । न आकाश न राजस तामसमल । निर्मायिका नमन अप्रमेयासी ॥२२॥
न जागृत न स्वप्नगत । नदेव न सुषुप्तींत रत । न तुरीयसंस्थ न बिंदुस्थित । नमन त्या निर्मायिक अप्रमेयासी ॥२३॥
न सोऽहं न बोध न विबोध । न मोहयुक्त न मोहविशुद्ध । न निर्गुण न सगुण प्रबोध । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥२४॥
न कर्मरूप न ज्ञानरूप । न सम न अधीनतम न सरूप । न स्वात्मग सर्वविकाररहित रूप । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥२५॥
न असत्स्वरूप न सत्स्वरूप । न समानरूप न नेतिरूप । विविधांत निजात्मरूप । नमन निर्मायिका अप्रमेयासी ॥२६॥
न अनंतरूप न एकरूप । न सम न तुर्यं न पंचम एक । सदा गणेशाकृतिरूपधारक । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥२७॥
न आगत न गत । गणेश अयोगरूप ख्यात । सदा निवृत्तिमय आसंमतांत । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥२८॥
वाणीनें वर्णन करण्या अशक्य । अयोगभावें मनन अशक्य । कैसें त्याचें वर्णन करूं मीं समायिक । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥२९॥
न सिद्धियुक्त न बुद्धियुक्त । न मायिक ब्रह्ममय गजवक्त्र । अनंतपार परेश वर्तत । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥३०॥
त्रिनेत्रधरासी गजमुखासी । चतुर्भुजधरासी एकरदासी । महोदरासी वाहनहीनगासी । नमन निर्मायिक अप्रमेया त्या ॥३१॥
जो न योगनिष्ठ न विहारयुक्त । निजात्मनामनगरींत स्थित । निजसमुद्रीं न विहार करित । नमन निर्मायिक अप्रमेया त्या ॥३२॥
न भक्तभक्तिप्रिय । तथापि योगें निवृत्तिद अभय । अपार मायामयपाशहार अप्रमेय । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥३३॥
अहं विकारें विमोहित । म्हणून गणेशाधिपते भ्रान्त । भटकत जगांत नानाविध मीं ह्रदयांत । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥३४॥
समाधिरूप मी अचिंत्यभाव । सर्वात्मक सर्वविवर्जित सदैव । भ्रमण करितों निवृत्तिदात्या रक्ष सर्वथैव । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥३५॥
सुसिद्धिबुद्धिप्रद मोहयुक्त । नानाविध आत्मरूप विमागगत । चतुर्विध पदार्थांत भ्रांतीनें भ्मरत । नमन निर्मायिका अप्रमेयासी ॥३६॥
शोभन खेलयुक्त मी असत । सुखेतर योगानें तदात्म पावत । शांतिद सौख्य अणुहि न जाणत । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥३७॥
अनंतभावें विमोहित । मज रक्ष तुझे चरण प्रिय मजप्रत । निवृत्ति देई परार्थभूत । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥३८॥
गणेशासी निवृत्तिधारकासी । परेशासी सुखसागरनिवासीसी । हेरंबासी महोदरासी । ब्रह्मपतीसी सुशांतासी नमन ॥३९॥
अयोगरूप गणनायक । प्रवेशहीनत्वें कैसें शोधूं साशंक । ढुंढे दयापरा स्तवितो तारक । विघ्नपते तुज नमो नमः ॥४०॥
मुद्‍गल वृत्तान्त सांगत । ऐसें स्तवून स्वानंद नमित । गणेशानासी हर्षयुक्त । भक्तियुक्त तो नमन करी ॥४१॥
श्रीगणेश तयास म्हणत । वर माग महाभागा सांप्रत । देईन सारें ह्रदयवांछित । मायामायिक मोहें दुःक तुजसी ॥४२॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र सर्वशांतिद । मायासंभव दुःख नाशकर सुखद । वाचका श्रोत्यांस सर्वद । जें जें इच्छी तें तें मिळे ॥४३॥
असाध्यही साध्य होत । मर्त्यास श्रवणें निजप्रद वर्तत । ऐसें ऐकून गणेशवचन उदात्त । स्वस्वरूपक म्हणे तयासी ॥४४॥
प्रथम करून वंदन । नंतर करपुट जोडून । ससर्वस्वानंद बोले वचन । विघ्नेशा जरी तूं संतुष्ट ॥४५॥
तरी निवृत्तिज सुख देई । अन्य सुखाची इच्छा न ठेवी । भ्रांतिपद माया निवारी ही । हाच वर मी मागतसे ॥४६॥
तथाऽस्तु ऐसें बोलून । गणेश पावले अन्तर्धान । स्वानंद स्वस्थानीं ख्निन्नमन । तेथेंच बसून राहिला ॥४७॥
अयोगनाथा त्या स्मरत । ब्रह्ममुख्य विश्वें लय पावत । त्यासमयीं स्वानंदांत । निजानंद स्वयं नष्ट तैं ॥४८॥
मायाहीनप्रभावें अयोगस्थ । मोदें ती तेथ शोभत । संयोगमायेनें हीन असत । कांहीं न त्यास दिसे तैं ॥४९॥
आपुला आत्मा वा अपर । मुख्य अयोग गणनायक थोर । कांहींच न दिसे तयास सत्वर । सर्व बंधविनिर्मुक्त झाला ॥५०॥
स्वस्वरूप तो होत । हें सर्व तुज कथिलें सांप्रत । अयोगाचें थोर चरित । अयोगांत कांहींच नुरे ॥५१॥
तूं मी हें ब्रह्म शाश्वत । न गणेश स्वसंवेद्य असत । त्यायोगे निवृत्ति लाभत । ऐसा प्रभाव अयोगाचा ॥५२॥
जो हें अयोग चरित वाचील । अथवा भक्तीनें ऐकेल । तो प्रथम ऐहिक भोग भोगील । अंतीं निवृत्ति लाभेल ॥५३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते अयोगचरितकथनं नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP