मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ५०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्ष म्हणे मुद्‍गलाप्रत । योगिध्येय गणेशरूप संमत । अयोग्यांसी ध्यान करण्यास जगांत । प्रत्यक्ष शक्य नसे तें ॥१॥
वेदादींत ऐसें कां असे वर्णित । तें सांगावें मज प्रत । संशय दूर करावा समस्त । योग्यायोग्य सामर्थ्याचा ॥२॥
मुद्‍गल म्हणती अयोगिजन । जाणती पंचभूतमय गजानन । सर्वतुल्य त्यास देहधारित समजून । योगरूप न ओळखती ते ॥३॥
योगमय रूप त्यांच्या ह्रदयांत । दक्षा स्फुटरूपेंही न विलसत । योगिजन गणेशाचें योगरूप जाणत । त्यांतला भेद तुज सांगतों ॥४॥
समष्टियष्टिरूप युक्त । ब्रह्म वेदांत असे कीर्तित । कुंभस्थळीं गणेशाच्या पाहत । तन्मय होऊनिया सदा ॥५॥
गणेशाच्या तीन डोळयांत । तिविध विविध पाहती संगत । महाकारणरूपा सोंड ज्ञात । बिंदु कंठ , दंत सोऽहंमात्रा ॥६॥
बोधरूप गणेशाचें जठर । सांख्य काय कर्ण सुंदर । चतुर्विध ब्रह्म चतुर्भुजमय उदार । त्या गणेश महात्म्याचें ॥७॥
मायामोहयुत ब्रह्म । मोहहीन सुसाक्षिक परम । दोन पाय गणराजाचे मनोरम । योगीजन पाहती सत्यार्थें ॥८॥
संहार नामक जें ब्रह्म । तो परशु मनोरम । नियंत्राख्य अंकुश अभिराम । कमल तें सृष्टिरूप ॥९॥
पाश मोहमय परम । बंध मोक्षात्मक नित नेम । दुष्ट नाशकर निष्काम । अभय देई भक्त जनांना ॥१०॥
रक्षक वांछितार्थप्रद । सकामकांना वरप्रद । म्हणून त्यास म्हणती कामद । चिंतामणि भुक्तिमुक्तिप्रद ॥११॥
अक्षीणतेज चंद्र असत । अमृत ब्रह्म निश्चित । स्वानंदाख्य परब्रह्म नगर असत । इक्षु सागररूप रस ब्रह्मा ॥१२॥
पंचचित्तमयी बुद्धि वर्तत । तेथ ऐश्वर्य भ्रमात्मिका सिद्धि ज्ञात । त्या उभयांस माया म्हणत । योगी योगभावानें ॥१३॥
मूषक व्यापक परम वाहन । धर्मं अधर्म ते छाती पाठ असून । शुभ अशुभ रोम पावन । औषधी ही अनुक्रमें ॥१४॥
कल्प हे उन्मेष निमेष । लक्षलाभ सुत सर्वकार्य प्रवर्तद विशेष । जैसें ठेवावें लक्ष्य । तैसा लाभ होतसे ॥१५॥
ऐसें विविध ब्रह्माकार । ख्यात त्या गणेशाचे थोर । म्हणोनि गणाध्यक्ष सर्वसार । ब्रह्मणस्पति नामें ख्यात ॥१६॥
योगिजन शुक प्रमुख ध्याती । देहधारीस त्या स्वचित्तीं । ब्रह्मरूप जो साकार जगतीं । तैसाचि विभुत्वें निराकार ॥१७॥
सगुण तो कंठापर्यंत । गजवाचक निर्गुण ख्यात । त्यांच्या योगें मस्तक शोभत । ऐसा हा गणेशयोग जाणावा ॥१८॥
योगिध्येय हें रूप वर्णित । वेदादींत योगाकार ज्ञात । गणपतीचें स्वभावतः वर्तत । ऐसें रहस्य जाणावें ॥१९॥
दक्ष विचारी हें ऐकून । मूषक हया गणेशाचें वाहन । कैसा केव्हां झाला तें मज लागून । सांगा सर्वज्ञा कृपानिधे ॥२०॥
मुद्‍गल तयास सांगती । मायेनें व्यापक ब्रह्म जनां मोहविती । शुभाशुभविवर्जित वृत्ती । भोगिती भोग जनांच्या द्वारें ॥२१॥
मुष धातूचा चौर्य अर्थ । तोच मूषक असे ज्ञात । व्यापक चौरासम सर्वास भोगित । ह्रदयीं त्यास मोहवून ॥२२॥
त्यानें तपश्चर्या करून । आराधिला व्यापकानें गजानन । तेव्हा गणेशानें होऊन प्रसन्न । केलें वाहन तयास आपुलें ॥२३॥
त्या मूषकाचा मोद वाढविला । वाहनरूपें त्यास उद्धरिला । मायामोहावरी ठेविला । आपुला ताबा गणेशानें ॥२४॥
हें सर्व धूम्रवर्ण चरित । नाना आख्यानयुक्त । सर्वसिद्धिप्रद पुनीत । सांगितलें तुज प्रजापते ॥२५॥
जो हें वाचून दाखवील । अथवा स्वयं प्रेमें ऐकेल । तो सर्वसुखसंपन्न होईल । अंतीं ब्रह्मांत लीन होई ॥२६॥
या सदृश अन्य नसत । सर्वसिद्धिकर उपाय अद्‍भुत । जेथ गणेशान साक्षात । वर्णिला असे धूम्रवर्ण ॥२७॥
जें जें इच्छित तें तें लाभत । यांत संशय कांहीं नसत । शुभ परिणाम भोगित । मानव याच्या वाचनानें ॥२८॥
जो हें लिहवून घेऊन । अथवा स्वयं घेत लिहून । घरीं स्थापून करी पुस्तकपूजन । तेथ राक्षसादींचें भय नसे ॥२९॥
अन्यही भय तेथ नसत । भोग विविध भक्तां लाभत । पुत्रपौत्र मित्र प्राप्त । अंतीं स्वानंद लोकीं जाई ॥३०॥
स्वानंद लोकांत नंतर होत । गणेश तन्मयतायुक्त । हा धूम्रवर्णाचा खंड प्रख्यात । धर्मार्थका मोक्षदाता ॥३१॥
वाचितां अथवा ऐकतां लाभत । पुरुषार्थचतुष्टय निश्चित । तीर्थें विविध हिंडून । ला भत । अथवा तप घोर करूनियां ॥३२॥
ऐसें विविध फळ लाभे त्वरित । या ग्रंथाच्या श्रवणें जगांत । इष्टापूर्तादिक जें करित । त्याचेंही फळ लाभेल ॥३३॥
इष्ट म्हणे यज्ञयाग जाण । पूर्त सामाजिक कार्य शोभन । यात्रादि पूजाविधि मनमोहन । करितां लाभतें जें पुण्य ॥३४॥
तें या खंडाच्या श्रवणें लाभत । काय वर्णावें फळ अमित । यासम अन्य कांहीं नसत । नानाविध साधनांत ॥३५॥
जेथ योगपति साक्षात । धूम्रवर्णक असे स्तुत । त्या ग्रंथासम काय असत । तुलना त्याची कैसी होय ॥३६॥
सर्व सिद्धिकर पूर्ण । कथिलें चरित्र हें पावन । धूम्रवर्णाचें यथामति प्रमाण । संक्षेपानें दक्षा हें ॥३७॥
विस्तारपूर्वक वर्णन । याचें करण्या असमर्थ मान । शिवादिदेव महान । वेद योगीजनही जगीं ॥३८॥
तेथ माझा काय पाड । आतां गणेशास भजे जो सुखद । यत्नें करून केलें विशद । जेवढें शक्य मज झालें ॥३९॥
अथवा जरी तूं ऐकण्या इच्छित । तरी तें तुजसी सांगेन निश्चित । सूत म्हणे ऐसें बोलून थांबत । महायोगी मुद्‍गल तैं ॥४०॥
दक्ष आल्हादित मन । हात जोडून करी नमन । म्हणे धूम्रवर्णाचें चरित्र महान । आपण मला निवेदिलें ॥४१॥
जैसें दक्षास मुद्‍गलें कथिलें । तैसें मीं तुम्हां सांगितलें । सर्वसिद्धिकर जें शोभलें । नाना आख्यानांनी युक्त ॥४२॥
ऐसें सारें ऐकून । महाभागा तोषलेंना मन । आतां अन्य काय ऐकण्या पावन । इच्छिसी तूं सांग मजला ॥४३॥
श्रीगणेशगुरूस वंदून । संपविला अनुवाद या खंडाचा पूर्णं । पुढिले खंडीं असे वर्णन । योगगीतेचें सुदुर्लभ ॥४४॥
हें सारें प्राकृतांत । करिता जाहला जो प्रमाद येथ । तो क्षम्य करून सीतारामाप्रत । स्फूर्ति देवो श्रोगणराज ॥४५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते फलश्रुतिवर्णनं नाम पंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

॥ इति श्रीमुद्‍गलपुराणे अष्टमः खंडः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP