मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ४६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ आसिक म्हणे पित्याप्रत । बाल्यापासून मी शैव असत । त्या शंकरास सोडून सांप्रत । कैसें भजूं विघ्नपा सांग ॥१॥
जरत्कारु म्हणे सुतासी । त्यायोनियां गणेशासी । शांति न लाभेल कोणासी । शंभुप्रमुख देव त्यास ध्याती ॥२॥
गणेशाचें करून ध्यान । ते जाहले शांतियुक्त पावन । शिवविष्णु आदि भावांत महान । ब्रह्मशब्द उपयोजिती ॥३॥
एकांशें कारण गणेश अंश त्यांत । वसे ऐसें वेदवादी सांगत । त्यांच्यांत योग आराधून प्राप्त । शांति सदा योगिजनांसी ॥४॥
ती शांति स्वल्पभावयुक्त । न मुख्य ऐसें योग्यांचें मत । शांतिप्रद ख्यात । गणेश हा ब्रह्मणस्पती ॥५॥
त्यास भज विधानयुक्त । तरीच शांति लाभेल तुजप्रत । गणेशमायेनें युक्त । पंचप्रकारें ज्ञात असे ॥६॥
जो पंचभेदविहीन । तो निर्मायिक गजानन । मायायुक्तविहीनत्व जाण । भ्रांतिमात्र हें सारें ॥७॥
त्यांच्या संयोगें गणेशान । शांतिरूप अस महान । म्हणून गणेशाहून भिन्न । शिव असे ख्यात जगीं ॥८॥
तरी अज्ञाजोत्पन्न दुःख त्यजून । अभेदरूप गणपाचें करी भजन । येथ संवाद पुरातन । सांगतो शंकरउपमन्यूचा ॥९॥
तो संवाद सर्वशांतिप्रद । महाभागा असे सुखद । महापाशुपत थोर । उपमन्यू होता महायश ॥१०॥
त्यास सहज शंकरब्रह्मज्ञान । होऊन जाहला मनीं खिन्न । शंकरासन्निध जाऊन । प्रणाम करून पूयासी ॥११॥
स्तवन करून हात जोडित । महामुनि उपमन्यू तयास म्हणत । सहज शांकर ब्रह्म स्वाधीन असत । दोषसंयुत तें वाटतसे ॥१२॥
स्वाधीन तैसा पराधीन । हा भेद ब्रह्मांत नसे म्हणून । ब्रह्मभूयकर योग मज लागून । सांग सांप्रत सदाशिवा ॥१३॥
ज्यायोगें मी शिवता लाभून । शांतिस्थ तयास भजेन । ऐसें त्याचें वचन ऐकून । सदाशिव हर्षभरित ॥१४॥
या महाभागास सांगत । गाणेश नामक योग पुनीत । म्हणे एकदा काशी नगरांत । जैगीषव्य मज भेटला ॥१५॥
तोही तुजसम पाशुपताग्रणी । मज विचारी प्रश्न झणीं । शिव सहजसंज्ञ म्हणोनि । ब्रह्मांत सहजंता कैसा असे ॥१६॥
म्हणोनि परम शैव योग । सांग मजला सुखप्रद शांतिग । विश्वनाथ सांगे उपाय योग । आचरी गणेश भजनाचा ॥१७॥
तेव्हांच शांति लाभेल । मीही शोधिला ढुंढी अमल । योग साहाय्यें ह्र्दयीं सबळ । हरण करून स्थिर केला ॥१८॥
माझें हें रम्य वचन । ऐंकोनि दुःखित त्याचें मन । जैगीषव्य म्हणे मज लागून । वचन तें तुज सांगतों ॥१९॥
विश्वेश्वरा देवा त्यजून । अन्यास विश्वपा न भजेन । अशांति अथवा शांतिद महान । शिव हीच मज परमगती ॥२०॥
असत्‍ शक्ति सद्‍ भानु असत । हरि सम शिव अव्यक्त । चारांच्या योगें स्वानंद गणनाथ ख्यात । बोध तैं केला मीं तयासी ॥२१॥
तोच मायेनें पंचविध झाला । मायाहीन अयोग पंचवर्जित भला । त्यांच्या योगें शांतिप्रद जगाला । पूर्ण वाचक ब्रह्मनाथ ॥२२॥
म्हणून आम्ही ब्रह्मप्रवाचक । लीलेस्तव आपलें रूप विशेषक । गणनाथ असे घेत । सकौतुक । तेथ कालभिन्नत्व गौण असे ॥२३॥
भेदबुद्धी त्यागून । विघ्नेशा भज एकनिष्ठ मन । शंकर गणनाथाहून न भिन्न । त्याचेंच रूप शंकर जाण ॥२४॥
ऐसें बोलून जैगिषव्याप्रत एकाक्षर । गणेशमंत्र देत । विधिपूर्वंक तैं तो जपत । ध्यान सिद्धिस्तव निरंतर ॥२५॥
त्यायोगें यथान्याय साधून । योग गाणेशयज्ञ महान । नंतर ब्राह्मणस्पत्य यज्ञ । आरंभिला तयानें ॥२६॥
आनंदानें यज्ञ करून । द्विजांस नमून केलें प्रसन्न । तेव्हां विघ्नेश वरदायक येऊन । उभा ठाकला तयापुढें ॥२७॥
त्यास पाहून त्वरित उठत । प्रणाम करून त्यास पूजित । पुनरपि नमून स्तवन करित । यजुःस्तोत्रें त्या समयीं ॥२८॥
योग शांति तया जैगीषव्याप्रत । योगांत आचार्य तयास करित । बुद्धिमंता त्यास तोषवित । नंतर अन्तर्धान पावला ॥२९॥
नंतर गुरूस शिवास । भजूं लागला ढुंढिराज दैवतास । गाणपत्य स्वभावें करी पूजनास । काशीत राहून तो मुनी ॥३०॥
म्हणून तूं गणनाथास भजावें । जेणें शांति प्राप्त तुज स्वभावें । शांतीस शांतिदाता तो गौरवें । सर्वांचा योगधारक ॥३१॥
जरत्कारू म्हणे ऐसें बोलून । एकाक्षर मंत्र दिला महान । उपमन्यूस विधिपूर्वक प्रसन्न । त्यानें तो मोदें स्वीकारिला ॥३२॥
गुरूस करून वंदन । त्यानें केलें मंत्रध्यान । गणेशास इष्टि अर्पून मन । शांत केलें तयानें ॥३३॥
गणेश शांतिरूप होत । गणराज स्वयं प्रकटत । त्या महामुनीस देत । शांतियोग त्या वेळीं ॥३४॥
उपमन्यू करी स्तुति । ती ऐकून गणेश चित्तीं । तोषले ब्रह्मनायक अन्तीं । अन्तर्धान पावले सत्वर ॥३५॥
म्हणून तूं संशय सोडून । विघ्नपतीचें करी भजन । हयांत व्यभिचार कांहीं नसून । शांतियुक्त यानें होशील ॥३६॥
सूत म्हणे ऐसें बोलून । त्यास षडक्षर मंत्र पावन । विघ्नपतीचा देऊन । अस्तीकासी धन्य केलें ॥३७॥
आस्तीकें ध्यान करून ह्रदयांत । साधिली गजाननाची पूजा पुनीत । इष्टि करून शांतियुक्त । गणेशकृपा प्राप्त त्याला ॥३८॥
गाणपत्यप्रिय अत्यंत । तो आपुल्या मातेजवळी जात । तिज गणेशज्ञान उपदेशित । शांतियुक्त केलें तिलाही ॥३९॥
गणपतीस प्रीतियुक्त । सतत राहिला भजत । अंतीं गणेश्वर धामांत । ब्रह्मरूप तो जाहला ॥४०॥
ऐसें हे कथिलें तुजप्रत । ब्रह्मणस्पति यज्ञाचें चरित । गाणपत्यप्रिय माहात्म्य अद्‍भुत । संक्षेपानें एवढें मीं ॥४१॥
जो हें माहात्म्य वाचित । अथवा श्रद्धेनें ऐकत । सकळ सिद्धि त्यास लाभत । भुक्तिमुक्ति लाभ होई ॥४२॥
ब्राह्मणस्पत्य यज्ञाचें फळ । लाभेल त्यासी निर्मळ । अंतीं स्वानंदग सबळ । होऊन ब्रह्मभूत होईल ॥४३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते ब्राह्मणस्पत्ययज्ञमाहात्म्यवर्णनं नाम षट्‍चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP