मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ४५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ गणेशाय नमः ॥ जरत्कारु म्हणे कौंडिण्याप्रत । ब्रह्म नानाविध वेदांत । वेदवादी सांगतात । अन्नप्राणादी भेदांनीं ॥१॥
क्रमसिद्धिस्तव वर्णित । मनोमय ब्रह्म ऐसें शास्त्रांत । त्यांत तें ब्रह्म असत । मनःकोशाचे प्रकाशक ॥२॥
तें महाभागा मुख्य नसत । सूक्ष्म तें स्वप्नविकारज मन ज्ञान । बुद्धि अहंकार चित्त । चतुर्विध ऐसें अन्तःकरण ॥३॥
मुनिसत्तमांनों शास्त्रांत । वर्णिलें असे सुविख्यात । चिंतामणि त्या चित्तांत । प्रकाशकरूपें विलसतसे ॥४॥
मन ब्रह्म कलात्मक । प्राण मन विज्ञानात्मक । त्रिविध स्वप्ननामक । त्यांत एकदेशें वास करी ॥५॥
तथापि ब्रह्माकार गजानन । तरी तो शांतिप्रद तत्त्व म्हणून । ब्रह्मणस्पतीचा गौरव महान । आपण कैसा करिता सदा ॥६॥
कौंडिण्य तें ऐकून म्हणत । योग्य प्रश्न तुझा असत । सर्वांसी हा हितप्रद असत । सांगतों गणेशा नमून ॥७॥
सांख्ययोगादिभेदस्थ । मार्ग नानाविध असत । पदार्थशोधनास्तव वेदवादांत । जाणावें ते सत्यार्थे ॥८॥
अन्य प्राणादिक शब्द असत । ब्रह्मवाचक निश्चित । तेथ चित्त समाख्यात । अन्तःकरण परमश्रेष्ठ ॥९॥
एकभागाश्रित चित्ता । मन ब्रह्मांत संस्थित । पदार्थ शोधनाख्य तद्विधीत । जाणावें तूं मानदा ॥१०॥
कांहीं वेदविवादांत । बुद्धि मनाहून श्रेष्ठ ज्ञात । त्याहून ब्रह्म श्रेष्ठ असत । शांतिप्रद सर्वसंमत ॥११॥
अंतःकरणांत बुद्धि असत । एका भागांत व्यवस्थित । म्हणोनि ती मुख्य नसत । त्याचपरी चित्त बुध म्हणती ॥१२॥
येथ दुसरा बोधप्रद । मार्ग सांगतों तुज विशद । एकलक्ष देऊन सुखप्रदा सुखप्रदा । ऐस विप्रा संशयहारी ॥१३॥
देह क्रियात्मक असत । मन बोधात्मक ज्ञात । त्यांच्या योगें स्वयं बुद्धि वर्तत । द्वंद्धधारिका मोहप्रदा ॥१४॥
गणेश उपासना होत । द्वंद्वदुःखहारक बुद्धि पुनीत । ब्रह्मकारात्मयोगें ज्ञात । बुद्धि सदा बुद्धिमंतांची ॥१५॥
ती बुद्धि त्याहून अतीतात । गणपांत लीन होत । तेव्हां शांति युक्त चित्त । ब्रह्मभूत होई जंतू ॥१६॥
मी गणेशरूप होता । मी देह मी भ्रांति तत्त्वता । कुठला मनोमय मोहपरता । विवेक स्फुरतां चित्तांत ॥१७॥
त्यांच्या संयोगें योगयुक्त । कैसा भ्रम संभवत । द्वंद्वभावयुक्त असोनि होत । द्वंद्ववर्जित तो गणेश ॥१८॥
ऐसें रहस्य जाणत । तो महायोगी शांति लाभत । गणेशांत गणेशभक्त । गणनाथ स्वयं होऊनी ॥१९॥
ऐश्या प्रकारें बुद्धिमय चित्त । तेथ चिंतामणि तो जाणत । तैं नर होय ब्रह्मभूत । विप्रेशा आणखी तुज सांगतों ॥२०॥
मन हें विवेक धारक असत । विवेकें अभिमान उमजत । विविध क्षेत्रांत म्हणोनि ज्ञात । अहंकार हा मनोमय ॥२१॥
बुध सांगती वेदवादांत । बुद्धि मनाहून पर असत । ज्ञानात्मिक ती ख्यात । तीच द्विधा जाहली ॥२२॥
जड बुद्धि ती क्रियामूल देहांत । चैतन्यदा मनोमयी ज्ञात । वृद्धि क्षयादिक ज्ञान प्रतिष्ठित । देहांत तें बुद्धिजन्य ॥२३॥
देहात्म्यांत विवेकाख्य ज्ञान । मनांत संस्थित तें शोभन । बुद्धिज तें क्षयवृद्धयादिहीन । चैतन्यधारक वर्ततसे ॥२४॥
त्यांच्या योगें बुद्धि होत । ज्ञानरूप ज्यांच्या अतीत । ब्रह्माहं मी ब्रह्म या शब्दांत । मनोवाणी विवर्जित ॥२५॥
बुद्धिरूप महान चित्त । जाण तत्स्वरूप उदात । त्याचें लक्षण संशयातीत । सांगतों तुज प्रीतीनें ॥२६॥
चित्त प्रकाशक ख्यात । प्रकाश बुद्धिजन्य असत । म्हणोनि गणनायक ख्यात । बुद्धीशा या नांवानें ॥२७॥
चित्त पंचविध ज्ञात । क्षिप्तमूढ विक्षिप्त । एकाग्र तैसें निरोधक असत । मतानुसार मुख्य मुनींच्या ॥२८॥
देहदेहिमय चित्त । एकाग्र ऐसे शास्त्रसंमत । मन हें स्वप्नमय असत । ब्रह्म देहरूपधारी ॥२९॥
म्हणून मनोमय चित्त न समजावें । प्रकाशकारक तें बरवें । सर्व शास्त्रांत संमतभावें । संयोग अयोगें निरोधक ॥३०॥
नाना ब्रह्में एकाग्र । निरोधमय तीं समग्र । देहदेहि प्रकाशे एकाग्र । चित्त होतें ऐसें म्हणती ॥३१॥
संयोग अयोग प्रकाशत्वानें ज्ञात । विरोधक चित्त शाश्वत । ऐसें निरूपिलें पुजप्रत । ज्ञानरहस्य गणेशाचें ॥३२॥
गणनायकास त्या तूं भजावें । योगींद्रवंद्य तेणें व्हावें । सुशांतिगासी स्मरावें । तरीच कल्याण होईल ॥३३॥
जरत्कारू म्हणे ऐसें बोलून । कौंडिण्य शांत बैसतां वंदन । जरत्कारू करी तयास प्रसन्न । साधन करी गणेशयोगाचें ॥३४॥
गाणपत्य त्यायोगें होत । अस्तिका तूंही भज त्याप्रत । शांतिप्राप्तर्थ आदरयुक्त । तूंही गणनाथास पूजावें ॥३५॥
सूत म्हणे ऐसें बोलून । जरत्कारू धरी मौन । त्या वेळ आस्तिक बोले वचन । विशेषज्ञ तयासी ॥३६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंड धूम्रवर्णचरिते जरत्कारुयोगप्राप्तिवर्णनं नाम पंचचत्वारिंशोध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP