मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ३३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढें सांगती । गणेशप्राप्तीची इच्छा चित्तीं । गालव विश्वामित्रास विनंती । तदुपायार्थ करता झाला ॥१॥
तो म्हणे त्या मुनिश्रेष्ठास । इच्छितों विघ्नेशाच्या दर्शनास । उपाय सांगावा विशेष । तुमची आज्ञा पाळीन मीं ॥२॥
तैसें आचरण करीन । विश्वामित्र तैं बोले वचन । श्रावणमासाचें आगमन । सांप्र्त होणार गालवा ॥३॥
ह्या सौख्यप्रद महिन्यांत । अनुष्ठान करी गणेशभावयुक्त । तरी गणेशास निश्चित । सिद्धियोगें श्रावणव्रताच्या ॥४॥
ऐसें बोलून त्यास देत । एकाक्षरमंत्र पुनीत । त्यासी प्रणाम करून जपत । गालव तो मंत्र श्रद्धेनें ॥५॥
श्रावणांत गणेशाचें ध्यान । पुरश्चरणाची करून । जपिला मंत्रराज यथाविधान । दुग्धाहार करोनी ॥६॥
गणेशासी तोषवित । सदा त्याच्या ध्यानीं रत । त्याचेंच चिंतन जो करित । गालव भक्त एकनिष्ठ ॥७॥
अमावास्येच्या दिनीं प्रकटत । भक्तिभावें तेथ निमंत्रित । सिद्धिबुद्धींच्या सहित । सिंहारूढ होऊनियां ॥८॥
त्याचें होतांचि दर्शन । गालव प्रेममग्न होऊन । त्वरित वरती उठून । प्रणाम करून पूजी तयासी ॥९॥
पुनः प्रणाम करित । सर्वेशास विघ्ननायका त्या स्तवित । आनंदाश्रू त्याच्या नयनांत । दाटले गणाध्यक्षदर्शनानें ॥१०॥
गालव सर्वसिद्धिप्रदायक स्तवित । होऊनियां मनीं मुदित । अमेयमायामयरूपा वंदित । मायाविहीना परमपरा मीं ॥११॥
योगासी योगेशासी । सुयोगदात्यासी विघ्नेश्वरासी । अचिंत्यरूपधारकासी । विघ्नेशासी नमो नमः ॥१२॥
सिंहगासी चतुर्भाहुधारकासी । सुरूपीसी स्वानंदपतीसी । स्वानंदनगरस्थितासी । अनंतविभवा तुज नमन ॥१३॥
हेरंबासी लंबोदरासी । देवासी देवदेवेशरूपासी । असुरनिहंत्यासी असुरासी । ब्रह्मरूपा तुज नमन ॥१४॥
सिद्धिबुद्धिविलासकरासी । ब्रह्माकारशरीरासी । एकदंतासी सगुणासी । निर्गुणा गुणात्म्या तुज वंदन ॥१५॥
सदा शांतिप्रदात्यासी । धूम्रवर्णासी पाशांकुशधारकासी । एकदंतासी प्रभयप्रधारकासी । नाभिशेषा सर्वादिपूज्या नमन ॥१६॥
स्ववूं कैसें मी तुजला । वेदसंघही मूक झाला । तुझ्या यथार्थ स्तुतीला । करूं शके ऐसा कोण ? ॥१७॥
म्हणून नमनमात्रें प्रसन्न । होई विघ्नपा तूं भक्तैकमन । सूत म्हणे ऐसें स्तवून । नाचूं लागला प्रेमानें ॥१८॥
म्हणे मी धन्य कृतकृत्य झालों । गणेशकृपेसी पात्र झालों । उद्धरून भवसागर गेलों । पुनः पुनः ऐसें म्हणे ॥१९॥
त्यास गणाधीश बोले वचन । माग गालवा वरदान । श्रावणव्रतें तुझ्या प्रसन्न । देईन जें मागशील ॥२०॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र । सर्वार्थप्रद पवित्र । पाठका श्रोत्यासी सर्वत्र । माझी भक्ती वाढवील ॥२१॥
धनधान्यप्रद भुक्तिमुक्तिद । आरोग्यादिकर ब्रह्मश्रद्धाप्रद । ऐसें बोलून गणेश विशद । थांबला ऐकण्या हृद्‍गत त्याचें ॥२२॥
गालव त्यास करी वंदन । जोडोनिया दोन्ही कर प्रसन्न । म्हणे भक्ति दे तुझी पावन । गाणपत्य करी मजला ॥२३॥
शांतिप्रद योग मज प्राप्त । व्हावा ऐसें मीं मागत । अन्य कांहीं नको मजप्रत । गजानना विघ्नेशा ॥२४॥
तस्थाऽतु म्हणून अंतर्धान । पावला देव गजानन । गालव खेदयुक्तमन । जाहला वियोगें गणपाच्या ॥२५॥
तदनंतर विश्वामित्रा समीप जात । वंदूत त्यास सांगे वृत्तान्त । तोही ऐकून हर्षभरित । म्हणे धन्य तूं गालवा ॥२६॥
तूं कृतकृत्य मान्य अससी । गणेशदर्शन लाधलासी । सच्छिष्य तूं पुत्रा मजसी । तारिलें या भवार्णवीं ॥२७॥
ऐसी प्रशंसा करित । विश्वामित्र गालव संमानित । पित्यास नमून जात । स्वच्छंदें तदनंतर तो गालव ॥२८॥
सदा गणपतीस भजत । भक्तिभावें अनन्यचित्त । गालव योगिवंद्य प्रख्यात । परमार्थवेत्ता जाहला ॥२९॥
गणेश भक्तिलालस रमत । समस्त गणेश क्षेत्रांत । अंतीं मयूरक्षेत्रांस । निवास करून तोषलासे ॥३०॥
तेथेंच राहून गणनाथास भजत । भावभक्तियुक्तचित्त । क्षेत्रसंन्यासविप्र पूजित । तदा गालवा गणेशप्रियासी ॥३१॥
तो त्यांसी गणेशकथा सांगत । विविध परींच्या पुनीत । ऐसें हें गालवमाहात्म्य असत । ऐकतां वाचितां सिद्धिप्रद ॥३२॥
दुसरेंही एक आख्यान । ऐकतां होईल मन प्रसन्न । महाराष्ट्रांत एक अंत्यज जन । दैवयोगें मुक्त झाला ॥३३॥
त्यानें श्रावण महिमा ऐकिला । द्विजमुखांतून एकदां भला । गणनाथावरी जडला । भाव त्याच्या चित्ताचा ॥३४॥
श्रावण मास लागतां आचरित । श्रावणमासाचें गणेश व्रत । स्नान करून नित्य जात । देवालयाबाहेरी ॥३५॥
नित्य तेथून करी नमन । भक्तिभावपूर्वमन । तदनंतर कुटुंब पोषण । करण्या व्यवसाय करी आपुला ॥३६॥
विविध कामें जनांची करित । द्रव्यप्राप्तिस्तव तो सतत । श्रीवणमास होतां समाप्त । मरण पावला तो दैवयोगें ॥३७॥
तेव्हां त्यास गाणप नेती । दूत ते आपुल्या लोकाप्रती । मार्गीं त्याच्या शरीरावरती । जो वारा वाहत होता ॥३८॥
त्या वार्‍याचा स्पर्श होऊन । पाच चोरांची बुद्धि पालटून । ते पापकर्मपरायण । परस्परांशी बोलती ॥३९॥
आपण नित्य पापें करितों । चोर्‍या बहुविधही करूनी देतों । लोकांसी दुख अपरिमित तरी तो । देव शिक्ष करील ॥४०॥
आपुली काय गती होईल । पाणीजनां नरक निळेल । यमयातना दुस्सह प्रबळ । भोगाव्या लागती निःसंशये ॥४१॥
तेव्हां आपणा सर्वां नरकवास । घडणार नित्य हें निश्चित कुवास । तरी यापुढें चोरीच्या व्यवसायास । सोडून देऊं आपण सारे ॥४२॥
ऐसा निश्चय करून । ते वनीं चालले मार्गातून । तों तेथ अवचित ब्राह्मण । तापसी दहा त्यांना दिसले ॥४३॥
त्यांस पाहून गाईंसहित । पापी ते चोर होत मुदित । खड्‍ग घेऊन धावत । ठार त्या द्विजां मारावया ॥४४॥
ते चोर निश्चय विसरले । तैं ते ब्रह्मण विनवूं लागले । अरे चोरांनो कायकेलें । आम्ही तुमचें नुकसान ? ॥४५॥
शस्त्र घेऊन करांत । तुम्ही पांच जण आलांत । गाई सहित । आम्हांस सांप्रत । सोडा विनवितों तुम्हांसी ॥४६॥
आमची हत्या करूं नका । प्राज्ञहो आम्हां ब्राह्मणा छळूं नका । ब्रह्महत्येच्या सम पातका । घेऊं नका आपल्यावरी ॥४७॥
त्यांचें तें ऐकून वचन । खड्‍ग खालीं । पापाचें भय वाटून । आपुलें नियमन करिती तदा ॥४८॥
त्या द्विजांसी विचारिती । आम्हांस सांगावें सांप्रती । ब्रह्महत्याभव पापास किती । घोर शासन देव करितो ॥४९॥
त्याच्या यातना किती होती । कोणत्या उपायानें होत क्षती । आम्हीं पापें करितों जगतीं । जन्मापासून सदा सर्वदा ॥५०॥
नानाविध पापें केली आजवरी । आमुचा व्यवसाय असे चोरी । तरी आतां आम्हांवरी । दया करा ब्राह्मणोत्तमांनो ॥५१॥
चोरांचें हें ऐकून वचन । ब्राह्मण । विस्मित होऊन । भयभीत मनीं कथिती वचन । लोकोद्धारपरायण ते ॥५२॥
पश्चात्तापानें नष्ट होतीं । चोरश्रेष्ठहो या जगतीं । यापुढें पापें या जगतीं । करूं नका निश्चयानें ॥५३॥
श्रावणांत गणनाथास पुजावें । ब्रह्मनायकास त्या स्मरावें । त्याचें व्रत आचरावें । तेणें पापमुक्त व्हाल ॥५४॥
तदनंतर ते महाभागा सांगती । श्रावण व्रताची महती । गोधन घेऊन जाती । आपुल्या आश्रमा परतोनी ॥५५॥
पुढें श्रावण मास लागला । तैं चोरांनीं निश्चय केला । स्वगृहीं परतून गणेश व्रताला । करिती ते दृष निश्चयें ॥५६॥
प्रातःकाळीं स्नान करून । नमिती भावबळें गजानन । प्रदक्षिणा प्रहर एक घालून । एकभुक्त ते राहती ॥५७॥
सर्वही चोर ब्रह्मचर्य पाळिती । श्रावणमास व्रत करिती । त्यायोगें साधू होऊन जगतीं । भोगिलें त्यांनीं अनंत भोग ॥५८॥
अंतीं स्वानंदलोकीं गेले । ऐसे बहुत जन या व्रतें उद्धरले । त्यांचें चरित्र पूर्णत्वें झालें । वर्णन करण्या असंभव ॥५९॥
किंचित नियम जे आचरती । त्यांची जर ही गती । संपूर्ण व्रत आचरती । त्यांना केवढें सुख लाभे ॥६०॥
कोणी हें व्रतमाहात्म्य वाचित । अथवा श्रद्धेनें ऐकत । त्यास ऐहिक पारलौकिक सुख लाभत । अंतीं लाभे गणेशपद ॥६१॥
ओमिती श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते श्रावणमासमाहात्म्यवर्णनं नाम त्रयत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP