मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ३१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत म्हणे आतां ऐकावें । श्रावणाचें माहात्म्य बरवें । सुखप्रद जें व्हावें । गणनाथास प्रिय म्हणोनी ॥१॥
तें संक्षेपानें सांगतों । वर्णन करण्या मोद होतो । विष्णु तोच राम होतो । दशरथाचा पुत्र प्रतापी ॥२॥
तो दाशरथि राम सभेंत । येतां एकदां विप्र जमत । त्यांची पूजा करून विचारित । आगमन कारण त्यांना ॥३॥
ते तेव्हां त्यास म्हणती । लवणासुर माजला अती । त्याचा वध करी ही विनंती । तुजला करण्या येथ आलों ॥४॥
त्यांची विनंती मान्य करित । राघव त्यांसी विचारित । त्या दुर्जंयावरी जय लाभत । ऐसा उपाय मज सांगावा ॥५॥
तेव्हां ते द्विज त्यास म्हणती । गणेशावरी अभिषेक भावभक्ती । गणेशसूक्तांचा घोष करिती । ते जन विजयी होतात ॥६॥
तैसें तूं करिता लाभेल । विजय तुजलाही बहुबळ । मासात श्रावणमास मुख्य विमल । सांप्रत सुरू होईल ॥७॥
हा मास विघ्नेशास अत्यंत । आवडता असे निश्चित । करितां हे श्रावणव्रत । संतुष्ट तो होईल ॥८॥
ऐसें बोलून तयास सांगत । श्रावणव्रताचा विधी समस्त । तेव्हां तो शत्रूघ्न भजत । गणेशासी भक्तीनें ॥९॥
उपोषण तो आचरित । दुग्धपानावरी जगत । अभिषेक करून तोषवित । विघ्नपासी स्वभक्तीनें ॥१०॥
श्रावणमासव्रत करून । गणेशासी नमून । ब्राह्मनासह राघव शत्रूघ्न । लवणराक्षसासन्निध गेला ॥११॥
त्रिशूलानें विहीन असत । ऐश्या त्या लवणासुराम रोधित । गणेश्वरास स्मरून मारित । दुष्टास त्या शरघातानें ॥१२॥
त्यांचे युद्ध अति भयंकर । चाललें तेथ समय उग्र शत्रूघ्नानें खड्‍गप्रहार । करून तोडिलें मस्तक त्याचें ॥१३॥
तेव्हां देवगण पुष्पवृष्टि । करिती त्यांच्या मनीं तुष्टी । शत्रुघ्नावरी परी तो समदृष्टि । जय हेरंब जयघोष करी ॥१४॥
ब्राह्मण त्यासी पूजिती । द्विजश्रेष्ठा करून प्रणती । त्या मथुरेसी भावभक्ती । आवासस्थान त्यानें केलें ॥१५॥
ऐसा काहीं काळ जात । तेव्हां स्वपुत्रास तेथ स्थापित । मथुर सोडून भक्तपरायण परतत । रामचंद्राजवळी तो ॥१६॥
ऐश्यापरी श्रावणमासांत । गणेंशाचें माहात्म्य ख्यात । अनुष्ठानाचें फल ज्ञात । सर्वसिद्धिप्रदायक ॥१७॥
दुसरीही एक कथा स्मरत । तीही तुज सांगेन सांप्रत । जालंधरवधास्तव आचरित । शिवशंकर व्रत तेव्हां ॥१८॥
जालंधर दैत्यानें जिंकलें । हें सर्व चराचर पीडिले । त्रैलोक्याधिपतिपाद प्राप्त केलें । वरदानप्रभावें त्यानें ॥१९॥
आसुर कर्म सर्वत्र करवित । दैत्यांसी सर्वत्र पाठवित । न स्वाहा न स्वधा मिळत । भूमिमंडळीं कोठेंही ॥२०॥
ऐसा बहुत काळ उलटत । तैं जालंधर जाहला मदोन्मत । पार्वतीस पकडण्या जात । युद्ध हो तेव्हां देवदैत्यांचें ॥२१॥
दैत्य जाहले पराजित । पळून गेले दशदिशांत । जालंधर तैं अतिकुपित । शस्त्र घेऊन लढूं गेला ॥२२॥
शंभूस जेव्हां तो जिंकित । अन्य सुरसंघ भयभीत । पळून जातां अंतर्धान पावत । महाशक्ति त्या वेळीं ॥२३॥
तेव्हां तो असुर अति विस्मित । स्वगृहास परतत । तेथ अतिविव्हाल दुःखित । कामबाणांनी पीडित तैं ॥२४॥
जगदंबिकेस पाठवित । कामाग्नि त्याचा चेतत । नाना शीतल जलस्पर्शात । त्यास समाधान न मिळालें ॥२५॥
देवगण समस्त लपले । पर्वतगुहेंत भयें राहिले । जालधंरनाशार्थ करूं लागले । विचार निश्चित उपायाचा ॥२६॥
तेव्हां बृहस्पति म्हणत । शकरादि सुरेंद्राप्रत । गणनाथ अनुष्ठान श्रावणांत । करावें तुम्हीं प्रियदेवहो ॥२७॥
त्याचें वचन मान्य करून । शंभु आदि देव तत्क्षण । गुरूसहित करिती पूजन । गणेशाचें दूर्बांदींनीं ॥२८॥
रात्रंदिवस ते भजत । एकचित्तें एकदन्त । श्रावण होता समाप्त । भाद्रपदांत यात्रा करिती ॥२९॥
पंचवीस पारणा करिती । गजाननास प्रणिपात भक्ती । तेव्हां आकाशवाणी तयाप्रती । माहादैत्यास मारण्या जावें ॥३०॥
तें दिव्यवचन ऐकून । शंकर करी युद्ध दारुण । महाघोर जालंधराचें हनन । केलेंत्यानें त्रिशूलघातें ॥३१॥
गजाननास स्मरे चित्तांत । तैं तो महासुर शिवदेहांत । तत्काल विलय पावत । देवमुनिजन करिती स्तुती ॥३२॥
जालंधर महादैत्यास जिंकित । देवादीस स्वस्थानीं स्थापित । सदाशिव वर्णाश्रम आयोजित । लोक सारे धर्म पाळिती ॥३३॥
नित्य श्रावण मासांत । अनुष्ठान करी भावयुक्त । एकनिष्ठपणें सेवित । शंभू गणनायकासी ॥३४॥
नित्य ध्यानपर होऊन । त्याचेंच करी तो चिंतन । ऐसें हें श्रावण मास महिमान । सांगितलें जें प्रभावी ॥३५॥
या व्रताच्या प्रभावें जिंकित । शंभु जालंधर असुरा मारित । जो हें वाची अथवा ऐकत । त्यास लाभ पुरुषार्थाचा ॥३६॥
इहलोकीं सौख्य भोगून । अंतीं मुक्त होऊन । स्वानंद साम्राज्य लाभून । धन्य होई उपासक ॥३७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते श्रावणमासमाहात्म्ये जालंधरवधो नामैकत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP