मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय २९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शिवदत्त पुनरपि प्रार्थित । गर्ग मुनीसी विनययुक्त । तुमच्या सुखकमलांतून रसयुक्त । शुकगीता ऐकिली मी ॥१॥
त्यायोगे झालें संतुष्ट । गणेशप्राप्ती हें माझें इष्ट । तें कैसें प्राप्त विशिष्ट । त्याचा उपाय सांगावा ॥२॥
तेव्हां गर्गं तयास म्हणत । समीप असे वैशाख मासव्रत । तें करोनी तूं श्रद्धायुक्त । गाणपत्य होशील निश्चयें ॥३॥
ऐसें बोलून महायोगी देत । गाणेशपंचक एकाक्षरयुक्त । विधिसमन्वित तयाप्रत । तदनतंर गर्गं निघून गेला ॥४॥
त्याचा निरोप घेऊन । गर्गं गेला स्वच्छंदें परतून । तदनंतर शिवदत्त व्रत पावन गणेशप्रीतीस्तव करीतसे ॥५॥
वैशाख महिन्यांत ध्यानसंयुक्त । गाणेशपंचकाची पूजा करित । मंत्रही जपे विधियुक्त । सर्वसिद्धप्रद गणेशाचा ॥६॥
शुद्धचतुर्थीस गणराज जात । ब्राह्मणरूपें तेथ क्षुधित । मुनी सन्निध जात । तेव्हां कृतांजलि तो नमितसे ॥७॥
त्या द्विजासी शिवदत्त म्हणत । मुने बसावें आसनीं सुखयुक्त । सांगावें आगमन कारण मजप्रत । जें शक्य तें मी करीन ॥८॥
विघ्नपाच्या प्रीतिस्तव तें करीन । तेव्हां ब्राह्मणरूप तो गजानन । म्हणे पाराशर्या महाभागा क्षुधाक्लिन्न । ऐसें जाण या वेळीं ॥९॥
तुझ्या घरीं भोजन वांछित । त्यांचें तें वचन ऐकत । तैं होऊनी हर्षयुक्त । म्हणे हात जोडोनियां ॥१०॥
ताता शुक्ल चतुर्थीचें व्रत । आज असे कां न ज्ञात । उपोषणसमायुक्त । देवर्षी पूजिती गजाननासी ॥११॥
ऐसा आहे हा दिवस । महाभागा कैसें विसरलास । सांग मजला तूं या समयास । भोजन कैसें वाढूं तुला ॥१२॥
त्याचें तें ऐकून वचन । गजानन बोले हासून । ब्राह्मणरूपधारी तो महान । म्हणें मी व्रत न जाणतों ॥१३॥
सदा भक्षणलालस वर्तत । मला कैसें उपवास व्रत । तें ऐकून त्यास नमित । गार्ग्य समर्पी नैवेद्य ॥१४॥
तो नैवेद्य खाऊन प्रसन्न । तृप्त जाहला गजवदन । पाराशर्या तो म्हणे वचन । भावभक्तीनें तुष्ट मीं ॥१५॥
द्विजोत्तमा माग वरदान । पुरवीन तुझें वांछित संपूर्ण । गार्ग्य म्हणे विप्रास वचन । काय मागूं महाविप्रा ॥१६॥
सर्व हें मायामय असत । गणेशतत्पर मी सतत । मज कांहीं उणें नसत । आपण जावें स्वगृहासी ॥१७॥
ऐसा त्याचा भाव पाहून । पुनरपि बोलला ब्राह्मण । माझ्या सदनीं तुज नेईन । म्हणोनि आलो वरदाता मीं ॥१८॥
तदनंतर त्याचें हठयुक्त । वचन ऐकून गार्ग्य म्हणत । गणेशाचें दर्शन मजप्रत । प्रथम घडवी दयाळा ॥१९॥
अन्य कांहीं वर न याचित । ऐसें बोले गार्ग्य विनीत । तेव्हा तो ब्राह्मण बोलत । मोहप्रद वचन ऐसें ॥२०॥
अरे हें काय अघटित । नानाविध ऐश्वर्य तूं न मागत । तें सोडून गजाननास वांछित । आश्चर्य याचें वाटतें ॥२१॥
मी योगींद्रमुख्य देईण । तुजला समस्त सुख सन्मान । ऐसें बोलून वचन । दाखवी तया इंद्रसुख ॥२२॥
नाना देवसहित । इंद्र तेथ प्रकट होत । त्या विप्रास नमन करित । म्हणे मी दास तुझा असे ॥२३॥
हें सारें माझें इंद्रसुख । भोग माहाभागा निःशंक । दाखवी मायेनें परमसुख । इंद्रवैभवाचें त्याला ॥२४॥
परी तें नश्वर जाणून । स्वीक्रारिलें नाहीं महान । इंद्र जाहला अन्तर्धांन । इंद्रनगरी निमाली ॥२५॥
तदनंतर सत्यलोकासहित । ब्रह्मदेव तेथ अवतरत । तोही गार्ग्यास विनवित । म्हणे राज्य माझें हें ध्यावें ॥२६॥
प्रथम सत्यलोकावर । राज्य करी तूं थोर । गणेश्वरास भजावें तदनंतर । अनुपम सुख हें नसोडावें ॥२७॥
परी त्या सुखासी त्यागित । गार्ग्य विघ्नेश्वरीं एकचित्त । त्यास मोह न अगदीं वाटत । म्हणे विधीसी कर जोडून ॥२८॥
अरे विधात्या क्षमा करी । ह्मा वैभवाची इच्छा मीं न करी । तेव्हां अन्तर्धान पावला सत्वरी । ब्रह्मदेव स्वलोकासहित ॥२९॥
तदनंतर केशव तेथ येत । सह वैकुंठ लोक आश्रित । तोही विनवी गार्ग्याप्रत । भोगावें वैकुंठसुख विप्रा ॥३०॥
परी महाविष्णुची प्रार्थना । त्या विप्रचित्ता भुलवीना । तेव्हां विष्णु परतला स्वस्थाना । गार्ग्य झाला योगपर ॥३१॥
तदनंतर शंकर अवतरत । कैलास लोकासहित । प्रार्थित । नानाविभवें हीं समस्त । गार्ग्य मुने स्वीकारावीं ॥३२॥
कैलासलोकाचें राज्य तुजप्रत । अर्पिलें असें सांप्रत । परी गार्ग्य तें त्यागित । गणपतिभजनीं दंग झाला ॥३३॥
तेव्हां शिवही पावला अन्तर्धान । तें पाहून तो महायोगी म्हणत । गार्ग्या तूं मूर्ख हतभाग्य वाटत । मजला या क्षणीं निःसंशय ॥३४॥
निंदा करी पाराशर्य । द्विजा म्हणे तुज नसे मुळीच समज । सर्व लोकसुखें त्यागून शिवात्मज । कैसा तुज प्रिय वाटे ? ॥३५॥
त्या गणेशातें घेऊन । काय करिशील समाधान । नानाविध भोग भोगून । नंतर भज गणेश्वरासी ॥३६॥
अरे ब्रह्मांडांतील भोग समस्त । सत्य संकल्पज भोगी त्वरित । ब्रह्मांडाधिपत्व तुज लाभत । कां तें तूं त्यागिलें हें ॥३७॥
गार्ग्य म्हणे ती निंदा ऐकून । महामुने क्षमस्व मी एकमन । गणेश्वरासीच पूजीन । असत्य सारें हें सौख्य ॥३८॥
दीनवाणे पराधीन । सत्यसंकल्प सुखही न न्यून । सत्य अनुपम परम शोभन । सत्यासत्य भेद मायावरा ॥३९॥
निःसंशय हा क्षणभंगुर । त्याचा संग न इच्छितसे उग्र । जरी ईश्वरभावें अमृतपर । करिशील मज तेंही नको ॥४०॥
योग निपुण होऊन । सुखैश्वर्य भोगण्या न उत्सुक मन । अरे महाखला येथ येऊन । कां मज ऐसें ठकविसी ॥४१॥
जाई तूं आपुल्या भवनाप्रत । गणेशभक्तिभेदका तूं त्वरित । ऐसा तिरस्कार करित । पाराशर्य मुनीचा त्या ॥४२॥
तेव्हां विकट हास्य करून । सत्वर घेतलें गणेशरूप महान । त्या शिवदत्तास बोले वचन । शिवदत्ता पहा मजला आतां ॥४३॥
पराशराचा मी असे सुत । गणनाथ तुझ्या पुढयांत । तुझी दृढ भक्ति पाहून संतुष्ट । लाविलें तुज कसोटीला ॥४४॥
तें ऐकून धीरवचन । शिवदत्त करांची ओंजळ जोडून । त्वरित करी वंदन । आनंदाश्रू वहात होते ॥४५॥
तो नाचू लागला प्रेमविव्हल । देहभावाची जाण होतां प्रबळ । एकवटोनि भक्तिभाव विमल । पूजी तया गजाननासी ॥४६॥
आनंदविभोर स्तवन गात । त्या वेळ स्तोत्र जें उत्सफूर्त । गणेशा तुज मी वंदित । पराशरात्मजा तुज नमन ॥४७॥
शिवपुत्रासी शेषसुतासी । सर्वपुत्रासी सर्वेंशासी । सर्वांच्या मातापित्यासी । भातृमित्रस्नुषादिका नमन तुला ॥४८॥
अनंतरूपीसी नानाभोगविहारकासी । भोगहीनासी देवासी । सुरासी अपारगुणधारकासी । गुणांच्या पते नमन तुला ॥४९॥
गणेशासी परेशासी । पूर्णांनंदासी आदिमध्यांतरूपासी । स्त्रष्टयासी पात्रासी प्रहारकासी । साक्षिभूता तुज नमन ॥५०॥
आदिमध्यान्तहीनासी । स्वानंदपतीसी मूषकवाहनासी । सिद्धिबुद्धिप्रदात्यासी । सिद्धिबुद्धिपते नमन तुला ॥५१॥
योगपतीसी गजाननासी । योगशांतिस्वरूपासी । सांतीस शांतिदात्यासी । परेशासी नसो नमः ॥५२॥
सर्वांस सुखदात्यासी । विघ्नेशासी गणेश्वरासी । किती स्तवूं देवा तुजसी । गणाध्यक्षा मति थकली ॥५३॥
जेथ वेदांनी धरलें मौन । तेथ माझी बुद्धी अतिहीन । गणाध्यक्षा मी विनीतमन । महोदरा तुज वंदितों ॥५४॥
धूलिकण जेवढे जगांत । तारका जेवढया गगनांत । मेघबिंदु किती पडत । मोजणें हें जरी शक्य झालें ॥५५॥
तरी तुझे गुण वर्णन । सर्वथैव अशक्य स्तवन । धन्य मी सर्वभावें प्रसन्न । पाहिला जेणें गजानन ॥५६॥
वेदांत गोचर ज्ञात । शिवादि योगिजनास तो परिचित । त्यामुळें दर्शन घडत । अहो महाभाग्य हें माझें ॥५७॥
ऐसें स्तवन करून । पुनरपि करी मुनिपुंगव नमन । तयास गणाधीश बोले वचन । भक्तलोलुप त्या वेळीं ॥५८॥
वर माग महाभागा वांछित । देईन मी ते समस्त । या स्तोत्रयोगें संतुष्ट । तैसाचि तुझ्या भक्तीनें ॥५९॥
शिवदत्त तेव्हां प्रार्थित । तुझी दृढ भक्ति देई सतत । अव्यभिचारिणी भक्ति याचित । अन्य कांहीं मज नको ॥६०॥
तुझ्या पायांचें दास्य लाभावें । सदैव हें वरदान द्यावें । तें ऐकून श्रीगणेश प्रेमभावें । म्हणती त्या शिवदत्तासी ॥६१॥
माझी दृढभक्ति वसेल । तुझ्या ह्रदयीं सदा विमल । केवळ माझें स्मरण करितां होईल । कार्य तुझे सदा सफळ ॥६२॥
तुं रचिलेलें हें स्तोत्र । अत्यंत असे पवित्र । पाठ करितां वा वाचितां सर्वत्र । सिद्धिप्रद सर्वांसी ॥६३॥
जें जें वांछिती स्तोत्रवाचक । तें तें मिळेल निःशंक । माझ्या भक्तीचा रोचक । प्रवाह वाहेल तव चित्तीं ॥६४॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावले ब्रह्मनायक गणेश महान । शिवदत्त गणेशरूप आठवून । आश्रमीं आपुल्या परतला ॥६५॥
सदा योगींद्रवंद्य तो होत । गाणपाग्रणी उदात्त । अंतीं विघ्नेश्वरांत । लीन झाला तो योगी ॥६६॥
ऐसें हें वैशाखांतील व्रत । मुख्य असे सर्वार्थप्रद सर्वांत । हया वाचनें पठनें लाभत । सर्वसिद्धि महाभागा ॥६७॥
वैशाख व्रतासहित । शिवदत्तचरित्र जो वाचित । अथवा भक्तिभावें ऐकत । त्याचें सर्व कार्य सफळ ॥६८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते वैशाखमासमाहात्म्ये शिवभक्तिप्रदानं नाम एकोनत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP