मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय २२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत सांगे शौनकादिकांप्रत । ब्राह्मण कोणी कर्णाट देशांत । अत्रि गोत्रज राहत । सर्वप्रिय नांव त्याचें ॥१॥
तो कार्तिक व्रत आचरित । प्रातःस्नान सदा करित । तदनंतर गणेशपूजनरत । नियमानें तो सर्वकाळ ॥२॥
गाणपत्यप्रिय असत । सदा गणेशभक्तींत आसक्त । तैसाच क्षत्रिय एक पुनीत । भीम नामा कुणी होता ॥३॥
तो नित्य स्नान करून । शमीस करी जलसिंचन । प्रदक्षिणा घाली भक्तियुक्त मन । दुसरा एक कैवर्तक होता ॥४॥
तो पूजितसे मंदारकासी । तैसा मेघप्रिय करी प्रदक्षिणेसी । पुष्पवाह वैश्य गोसेवेसी । करी गणपतीस ध्याऊन ॥५॥
शूद्र श्यामल नाम असत । ती दीपदान करी कार्तिक व्रतांत । गणेशप्रीतिस्तव करित । नित्य स्नानव्रत कार्तिक मासीं ॥६॥
महाबाहुनामक अन्य वैश्य आचरित । ब्रह्मणभोजनाचें व्रत । पद्मनामा कारुक नमित । स्नान करून नित्य नेमें ॥७॥
महीपाल नामें शूद्र घेत । नित्यनेमें गणेशतीर्थ कार्तिकांत । भक्तिभावें तो भजत । गणनायकास कार्तिक मासीं ॥८॥
ऐसे नाना जन करून स्नान । गणेश प्रीतिस्तव व्रत महान । कार्तिक व्रत आचरून । गणेशासी पूजिती ॥९॥
रोगापासून ते मुक्त । वंध्यत्वादि दोष त्यांचे जात । कार्तिकमासव्रत पूर्ण होता लाभत । धनधान्य ते सारें ॥१०॥
अंतीं स्वानंदलोक प्राप्ति । गणेशासी ते नमिती । ब्रह्मभूत ते होती । कार्तिकव्रताच्या पुण्यानें ॥११॥
म्हणून कार्तिक व्रत । आचरावें भक्तियुक्त । गणेशप्रीति तेणें लाभत । सर्वंसिद्धि गणेशभक्त ॥१२॥
नियमें करितां भक्ति । त्यासम अन्य नसे रीती । कांहीं नियम आचरितां जगतीं । गणेश वश होतसे ॥१३॥
नियमानें अल्प जें करिती । कोटि गुण त्याची महती । कार्तिक महिन्यांत स्नानाची ख्याति । विघ्नेशसेवेंत जाणावी ॥१४॥
गणपप्रिय पंचक करित । कार्तिकांत तो गणेशप्रिय होत । यांत संशय कांहीं नसत । दान होमादिक कार्यें करावीं ॥१५॥
तीं सारीं कार्तिक मासांत । अनंत पुण्यप्रद होतात । गणनाथास जीं अर्पित कर्मज फलें तीं यशदायी ॥१६॥
बहुत काय सांगावें । कार्तिकी स्नान व्रत नियमें करावें । एकदा जरी भक्तिभावें । अक्षय फलप्रद तें होई ॥१७॥
ऐसें हें कार्तिक मास चरित । कथिलें तुज परम पुनीत । गणेशलोकप्रद सुखद जगांत । इह परलोकीं हितावह ॥१८॥
जो नर भक्तीनें वाचित । अथवा जो भक्तीनें ऐकत । त्याच्या वासना पूर्ण होत । अंतीं गणपतिप्रिय होई ॥१९॥
अन्य देवनिष्ठ जे भक्त । ते जरी कार्तिकव्रत आचरित । तरी तेही इह्लोकसुख भोगित । अंतीं होय मुक्तिलाभ ॥२०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते कार्तिकमासमाहात्म्ये नानानियमनिरूपणं नामं द्वाविंशोऽध्यायः समाप्तः  । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP