मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय १२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीशिव कथा पुढची सांगती । त्रिपुर नाम दैत्य जगतीं । ब्रह्मदेवाच्या वरानें शक्ति । अद्‍भुत प्राप्त करता झाला ॥१॥
तो महाबळी जिंकित । चराचर सारें त्वरित । यज्ञकर्मांचा लोप करित । वर्णसंकरज कर्में करवी ॥२॥
तेव्हां उपोषणसंयुक्त । देव मज शिवास शरण येत । मीं अत्यंत क्रोधयुक्त । त्याच्यासह लढण्या गेलों ॥३॥
माझें त्याच्यासवें होत । दारुण युद्ध त्या समयांत । देवदानव त्वेषें लढत । रोमहर्षक तें युद्ध होतें ॥४॥
संहारास्त्रें मी सर्वही सोडिलीं । परी तीं महर्षींनो निष्फळ झालीं । म्हणोनि चित्तवृत्ति जाहली । खेदयुक्त त्या वेळीं ॥५॥
क्षणांत अग्निशस्त्रें जित । त्या दैत्यराजाच्या हस्तें पराजित । मी कैलास सोडून पळत । गहन वनीं तैं गेलों ॥६॥
निःश्वास सोडून चिंतायुक्त । हतोत्साह उद्यमरहित । विचार केला मनांत । हितावह एक त्या वेळीं ॥७॥
हा दैत्य माझा हस्तें मरणार । यांत संशय न तिळमात्र । तरी माझें हें कृत्य थोर । निष्फळ कोणी कां केलें ? ॥८॥
मी ईश असून अनीश सांप्रत । ऐसा विचार जों करित । तोंच सूर्योदयासम तेज फाकत । देवमुनि नारद तेथ आले ॥९॥
मजला प्रणास करून । उभे राहिलें प्रसन्न । मीही त्यांचें केलें पूजन । दिचारिलें त्यांना खेदानें ॥१०॥
सर्व वृत्तांत ऐकून । मज म्हणे तो बुद्धिमान । त्रिपुरवधाचा उपाय तत्क्षण । म्हणे शिव तूं अहंकारी ॥११॥
मोहसंयुक्त अहंकारयुक्त । विघ्नराजास विसरलास सांप्रत । त्याची पूजा न करितां गर्वयुक्त । सत्ताहीन झालासी ॥१२॥
विघ्नें सत्तात्मक असत । त्यांचा स्वामी गणेश वर्तत । ढुंढीचें अर्चन विस्मृत । झालें म्हणून ऐशत्व गेलें ॥१३॥
आपुल्या देहींची सत्ता । मोहपरायण जे मानिती सर्वोंच्च सर्वथा । गणेशाशी न जाणती तत्त्वतां । सत्ताहीन होतात ते ॥१४॥
जो कृपाकटाक्षें निर्मित । रक्षित अथवा संहारित । तृणा पासून ब्रह्मांडादिक समस्त । लोकसंकुल तो गणेश ॥१५॥
त्याच्या कृपेंवाचून । सदाशिवा तूं शक्तिहीन । गवताची काडीही शक्तिमान । तुझ्या पुढें सांप्रत ॥१६॥
तरी दैत्यास कैसें जिंकशील । तुजें चित्त गर्वयुक्त न विमल । जरी त्यास शरण जाशील । तरी सत्ता सर्व तुज लाभे ॥१७॥
त्रिपुर महादैत्यास । मारशील तूं निःशेष । मुद्‍गल सांगती दक्षास । ऐसें नारदें सांगितलें ॥१८॥
तदनंतर महेशास नमून । महामुनि करीत गणेशगायन । गेले स्वेच्छापरायण । त्रिभुवनीं संचार करावया ॥१९॥
शिवानें ह्रदयीं गणेश स्मरून । केलें ब्रह्मनायकाचें चिंतन । दंडकारण्यांत जाऊन । वनैकदेशी तप केलें ॥२०॥
ऐसी शंभर वर्षे जात । शिव होता तपश्चर्यारत । तैं गणनायक प्रकटत । मूषकावरी बैसोनी ॥२१॥
दहा आयुधें करांत । त्यास पाहून शंकर वंदित । पूजन करून स्तवित । भक्तिभावें गणेशासी ॥२२॥
गणेशा परेशा तुज नमन । धूम्रवर्णा ढुंढे अभिवादन । शिवात्मजा करतो वंदन । सर्वांचा तूं मातापिता ॥२३॥
गणेशासी गुणसर्जकासी । संहर्त्यासी निर्मात्यासी । सर्वापालका देवदेवासी । हेरंबासी नमन असो ॥२४॥
अनंत विभवासी अनंतोदरासी । अनंत माया प्रचालकासी । विघ्नेशासी ज्येष्ठराजासी । ज्येष्ठज्येष्ठासी नमन असो ॥२५॥
सर्व पूज्यासी सर्वांदिपूज्यासी । स्वानंदपतीसी मूषकध्वजासी । सिद्धिबुद्धिपतीसी । इक्षुसागरपतीसी नमन ॥२६॥
मनोवाणी विहीनासी । मनोवाणीमयासी । योगेशासी महाविष्णुसुतासी । शेषपुत्रा तुज नमन ॥२७॥
त्रैलोक्य क्षेत्रस्थासी । दंडकारण्यादेवासी । ब्रह्मेशा नमन तुजसी । गणेशा तुज अभिवादन ॥२८॥
जेथ वेदादीही धरती मौन । तेथ किती करूं स्तवन । तुज गणाधीशा पाहून । धन्य मीं सर्वभावें झालों ॥२९॥
तुझें झालें दर्शन । त्यायोगें धन्यरूप नयन । मस्तक धन्य तुज नमून । स्तवनानें मुखही माझें ॥३०॥
तुझ्या पूजनें धन्य कर । दर्शनें धन्य सर्व शरीर । भक्ति देई दृढ वर । हाचि द्यावा गणनायका ॥३१॥
त्यायोगें कृतकृत्य होईन । शांतियोगपरायण । त्रिपुरवधार्थ मज या क्षण । सामर्थ्य देई शाश्वत ॥३२॥
महेशा तूं गणाधीश । सर्वांचा यथार्थे तूं ईश । सार्थक करी तूं परेश । तें ऐकून गुणेश म्हण ॥३३॥
त्या देववरिष्ठ भक्ताप्रत । म्हणे मीं ध्यानभावें तुष्ट । तुझें सर्वही इच्छित । सफल होईल सदाशिवा ॥३४॥
त्रिपुरनाशार्थ सांगत । तुज मीं एक उपाय सांप्रत । त्रिविधा परम माया असत । देहभोगपरायणा ॥३५॥
आसुरी त्रिपुराख्या ती असत । नाना विषयांत लंपट । तिच्या जयास्तवा त्वरित । तूं माझा आश्रय घेटलास ॥३६॥
मीं चतुर्थ गणपाकृती । माझें रूप पुरुषवाचक जगती । माझें पौरूष बीजरुप घेऊन मजप्रती । विचक्षणा काय करी ॥३७॥
त्रिगुणरूप माया सत्त्वरी । तूंटाक मजवरी । ऐसें सांगून दैत्यारी । पौरूष मंत्र त्यास देई ॥३८॥
त्याची माया घेऊन । निर्मोह करी शिव पावन । तदनंतर गुणेश अन्तर्धान । ब्रह्मनायक झणीं पावले ॥३९॥
शिव मंत्रप्रभावें मारित । त्रिपुरासुरासी तो त्वरित । सदा पौरूषभावें युक्त । जाहला मायेस जिंकून ॥४०॥
मायेस स्वाधीन करित । ऐसा मंत्रप्रभाव अद्‍भुत । हें गणेशस्तोत्र जो ऐकत । शिवविरचित भक्तीनें ॥४१॥
तो मोहहीन होत । सर्वभावें देवपरायण वर्तत । पुत्रपौत्र समायुक्त । धनधान्यानें समृद्ध होई ॥४२॥
विविध भोग अनंत । भोगून अंतीं स्वानंद लोकीं जात । हें गुणेशमाहात्म्य जो ऐकत । अथवा वाचित नित्य नमें ॥४३॥
त्या नरास सर्व सिद्धि प्राप्त । पौरुषार्थप्रद हा सत्य वाटत । धूम्रवर्णात्मक अवतार जगांत । भुक्तिमुक्तिप्रद सर्वदा ॥४४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते गुणेशावतारवर्णनं नाम द्वादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP