खंड ८ - अध्याय ८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शिव सांगे पुढील वृत्तान्त । अहं असुर जाहला शांत । तें पाहून देवऋषि विस्मित । तैसेचि मुदित सर्व जन ॥१॥
ते धूर्मवर्णासी पूजिती । भक्ति दृढ त्यांच्या चित्तीं । पुनः पुन्हा प्रणास करिती । स्तवन करिती कर जोडून ॥२॥
देवर्षि धूम्रवर्णाचें स्तोत्र गाती । सर्वादि पूज्यांसी वंदिती । निरालंबासी वंदन करिती । स्वरूपासी नित्य देवासी ॥३॥
ढुंढीसी सदा अव्यक्त रूपासी । सर्वांतगासी सर्वेश्वरासी । सदा मोहहीनासी मोहप्रदासी । धूम्रवर्णासी नमन असो ॥४॥
निजभक्त मोहनाशकासी । महा आनंद त्रैविध भावयुक्तासी । परेशासी धूम्रवर्णासी । सर्वेश्वरासी नमन असो ॥५॥
सिद्धिबुद्धिप्रदात्यासी । गणेशपुरांत वासकर्त्यासी । स्वसंवेद्यनामासी । अनाथनाथासी नमन असो ॥६॥
सदा स्वेच्छेनें क्रीडाक्रासी । सगुणासी निर्गुणासी । महा आखु ध्वजासी । धूम्रवर्णा सर्वेश्वरा नमन असो ॥७॥
हेरंबकासी गजाकारतुंडासी । लंबोदरासी त्रिनेत्रधरासी । शूर्पश्रुति क्षोभकारीसी । धुम्रवर्णा सर्वेश्वरा नमन असो ॥८॥
मदासक्तयोगींद्रासी भृङगात्मकासी । चतुर्बाहूसी एकदंतासी । विचित्र अनर्घ्य वस्तुभूषितासी । धूम्रवर्णा सर्वेश्वरा नमन असो ॥९॥
देवदेवेशासी सुपुत्रासी । आद्य सृष्टिनिर्मात्यासी । मायिकां मोहप्रदासी । धूम्रवर्णा सर्वेश्वरा नमन असो ॥१०॥
तूं प्रेरणा देतां निर्मित । अभेदात्मक जीवन भूमन्‍ पुनोत । तेथ तदाकाररूपें तूं निवसत । धूम्रवर्णा सर्वेश्वरा नमन असो ॥११॥
त्या आत्मरूपाने सृजिलें । तदनंतर भेदकांचें निज दैवत भलें । ब्रह्मभावें तुझेंच रूप जाहलें । धूम्रवर्णा सर्वेश्वरा नमन असो ॥१२॥
असद्‍भाव युक्तें विदेह निर्माण । केलें जैं विदेह ब्रह्म पावन । सांख्यात्मक मूळ बीज तूंच शोभन । धूम्र वर्णा सर्वेश्वरा नमन असो ॥१३॥
त्या विदेहानें सृजिलें । स्वतोत्थानरूप जें शोभलें । तुझ्या प्रबोधें विघ्नेश्वर रूप झालें । धूम्रवर्णा सर्वेश्वरा नमन असो ॥१४॥
तदनंतर तुझ्या सत्तेनें निर्मित । सदात्मस्वरूप सोहंरूप उदात्त । तूंच तेथ परात्म्या वसत । धूम्रवर्णा सर्वेश्वरा नमन असो ॥१५॥
त्या सदैकस्वरूपानें निर्मिलें । महाबिंदुरूप चाराचें मूळ भलें । सहज योगानें तेथ विलसलें । रूप धूम्रवर्णा तुझें ॥१६॥
तदनंतर नामरूप सम । सुषुप्तीत । सुसूक्ष्म रूप जें परम । तैसेंचि स्थूलभावसंपन्नसम । चतुर्विध शरीरें तूं निर्मिली ॥१७॥
तीं शरीरें क्रीडापर । धूम्रवर्णा तूं सर्वेंश्वर । विश्वरूप सर्वांकार । अनंत आननांसी युक्त तूं ॥१८॥
चर स्थावररूपें भोग । भोगिसी तुंच सुभग । चराचर रूप सृष्टिकर्तां विश्वग । देवीमया तू प्रकाशवंत ॥१९॥
देवयक्षा साध्या तुजसी । वंदन देवेंद्रा देवात्मकासी । दिगीशासी वृक्षादिबीजात्मकासी । धूम्रवर्णा सर्वेश्वरा तुज नमन ॥२०॥
सर्परूपासी दैत्यात्मकासी । समुद्रादि नाना भेदरूपासी । अनंतरूपें क्रीडाकरासी । धूम्रवर्णा सर्वेश्वरा तुज नमन ॥२१॥
ऐसें असोनी तदाकारहीन । सदा सहजयोग संपन्न । स्वसत्तात्मक तूं पावन । धूम्रवर्णा सर्वेंश्वरा नमन असो ॥२२॥
म्हणोनि वेदवाद धूम्र होती । धुरकट हयांची होत मती । तुझ्या स्वरूपवर्णनीं थकती । म्हझ्णोनि तूं धूम्रवर्ण ॥२३॥
वेद योगींद्र जेथें हरले । तेथ आमुची मति काय चाले । आम्हीं अल्पबोधें स्तविले । धूम्रवर्णा सर्वेश्वरा नमन असो ॥२४॥
श्रीशिव सांगती वृत्तान्त । ऐसें स्तुति स्तोत्रगाऊन वंदित । देव ऋषि वंदन करित । तयासी म्हणे धूम्रवर्ण ॥२५॥
महाभागांनो मीं स्तुतितुष्ट । देईन तुमचें जें इष्ट । जरी दुर्लभ असलें दुर्धट । तरीही तें देईन ॥२६॥
तुम्हीं रचिलेलें स्तोत्र उत्तम । सुसिद्धिप्रद इष्टकाम । ब्रह्मभूकर मनोरम । होईल सर्वत्र सर्वदा ॥२७॥
पुत्रपौत्रकलत्रादि प्राप्त । धनधान्य समृद्धि होत । आयुरारोग्य ऐश्वर्य लाभत । पाठका तैसें श्रोत्यासी ॥२८॥
हया स्तोत्राचें वाचन । एकवीस वेळा करून । एकवीस दिवस नित्यनेस । मारण उच्चाटनें न बाधती ॥२९॥
परकृत्यादिक सर्व नष्ट । होईल सर्व दूर अनिष्ट । या स्तोत्रमुख्यें स्तवितां इष्ट । पवतील भक्त सदा ॥३०॥
हें वरदान ऐकून प्रार्थिति । ते देव ऋषि अतिप्रीती । अहं असुराची केलीत शांति । धूम्रवर्णा तेणें तुष्ट ॥३१॥
त्यांतच आम्हांस वर लाभला । स्वाधिकार पुनः प्राप्त झाला । आतां वर्णाश्रम धर्मपालनाला । सामर्थ्य लाभेल जनांसी ॥३२॥
आणसी काय मागूं सांप्रत । तुझी दृढ भक्ति उपजो हृदयांत । अहंकाराचा जी नाश करित । त्या भक्तीनें तुष्ट व्हावें ॥३३॥
तथाऽस्तु ऐसें बोलून । गणेश्वर पावला अंतर्धान । तदनंतर त्यासी नमून । क्षेत्र तेथें स्थापिती ॥३४॥
धूम्ररवर्ण क्षेत्र तें ख्यात । तेथ गणेशासी ते पूजित । आपापल्या पदीं जात । हर्षभरें ते सारे ॥३५॥
स्वकार्यांत सुखयुक्त । सदैव गणपतींत आसक्त । ऐसें हें अहंकारभयनाशक पुनीत । सांगितलें कथानक ॥३६॥
ऐश्यापरी तो धूम्रवर्ण । नाना अवतार घेऊन । विश्वासी करी निर्विघ्न । भक्तिभावें तूं प्रसन्न ॥३७॥
धूर्मवर्णाचे अवतार अनंतर । ते वर्णनातीत असत । म्हणोनि संक्षेपें कथिलें वृत्त । मुख्य अवताराचें येथें ॥३८॥
सनकादी मुनींनो सतत । गणेशासी भजा भावयुक्त । तेणें अहंकार-विनिर्मुक्त । योगिवंद्य शांतियुक्त तुम्हीं व्हाल ॥३९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते धूम्रवर्णावतारसमाप्तिर्नाम अष्टमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP