मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ५ वा

पांडवप्रताप - अध्याय ५ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥
वैशंपायन म्हणे जनमे जया ॥ श्रवण करी पवित्र राया ॥ चतुरानना पासूनियां ॥ दहावा ययाति याणिजे ॥१॥
जन मेजय म्हणे कथा समस्त ॥ ऐकावया मी आर्तभूत ॥ कर्ण जहाले अति क्षुधित ॥ श्रवण भोजन देइंजे ॥२॥
वैशंपायन म्हणे सावधान ॥ देव दैत्यांसों वैर मुळीं हून ॥ इंद्रपद घ्यावया हिरोन ॥ दैत्यीं उपाय निर्मिले ॥३॥
युद्ध करिताम अद्भुत ॥ निर्जर जर्जर जाहले समस्त ॥ अपार मृत्यु पावती दैत्य ॥ नाहीं गणित सर्वथा ॥४॥
परी जपून मंत्र संजीवनी ॥ शुक्र उठवी दैत्यां तेच क्षणीं ॥ विबुध पडती समरांगणीं ॥ त्यांसी उपाय चालेना ॥५॥
अमृत संजीवनी पाहीं ॥ बृहस्पती पाशीं मंत्र नाहीं ॥ पाकशा सनाचे ह्रदयीं ॥ चिंतारोग प्रवर्तला ॥६॥
मग बृहस्पतीचा पुत्र ॥ कच नाम अति पवित्र ॥ गुण निधी परम चतुर ॥ कार्य साधनीं नेटका ॥७॥
तयातें एकांतीं नेऊनी ॥ सांगता जाहला कुलिशा पाणी ॥ म्हणे तूं शुक्रपाशीं जाऊनी ॥ संजीवनी साधीं कां ॥८॥
थोरपण अभिमान ॥ मी एक जाणता सर्वज्ञा ॥ मी असें देव गुरु नंदन ॥ हें सर्वही सांडिंजे ॥९॥
परम प्रीती धरूनि जीवीं ॥ शत्रूशीं मैत्री करावी ॥ शुक्रास प्रार्थून विद्या घ्यावी ॥ अनालस्यें करूनि ॥१०॥
गुरु शुश्रूषा करून अपार ॥ विद्या साधिती परम चतुर ॥ कीं पुष्कळ धन देऊनि साचार ॥ विद्या समुद्र शिष्य होती ॥११॥
अथवा आपुली विद्या गुरूस देती ॥ दुसरी त्यापासून साधिती ॥ चोथा उपाय निश्चितीं ॥ विद्या साधनीं असेना ॥१२॥
तरी प्रेम भावें करून ॥ कवीस रिघावें तुवां शरण ॥ नाना कष्ट पीडा सोसून ॥ आपुलें कारण साधावें ॥१३॥
तूं चातुर्य सिंधू यथार्थ ॥ तुज काय शिकवावें बहुत ॥ आदित्यास प्रभा अत्यंत ॥ पाडीं म्हणावें न लगे हें ॥१४॥
मृग मद आणि रंभा सुत ॥ हे पहिलेच सुवा सिक अत्यंत ॥ चंदन स्वांगें सुगंध बहुत ॥ साह्य न लगे दुसरें ॥१५॥
तैसा तूं चातुर्य भांडार ॥ तुज सांगणें न लगे वारंवार ॥ मग कचें वाचस्पतीस करून नमस्कार ॥ आज्ञा घेतली शक्राची ॥१६॥
कच जात त्वरेंकरून ॥ मार्गीं जाहले दिव्य शकुन ॥ दैत्यपुरींत सावधान ॥ निःशंक मनें चालिला ॥१७॥
सभा घनवटली अपार ॥ मुख्य़ वृषपर्वा दैत्येंद्र ॥ पूज्य त्याचा गुरु शुक्र ॥ उच्च स्थलीं बैसला ॥१८॥
त्या सभेस कच येऊन ॥ मुखें जय जय कार करून ॥ घालिता जाहला लोटां गण ॥ आदरें कवीस तेधवां ॥१९॥
उभा ठाकला कर जोडून ॥ म्हणे मी आहें देव गुर नंदन ॥ आलों निष्कपट तुज शरण ॥ तनुमनधनें करूननियां ॥२०॥
मी विद्यार्थी तुझा दीन ॥ नीच सेवा जे असेल पूर्ण ॥ तीच सांगावी मज लागून ॥ आलों शरण यालागीं ॥२१॥
ब्रह्म चर्य व्रतस्थ ॥ सहस्त्र वर्षें पर्यंत ॥ सेवा करीन निश्चित ॥ अनाल स्येंकरू नियां ॥२२॥
विरोध असेल वडिलांशीं ॥ तो संबंध नाहीं मजशीं ॥ मी निष्कपट मानसीं ॥ शरण तुजसी पातलों ॥२३॥
शरण आलों असें तुज ॥ उपेक्षितां जाईल लाज ॥ मज देवांशीं नाहीं काज ॥ पुत्र तुझा मी आहें ॥२४॥
कवि विचारी मनांत ॥ हा मनाचा निर्मला दिसत ॥ येणें सेवा करितां अद्भुत ॥ बृह स्पति शिष्य आमुचा ॥२५॥
पिता तोचि बोलती पुत्र ॥ येथें नाहीं अन्य विचार ॥ ही लाव्यता आम्हांस थोर ॥ शिष्य गुरु सुत आमुचा ॥२६॥
मग म्हणे वत्सा पाहीं ॥ मम गृहीं तूं अवश्य राहीं ॥ विद्या अभ्यासीं सर्वही ॥ दुर्लभ ज्या कां त्रिभुवनीं ॥२७॥
मग दूर्वा सुमने अघोंदक ॥ जल काष्ठें समिधा देख ॥ फल मूल पर्णादिक ॥ आणून नित्य देतसे ॥२८॥
सडासंमार्जन पाद क्षालन ॥ वस्त्रक्षालन अंगम र्दन ॥ व्यजन पिकपात्र धरून ॥ उभा जवळी सर्वदा ॥२९॥
वेद शास्त्राचर्चा गायन ॥ स्तुतिवादें तोषवी मन ॥ देवयानी तें देखोन ॥ मित्रत्व वाढवी कचाशीं ॥३०॥
भोजन तांबूल फलाहार ॥ कचा वेगळें न करी साचार ॥ स्त्रेह वाढवी अपार ॥ कोठें दूर जाऊं नेदी ॥३१॥
पंचशत संवत्सर ॥ चढती सेवा करी गुरु पुत्र ॥ देव यानीची प्रीति अपार ॥ कचावरी बैसली ॥३२॥
धेनु घेऊनि वना पाहीं ॥ चाचा र्याज्ञें नित्य जाई तों दुष्ट दैत्यांनीं लवलाहीं ॥ एकला वनीं लक्षिला ॥३३॥
म्हणती हा देव गुरूचा सुत ॥ महा कपटी असे धूर्त ॥ संजीवनी साधूं आला येथ ॥ लटकेंचि साधुत्व दावीतसे ॥३४॥
मग तीक्ष्ण खङ्ग धारीं ॥ मारून टाकिला तो वनांतरीं ॥ मांस भक्षिलें वनचरीं ॥ वृक व्याघ्रजं बुकीं ॥३५॥
अस्ता जातां गभस्ती ॥ धेनु पातल्या गृहा प्रती ॥ कच न देखोनि चित्तीं ॥ देव यानी खेद करी ॥३६॥
पित यासी म्हणे देव यानी ॥ वनीं कच मारिला दैत्यांनीं ॥ मी प्राण देईन ये क्षणीं ॥ कच माझा न भेटतां ॥३७॥
भृगुत नय विचारी मनीं ॥ तों कच मारिला दैत्यांनीं ॥ मांस भक्षिलें श्वाप दांनीं ॥ हें सर्व ज्ञानें समजलें ॥३८॥
मग संजीवनी स्मरोनी ॥ म्हणे वत्सा ये धांवोनी ॥ तों अक स्मात कच येऊनी ॥ धरी चरण भार्ग वाचे ॥३९॥
मंत्राचें तेज अद्भुत ॥ श्वापदोदरींचीं खंडें समस्त ॥ जडोन देह झाला पूर्व वत ॥ धन्य सामर्थ्य शुक्राचें ॥४०॥
कच सांगे कवीला गूनी ॥ दैत्यीं मज वधिलें वनीं ॥ दैत्य गुरु म्हणे ते क्षणीं ॥ श्रमलासी बहु वत्सा तूं ॥४१॥
मग सुमनें आणा वया गुरु सुत ॥ एकदां गेला असतां वनांत ॥ दैत्य देखोनियां म्हणत ॥ उठविला कीं कवीनें ॥४२॥
म्हणती मग ते न उठे पुढती ॥ ऐशी करावी आतां युक्ती ॥ दैत्यीं मारूनि मागुती ॥ शरीर केलें दग्ध त्याचें ॥४३॥
मग भस्म अस्थि करूनि चूर्ण ॥ मद्या माजी मेळवून ॥ शूक्रास कर विती प्राश ॥ आत्या दरें करू नियां ॥४४॥
दैत्य आनंदले संपूर्ण ॥ कच उठा वयाचा खुंटला यत्न ॥ देवांचें बळ जाहलें क्षीण ॥ म्हणती हिरोन घेऊं इंद्रपद ॥४५॥
तों मावळला वासरमणी ॥ कच न देखे देव यानी ॥ पितया पाशीं येऊनी ॥ शोक करी बहु साल ॥४‍६॥
शुक्र म्हणे मारिला दैत्यांनीं ॥ मद्यांत घातला घोंटूनी ॥ पुढती न उठे मागु तेनी ॥ देव यानी रडे तेव्हां ॥४७॥
शुक्र बाहे म्हणे रे वत्सा ॥ कोठें आहेस बाळा कचा ॥ येरू म्हणे मी पुत्र साचा ॥ त्वदुदरींच वसतसें ॥४८॥
मी भाग्याचा बहु वस ॥ तुझे उदरीं जाहला वास ॥ ठाव नाहीं वाहेर याव यास ॥ केला विपर्यास दैत्यांनीं ॥४९॥
कवि म्हणे कन्येला गून ॥ कच उठ वितां मजला मरण ॥ मी वांचलिया कच दर्शन ॥ नव्हे कदा तुज लागीं ॥५०॥
तुजला आवडे कोण ॥ मज सत्वर सांग वचन ॥ देव यानी म्हणे हें कठिण ॥ न व्हावें मरण दोघांसी ॥५१॥
आतां एक करीं ताता ॥ संजीवनी देईं गुरु सुता ॥ तो बाहेर येऊनि तत्त्वतां ॥ पुनः तुजला उठवील ॥५२॥
शुक्र विचारी मनांत ॥ कच जाहला माझा सुत ॥ संजीवनी विद्या हे अद्भुत ॥ करावी प्राप्त तयातें ॥५३॥
कच न उठतां जाण ॥ देव यानी देईल प्राण ॥ तरी संजीवनी मंत्र संपूर्ण ॥ शिकवावा कचातें ॥५४॥
म्हणे जीव तनुजा मम सुता ॥ न्यासबीजा सहित आतां ॥ संजीवनी मंत्र घे तत्त्वतां ॥ अवश्य ताता कच म्हणे ॥५५॥
आतां ब्रह्म हत्यारे चांडाळ ॥ क्षय पावती दैत्य सकळ ॥ मग कवींद्र होऊनि दयाळ ॥ एकांतीं सांगे संजी वनी ॥५६॥
तुंवा केली सेवा बहुत ॥ त्याचें फळ हें तुज प्राप्त ॥ माझी विद्या सुफळ हो समस्त ॥ प्रेतें उठवीं देवांचीं ॥५७॥
भगवंतें उदरींच देख ॥ उपदेशिला जैसा शुक ॥ कीं भर्भीं असतां दैत्य बाळक ॥ नारदें त्यास उपदेशिलें ॥५८॥
तैसी संजी वनी ते समयीं ॥ प्रतिष्ठिली कचाचे ह्रदयीं ॥ जैसें प्राणसखयास पिता सर्वही ॥ ठेवणें आपुलें दावीतसे ॥५९॥
विद्या दिध लिया समस्त ॥ म्हणे कचा बाहेर ये त्वरित ॥ उठवीं तूं माझें प्रेत ॥ संजीवनी जपे नियां ॥६०॥
मग तो बाहेर येत ह्रदय भेदून ॥ जेवीं उदय पावे रोहिणीरमण ॥ तैसा प्रकटला गुरु नंदन ॥ तों कवि अचेतन पडियेला ॥६१॥
कच सद्नदित ते वेळीं ॥ म्हणे धन्य तूं गुरु माउली ॥ मग मंत्र जपोनि तेच वेळीं ॥ कविराव उठविला ॥६२॥
निद्रित उठे अकस्मात ॥ तैसा उठला शुक्र त्वरित ॥ कच धांवोनि चरण धरीत ॥ प्रेमें क्षालीत नय नोदकें ॥६३॥
उभा ठाकला कर जोडून ॥ आरं भिलें गुरु स्तवन ॥ म्हणे त्रिभुवनींचे गुरुत्व संपूर्व ॥ एक वटलें तुझे ठायीं ॥६४॥
सकळ गुरु रत्नैकपदक ॥ त्यांत वरिष्ठ तूं मध्य नायक ॥ द्वादश गुरुत्वें असती देख ॥ स्वामी ऐका अनुक्रमें ॥६५॥
धातुवादी गुरु प्रथम जाण ॥ दुसरी गुरु जाणिजे चंदन ॥ तिजा विचार गुरु पूर्ण ॥ अनु ग्रह गुरु चवथा पैं ॥६६॥
परीस गुरु पांचवा ॥ कच्छप जाणिजे सहावा ॥ सातवा चंद्र गुरु ओळ खावा ॥ दर्पण आठवा जाणिजे ॥६७॥
नववा जाणिजे छाया निधी ॥ दहावा नादनिधी त्रिशुद्धी ॥ क्रोंच पक्षिणी कृपानिधी ॥ अकरावा तो ओळखें ॥६८॥
सूर्य कांतकार्पास प्रकार ॥ हा बारावा शेवटीं निर्धार ॥ यांचा अर्थ साचार ॥ अनुक्रमें ऐकिजे ॥६९॥
धातुर्वादी गुरु तो कोण ॥ शिष्या हातीं करवी तीर्थाटन ॥ नाना साधनें साधून ॥ शेवटीं ज्ञान प्राप्त होय ॥७०॥
एक अभक्तांस दूर करून ॥ भक्तासी तारी समागमें पूर्ण ॥ जैसा मलय गिरिचंदन ॥ सुवा सिक करी वृक्ष सर्व ॥७१॥
परी हिंगण आणि वंश ॥ यांस न करी ससुवास ॥ तैसा अभक्त त्यागी भक्तांस ॥ तरी पुरुष साच तो ॥७२॥
विचार गुरु सारा सार पद्धती ॥ श्रवण करवी शिष्यांहातीं ॥ शेवटीं साक्षात्कार पावती ॥ पिपीलि कामार्गें ॥७३॥
एका अनु ग्रह गुरु देत ॥ त्याचे प्रतापें ज्ञान वाढत ॥ सायास न लागती तेथ ॥ ऐसें सामर्थ्य एकाचें ॥७४॥
पांचवा गुरु परीस जाण ॥ स्पर्शें लोहाचें करी सुवर्ण ॥ तैसें जयाच्या स्पर्शें करून ॥ दिव्य ज्ञान साधका ॥७५॥
कच्छप गुरु तोचि पाहें ॥ कृपाव लोकनें लवलाहें ॥ विलोकितांच ज्ञान होये ॥ कूर्मिणी पाहे पिलीं जैसी ॥७६॥
उदय पावतां चंद्र ॥ चंद्रकां तास फुटे पाझर ॥ दयावंत होतां अंतर ॥ दूरचे साचार शिष्य तरती ॥७७॥
आठवा गुरु दर्पण ॥ दर्शनें होय स्वरूप ज्ञान ॥ ऐसें तयाचें सामर्थ्य पूर्ण ॥ सायास कांहीं न लगती ॥७८॥
छाया निधि पक्षी अवधारीं ॥ जो गगनीं वास्तव्य करी ॥ त्याची छाया पडे ज्याचे शिरीं ॥ मग पृथ्वीपति तो होय ॥७९॥
तैसें ज्या पुरुषाचें दुर्लभ ॥ अवचट कृपाकर लागतां पूर्ण ॥ कैवल्य प्राप्ति दिव्य ज्ञान ॥ स्पर्श मात्रें होय पैं ॥८०॥
आतां नादनिधि महामणी ॥ जे धातूची ध्वनि पडे कानीं ॥ द्दष्टि न देतां स्वस्थानीं ॥ सुवर्ण होती सर्व धातू ॥८१॥
तैसी ज्या पुरुषाची करणी ॥ ऐकतां मुमुक्षु कारुण्य वाणी ॥ दर्शन न होतां तेच स्थानीं ॥ दिव्य ज्ञान प्रकटत ॥८२॥
आतां जैसी क्रौंच पक्षिणी ॥ समुद्र तीरीं पिलें ठेवुनी ॥ चारा घ्यावयाला गुनी ॥ दूर देशा प्रती जाय ॥८३॥
षण्मास पर्यंत काल क्रमीत ॥ पिलीं इकडे तैसींच जीत ॥ क्षण क्षणां तें आठवूनि मनांत ॥ बाहे ऊर्ध्व मुख करूनी ॥८४॥
त्याच स्त्रेहें निश्चितीं ॥ पिलिं येथें पुष्ट होती ॥ तेवीं तो आठवी ज्यांसी चित्तीं ॥ ते तरती स्वस्थानीं ॥८५॥
सूर्य दर्शनें सूर्य कांतांत ॥ अग्नि पडे अकस्मात ॥ कार्पास तत्काळ दग्ध होत ॥ इच्छा नसतां सूर्याची ॥८६॥
तैसी इच्छा न धरितां अकस्मात ॥ त्याची द्दष्टि जिकडे झळकत ॥ तो पुरुष विदेहत्व ॥ पावे तत्काल तेथेंचि ॥८७॥
ऐसीं द्वादश गुरुत्वें पूर्ण ॥ ओंवाळावीं तुज वरून ॥ ऐकतां कचाचें स्तवन ॥ कविश्रेष्ठ संतोषला ॥८८॥
कचासी दिधलें आलिंगन ॥ करें कुरवाळिलें वदन ॥ म्हणे चांडाळ दैत्य दुर्जन ॥ तुज मारून टाकिलें ॥८९॥
मद्यांत घालूनि तुज ॥ दुर्जनीं पाजियेलें मज ॥ तरी विष्णु हस्तें निर्लज्ज ॥ संहारती सर्वही ॥९०॥
आज पासून मद्यपान ॥ जो कोणी करील ब्राह्मण ॥ तो नीच अना मिका हून ॥ नरक दारुण भोगील ॥९१॥
ती शुक्राज्ञ अवधारा ॥ न मोडवे हरि हरां ॥ मद्यपान करितां विप्रा ॥ प्रायश्चित्तचि तत्काळ ॥९२॥
असो सहस्त्र वर्षें जाहलीं पूर्ण ॥ कचास म्हणे भृगुनंदन ॥ आतां स्वस्थला जाऊन ॥ आपुला श्रम करीं दूर ॥९३॥
नमस्कारूनि गुरुचरण ॥ निघता जाहला गुरु नंदन ॥ तों देव यानीनें येऊन ॥ पदरीं स्त्रेहें धरियेला ॥९४॥
म्हणे म्यां तुझी धरिली आस ॥ तूं सुंदर निर्दोष पुरुष ॥ असुरीं मारूनि निःशेष ॥ दोन वेळां टाकिलें ॥९५॥
म्यां शुक्राचार्यासी बोधिलें ॥ दोन वेळां तुज जन्म विलें ॥ मानस तव पदीं गुंतलें ॥ वरीन वेगें तुज लागीं ॥९६॥
विद्या विनय संपन्न ॥ तुज सारिखा नाहीं ॥ आन ॥ मज सारिखी दुसरी कामीन ॥ त्रिभुवनांत असेना ॥९७॥
अमृत संजीवनी विद्या पूर्ण ॥ तुज प्राप्त जाहली माझेन ॥ मज वरितां भृगुनंदन ॥ स्त्रेह वाढवील विशेष ॥९८॥
कच बोले आदरें ॥ तुम्ही आम्ही एको दरें ॥ बंधु भगिनी निर्धारें ॥ नाहीं दुसरें सापत्न ॥९९॥
तुज मज जनन स्थान ॥ कवीं द्राचें उदर पूर्ण ॥ ज्येष्ठ भगिनी माते समान ॥ झणीं वचन बोलसी ॥१००॥
यावरी देव यानी बोलत ॥ कचा तूं नष्ट परम धूर्त ॥ माझे न पुर विसी मनोरथ ॥ कपट साधुत्व तुझें हें ॥१०१॥
संजीवनी मंत्री निर्मळ ॥ होईल तुझा निष्फळ ॥ बीजें व्यर्थ गेलीं सकळ ॥ समयीं फळ न देती ॥१०२॥
कच म्हणे देव यानीसी ॥ विचार न करितां मज शापिसी ॥ तूं ब्रह्म कन्या निश्चि येंसी ॥ क्षत्रि यासी वरसील पैं ॥१०३॥
कदा न वरीच ब्राह्मण ॥ तुज शाप नेदीं मी कठिण ॥ तूं स्त्रेह केला असाधारण ॥ गुरु नंदिनी विशेष ॥१०४॥
मज मंत्र न फळे निःशेष ॥ तरी उपदेशीन दुज यास ॥ कार्य चालेल विशेष ॥ गुरु प्रसादें करूनी ॥१०५॥
ऐसें बोलूनि तारा सुत ॥ शक्र पदास पावला त्यरित ॥ सामोरा येऊनि शचीनाथ ॥ सन्मानीत गुरु सुता ॥१०६॥
देऊ नियां क्षेमालिंगन ॥ दिव्य यानीं बैस वून ॥ वाद्यगजरें करून ॥ मिरवीत नेला स्वस्थाना ॥१०७॥
वंदूनियां गुरु चरण ॥ समीप बैसे सहस्त्र नयन ॥ कचें सांगितलें वर्तमान ॥ शक्र ऐकोन तोषला ॥१०८॥
सबीज मंत्र ते वेळां ॥ कचें गुरूस सांगितला ॥ प्रतीति समवेत फळला ॥ आनंदला देवराव ॥१०९॥
दिव्या भरणीं दिव्यवसनीं ॥ गुरु कच पूजिले दोन्ही ॥ देव समस्त लागती चरणीं ॥ धन्य करणी कचाची ॥११०॥
इकडे शुक्रशिष्य वृषपर्वा ॥ जो दैत्यां माजी म्हणती मघवा ॥ दैत्य समुदाय आघवा ॥ आज्ञा शिरीं वंदीतसे ॥१११॥
तों शर्मिष्ठा जे दैत्य कुमारी ॥ लावण्य समुद्रींची लहरी ॥ देवांगना न पावती सरी ॥ आवडे सुंदरी पितयातें ॥११२॥
शुक्रकन्या देव यानी ॥ सौंदर्यरत्नांची दिव्य खाणी ॥ वनक्रीडेस दोघी जणी ॥ निघत्या जाहल्या एकदां ॥११३॥
परिचारिका दहा सहस्त्र ॥ स्त्रियांचाच सर्व दळभार ॥ शर्मिष्ठा देव यानी सुंदर ॥ प्राण सख्या परस्परें ॥११४॥
देखती रमणीक उद्यान ॥ नंदन वना हून सुंदर गहन ॥ त्यांत सरोवर निर्मळ जीवन ॥ मराळ तीरीं क्रीडती ॥११५॥
शर्मिष्ठा आणि देव यानी ॥ तीरीं वसनें भूषणें ठेवूनी ॥ सखियां समवते नग्न होऊनी ॥ सरोवर जीवनीं क्रीडती ॥११६॥
कमळें तोडोनि करीं घेती ॥ परस्पर जळ शिंपिती ॥ नाना कुसरी गायन करिता ॥ अप्सरा जैशा दिव्य पैं ॥११७॥
सेने सहित पुरंदर ॥ मार्गीं चालतां दळ भार ॥ स्त्रिया क्रीडतां सत्वर ॥ वायु गेगें सूटला ॥११८॥
अनिल वेगें करूनी ॥ वस्त्रें जाती गुंडाळूनी ॥ दूरी ऐकतां पुरुषवाणी ॥ घाबर्‍या कामिनी धांविन्नल्या ॥११९॥
शर्मिष्ठेचें दिव्य वस्त्र ॥ भार्गवी नेसली सत्वर ॥ तिचें क्षीरोदक पवित्र ॥ राज कन्य़ा ओढीतसे ॥१२०॥
दूर गेले निर्जर भार ॥ मग सावध होऊनि समग्र ॥ अंबरें आपुलिं सत्वर ॥ परस्पर लक्षिती ॥१२१॥
क्रोधायमान देव यानी ॥ शर्मिष्ठेस बोले कठोरवाणी ॥ तूं परम नष्ट राज नंदिनी ॥ वसन माझें नेसलीस ॥१२२॥
तूं अपवित्र परम निषिद्ध ॥ पितृ भाग्याचा चढला मद ॥ माझा पिता शुक्र प्रसिद्ध ॥ त्याच्या वरदें राज्य तुम्हां ॥१२३॥
माझे पितयाचें पादोदक ॥ शिरीं वंदी तुझा जनक ॥ राज्य भोगितो सम्यक ॥ शुक्र प्रसादें करूनी ॥१२४॥
ऐकतां कोपली राज कुमारी ॥ तूं आश्रिताची कन्या दरिद्री ॥ तुझा ताठा न मावे अंबरीं ॥ तोंड आवरीं शतमूर्खे ॥१२५॥
तुझा बाप भिक्षुक ॥ ठाऊक आहे परान्न भक्षक ॥ माझा जनक देतो भीक ॥ मातलीस ते भक्षू नियां ॥१२६॥
आपण अयोग्य बुद्धि मंद ॥ पंडितांशीं करी वाद ॥ आपण निःशस्त्री धरूनि मद ॥ धांवतसे रणशूरावरी ॥१२७॥
आपण मागणार भिकारी ॥ दातया सांगे आपुली थोरी ॥ तूं तैशीच मूढ निर्धारीं ॥ विप्र भिकारी पिता तुझा ॥१२८॥
शर्मिष्ठेनें दासी लावून ॥ मुष्टिघातें पृष्ठी मर्दून ॥ वनीं कूपामाजी टाकून ॥ आपण गेली स्वस्थाना ॥१२९॥
निःशेष निमाली देव यानी ॥ शर्मिष्ठा गेली संतोष मानूनी ॥ तों ययातिराव तये वनीं ॥ मृगयामिषें पातला ॥१३०॥
अश्वारूढ एकला ॥ दळ भार दूरी राहिला ॥ तृषेनें परम श्रांत झाला ॥ शोधीत आला कूपापाशीं ॥१३१॥
तों त्यांत स्वल्पोदक ॥ आंत इंदिरे समान सुरेख ॥ ललना करी परम शोक ॥ दीर्घ स्वरें रडतसे ॥१३२॥
ययाति बोले वरूनी ॥ कोणाची तूं सुंदर नितंबिनी ॥ कुमारी कीं सुवा सिनी ॥ या स्थळीं पडलीस कां ॥१३३॥
म्हणे दैत्यांचा प्राणदाता ॥ उशनाकवि माझा पिता ॥ शर्मिष्ठा जी राज दुहिता ॥ तिणें येथें टाकिलें ॥१३४॥
तूं कोण सांग मज प्रती ॥ येरू म्हणे मी राव ययाती ॥ देव यानी म्हणे धरीं हातीं ॥ बाहेर काढीं राजेंद्रा ॥१३५॥
तूं पवित्र नृपति कुलवंत ॥ मी ब्रह्म कन्या वंद्य अत्यंत ॥ माझा धरा वया हात ॥ योग्य होसी राजेंद्रा ॥१३६॥
ययाति म्हणे हें थोर यथार्थ ॥ देऊ नियां सव्य हस्त ॥ बाहेर काढिली त्वारित ॥ स्वरूप अद्भुत न वर्णवे ॥१३७॥
रातोत्पल सकुमार ॥ तैसे करतल परम सुंदर ॥ परम आरक्त तेजागार ॥ नक्षत्रां ऐसे झळकती ॥१३८॥
आकर्ण नेत्री लावण्य खाणी ॥ उपमेस रंभा मेनका उणी ॥ अंगींचा सुवास वनीं ॥ बह कतसे चहूं कडे ॥१३९॥
साधका साधे निधान ॥ कीं रंका सांपडे धन ॥ कीं जन्मां धासी आले नयन ॥ तैसा राव संतोषला ॥१४०॥
म्हणे सुकुमारे गृहास जाईं ॥ स्त्रेह असों दे निज ह्रदयीं ॥ शुक्ल पक्षीं लवलाहीं ॥ जैशी वाढे शशिकला ॥१४१॥
येरी म्हणे मनींचें आर्त ॥ पुरविणार रमाकांत ॥ पुसोन गेला नृपनाथ ॥ भार्गवी जात स्वग्रामा ॥१४२॥
नगरा समीप जाऊनि त्वरित ॥ वृक्षा खालीं बैसली रडत ॥ घूर्णिकेस देखोन सांगत ॥ वर्तमान सर्वही ॥१४३॥
पितयास जाऊनि त्वरें सांग ॥ निर्दय दैत्यांचा सांडीं संग ॥ नाहीं तरी करीन देहत्याग ॥ जिव्हा आसडून आपुली ॥१४४॥
सांडून दुष्ट हे सकल ॥ शिष्य करावा देव पाल ॥ परम सत्त्व मूर्मि शुशील ॥ वधील सकल दैत्यांसी ॥१४५॥
घूर्णिका धांवली त्वरित ॥ शुक्रास जाणवी सर्व मात ॥ शर्मिष्ठेने केला घात ॥ मरून वांचली देव यानी ॥१४६॥
वर्तमान ऐकून साद्यंत ॥ शुक्र वेगे आला धांवत ॥ कंठीं धांवोनि मिठी घालीत ॥ देव यानी पित याच्या ॥१४७॥
भिजली कंचुकी आणि चीर ॥ तुटून गेले मुक्ताहार ॥ रडे आक्रोशें सुकुमार ॥ शुक्र शांतवी तियेतें ॥१४८॥
काय जाहलें सांग वहिलें ॥ मजला शर्मिष्ठेंनें मारिलें ॥ वनीं घोर कूपीं ढकलिलें ॥ प्राण जावा म्हणो नियां ॥१४९॥
नहुष पुत्र राजा ययाती ॥ तो पातला मृगये प्रती ॥ तेणें मज धरून हातीं ॥ कूपा बाहेर काढिलें ॥१५०॥
मारून लोटिलें कूपांत ॥ याचा खेद न मनीं किंचित ॥ परी दुष्टोत्तरें छळिलें बहुत ॥ तें न वदवे माझेनि ॥१५१॥
ओखटें बोलतां उत्तर ॥ तुटे बहुकालींचा मित्र ॥ दुग्धीं कांजी पडतां बिंदुमात्र ॥ घट नाशी दुग्धाचा ॥१५२॥
तप्त शस्त्राचे घाय तीक्ष्य ॥ त्या हून शब्द शस्त्र दारुण ॥ त्रिभुवनी वंद्य तुझे चरण ॥ तुज दूषण लाविलें ॥१५३॥
मग शांत वून देव यानी ॥ शुक्र पावला दैत्य स्थानीं ॥ समस्त उभे ठाकले ते क्षणीं ॥ आचार्य चरण वंदावया ॥१५४॥
पूज्या सनीं न बैसे कवी ॥ म्हणे मज आज्ञा द्यावी ॥ मजविणें सुखें ॥ भोगावीं ॥ आचार्य पदवी बुडाली ॥१५५॥
ऐसें बोलतां भृगु निश्चित ॥ दैत्यांस वाटला कल्पान्त ॥ वृषपर्वा धांवोनि पाय धरीत ॥ एक घाली पोटांत डोई ॥१५६॥
ऋणा नुबंध तुटला संपूर्ण ॥ प्राक्त नाचें विचित्र विंदान ॥ नेईल तिकडे जावें एथून ॥ ईश्वरी संकल्प अगाध ॥१५७॥
म्हणे अपराध जाहला काई ॥ तो सांगावा लवलाहीं ॥ आम्हांस मारू नियां जाईं ॥ सर्वां सही ये काळीं ॥१५८॥
तुझेनि बळें निर्धारीं ॥ शक्र प्रतिमा घातली तोडरीं ॥ विष्णु महिमा वानिजे सर्वोपरी ॥ परी आम्ही मानूं तृप प्राय ॥१५९॥
प्राण सख यानें  विष घातलें ॥ मातेनें बालक आपटिलें ॥ तारकें पूरीं ओसंडिलें ॥ तेथें यत्न न चले कीं ॥१६०॥
रक्षक करूं इच्छीत घात ॥ दाता भणंगास दवडीत ॥ गुरु कुमार्गेंच लावीत ॥ तेथें यत्न न चले कीं ॥१६१॥
आम्हां अंतरतां तुझे चरण ॥ तत्कालचि सर्वांसी मरण ॥ अपराध तरी कवण ॥ करीं विदित स्वामिया ॥१६२॥
शुक्र बोले तये क्षणीं ॥ तुझें शर्मिष्ठेनें देव यानी ॥ ताडन करून काननीं ॥ कूपा माजीं लोटिली ॥१६३॥
नहुषपुत्रें काढिली बाहेरी ॥ न ये कदा नगरा भीतरी ॥ देहत्याग करील निर्धारीं ॥ तुमचे संगें राहतां ॥१६४॥
दैत्येंद्र म्हणे आचार्य श्रेष्ठा ॥ तुझिया पादुकां वरून ॥ वरिष्ठा ॥ ओंवाळून टाकीन शर्मिष्ठा ॥ आणि देव यानी वरूनि ॥१६५॥
आज्ञा देइंजे निश्चित ॥ घेईन देहान्त प्रायश्चित्त ॥ राज्य ओंवाळीन समस्त ॥ तुझिया पादुकांवरूनि ॥१६६॥
देव यानी तुझें बालक ॥ आम्ही कोणाचे सकळिक ॥ पितया हून ग्रुरू अधिक ॥ श्रुति शास्त्रें बोलती ॥१६७॥
देव यानीचा अपमान ॥ तेणें शिणलें तुझें मन ॥ देव आम्हांसी करिती दीन तोही अपमान तुझा कीं ॥१६८॥
आतां अन्याय घालीं पोटांत ॥ चरन धरिती दैत्य समस्त ॥ क्षमा म्हणसी तरी उठों सत्य ॥ नातरी पडूं ऐसेचि ॥१६९॥
शुक्र म्हणे जाऊनि वना ॥ देव यानीची करा प्रार्थना ॥ ती समज ल्यास माझे मना ॥ समाधान सहजचि ॥१७०॥
शुक्र आणि वृषपर्व दैत्यनाथ ॥ आले देव यानी असे तेथ ॥ चरण वंदिती समस्त ॥ अपराध क्षमा करीं माते ॥१७१॥
इच्छिसी तें देऊं समस्त ॥ सुरां दुर्लभ ते पुरवूं पदार्थ ॥ देव यानी म्हणे त्वरित ॥ देऊं इच्छितां मज जरी ॥१७२॥
तरी दहा सहस्त्र दासीं सहित ॥ शर्मिष्ठा दासी निश्चित ॥ जेथें मज देईल तात ॥ तेथें यावें तियेनें ॥१७३॥
ऐसें ऐकतां वृषपर्व ॥ सेवक पाठनू नियां तेव्हां ॥ दासीं समवेत सुदैवा ॥ शर्मिष्ठा त्वरें आण विली ॥१७४॥
पिता म्हणे शर्मिष्ठेसी ॥ आमुचें कुल जरी वाढ विसी ॥ तरी तूं होईं देव यानीची दासी ॥ न करीं मानसीं खेद कांहीं ॥१७५॥
येरी म्हणे तूं नांदें अक्षयीं ॥ यापरता मज लाभ नाहीं ॥ रायें कर धरूनि ते समयीं ॥ देव यानीस दीधली ॥१७६॥
असो देव यानी शर्मिष्ठे सहित ॥ तात सदनीं प्रवेशत ॥ दैत्य स्वगृहीं समस्त ॥ नांदूं लागले तेधवां ॥१७७॥
सवें घेऊनि शर्मिष्ठेसी ॥ देव यानी गेली वनक्रीडेसी ॥ पावली पूर्व स्थलासी ॥ खेळे मानसीं आनंदें ॥१७८॥
तों मृगया व्यसनें ययाती ॥ पावला त्याच स्थला प्रती ॥ तों देखिल्या बहुत युवती ॥ दोघी जणी श्रेष्ठ त्यांत ॥१७९॥
शर्मिष्ठा आणि देव यानी ॥ देखोनि राव निवाला मनीं ॥ म्हणे सकल तरूणींच्या स्वामिणी ॥ दोघी जणी सत्य पैं ॥१८०॥
राव बोले मधुर वचन ॥ मी नहुष पुत्र ययाति जाण ॥ सोमंवश ध्वज पूर्ण ॥ संतति अत्रि ऋषीची ॥१८१॥
देव यानी म्हणे तयासी ॥ शर्मिष्ठा हे माझी दासी ॥ मी शुक्रात्मजा जाण निश्चयेंसी ॥ ओळख मानसीं असेल ॥१८२॥
तुवां मज कूपांतूनी ॥ काढिलें कृपा ह्स्त देऊसी ॥ मी होईन तुझी पट्टराणी ॥ पाणि ग्रहिणी यथोक्त ॥१८३॥
राजा म्हणे तूं ब्रह्म कुमारी ॥ परम कोपिष्ठ त्या हीवरी ॥ समर्थ तव पिता निर्धारीं ॥ शुक्राचार्य असुर गुरू ॥१८४॥
त्यास न कळतां लग्न ॥ कैसें करावें अप्रमाण ॥ येरी म्हणे माझें वचन ॥ परम मान्य पित यासी ॥१८५॥
मग दासी पाठ विली सत्वर ॥ कवीस सांगितला समाचार ॥ परम आनंदला भृगुवर ॥ आला सत्वर त्या ठाया ॥१८६॥
पातला देखोन कवींद्र ॥ नमस्कारी ययाति राजेंद्र ॥ मनोरथ परिपूर्ण ऐसें साचार ॥ बोले गुरुवर दैत्यांचा ॥१८७॥
देव यानी बोले वचन ॥ पितया तव उदरींचें हें रत्न ॥ त्यास ग्राहक नहुष नंदन ॥ घ्यावया लागीं पातला ॥१८८॥
कचें दिधलें शाप वचन ॥ दुसरें ब्रह्म सूत्र प्रमाण ॥ तरी न करितां अनमान ॥ करीं दान माझें आतां ॥१८९॥
आनंदले भृगु आपण ॥ सकल संपत्ति तेथें आणोन ॥ यथा सांग केलें लग्न ॥ देत आंदण बहु साल ॥१९०॥
शुक्र म्हणे यया तीस ॥ तुज सांगणें एक रहस्य ॥ तुवां रेतदान शर्मिष्ठेस ॥ सहसाही न करावें ॥१९१॥
ही राजत नया निश्चियेंसीं ॥ परी मम कन्येची होय दासी ॥ ईस भोगितां निश्चियेंसीं ॥ शाप शस्त्रें ताडीन ॥१९२॥
कदा न घडे म्हणे ययाती ॥ द्विज म्हणे माझे पाय शिवें हातीं ॥ मग प्रमाण करी नृपती ॥ शुक्र चित्तीं आनंदला ॥१९३॥
मग शर्मिष्ठे सहित देव यानी ॥ ययाति निघाला घेऊनी ॥ जामातासी बोळवूनी ॥ शुक्र गेला स्वस्थाना ॥१९४॥
आपुल्या नगरा लागून ॥ मिरवत आला नहुष नंदन ॥ भार्गवीचें वचन प्रमाण ॥ ययातिराव मानीत ॥१९५॥
श्रृंगारवनीं नेऊनी ॥ शर्मिष्ठा ठेविली ते क्षणीं ॥ विश्राम सदन बांधोनी ॥ दासी दिधल्या सेवेसी ॥१९६॥
पतिसंग वेगळा करूनी ॥ सकळ भोग पुरवी देव यानी ॥ शय्या शृंगार भोजनीं ॥ आपणा समान मान देत ॥१९७॥
देव यानीचे संगतीं ॥ परम सुखावे ययाती ॥ तुच्छ मानी अमरावती ॥ नाहीं गणती आनंदा ॥१९८॥
यदु आणि तुर्वस ॥ पुत्र जाहले कवींद्र कन्येस ॥ बत्तीस लक्षणीं डोळस ॥ रूपें विशेष न वर्णवे ॥१९९॥
श्रृंगारवनीं राज सुता ॥ सकळही भोग भोगितां ॥ परी पती विणें तत्त्वतां ॥ खदिरां गारामान ॥२००॥
म्हणे कर्माची गति गहन ॥ न सुटे कदा भोगिल्या वीण ॥ मी दास्य पावलें पूर्ण ॥ पति संग नेणेंचि ॥२०१॥
पती विण भोग श्रृंगार ॥ वाटती जैसे विखार ॥ निद्रा न लागे अणुमात्र ॥ विकल शरीर पडतसे ॥२०२॥
जीवना वीण कासार ॥ दीपावीण व्यर्थ मंदित ॥ फलावीण तरूवर ॥ तेवीं शरीर व्यर्थ माझें ॥२०३॥
तों मृगयामिषें ययाती ॥ पातला त्या वना प्रती ॥ बाहुत श्रमला विश्रांती ॥ पावावया तेथें आला ॥२०४॥
प्रधानास म्हणे नृपवर ॥ आजी येथें रहावें साचार ॥ अवश्य म्हणोन दळभार ॥ केला स्थिर त्या स्थानीं ॥२०५॥
शर्मिष्ठेस आनंद बहुत ॥ बाहेर आली अंचल रुळत ॥ तिचें सौंदर्य़ पाहतां रतिकांत ॥ भुलोन वेडा होय पैं ॥२०६॥
भोंवत्या तिच्या सहस्त्र दासी ॥ सदा तिष्ठती सेवेसी ॥ उदक ठेवूनि रायासी ॥ अभ्यंग करवी शर्मिष्ठा ॥२०७॥
आपण स्वहस्तें करून ॥ करी रायास तैलमर्दन ॥ मार्जन जाहल्या भोजन ॥ देत आपण शर्मिष्ठा ॥२०८॥
राजेंद्राचे भाळीं ॥ मृग मदतिलक रेखी वेल्हाळी ॥ दिव्य चंदन उटी दिधली ॥ हार घाली स्वहस्तें ॥२०९॥
ऐसा स्वगुणें करून ॥ मोहिला नहुष नंदन ॥ राजा म्हणे माझें मन ॥ तुझा संग इच्छीतसे ॥२१०॥
परी कोपेल देव यानी ॥ मी काय करूं सांग ये क्षणीं ॥ येरी म्हणे मी राज नंदिनी ॥ वरिलें मनीं पूर्वींच म्यां ॥२११॥
मनः सुमनांची माला ॥ तुझे कंठीं घातली नृपाळा ॥ तिचें मन राखिसी सुशीला ॥ माझी उपेक्षा करूनियां ॥२१२॥
एकचि सुधारस पूर्ण ॥ प्राशन करिती दोघे जण ॥ एकाचें चुकलें मरण ॥ एका मृत्यु न सोडी ॥२१३॥
भागीरथींत स्त्रान ॥ सप्रेम करिती दोघे जण ॥ एकाचें पाप गेलें जळोन ॥ एक तैसाचि राहिला ॥२१४॥
परिसाच्या देवास निश्चिती ॥ लोह भक्त द्दढ भेटती ॥ एकाची जाहली सुवर्ण कांती ॥ एक तैसाचि राहिला ॥२१५॥
सुवर्णलतिका गुणें समान ॥ कवळिती सुरद्रुमाग गून ॥ एक सफल जाहली पूर्ण ॥ दुजी निष्फल जाहली कां ॥२१६॥
एका हातें झांकूनि नयन ॥ एका चक्षूनें कीजे अवलोकन ॥ हें चतुरांस नव्हे भूषण ॥ लगे दूषण तत्त्वतां ॥२१७॥
असो चातुर्य सुमनें करून ॥ तिणें पूजिला नहुष नंदन ॥ पंचबाणें रायाचें मन ॥ भेदिलें पुर्ण नाटोपे ॥२१८॥
क्षेमा लिंगन चुंबन ॥ परस्परें देतां पूर्ण ॥ सुरता नंदीं सदा निमग्न ॥ दोघें जाहलीं तेधवां ॥२१९॥
भोग देऊन ते क्षणीं ॥ राव निघे वेगें करूनी ॥ हें जरी कळेल देव यानी ॥ तरी अनर्थ करील ॥२२०॥
परी शर्मिष्ठा जाहली गरोदर ॥ नवमास भरले सत्वर ॥ आवळे जावळे दोघे पुत्र ॥ द्रुह्यु अनु नामें जाहले ॥२२१॥
देव यानी चिंतातुर ॥ म्हणे कैसी प्रसवली दोघे पुत्र ॥ लोटल्या एक संवत्सर ॥ तया वना पातली ॥२२२॥
म्हणे कैसे जाहले गे पुत्र ॥ शर्मिष्ठा बोले तेव्हां चतुर ॥ एक अकस्मात आला ऋषी श्वर ॥ तेणें भोग दीधला ॥२२३॥
त्याचे प्रसादें करून ॥ जाहले दोघे नंदन ॥ देव यानी बोले वचन ॥ नाम गोत्र काय त्याचें ॥२२४॥
येरी म्हणे मी भुलल्यें ॥ त्यासी पुसावया विसरल्यें ॥ येरी म्हणे ऐसें जरी जाहलें ॥ तरी मी संतुष्ट सदा तुजवरी ॥२२५॥
घरा गेली देव यानी ॥ परी सचिंत सदा मनीं ॥ तों आणिक नृप संगें करूनी ॥ पुत्र कन्या जाहलीं ॥२२६॥
पुरु माधवी निर्दोष ॥ पुत्र कन्या नामें विशेष ॥ तों देव यानी आली वनास ॥ शर्मिष्ठेस पुसतसे ॥२२७॥
बत्तीसलक्षणीं संयुक्त ॥ राजबीज तेज अद्भुत ॥ तुज कैसे होतात सुत ॥ ऋषी पासून नेणें मी ॥२२८॥
तों देव यानीचे सांगातें ॥ ययाति आला होता तेथें ॥ देव यानी बोलवी बालकांतें ॥ पुढें तिघांतें घेऊनी ॥२२९॥
पुसे बालकांला गून ॥ तुमचा पिता दाखवा कोण ॥ तंव तिघेही तर्जनी उच लोन ॥ राया कडे दाविती ॥२३०॥
सवेंच उठलीं तिघें जण ॥ बैसती राज अंकीं जाऊन ॥ गळां मिठी घालून ॥ फळें मागती भक्षावया ॥२३१॥
तें देखोनि देव यानी ॥ क्रोधें संतप्त तये क्षणीं ॥ म्हणे राज याला गूनी ॥ पुत्रत्रय तुज जाहलें ॥२३२॥
राजा नेदी प्रतिवचन ॥ पाहे खालीं अधोवदन ॥ जैसा तस्कर आणिला धरून ॥ बोल वितां न बोले ॥२३३॥
म्हणे शर्मिष्ठेस तूं दासी ॥ चोरून भोगिलें रायासी ॥ संपादणी करितेसी ॥ कीं मज ऋषी भेटला ॥२३४॥
असत्य बोलसी वचन ॥ जिव्हेचें करीन खंडन ॥ तूं असुरी कपटीण ॥ वशीकरण जाणसी ॥२३५॥
शर्मिष्ठा म्हणे मी तुझी भगिनी ॥ म्यांही राव वरिला मनीं ॥ पितृवचनें करूनी ॥ दासी तुझी म्हण वितें ॥२३६॥
देव यानी म्हणे रायासी ॥ मी जातें कवीं द्रापाशीं ॥ तूं भोगीं शर्मिष्ठेसी ॥ करीं सुखें राज्य आतां ॥२३७॥
वेगें निघतां ती गोरटी ॥ राजा धांवोनि घाली मिठी ॥ म्हणे एवढा अन्याय पोटीं ॥ घालीं माझा एधवां ॥२३८॥
राजा भाल ठेवी चरणीं ॥ पायें लोटी देव यानी ॥ लत्ता प्रहार करूनई ॥ म्हणे सरें माघार ॥२३९॥
राजा धांवतसे चरणीं ॥ परी नाटोपे देव यानी ॥ मनोवेगें करूनी ॥ शुक्रा जवळी पातली ॥२४०॥
धरूनि पित याचे चरण ॥ दीर्घस्वरें करी रोदन ॥ तों राजाही कर जोडून ॥ उभा ठाकला तिज मागें ॥२४१॥
देव यानी म्हणे पित यासी ॥ दैत्य कन्य़ा माझी दासी ॥ येणें भोगून तियेसी ॥ पुत्रत्रय निर्मिलें ॥२४२॥
मज जाहले दोघे सुत ॥ तिजकडे याचें सदा चित्त ॥ शाप शस्त्रें भृगु सुत ॥ ताडिता जाहला रायातें ॥२४३॥
महा वार्धक्यें निश्चित ॥ शरीर होवो तुझें गलित ॥ राजा लोटां गणें घालीत ॥ विनवीत श्वशुरातें ॥२४४॥
म्हणे शर्मिष्ठा दग्धली कामें करून ॥ प्रर्थून मागे भोग पूर्ण ॥ जरी नेदीं वीर्यदान ॥ तरी पुत्र्र हत्या घडेल ॥२४५॥
या शास्त्र निर्बंधें निश्चित ॥ तेथें जाहला वीर्यपात ॥ शुक्र म्हणे अविधि यथार्थ ॥ करून शास्त्र सांगसी ॥२४६॥
माझें वचन नव्हे व्यर्थ ॥ तंव राव जाहला जरा भिभूत ॥ दशन पडले समस्त ॥ नयन अंधत्व पावले ॥२४७॥
श्रवण जाहले बधिर ॥ कांपूं लागलें शरीर ॥ मर्कटा ऐसें कलेवर ॥ दिसों लागलें तयाचें ॥२४८॥
नयनीं घ्राणीं वदनीं ॥ एक वटलीं जलें तीन्ही ॥ शब्द अडखळे आननीं ॥ कोणा तेंही समजेना ॥२४९॥
यावरी घालूनि लोटां गण ॥ यया तिराव बोले वचना ॥ तृप्त नाहीं माझें मन ॥ देव यानीस भोगितां ॥२५०॥
कृपा करून ये समयीं ॥ माझें तारुण्य मज देईं ॥ कवि कळवळला ह्रदयीं ॥ वचन काय बोलत ॥२५१॥
पांच पुत्र तुझे जाण ॥ एकासीं मागें तारूण्य़ ॥ त्यास देऊन वृद्धपण ॥ होईं तरुण पुढती तूं ॥२५२॥
राजा म्हणे शुक्रातें ॥ जो तारुण्य ओपील मातें ॥ राज्यपद देईन त्यातें ॥ नाहीं इतरांतें संबंध ॥२५३॥
अवश्य म्हणे कविराज ॥ जो तारुण्य देईल सतेज ॥ तोच वंशीं विजय ध्वज ॥ वंशधर पद तयातें ॥२५४॥
आज्ञा घेऊन ययाती ॥ पातला स्वनगरा प्रती ॥ पंच पुत्रांस परम प्रीतीं ॥ पाचारून पुसतसे ॥२५५॥
सहस्त्र वर्षें पर्यंत ॥ तारूण्य द्यावें मज यथार्थ ॥ तृप्त जाहलिया मनोरथ ॥ जरा पुढती घेईन मी ॥२५६॥
यदु तुर्वसु देव यानीचे पुत्र ॥ द्रुह्यु अनु पुरु निर्धार ॥ हे शर्मिष्ठेचे सुंदर ॥ पंच कुमार दोधींचे ॥२५७॥
त्यांत चौघे बोलती नंदन ॥ नेदूं आपुलें तारुण्य ॥ केवळ नर कवास वृद्धपण ॥ पाप कोण घेईल हें ॥२५८॥
आमुचें तारुण्य घेऊन ॥ भोगिसी आमुचे माते लागून ॥ मातृग मनाचें दारूण ॥ पाप घडेल आम्हांतें ॥२५९॥
ऐसी ऐकतां वचनोक्ती ॥ शाप देत ययाती ॥ यदूची यादव कुलसंतती ॥ आश्रयें राहील दुजियांच्या ॥२६०॥
नाहीं छत्र सिंहासन ॥ अरे तुर्वसो तुझें संतान ॥ गोह त्यारी मद्यपी जाण ॥ महा चांडाल अपवित्र ॥२६१॥
आरक्तश्याम वर्ण नयन ॥ सागर बेटीं राहील पूर्ण ॥ द्रुह्यु पुत्रा प्रती ॥ शापवचन ॥ काय बोले ययाती ॥२६२॥
तुझा वंश हो कैवर्तक सत्य ॥ मत्स्यघ्न अनाचारी बहुत ॥ नौका तारूनि जीवित ॥ रक्षूनियां वर्तेल ॥२६३॥
अनु तुझें संतान ॥ यंत्रकार लोहकार जाण ॥ राज्य विरहित याति हीन ॥ जन्मतील दुरात्मे ॥२६४॥
चौघे घातले बाहेरी ॥ पुरु पाचारिला ते अवसरीं ॥ तेणें मस्तक ठेवूनि चरणांवरी ॥ तरुणत्व दीधलें ॥२६५॥
पुरु पुत्र बोले वचन ॥ शरीर जाहलें तुजपासून ॥ तुझें तुज नेदीं पूर्ण ॥ तरी जाईं नरका लया ॥२६६॥
ऐसें बोलतां वचन ॥ ययाति जाहला तरुण ॥ पुरुण ॥ पुरूनें घेतलें वृद्ध पण ॥ सहस्त्र वर्षें मर्यादा ॥२६७॥
शर्मिष्ठा आणि देव यानी ॥ स्त्रिया भोगी सुख शयनीं ॥ राज्य चालवी अनुदिनीं ॥ धर्म न्यायें ययाती ॥२६८॥
दुष्टांस दंड करून ॥ केलें बहु प्रजा पालन ॥ सुखी केले पृथ्वीचे ब्राह्मण ॥ भोजन धनालंकारें ॥२६९॥
केले बहुतचि यज्ञ ॥ गो भू गज नवरत्न ॥ उरलें नाहीं कांहीं दान ॥ व्रताचरण नेम कांहीं ॥२७०॥
मग उब गून विषयांसी ॥ तारुण्य़ दिधलें पुरूसी ॥ छत्र सिंहासन देऊन त्यासी ॥ वंशधर तो केला ॥२७१॥
अंगी करून वृद्ध पण ॥ दोघी स्त्रिया संगें घेऊन ॥ प्रवेशला ताप सारण्य ॥ तप दारुण आचरला ॥२७२॥
तीस वर्षें पर्यंत ॥ जला हार ययाति करीत ॥ वायु भक्षण निश्चित ॥ एक वर्ष केलें हो ॥२७३॥
पंचाग्नि साधन ॥ वर्ष एक ॥ चरणा वरी उभा देख ॥ मग दिव्यदेह पावोनि सुरेख ॥ स्वर्गा प्रती पावला ॥२७४॥
उभयदारां सहित ॥ दिव्य विमानीं बैसत ॥ इंद्रादि देव सामोरे येत ॥ वंदिती समस्त रायातें ॥२७५॥
पुण्य देखोन समर्थ ॥ इंद्रास विषाद उपजत ॥ कपटें रायासी विचारीत ॥ बोलें सुकृत आपुलें ॥२७६॥
भोळेपणे सांगे ययाती ॥ तों सुकृत हानि जाहली निश्चितीं ॥ खालीं पडला धरणीपती ॥ तंव नवल वर्तलें ॥२७७॥
माधवी कन्येचे पुत्र देख ॥ प्रतर्दन वसुमान शिबि अष्टक ॥ चौघे पुत्र पुण्य श्लोक ॥ स्वर्धुनीतीरी वसती सुखें ॥२७८॥
महा पुरुष ते महंत ॥ गंगातीरीं याग करीत ॥ त्याचा होम धूम्र गगनीं जात ॥ पुण्य रूप तेजस्वी ॥२७९॥
ययाति पडाव धरित्रीं ॥ तों धूम्रें धरिला वरचेवरी ॥ ययाति ते अवसरीं ॥ नमस्कारी तैं अष्टका ॥२८०॥
सांगितलें वर्तमान ॥ इंद्रें दिधलें लोटून ॥ मग तो ययाति पूर्ण ॥ महंतींही बोधिला ॥२८१॥
त्यांचे संगें केलें तप ॥ श्रवण केलें अमूप ॥ मग स्वर्गास सुखरूप ॥ ययाति राव पातला ॥२८२॥
व्यास सूत वैशं पायन ॥ तिघे बोलिले कथा पूर्ण ॥ त्यांतील सारांश काढून ॥ केलें कथन तुम्हां प्रती ॥२८३॥
संपले ययाति आख्यान ॥ पुढें कथा गोड गहन ॥ श्रवण करोत विचक्षण ॥ ब्रह्या नंदेंकरो नियां ॥२८४॥
भारत ग्रंथ समुद्र ॥ साहित्यरत्नें आंत अपार ॥ त्यांचे ग्राहक पंडित नर ॥ परम चतुर भावार्थी ॥२८५॥
पांडव प्रताप ग्रंथीं ॥ जे बैसती श्रवणपंक्तीं ॥ तिंहीं कृपा करून पंडितीं ॥ अवधान ॥ पुढें देइजे ॥२८६॥
ब्राह्मानंदा पंढरीनाथा ॥ पुढें बोलवीं भारत कथा ॥ आदिम ध्यान्त तत्त्वतां ॥ तूंचि कर्ता अससी पैं ॥२८७॥
वाजविणार नाहीं बरवा ॥ तरी कैसा वाजेल पांवा ॥ रुक्मिणी जीवना करुनार्णवा ॥ श्री धर वरदा सुखाब्धे ॥२८८॥
पुढें पांडवोत्पत्ति सुंदर ॥ माजेल जो रसा अपार ॥ श्री धर मुखें परिकर ॥ ब्रह्मानंद वदेल पैं ॥२८९॥
सुरस पांडव प्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ पंचमाध्यायीं कथियेला ॥२९०॥
इति श्री श्री धर कृतादिपर्वणि पंचमाध्यायः ॥५॥
श्री कृष्णार्पणमस्तु ॥

॥ श्री पांडवप्रताप आदिपर्व पंचमाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP