मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ५०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल कथा पुढची सांगती । पार्श्व मुनी पूर्वीं गणेशा पूजिती । दीपवत्सल पत्नीसह आराधिती । तपश्चर्यें नें विभूसी ॥१॥
दहा सहस्त्र वर्षांनंतर । गणेश प्रकटले समोर । वर देण्या त्यास उदार । त्यानें पूजन प्रथम केलें ॥२॥
नंतर नाना स्तोत्रांनी स्तवित । तें गणेश त्यास म्हणत । वर मागा पतिपत्नी तुम्हीं इच्छित । पुरवीन मीं तो निश्चयें ॥३॥
तीं उभयता प्रार्थित । आमुचा पुत्र होऊन पुरवी इच्छित । तथास्तु म्हणून गणराज जात । स्वानंदपुरा परतुनी ॥४॥
तदनंतर एकदा देवर्षि नारद । इंद्रास भेटून करी सुखसंवाद । सुरनाथ पूजी तयास सुखास । विचारी हितकारक वृत्त ॥५॥
नारद सांगे तयाप्रत । हिमालयावरी राजा मदयुक्त । अभिनंदन तो यज्ञ करित । दुर्मती हिमप्रांतांत ॥६॥
तो ब्राह्मणी बोलावून आज्ञापित । इंद्राविना यज्ञ करा हेतयुत । अन्यथा हनन करीन त्वरित । तुम्हां सर्वाचें निर्घृणपणें ॥७॥
बलगर्वित तो ऐसें म्हणत । महर्षी तें ऐकून म्हणत । तैसेंचि करुं आम्हीं नृपा सांप्रत । वचन हें देतों आमुचें ॥८॥
आज ना उद्यां करितील । यज्ञ ऐसा भयें ते विप्र अबल । यांत नसे संदेह लव बळ । नृपाचें ते जाणिती ॥९॥
आतां जें इच्छिसी तें करी । मीं जातों आतां माघारी । ऐसें म्हणून मार्ग धरी । मयायोगी वैकुंठाचा ॥१०॥
नारद विष्णूस भेटत । तदनंतर स्वच्छंदे विहार करित । इंद्र क्रोधयुक्त स्मरत । महाकाया काळासी ॥११॥
महाकाळ तें प्रकटत । झणीं इंद्राच्या पुढयांत । त्यास प्रणाम करुन स्तवित । वृत्तान्त दुःखद सांगितला ॥१२॥
यज्ञाचा विध्वंस करी । दुःखाचें कारण दूर करी । काळ ती आज्ञा स्वीकारी । त्वरित गेला धरणीवरी ॥१३॥
कालाधीन जग समस्त । सदा सर्वदा कालग्रस्त । काळास योगबळें जिंकित । योगिजन सर्वकाळ ॥१४॥
प्रथम कर्मशुद्धी प्राप्त करुन । नंतर योगनिष्ठा लाभते महान । म्हणून कर्मनाशार्थ यतेन । विशेषें मीं काळ म्हणे ॥१५॥
कर्महीन जे नर असती । ते मलिन चित्तीं होती । आद्य योगास नेच्छिती । मदोन्मत्त ते होतील ॥१६॥
जन्ममृत्युयुक्त समस्त । माझ्या अधीन सर्व असत । इंद्रें प्रेरणा दिली मजप्रत । कपट मी करणार नाहीं ॥१७॥
ऐसा विचार करुन घेत । काळ आसुर रुप त्वरित । विघ्नरुपें त्या भूपाप्रत । क्रोधें आरक्त होऊनियां ॥१८॥
यज्ञ वेगानें मोडिला । ब्राह्मणां तारिलें त्या वेळा । नाना स्थळीं तो फिरला । विघ्नरुपधारी काळ दुष्ट ॥१९॥
कर्मखंडनोद्यत संचार करित । काळ तो बळमोहित । सर्वत्र मानवांसी पीडित । कर्मलोप करण्याला ॥२०॥
महावेगें जनास मोहवित । विप्रांस भ्रम पाडित । नाना स्वरुपधारी भुलवित । योगीजनांसी त्या समयीं ॥२१॥
रात्रीं प्रातःकाळीं सायंकाळीं करित । नाना भ्रम जगांत । रात्रीस दिवसाचा भास आणित । दिवस भासवी रात्रिरुप ॥२२॥
कर्मखंडन करण्या यत्नपर । तो काळ करी विघ्न अनिवार । त्याचें वर्णन अशक्य अपूर्व । कर्महीन सर्वां केलें ॥२३॥
भ्रमयुक्त सारे जन होत । चंद्र सूर्य नक्षत्रां झाकित । तेव्हां देवही अतिभयुक्त । भ्रांत झाले मानसीं ॥२४॥
यज्ञ कर्मे लोप पावत । देवांसी उपोषण तें घडत । ते चालण्याही अशक्त । कालाधीन सुर सारे ॥२५॥
काळास चालवूं न शकतो । सृष्टिस्थिति लयात्मक स्थिती । तेव्हां वसिष्ठ मुख्य ब्राह्मण जाती । शरण महाविष्णूला ॥२६॥
वैकुंठांत ते जात । जेव्हां काळभयें पीडित । तेव्हां विष्णु त्यांस नेत । शंकरासमीप भयसंकुल ॥२७॥
नानाविध स्तोत्रें शंकरा स्तवित । वर्णितो कामाचें सारें वृत्त । शिव त्या सर्वांसमवेत । विघ्नेशाचें स्तवन करी ॥२८॥
तपश्चर्या करिती ध्यान करिती । झणीं विघ्नेशा तोषविती । ऐसी शंभर वर्षें जाती । तें गजानन तोषला ॥२९॥
त्यांस वर देण्यास प्रकटत । त्या तापसा जागें करित । त्या समयीं ते स्तवित । विघ्ननाशार्थ त्या देवासी ॥३०॥
त्या सर्वांची प्रार्थना ऐकत । तथास्तु म्हणून स्वीकरित । पार्श्वाचा पुत्र होत । दीप वत्सलेच्या घरीं ॥३१॥
दीपवत्सल भार्येसहित । पार्श्व योगीधीर एक आचरत । विघ्नेश्वरा तो स्मरत अविरत । ऐसी हजार वर्षे गेलीं ॥३२॥
तेव्हां गजानन प्रसन्न होत । त्यांच्यापुढें प्रकट होत । तीं पतिप्रत्नी त्यास पूजित । स्तवन करिती प्रार्थिती ॥३३॥
तो पार्श्वयोगी याचना करित । स्वामी माझा होई सुत । पुत्रवात्सल्यें पत्नीसहित । भजेन परमतारका तुजसी मी ॥३४॥
मूर्तीत देव मानून । हृदयीं योगमागें आराधून । भजेन त्रिविध ढुंढे तुज पावन । सर्वत्र मी विशेषें ॥३५॥
नाना कर्मपर मी होत । गजानना जै तुझा पिता जगांत । तेणें तूं माझा तारक निश्चित । होशील यांत न संशय ॥३६॥
तथास्तु म्हणून अंतर्धांन । विघ्नराज पावले तत्क्षण । विघ्नासुर विनाशार्थ पावन । देहधारी झाला गजानन ॥३७॥
दीपवत्सलिकेच्या उदरांत । तो महा विभु जन्मत । जन्मा नंतर स्तनपानादिक करित । अतितोषें तो सर्व क्रीडा ॥३८॥
पांच वर्षांचा झाला तो सुत । मुनिसदनीं तो नांदत । तेव्हां देवर्षि भक्तिसंयुत । त्यास भेटण्या सर्व गेले ॥३९॥
शंकरादि देवास पाहत । वसिष्ठदि मुनीश्वरांचे स्वागत करित । सर्वांस पाहून स्वगृ हांत । संभ्रमयुक्त तो पूजन करी ॥४०॥
यथाविधी त्यास पुजून । प्रेमसंयुक्त म्हणे वचन । धन्य धन्य माझें जीवन । धन्य कर्म धन्य जन्म ॥४१॥
आपण देवगण मुनिजन समस्त । माझ्या घरीं आलांत । आतां आज्ञा करावी मजप्रत । देवेशांनो दास मी तुमचा ॥४२॥
आपली आज्ञा पाळीन । यांत संदेह अल्पही नसून । आपुला प्रभाव जाणून । सांगाल तें करीन मीं ॥४३॥
तें ऐकोन देवर्षि म्हणत । तुझ्या भाग्यबळें जन्मत । स्वानंदवासी गजानन साक्षात । मायेनें अवतार घेऊन ॥४४॥
त्यास हितार्थ प्रार्थना करण्या सांप्रत । आलों तव गृहीं समस्त । विघ्नासुरें जग समस्त । भ्रष्ट केलें महामुने ॥४५॥
त्याचा नाश करण्या करणें । प्रयत्न महामते आम्हां रक्षणें । त्यांचे वाक्य ऐकून उदासवाणें । जीवन वाटे मुनीस त्या ॥४६॥
तो जाहला शोकसंतप्त । त्या समयीं गजानन तेथ येत । त्यास पाहून सारे उठत । प्रणाम करिती विनम्रभावें ॥४७॥
सुरेश्वर मुनी स्तवित । देवासी ते आदरें प्रार्थित । त्याचें जाणॊओन हृदयवांछित । चतुर्भुजरुप तो घेई ॥४८॥
शस्त्रहत मूषकावरी बसत । झणीं महासुरा मारण्या जात । पुढिल कथाभाग अद्‌भुत । वाचावा पुढिले अध्यायीं ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजानन चरिते विघ्नासुराश्रगमनें नाम पंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP