मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ३१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दशरथ विचारी वसिष्ठप्रत । पौष कृष्ण्चतुर्थीचें व्रत । कैसें जाहलें प्रख्यात । ती सर्व कथा मज सांगा ॥१॥
वसिष्ठ तेव्हां सांगत । इतिहास तयाप्रत । वीरसह राजा हस्तिनापुरांत । धर्मशील श्रेष्ठ होता ॥२॥
धर्मशील नानाशास्त्र निष्णात । मान्यवर तो बलवंत । नाना दानें याचका देत । परी नव्हतें त्यास संतान ॥३॥
त्यासाठीं प्रयत्न करित । देवसेवा करी भक्तियुक्त । पुत्रकामेष्टि यज्ञ करवित । ब्राह्मणांकरवीं त्यासाठीं ॥४॥
परी त्यास वंशवर्धनार्थ न होत । इच्छित ऐसा सुत । तीर्थक्षेत्रादिक फिरत । परी संततीलाभ नसे ॥५॥
तेव्हां होऊन अतिदुःखित । राज्य सोडून जाई वनांत । स्त्रीसहित भ्रमण करित । थंडी वारा उन्हांत ॥६॥
महावनांत तो जात । दुःखशोक निमग्न अत्यंत । सिंह वाघ जेथ फिरत । तेथही फिरे भयहीन ॥७॥
तेथ त्रित नामा महामुनी येत । योगींद्र एक अवचित । त्यास नमस्कार करुन जोडित । करांजली ॥८॥
त्यानें विचारितां कथित । सर्वही आपुला वृत्तान्त । महायश तो रुदन करित । करुणापूर्वक त्या वेळीं ॥९॥
तो ऐकून वृत्तान्त । तयासी म्हणें तो त्रित । चतुर्थीचें नष्ट व्रत । तुझ्या राज्यांत महिपाला ॥१०॥
जरी तूं नाना धर्मरत । परी मुख्य चतुर्थीचें व्रत । विसरलास जें चतुर्वगें देत । तें न करतां नरकाप्रती ॥११॥
ऐसें सांगून मुनिसत्तम । सांगे महात्म्य अनुपम । वीरसह तें ऐकून मनोरम । म्हणे मी आराधीन गणेशाला ॥१२॥
त्या गणेशाचें स्वरुप मजप्रत । आणखी सांगावें विस्तृत । अशक्य वर्णन करण्या असत । म्हणे त्रित तयासी ॥१३॥
परी उपाधियुक्त सांगतों । माझाच वृत्तान्त कथितों । पूर्वी मी करीत होतों । तपःसाधना अत्यंत ॥१४॥
शापनुग्रहणीं शक्ति लाभत । एक द्विजंबधु विद्यायुक्त । त्यांच्यासह एकदा जात । नृपसदनीं यज्ञ करण्या ॥१५॥
तो यज्ञ करवून परतत । जेव्हां मी स्वगृहाप्रत । दक्षिणा पशुधनांनी युक्त । विपुल प्राप्तीसह अन्यही ॥१६॥
तेव्हां वनांतरीं मार्गांत । माझे भाऊ एक द्विज जात । मजला लकटून एका कूपांत । निघून गेले स्वगृहीं ॥१७॥
जलहीन त्या कूपांत । मी पडलों खेदयुक्त । तेथ मानसिक यज्ञ करित । हितावह जो संकटीं ॥१८॥
देवादिक जे आहूत । ते सर्वही तेथ येत । हविर्भाग स्वीकारण्या इच्छित । मानसपूजा केली मीं ॥१९॥
ते सर्वही होऊन तृप्त । मजला वर देत ईप्सित । कूपाबाहेर काढून जात । सकल देव परतून ॥२०॥
नंतर अन्य नृपाजवळ याचना । करुनी पुरविली कामना । मिळवून प्रभूत धना । गोधनही अपार ॥२१॥
हर्षभरें आश्रमाप्रत । आपल्या परतलों त्वरित । तप आचरिलें उग्र अत्यंत । त्यायोगें ज्ञान मज झालें ॥२२॥
तप सोडून भूमिसाधक । जडोन्मत पिशाचादिक । भूमि साधिल्या निःशंक । अंतीं ब्रह्मगत मी जाहलों ॥२३॥
समात्मा मीं स्वशांतिद आश्रमांत । आपुल्या होतों हर्षयुक्त । तेव्हां मुद्‌गल मुनि येत । धर्मशील जे पवित्र ॥२४॥
माननीयांत मान्यवर । पवित्र जैसे उदार । प्रणाम करुन तो योगींद्र । स्तविली मी श्रद्धाभावं ॥२५॥
म्हणें मीं तयासी विनीत । हात जोडून भक्तिभावयुक्त । शांतियोग सांगावा मजप्रत । शांतिलाभ होय तेणें ॥२६॥
मुद्‌गल तेव्हा सांगत । असत्‍ शक्ति सूर्य सत्‍ असत । विष्णु समभावयुक्त । अव्यक्त त्यामाजीं शंकर ॥२७॥
त्यांच्या संयोगें गणप होत । संयोगें मायायुक्त उदात्त । ब्रह्मनायक गणेश असत । अयोगांत मायाहीन ॥२८॥
संयोग अयोग यांच्या योगांत । गणेशयोग असे ख्यात । शांतिप्रद शांतीसीही तो ज्ञात । त्यास भज तूं भक्तिभावें ॥२९॥
ऐसें सांगून मुद्‌गल देत । एकाक्षर मंत्र विधियुक्त । नंतर अंतर्हित होत । गणराजभक्ति मीं करुं लागलों ॥३०॥
सर्वभावें त्यास भजत । तेणें शांति लाभत । मज कुठलें भय बाधत । गणेशाहून अन्य ब्रह्म नसे ॥३१॥
गणेशाहून अन्य तप नसत । नसे कर्म वा ज्ञान जगांत । गणेशाहून जें श्रेष्ठ असत । ऐसें जगीं काहीं नसे ॥३२॥
योग तैसी भक्ति नसत । त्या गणेशाहून श्रेष्ठ विश्वांत । म्हणोनि सर्वांसी पूज्य ख्यात । सर्व कार्यांत सिद्धिप्रद ॥३३॥
गणेशानासी त्यागून । कर्म ज्ञानादिक अपावन । निष्फळ सारें तें मान । भस्मांत आहुती दिल्यापरी ॥३४॥
ऐसें बोलून तयाप्रत । त्रितमुनि दशाक्षर मंत्र देत । विधिपूर्वक तो पुनीत । नंतर अन्तर्धान पावला ॥३५॥
राजा वीरसह हर्षभरित । आपुल्या नगरासी परतून जात । प्रधान त्यांचें स्वागत करित । गणेशास आराधिती ॥३६॥
तदनंतर जी प्रथम येत । पौष कृष्ण चतुर्थी त्या दिनीं व्रत । संकष्टीचें नृप करित । समस्त प्रजाजनांसमवेत ॥३७॥
हया व्रताची प्रशंसा करित । चतुर्थीव्रत जगीं ख्यात । सर्व जन तें आचरित । जैसा राजा तैसी राजा ॥३८॥
नंतर वीरसेह नृपास । महाशूर पुत्र होऊन विशेष । नीतिज्ञ धर्मसंयुत जो जनांस । तोषवी आपल्या गुणांनी ॥३९॥
रोगहीन प्रजा समस्त । हृष्ट पुष्ट जन होत । जेथ तेथ प्रेमें वर्णित । चतुर्थी माहात्म्य सकलजन ॥४०॥
वीरसह नृप राहिला सुखांत । वृद्ध होतां जात वनांत । पुत्रावरी राज्य सोपवित । निवृत्तिपूर्वक त्या वेळीं ॥४१॥
स्त्रीसहित जाऊन वनांत । गणनाथासी तो भजत । अंतीं ब्रह्ममय तो होत । व्रतपुण्याच्या प्रभावानें ॥४२॥
क्रमानें सारे ब्रह्मभूत । जाहले ऐसें व्रत माहात्म्य अद्‌भुत । दुसराही असे एक वृत्तान्त । पापनाशक महान ॥४३॥
गौड देशांत वाणी असत । एक पापी लोभयुक्त । द्रव्यासाठी विष देऊन मारित । प्रत्यक्ष आपुल्या पित्याला ॥४४॥
आपुल्या आईसही मारिलें । अन्यजनांसही ठार केलें । विषप्रयोगें त्यानें मारिले । असंख्य लोक सर्वकाळ ॥४५॥
त्यांचें धन लुबाडून । आपण झाला अतिसधन । परस्त्रीलालस होऊन । सतीस भ्रष्ट करुं पाहे ॥४६॥
मद्यमांस तो सेवित । नाना मिषें दूषवित । परस्त्रियांसी भोगित । शेवटीं राजा पकडी तया ॥४७॥
राजाज्ञेनें बंदिस्त । शिपाई मार देती निष्ठुरचित्त । पायांत बेडया ठोकित । ऐसा जाहला तो कैदी ॥४८॥
त्या दिवशीं दैवयोगें असत । पौष कृष्णचतुर्थी पुनीत । त्या संपूर्ण दिनीं तयास घडत । उपवास योगायोगें ॥४९॥
परी चंद्रोदय झाल्यावर । रक्षकें दिलें कदन्न समग्र । तें भक्षून करी विचार । कैसी सुटका होणार ॥५०॥
परी त्याची सुटका नहोत । पंचमी तिथि उजाडत । राजदूत त्यास सुळीं चढवित । ऐश्यापरी अंत झाला ॥५१॥
परी तो व्रतपुण्यें ब्रह्मभूत । न कळत घडेल जरी व्रत । संकष्टीचें माहात्म्य अद्‌भुत । अशक्य वर्णन विस्तारें ॥५२॥
हें पौष संकष्टीचें माहात्म्य ऐकत । अथवा हें वाचील श्रद्धायुत । त्यासी शुभलाभ निरंतर होत । ऐसा आधार ग्रंथींचा ॥५३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते पौषकृष्णचतुर्थीमाहात्म्यवर्णन नामैकत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP