मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय १९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दशरथ विनवी वसिष्ठासी । चतुर्थी येत जी मलमासी । त्या वरदेचें चरित्र मजसी । सर्वसिद्धिप्रद सांगावें ॥१॥
वसिष्ठ तेव्हां कथन करित । पुरातन इतिहास तयाप्रत । आंध्रप्रांतीं राजा असत । सुषेण नामें धार्मिक ॥२॥
चंपक नामक नगरींत । धर्मनीतीनें तो राज्य करित । विविध शस्त्रास्त्रीं पारंगत । दानशूर यशस्वी तो ॥३॥
व्रतपरायण तो भक्त । देवप्रिय अतितिपूजेंत रत । भूमंडळ जिंकून राज्य करित । सर्व राजे करभार देती ॥४॥
परी त्याच्या राज्यांत । एक भयंकर आपत्ति येत । साप चावती जनांप्रत । क्षुब्ध सर्प सर्वत्र फिरती ॥५॥
जेथ जेथ प्रजाजन जाती । तेथ तेथ सर्पही असती । झाली त्यांची अगतिक गती । कोठें रहावें समजेना ॥६॥
वनांत अथवा गृहांत । सर्पदंशाचें भय सतत । राजा जाहला दुःखार्त । महाभयपरयाण ॥७॥
पंचमीचें व्रत करिती । होण्या नागांची शांती । परी नाग न शमती । परम दारुण ते तथापि ॥८॥
नाना पुण्यतीर्थयात्रा करिती । प्रजाजन परी न होय मुक्ती । क्रूर नाग ते सर्वत्र विचरती । भूमिवरी दशरथा ॥९॥
तेव्हां तो राजेंद्र शरण जात । जैमिनीगुरुस श्रद्धायुक्त । त्यास प्रणाम करुन राहत । ओंजळ जोडून त्याच्यापुढे ॥१०॥
आसनादी देऊन त्यास तोषवित । आगमन कारण मुनि विचारित । सुषेण तेव्हां निःश्वांस सोडित । सांगे सकल वर्तमान ॥११॥
स्वामी सर्प झाले अपार । चावती प्रजेस अनिवार । भय संकुलित समग्र । राहण्या स्थान ना उरलें ॥१२॥
स्वामी नाना उपाय केलें । परी ते सारे व्यर्थ ठरले । सर्पांचें भय ना शमलें । म्हणोनि तुजला शरण आलों ॥१३॥
सर्पगणांची व्हावी शांति । म्हणोनि काय करावी कृती । हे सारें जरी न सांगाल मजप्रती । तरी मी प्राण त्यागीन येथ ॥१४॥
वसिष्ठ कथा पुढें सांगती । जैमिनी तेव्हां नृपास म्हणती । स्वशिष्यासी निंदिती । तो वृत्तान्त ऐक आतां ॥१५॥
अरे पाप्या तुझ्या राज्यांत । चतुर्थीचें भ्रष्ट झालें व्रत । त्या योगें मरणोत्तर जाल नरकांत । सर्वही तुम्हीं निःसंशय ॥१६॥
चार पुरुषार्थांची दायिका । ऐसी चतुर्थी वरदा एका । संकट हरी ती संकष्टी सुखकारिका । ऐसें रहस्य जाणावें ॥१७॥
जरी हें चतुर्थीचें व्रत । कार्यारंभी न करित । तरी चार पुरुषार्थहीन होत । ऐसें कर्महीन जाण ॥१८॥
ऐसें सांगून महिमान । चतुर्थींचे केलें कथन । तें ऐकून सुषेण प्रसन्न । विचारी प्रश्न उत्सुकतेनें ॥१९॥
कैसा हा गणेशान देव असत । ज्याचें हें व्रत अद्‌भुत । त्याचें स्वरुप मजप्रत । सांगा त्याची भजेन मी ॥२०॥
जैमिनी देई उत्तर । गणेशस्वरुप वर्णनाचे पार । तथापि उपाधियुत स्वरुप सुंदर । ढुंढीचे मी वर्णितों ॥२१॥
मीं पूर्वी शांतिलाभार्थ जात । व्यासाची शरण सुविनीत । तेव्हां तो साक्षात्‍ नारायण जें सांगत । तेंचि तुज मी सांगेन ॥२२॥
तूं माझा शिष्य परी अधम । म्हणोनि विसरलास व्रत अनुपम । गणेशाचें जें जगीं परम । सर्वसिद्धिप्रदायक ॥२३॥
देहदेहिमय सर्व असत । गकाराक्षरें निवेदित । ‘ण’कारवाचक ब्रह्म वर्तत । संयोगायोगरुप ॥२४॥
त्यांचा स्वामी गणेश ख्यात । महामते ऐसें वेद सांगत । चित्तांत निवास करी अद्‌भुत । म्हणोनि चिंतामणि नाव ॥२५॥
चित्तरुपा स्वयंबुद्धि असत । भ्रांतिरुपा ती सिद्धि वर्तत । त्यांच्यायोगें प्राप्त होत । त्या उभयतांचा जो पति ॥२६॥
ऐसें सांगून नृपास देत । षडक्षर गणेशमंत्र पुनीत । सुषेणासी विधियुक्त । यथान्याय सविशेष ॥२७॥
नंतर मुनीची अनुज्ञा घेऊन । सुषेण स्वनगरांत परतून । व्रत करण्या उत्सुक मन । तें प्रथम आला मलमास ॥२८॥
मलमासांत वरदाख्य येत । शुक्ल चतुर्थीचें व्रत । तें सुषेण नृप आचरित । भक्तिभावें त्या वेळीं ॥२९॥
आपुल्या समस्त प्रजेकडून करवित । राजा हें व्रत अद्‌भुत । नगरजन ग्रामस्थही करित । विधिपूर्वक सर्वत्र ॥३०॥
राजा जें परमादरें करित । प्रजा तें करी हर्षयुक्त । त्या व्रतपुण्यानें अंतर्हित । सर्प झाले त्या राज्यांत ॥३१॥
लोक जाहले सर्पभयमुक्त । तैसेचि रोग वर्जित । पुत्रपौत्रादि संयुक्त । धनधान्य समन्वित ॥३२॥
वृद्ध होता स्वपुत्राप्रत । सुषेण आपुलें राज्य देत । वनांत जात स्त्रीसमवेत । विघ्नेशाचें पूजन करी ॥३३॥
अंतीं स्वानंदलोकीं जात । व्रतप्रभावें ब्रह्मभूत । सर्व लोकही व्रतसंस्थित । शुक्ल कृष्ण चतुर्थी करिती ॥३४॥
तेही अंती क्रमें होत । व्रतप्रभावें ब्रह्मभूत । दुर्लभ कांहींच नुरत । व्रत हें महा अद्‌भुत करितां ॥३५॥
आणखी एक कथा असत । मलमास चतुर्थीच्या संभंधांत । शुक्लचतुर्थीचें जें व्रत । पुण्यकारक श्रवणेंही ॥३६॥
कोणी एक हस्तिनापुरांत । होता क्षत्रिय भयंकर पापरत । बाल्यापासून दुष्ट आचरित । विविधरीती क्रू कर्म ॥३७॥
द्रव्यलोभार्थ जनकास मारित । परस्त्रीलालस अत्यंत । चौर्यकर्मीं होता आसक्त । दुर्मती तो पापी नर ॥३८॥
एकदा हिंडत होता वनांत । पांथस्थासी ठार मारित । त्यानंतर सर्पदंश त्यास होत । भयोद्विग्न जाहला तें ॥३९॥
स्वगृहा परतण्या वांछित । परी विषप्रभावें संतप्त । तेथेच जल अन्नरहित । देहपात त्याचा झाला ॥४०॥
तो दिवस होता पुनीत । शुक्लपक्ष मलमास चतुर्थीयुत । त्या दिवशीं नकळत घडत । उपवासव्रत त्या पाप्यासी ॥४१॥
चतुर्थीस उपवास घडत । पंचमीस तो झाला मृत । महाखल तो त्या घोर वनांत । अंतीं गेला स्वानंदलोकीं ॥४२॥
तेथ गणपतीस पाहत । स्वयं झाला ब्रह्मभूत । ऐश्याचि परे नाना लोक लाभत । ब्रह्मभूत पदवीसी ॥४३॥
येथ अखिल भोग भोगत । अंतीं तें मुक्त होत । ऐसें हें मलमास चतुर्थीचें अद्‌भुत । माहात्म्य जो ऐकेल ॥४४॥
अथवा जो हे वाचील । त्यास सर्वलाभ होईल । मृत्यूनंतर तो पावेल । शाश्वत गणेशसायुज्य ॥४५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते मलमासशुक्लचतुर्थीचरितवर्णन नाम एकोनविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP