मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय १२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दशरथ म्हणे वसिष्ठप्रत । चतुर्थींचे महिमान वाटत । अमृताहूनही सुरस मजप्रत । आनंद माझा वाढला ॥१॥
माझी तृप्ति न झाली । माघ शुक्ल चतुर्थीची कथा राहिली । ती सांगावी मज भली । जेणें सुखलाभ सर्व जनांसी ॥२॥
वसिष्ठ सांगती तयाप्रत । माघ शुक्ल चतुर्थी दिनीं जन्म होत । विनायकाचा कश्यपाच्या घरांत । साक्षात्‍ मंगळयुक्त नृपा ॥३॥
मुद्‌गल निवेदिती दक्षास । वसिष्ठठोक्त कथा ती सुरस । देवांतक अधाश्रित जी सुधासम जनांस । ऐकून मोद दशरथासी ॥४॥
अजनंदन मोदयुक्त । त्या व्रतार्थ प्रेरित । त्याचा आदर ओळखून हर्षयुक्त । गाणपत्येंद्र नृपसत्तमा म्हणे ॥५॥
वसिष्ठ म्हणे इतिहास पुरातन । तुजल दशरथा सांगेन । जो ऐकता पूर्णत्व लाभून । नरोत्तमा सुख लाभतें ॥६॥
कर्णाट प्रांतीं भानुपुरींत । सोमनामा धर्मयुक्त । देव विप्र अतिर्थींच्या पूजेंत । सदैव रत जो होता ॥७॥
शस्त्रास्त्रज्ञ वीर्यवंत । राज्य करी तो नीतियुक्त । भूमंडळ सर्व जिंकित । सुराज्य उत्तम तो करी ॥८॥
त्याची भार्या यशोवती । पूर्ण पतिव्रता जी होती । धर्मशीला दानपर्यायण ती । होती अत्यंत रुपशालिनी ॥९॥
दीर्घकाल राज्य उत्तम । त्यानें केलें अनुपम । अनावृष्टिभव दुःख परम । प्राप्त झालें पुढें तयासी ॥१०॥
शौनक नामक मुनींप्रत । दुःखनिवृत्तीस्तव तो जात । सर्वार्थकोविद जे निवसत । गाणापत्य प्रशांत वनांत ॥११॥
महावनीं त्या जाऊन । त्या मुनीस करुन अभिवादन । साष्टांग नमस्कार करुन । करांजली जोडितसे ॥१२॥
सोम त्या मुनिश्रेष्ठास म्हणत । अत्यंत विनयानें युक्त । धन्य माझा जन्म असत । तुमचे दर्शन झालें म्हणोनि ॥१३॥
माझे कर्मादि धन्य वाटत । तें ऐकून शौनक म्हणत । स्वपरभावविवर्जित । सर्वशास्त्रार्थ कोविद तो ॥१४॥
राजा महाभागा या वनांत । किमर्थ आलास दुःखित । या दुर्गंम वनांत । काय वृत्तांत सर्व सांग ॥१५॥
मुनींद्र ऐसें विचारित । तेव्हां सोमराजा त्यास म्हणत । वेदज्ञमुनीस हर्षयुक्त । ऐका माझा पूर्व वृत्तांत ॥१६॥
कर्णांटांत माझी वसती । धर्मयुक्त केलें राज्यनीतीए । परी सांप्रत अवचिती । दुष्काळ पडला राज्यांत ॥१७॥
मी नीतियुक्त राज्य पाळिलें । परी हें परम दुःख ओढवलें । प्रजाजनही सर्वं गांजले । पापयोगें अज्ञातशा ॥१८॥
तरी उपाय सांगा मजप्रत । आपण योगीश्वर साक्षात । राज्य सोडून शरणागत । शरण आलों मी तुम्हांसी ॥१९॥
त्याचें तें विनत वचन ऐकत । तेव्हां शौनक मुनिशार्दूल म्हणत । ऐक राजा दुझ्या राज्यांत । पाप दारुण जें घडलें ॥२०॥
त्या पापानें रोगयुक्त । लोक झाले वंध्यतायुत । अनावृष्ठी अवचित पीडित । त्याचें कारण सांगेन ॥२१॥
चतुर्थीचें नष्ट व्रत । शुक्लकृष्ण पक्षांत । तरी प्रयत्नपूर्वक आतां त्वरित । आचरी तें व्रत नृपा तूं ॥२२॥
अन्यथा वर्ष सहस्त्रें जरी लोटलीं । तरी सुखशान्ति संभवली । म्हणोनि पाहिजे केली । उपासना तूं गणेशाची ॥२३॥
सर्वत्र विख्यात जें व्रत । त्याचें माहात्म्य सांगतों तुजप्रत । ते ऐकता नृपाचें चित्त । विस्मययुक्त जाहलें ॥२४॥
पुनः विचारी शौनकाप्रत । मुनिसत्तमा सांगा मजप्रत । गणेशाचें स्वरुप शांतियुक्त । विप्रा निवेदन करावें ॥२५॥
राजा पूर्वीं मी तपमग्न वसत । अंतर्निष्ठ माझ्या आश्रमांत । ब्रह्मचिंतनपर तेथ येत । महायोगी भृगुमुनी ॥२६॥
त्यांचे आगम्न अकस्मात । माझ्या अनुग्रहार्थं होत । त्यांस पाहून प्रणत । आसनीं बसवून पूजी तयासी ॥२७॥
हात जोडून विनम्र पुढयांत । मज पाहुनी भृगुमुनि म्हणत । तूं काय इच्छिसी तें मजप्रत । महाभागा सांग सारें ॥२८॥
योगनिष्ठा तुज शांति प्राप्त । जाहली का सांग मजप्रत । आमुच्या कुळीं साधुगुणात्वित । महाभागा तूं अससी ॥२९॥
तेणें मीं जाहलों तृप्त । पुरवीन तुझें वांच्छित । तदनंतर प्रणाम करुन तयाप्रत । शौनक सांगे हृद‌गत ॥३०॥
योगशांतिप्रद योग । पूर्णत्वें सांगावा सलग । तेणें तृप्ति पावेन सांग । तुमच्या अनुग्रहानें मीं ॥३१॥
भृगु तेव्हां त्यास सांगत । योगशांतिमय पुनीत । गणेश ब्रह्मनायक विश्वांत । विधिपूर्वक त्यासी भजावें ॥३२॥
तेणें तू होशील शांत । पंचविध चित्त असत । तेथ चिंतामणि निवसत । त्यास जाणून ब्रह्मभूत ॥३३॥
बाळा झाए ब्रह्मादि समस्त । चित्तानें जे होय ज्ञात । तेथ मोह प्रवर्तत । त्याग करी मोह चित्ताचा ॥३४॥
ऐसा त्याग करुन । स्वयं चिंतामणी होऊन । मनोवाणीमय चित्त जाणून । जाणते त्या विवर्जित ॥३५॥
ऐशा उभयविध चित्तांचा त्याग करी । तरीच सुखाची आशा करी । ऐसें सांगून उपदेश करी । गणानां त्वा या मंत्राचा ॥३६॥
शौनकासी गणेशमंत्र देऊन । भृगु पावला अंतर्धान । शौनक म्हणे तो जपून । मी चित्तनिग्रहीं रत झालों ॥३७॥
क्रमें योगिवंद्य होत । गणराजाची कृपा लाभत । तरीही त्याचें भजन न सोडित । वरद झाला तें भक्तिवत्सल ॥३८॥
मज गाणपत्य तो करी । तेव्हांपासून मी आजवरी । गणप होऊन चित्तांतरीं । घेत अनुभव आनंदाचा ॥३९॥
ऐसें सांगून त्या राजेंद्राप्रत । शौनक गणेश मंत्र देत । गणानां त्वा हा पुनीत । विधियुक्त तो मुनिशार्दूंल ॥४०॥
शौनकासी प्रणाम करुन । राजसत्तम गेला परतून । आपुल्या नगरांत प्रसन्न । प्रधान स्वागत करिती तें ॥४१॥
तदनंतर जो माघशुक्ल चतुर्थी येत । त्यापासून व्रत तें आचरित । कृष्ण चतुर्थीचें हें व्रत । विख्यात केलें तयानें ॥४२॥
सर्व प्रजाजन व्रत आचरिती । त्यायोगें पुण्य संचयाची शश्वती । त्याप्रभावें पर्जन्याची वृष्टी । होऊन हर्षयुक्त झाले जन ॥४३॥
गणेशभजनांत झाले रत । त्या नृपाचे प्रजाजन समस्त । वरदाख्य गणेशासी पूजित । नित्य आदरपूर्वक ॥४४॥
पुत्रपौत्रांच्या संगतींत । उत्तम राज्य करी नृप भक्त । लोक सर्व मग्न सुखांत । रोगवंध्यत्व वर्जित झाले ॥४५॥
स्वधर्मनिरत होऊन । भजती ते गणनायकासी प्रसन्न । गणेशासम अन्य न मानून । परमादरें पूजती तया ॥४६॥
सोमराजा अंतीं जात । गणेशलोकीं तो पुनीत । स्वानंदलोकीं ब्रह्मभूत । प्रणाम करी गणेशांसी ॥४७॥
नृपा तुज सांगितले चरित । एक अन्यही असत । सुंदर जें व्रतसंभूत । सर्वपापप्रणाशक ॥४८॥
कॉंडिण्य नगरांत अंत्यज वसत । भानुनामा महापापी दुर्वृत्त । दुष्ट कर्मपरायण अत्यंत । परस्त्रीलंपट तो होता ॥४९॥
मद्यपान द्यूतांत रत । सदा गाठून मार्गांत । द्रव्यलोभा ठार मारी जनां अवचित । पापें ऐसी बहु झालीं ॥५०॥
ब्राह्मणांचा वध करित । दुष्टकर्मा तो सतत । दैवयोगें एकदा वनांत । अंत्यज तो फिरत होता ॥५१॥
परी कोणी पांथस्थ न येत । म्हणोनि प्रतीक्षेंत बैसत । माघी शुक्लीचतुर्थी ती असत । उपवास त्यास योगें घडला ॥५२॥
अन्नजल ही न मिळून । पर्वत गृहेंत राहिला बसून । कांहींच वनांत न मिळून । व्याकुळ झाला क्षुधातृषेनें ॥५३॥
ऐसी संपूर्ण रात्र घालवित । प्रभात होतां जाय गृहाप्रत । तृषार्त तो प्याला जल त्वरित । भराभर त्या वेळीं ॥५४॥
परी त्या पाण्यात । होतें बहुधा विष उग्र अत्यंत । तेणें दुःख होऊन प्राप्त । ओकून पडलें सर्व पाणी ॥५५॥
तत्क्षणीं त्याचा मृत्यू होत । तेव्हां येती गणेशदूत । ते तयासी आदरें नेत । गणपासन्निध त्या वेळीं ॥५६॥
गणेशदर्शन होतां पाप नाशित । पापी होय तो ज्ञानयुक्त । गणनाथाचें सायुज्य लाभत । त्या पुण्यप्रभावें ॥५७॥
न जाणतां घडलें व्रत । तेणें तरला अंत्यज अवचित । महापापी होत ब्रह्मभूत । सूर्यवंशज तो प्रसिद्ध ॥५८॥
ऐसी माघशुक्ल चतुर्थी असत । पुण्यक्री अत्यंत । तिचें महिमान वर्णनातीत । कोण वर्णूं शकेल? ॥५९॥
ऐसें हें व्रत करुन । नाना जन ब्रह्मभूत झाले पावन । चतुर्थींचे हें माहात्म्य ऐकून । वाचिता होतो सिद्धिलाभे ॥६०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते माघशुक्लचतुर्थीमाहात्म्यवर्णनं नाम द्वादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP