मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ११

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः  दशरथ प्रार्थी वसिष्ठाप्रत । मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीचें व्रत । ऐकून झालों संतृप्त । गुरुसत्तमा महाभागा ॥१॥
आतां पौषमासीं वरदायिनी । चतुर्थी जी जीवनीं । माहात्म्ययुक्त असोनी । तारक होते मनुजासी ॥२॥
त्या चतुर्थीचें महिमान । सांगावे मजसी उत्तमोत्तम । वसिष्ठ तेव्हां सांगती वचन । सांगतों तुज संक्षेपें तें ॥३॥
विस्तारपूर्वक कथन । असंभव असें म्हणून । स्वल्प परी गुणसंपन्न । ऐसा वृत्तान्त ऐकावा ॥४॥
अवंती नगरींत ब्राह्मण असत । सुदंत नामा विख्यात । तो सर्व शास्त्रांत पारंगत । राजपुरोहित नीतिज्ञ ॥५॥
धर्मशास्त्रानुसार राजाप्रत । देई बोध नीतियुक्त । बृहद्रथ राजा वश असत । सुदंताच्या हया कारणें ॥६॥
नानाधर्मकर तो भूमि पाळित । सुदंताचा उपदेश ऐकत । सुदंताची भार्या असत । विलासिनी नांवाची ॥७॥
ती कर्मदोषें वंध्या होत । पतिव्रता मनीं दुःखित । तिची अपत्यें उपजतांच मरत । म्हणोनि कष्टी तें दांपत्य ॥८॥
ब्राह्मणें केलें बहुत दान । विविध व्रतांचे करी आचरण । तथापि अपत्य न जगून । पुत्रसौख्य त्यांस नव्हतें ॥९॥
सुदंत तो राजपुरोहित । होवोनिया अति दुःखित । भार्येसह गेला वनांत । भरांतचित्त भटके तिथें ॥१०॥
जीवनांत रस ना वाटत । मरण्याचा निश्चय करित । म्हणोनि दृढ तपातें बैसत । तेथ योगींद्र वामदेव आले ॥११॥
त्यांची पूजा करुन । भक्तीने कर जोडून । सुदंत ब्राह्मण बोले वचन । खेदयुक्त त्या वेळीं ॥१२॥
माझें दुःखिताचें जीवन । तप वय तैसेंचि ज्ञान । तुझ्या पादपद्माचें होतां दर्शन । धन्य झालें सर्वही ॥१३॥
मज नसे संतान । वंध्यादोषें दुःखित मन । मृत्यूनंतर स्वर्गहीन । योगींद्रा काय होईल मम गती ॥१४॥
वामदेव सुदंतासी सांगत । ऐक महाभागा तूं धर्मसंयुत । तथापि पापचारी जगांत । कां झालास तें ऐक आतां ॥१५॥
अवंतीपुरपालाचा तूं पुरोहित । तो राजा जे महापाप करित । तेंचि तुझ्या हातून घडत । लोप जाहला चतुर्थी व्रताचा ॥१६॥
त्यायोगें भूमिमंडळांत । भूवासीजन समस्त । चतुर्वर्ग फळांनी हीन होत । धर्माचरण जरी अन्य घडलें ॥१७॥
राजासम तूंही आचरित । धर्म जरी निष्ठावंत । तरी व्रतलोपानें दुःखित । सांप्रत तूं झालास ॥१८॥
ऐसें ऐकून वचन । वामदेवाचें सुदंत उदास होऊन । त्या बुद्धिमंता विनयें नमून । विस्मयपूर्वक विचारी तें ॥१९॥
तें हितकारक व्रत । कोणतें तें सांगा त्वरित । चार पुरुषार्थाचा लाभ होत । त्यानें कैसा तें वर्णावें ॥२०॥
हया व्रतानें जो नर हीन । तो जगांत फलहीन । दयासागरा माझें मन । उत्सुक ऐकण्या व्रतमहिमा ॥२१॥
ऐसी प्रार्थना ऐकत । महायोगी वसिष्ठ कथा पुढती सांगत । वामदेव सांगे माहात्म्य तयाप्रत । सुंदतें ऐकिलें विस्मयें ॥२२॥
पुन्हां विचारी विप्राप्रत । गणेशज्ञानांत चित्त रमत । गाणपत्य महामुनीसी विनत । गणाधीश हा कैसा असे? ॥२३॥
कैसें तयाचें स्वरुप असत  जाणून भजेन भक्तिसमन्वित । तेव्हां वामदेव म्हणत । सुदंता ऐक उत्तम ज्ञान ॥२४॥
जें जाणता भक्तिभावित। गाणपत्य तूं होशील जगांत । मी पूर्वी यत्नसंयुत । तपोनिष्ठ जगीं ख्यात ॥२५॥
माझ्या तपानें व्याप्त । जाहलें होतें चराचर समस्त । नंतर योगासाठीं मीं त्यागित । तपश्चर्या ब्राह्मणोत्तमा ॥२६॥
शमदमपर होऊन । अंतर्निष्ठ मन करुन । मनावरी जय मिळवून । योगिभूमि क्रमानें ॥२७॥
सहज स्थितींत झालों स्थित । येथ तेथ मी संचार करित । मोहहीन स्वाधीनयुक्त । नंतर शांतिकाम मीं झालों ॥२८॥
योग त्यागून शांतिलाभार्थ करित । ब्रह्मावरी मन केंद्रित । जें मनोवाणीविवर्जित । स्वाधीनता जाणण्यासी ॥२९॥
निर्मोहिता कैसी लाभेल । ऐसा विचार चित्तीं सबल । काय करवें कार्य सफल । उत्कंठा ऐसी चित्तांत ॥३०॥
नंतर योगिवंद्या शंकरासी शरण । जाऊन झालों मीं शैव सुमन । शैवमागीं मज रत पाहू । शंभू म्हणाले मजलागीं ॥३१॥
वामदेवा महामते आगमन । कां केलेंस सांगा प्रयोजन । तुमचा वृत्तांत ऐकून । प्रिय करीन मी तुमचें ॥३२॥
तेव्हां करांची ओंजळ जोडून । मी महादेवासी तें नमून । भक्तवांच्छाकल्पतरुस निवेदन । माझें हृदगत्‍ सर्व केलें ॥३३॥
स्वेच्छामय जें शैव ब्रह्म । सहज तैसें जें परम । त्याहून परतें कांहीं सम । जगीं कैसें संभवेल? ॥३४॥
तथापि संशय दूर करावा । ब्रह्मभूत होता शैव बरवा । स्वेच्छाभाव तेथ असावा । हें कैसें संभवेल? ॥३५॥
स्वाधीनत दोषयुक्त । सहज न पर ज्ञात । म्हणोनि शांति लाभार्थ उत्कंठित । तुझ्या दर्शना मीं आलों ॥३६॥
योगशांतिप्रद जें पूर्ण असत । तें करुणानिधे मजप्रत । सांगावें आपण ऐसें प्रार्थित । ऐकून शंकर तुष्ट झाला ॥३७॥
सर्व योगज्ञ गाणपत्यस्वभाव । तयासी म्हणे श्री शिव । योगशांतिप्रद जाण अभिनव । गणेश एक जगांत ॥३८॥
त्या परब्रह्मांस योगसेवापर । जाण तूं शांतिदात अमर । स्वानंदापासून थोर । चतुर्धा जो जाहला ॥३९॥
असत्य सत्यसम सहज । या चारांचा योग सुखज । स्वानंद नामे तो अज । परिकीर्तित जाहला ॥४०॥
अयोगांत संयोग न होत । कोणत्याही ब्रह्मांचा जगांत । गकाराक्षर ज्ञान अद्‍भुत । जाणावें नि ज बोधानें ॥४१॥
णकाराक्षर जें ज्ञान । तें निवृत्तीनें पावे जन । त्यांचा स्वामी गणेशान । योगरुप कथिला असे ॥४२॥
शांतीनेच तो लाभत । शांतास शांतिदाता जो असत । चित्त पंचविध ख्यात  बुद्धिरुप यांत न संशय ॥४३॥
मोहात्मिका जी सिद्धि असत । ती सिद्धि मायाद्वय असत । ती त्यांचें बिंब गणेश पुनीत । बिंबिभाव प्रभो सोडवा ॥४४॥
आतां तूं गणनाथ होशिल । संशय यांत न राहील । ऐसें सांगून वामदेवा अमल । एकाक्षर मंत्र देई ॥४५॥
विधिपूर्वक तो मंत्र । महादेव करुणायुक्त देत । तो स्वीकारुन प्रणाम करित । वामदेव महेशासी ॥४६॥
नंतर मीं जात वनांत । गणनाथा भजे भक्तिसंयुत । एकाक्षर विधानें संतुष्ट होत । गणनायक मजवरी ॥४७॥
योगशांति ती परमा देत । भक्तवात्सल्ययोगें मजप्रत । म्हणोनि मी होत । योगिवंद्य सर्वत्र संमत ॥४८॥
तथापि त्या विघ्नदहनाचें भजन । नित्य केलें मी एकनिष्ठ मन । ऐसें दहा हजार वर्षे उपासून । गणाधीशा तोषविलें ॥४९॥
तेव्हां तो माझ्या आश्रमांत । पुनरपि वर देण्या येत । घनगंभीर शब्दें म्हणत । वामदेवा वर माग ॥५०॥
महाभागा जें हृदयोप्सित । तें तें पुरवीन समस्त । तुझ्या भक्तीनें मीं तृप्त । योगिसत्तमा जाहलों ॥५१॥
गणेशाचें ऐकून वचन । संपविलें मीं ध्यान । वरती उठून केलें वंदन । पुजून गणेशस्तुति केली ॥५२॥
गणेशा तुज सदा नमग्न । स्वानंदवासी तुज अभिवादन । सिद्धिबुद्धिपते तुज वंदन । विघ्नेशा तुज पुनः पुन्हां ॥५३॥
मूषकारुढासी हेरंबासी । भक्तवांच्छापूरकासी । ढुंढिराजा तुज देवासी । नमन माझें रक्षी मजला ॥५४॥
आदिमध्यांतहीनासी । आदिमध्यांतरुपासी । शंकराप्रियपुत्रा तुजसी । लंबोदरा नमन माझें ॥५५॥
नाना मायाधरासी । मायिकां मोहदायकासी । मायामायिकभेदें क्रीडा करिसी । वंदन तुज मनोभावें ॥५६॥
विष्णुपुत्रासी शिवपुत्रासी । ब्राह्मणासी ब्रह्मपुत्रासी । सर्वेशासी सर्वपुत्रासी । नमन तुज सर्वात्मका ॥५७॥
सर्वांच्या मातापित्यासी । महोदरासी देवेंद्रपासे । ज्येष्ठासी महोग्रासी । महेशासी नमन असो ॥५८॥
विष्णूसी प्रभविष्णूसी । अमृतासी सूर्यासी । नाना शक्तिस्वरुपासी । पुरुषासी नमन असो ॥५९॥
प्रकृतासी गुणोदशासी । गुणात्म्यासी एकासी । अनेकात्मकासी विघ्नकर्त्यासी । योग्यांच्या पतीस नमन ॥६०॥
योगासी योगनाथासी । स्तवितों मी गणेशासी । मनोवाणीविहीनासी । मनोवाणीमया नमन ॥६१॥
ऐसी जेव्हां तो स्तुति करित । तेव्हां निमग्न भक्तिरसांत । अंगावरी रोमांच फुलत । कंठ सगद्‌गद त्याचा झाला ॥६२॥
देहभान विसरुन नृत्य करित । विघ्ननाशक वामदेवास म्हणत । वर माग महाभागा चितस्थित । तुझ्या स्तोर्रें संतुष्ट मीं ॥६३॥
हें स्तोत्र सर्वसिद्धिप्रद होईल । वाचका पाठकासी अमल । पुत्रपौत्रादिक लाभतील । धनधान्याही प्राप्त होय ॥६४॥
गणेशाचें ऐकून वचन । वामदेव म्हणे प्रसन्न मन । ब्रह्मेशा ब्रह्मभावित पावन । भक्ति देई गणाधीशा ॥६५॥
गाणपत्य ती विशेषयुत । एवढाचि वर मीं मागत । अन्य काहीं न इच्छित । तुष्ट जरी तूं विघ्नपा ॥६६॥
तथास्तु म्हणून अंतर्धान । पावले तेव्हं गजानन । वामदेव प्रसन्नमन । गाणपत्य श्रेष्ठ जाहला ॥६७॥
तेव्हांपासून शांति लाभत । मजसी जी अभिनव असत । म्हणून तूं गणराजा भज निश्चित । शांतिलाभ तुज होईल ॥६८॥
एकाक्षर मंत्र तें देत । विधिपूर्वक स्वीकारी सुदंत । ॐगं पदांनी युक्त । जप त्याचा करुं लागे ॥६९॥
वामदेव मुनि अंतर्धान । पावले तेव्हां परतून । आपुल्या स्थानासी उत्सुक मन । गणनायका भजू लागे ॥७०॥
राजानें त्याचें केलें स्वागत । तोही गणनायका भजत । बृहद्रथासी सर्व वृत्तान्त । सांगितला त्यानें सविस्तर ॥७१॥
त्याची आज्ञा मानून । राजा करी व्रताचें पालन । घोषणा राज्यांत करुन । नागरिकां जागृत केलें ॥७२॥
तदनंतर पौषमासांत । जी शुद्ध चतुर्थी येत । ती प्रजाजनांसह आचरित । यथाविधि भक्तिभावें ॥७३॥
व्रताचरणमात्रें होत । मुनिपत्नी गर्भयुक्त । सुत लाभला योग्य काळांत । ज्ञानयुक्त चिरायू ॥७४॥
तेव्हांपासून भूमितलावर । उत्तम व्रत हें आचरिती सर्व । शुक्लकृष्ण चतुर्थीचें अपूर्व । रोगादी सर्व नष्ट झाले ॥७५॥
सर्व प्रजा पुत्रादि संयुत । जाहली धनधान्ययुक्त । अंतीं निमग्न स्वानंदांत । सुदंत योगिवंद्य जाहला ॥७६॥
योगसेवा प्रभावें नृपही लाभत । गणेशाचें ज्ञान अद्‌भुत । गाणपत्य तो प्रख्यात । ऐसा प्रभाव या व्रताचा ॥७७॥
तरी नृपा ऐक पुनरपि वृत्त । धनप्रिय वैश्य मार्गात । एकदा व्यापारनिमित्त । श्रमला म्हणोनि विश्रामला ॥७८॥
तेथ चोरांनी हल्ला करुन । लुटिलें त्याचें सर्व धन । त्यांच्या शस्त्राघातें विद्ध होऊन । पडला तो धरणीवरी ॥७९॥
चोर गेले पळून । वैश्य पडला वनांत खिन्न । विलाप करी अति करुण । दैवयोगें तेथ चतुर्थी आली ॥८०॥
ती पौष शुक्ला चतुर्थी असत । योगायोगें उपवास घडत । जलही त्यास न लाभत । प्राशनार्थ वनांत ॥८१॥
पीडा दारुण शरीरांत । वेदना व्याकुळ निद्रा न लाभत । जागरण जाहलें सहजगत । पंचमीस मेला तो पापी ॥८२॥
धनलुब्ध धनप्रिय त्वरित । अज्ञानें व्रत घडलें जगांत । म्हणोनी स्वानंदलोकीं जात । गणपास पाहून मुक्त झाला ॥८३॥
व्रताच्या महिम्यानें ब्रह्मभूत । तो धनलोभीही होत । ऐसें हें व्रत अति अद्‌भुत । सेविता जन मुक्त होती ॥८४॥
संसारसागर तरती । इहलोकीं अखिल भोग भोगिती । ते वर्णनातीत असती । ऐसा प्रभाव व्रताचा ॥८५॥
हें पौष चतुर्थी महिमान । वाचील वा ऐकेले भक्तियुक्त मन । राजा, त्यास लाभतील पावन  इहपरलोकीं सर्व सुखें ॥८६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते पौषशुक्लचतुर्थीमाहात्मवर्णनं नामैकादशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP