मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय २

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल सांगती दक्षाप्रत । प्रकृति गणाध्यक्षास मनीं स्मरत । सृष्टि निर्माण करण्या इच्छित । दोन भाग झाले तिचे ॥१॥
चतुर्थी संज्ञक प्रकृतीचा वाम भाग । कृष्ण वर्ण झाला सुभग । शुक्ल वर्ण जाहलें दक्षिणांग । तें पाहून विस्मित झाली ॥२॥
पुनः गण्पतीचे ध्यान करित । सृष्टिरचना कार्यांत । मग्न जेव्हां ती होत । तेव्हां विविध तिथी जन्मल्या ॥३॥
मुखांबुजापासून प्रतिपदा जन्मली । नासिकेपासून द्वितीया झाली । वक्षापासून तृतीया उद्‍भवली । अंगुलीपासून पंचमी ॥४॥
हृदयापासून षष्ठी जन्मत । डोळ्यांपासून सप्तमी संजात । बाहूपासून अष्टमी उत्पन्न होत  । उदरापासून नवमी तिथी ॥५॥
कानांपासून दशमी जन्मली । कंठापासून एकादशी झाली । पायांपासून उद्‍भवली । द्वादशीतिथी दक्ष प्रजापते ॥६॥
स्तनांपासून त्रयोदशीं । अहंकारांतून चतुर्दशी । मनापासून निर्मिती अविनाशी । पौर्णिमा अमावस्या तिथींची ॥७॥
जिह्रेच्या सर्व भावें प्राप्त । तिथींस भिन्नता जगांत कृष्णा चतुर्थी जी उक्त । तिच्यापासून जन्म कृष्णतिथींचा ॥८॥
शुक्ल चतुर्थीपासून । चौदा तिथ्यांचा देह समुत्पन्न । एका पक्षांत ऐशा तिथीमहान । पंचदश जाणाव्या ॥९॥
दिनांश पुरुष होत । रात्री स्त्रीरुप धारण करित । स्वस्वभाव विहारज्ञ असत । हितांत रत सर्वदा ॥१०॥
अन्य तिथीं सहित । चतुर्थी देवी तप करित । गणेशभजनीं नित्य रत । मंत्रध्यानपरायण ॥११॥
एक वर्ष ऐसें जात । तेव्हां विघ्नेश प्रकटत । भक्तवत्सल चतुर्थींच्या पुढयांत । शुक्लेसमोर माध्यान्हीं ॥१२॥
कृष्णेसमोर चंद्रोदयीं प्रकटत । वर मागा ऐसें म्हणत । गणेशासी त्या वंदित । पूजा करुन स्तुति करिती ॥१३॥
शुक्लचतुर्थी प्रथम प्रार्थित । गजानना तुझ्या भक्तींत । दृढ करावें माझें चित्त । याहून अन्य इच्छा नसे ॥१४॥
तिचें तें वचन ऐकून । तिजला म्हणे गजानन । माध्यान्हीं झालें माझें दर्शन । म्हणोनि पुण्यकाळ हा जाणावा ॥१५॥
माध्यान्ह काळीं शिवादिक जे मज भजती । शुक्ल चतुर्थीस भावभक्ती । ते सर्व जन होती । प्रिय मजला जगांत ॥१६॥
माझ्या समस्त व्रतांत । सर्व भावें तूं विलसत । निराहार राहून मज उपासत । चतुर्विध वैभव देईन त्यासी ॥१७॥
संचित नसलें तरी होत । फलप्रदं यांत संशय नसत । नाना भावें नियंत्रित । म्हणोनि वरदा नाम तुझें ॥१८॥
संचित वा नसलें । तरी ज्यानें गणेशा पूजिलें । चतुर्थी तिथीस भावबळें । सफल त्याचें व्रत होय ॥१९॥
माझ्या कृपाप्रसादें युक्त । ऐशा तुज जे न पूजित । त्यांची अन्य व्रतें निष्फळ होत । ऐसें माहात्म्य चतुर्थी तुझें ॥२०॥
ऐसे बोलून अंतर्धान । पावला देवनायक गजानन । शुक्ल चतुर्थी तेव्हांपासून । वरदा नामे ख्यात झाली ॥२१॥
गणेशासी प्रिय अत्यंत । त्याची ती जन्मतिथी होत । जगीं लाभण्या आत्महित । उपोषण त्या दिनीं करावें ॥२२॥
पंचमीस पारणें करुन । ब्राह्मणांसी साक्ष ठेवून । करावें मनोभावें उद्यापन । तेणें चतुर्विध फल लाभे ॥२३॥
जें जें इच्छी तें तें लाभत । व्रत करता समस्त ईप्सित । अंतीं स्वानंदलोकांत । ब्रह्म सायुज्य त्यास लाभे ॥२४॥
ऐशा या चतुर्थी व्रतांत । प्रिय अन्न पापी नर भक्षित । तरी ते नरकास पात्र होत । अन्नहीन त्यापुढें ॥२५॥
ऐसा वर चतुर्थीस देत । विघ्नराज तो कृपायुक्त । त्या वेळेपासून सर्वमान्य होत । शुक्ल चतुर्थी व्रतमूल ॥२६॥
नंतर कृष्ण चतुर्थीप्रत । पुनरपि प्रकटून गणेश म्हणत । आता तूं वर माग इच्छित । महाभागे मी तो देईन ॥२७॥
ऐसें वचन ऐकून । प्रथम प्रणाम करुन । नंतर पूजून गजानन । स्तुति करी हर्षयुक्त ॥२८॥
जरी प्रसन्न भावें वर देसी । तरी तुझी दृढ भक्ति देई मजसी । महोदरा, नाथा वियोग मजसी । आपुला कधीं न व्हावा ॥२९॥
सर्वमान्य मज करावें । मी एकनिष्ठ भक्तिभावें । तिचें वचन बरवें । बोलतसे गजानन ॥३०॥
सदैव मम प्रिया अत्यंत । होशील महातिथे तूं जगांत । चंद्रोदयीं मी तुझ्या सहित । तें व्रत मुख्य जाणावें ॥३१॥
माझा वियोग तुज न होईल । त्या दिनीं जे वर्जिती अन्न जल । उपासना करिती अमल । त्यांची संकटे हरण करीन ॥३२॥
पांच प्रहर माझे भक्त । जे राहती अन्नजलवर्जित । दृढ श्रद्धेनें उपासना करित । त्यांचें संकष्ट हरण करीन ॥३३॥
चतुर्विध संकट असत । जन्म मृत्यु कर्म व्रतज जगांत । त्यानें कर्म फल न लाभत । कदापिही व्रतधार्‍यास ॥३४॥
इत्यादि विविध संकटें हरण करी । चतुर्थिके माझ्या प्रसादें उद्धरी । संकष्टीचें व्रत जो करी । भक्तियुक्त मनानें ॥३५॥
इहलोकीं अखिल भोग भोगत । अंतीं स्वानंदलोकांस जात । संकटहारिणी चतुर्थी असत । तिच्या प्रभावें ऐसें घडे ॥३६॥
माझे जो भजन करित । परी चतुर्थी व्रत न आचरत । तरी तें सकल निष्फल होत । ऐसें रहस्य जाणावें ॥३७॥
तुज सोडून जे पापी नर । अन्य व्रतें करिती अपार । निष्फल तीं सर्व होणार । यांत संशय कांहीं नसे ॥३८॥
वर्णाश्रमधर्मीं असत । परी चतुर्थी व्रत न करित । त्याचे स्वधर्मस्थ कर्म नष्ट होत । इतुकें माहात्म्य चतुर्थीचें ॥३९॥
नियत चित्त निराहार युक्त । जो रात्रीपर्यंत व्रत आचरत । त्याचें संकट हरण करी त्वरित । स्वानंदार्थ निःसंशय ॥४०॥
अन्य द्विजांसहित । माझें पूजन करुन विधियुक्त । भोजन करावे रात्रीं समयांत । वरानने मज तोषवाया ॥४१॥
श्रावणांत लाडू भक्षण करावे । भाद्रपदांत दहिभात भोजन घ्यावें । आश्विनांत निर्जल करावें । संकष्टीचें व्रत सदा ॥४२॥
कार्तिकांत दुग्धपान करावें । मार्ग शीर्षांत जल पिऊन रहावें । पौषमासी गोमूत्र सेवन करावें । माघमासांत खावे तीळ पांढरे ॥४३॥
फाल्गुनांत घृत शर्करा सेवन । चैत्रांत पंचगव्याचें प्राशन । वैशाखीं कमलबीज भक्षण । ज्येष्ठांत सेवावें गोघृत ॥४४॥
आषाढांत मधु भोजन । यति जनासी हे सर्वदा बंधन । अन्यांनी करावें भोजन । ऐशा प्रकारें अन्य रीती वा ॥४५॥
याम मात्र रात्र अवशेष असत । तेव्हां प्रातःकाळीं उठावें भक्तियुक्त । माध्यान्ह कर्म प्रातःकालांत । करावें गणेशभक्तानें ॥४६॥
चार घटका रात्रींत । सूर्योदय तो प्रकीर्तित । ऐशा रीती कर्मादिक करित । अन्य मंत्रें पूजी मज ॥४७॥
प्रत्यक्ष उदय काळीं आचरावें । सूर्याचें उपस्थान बरवें । नंतर चंद्रोदयापर्यंत करावें । जपादि व्रत शमीखालीं ॥४८॥
मौन ठेवून अनुष्ठान । करावें नंतर विधियुक्त स्नान । माध्याह्र कालीं कर्म करुन । विधिपूर्वक मज पूजावें ॥४९॥
नंतर करावें अर्घ्य दान । प्रथम चतुर्थी तुझा मान । नंतर अर्घ्य मज निवेदन । तदनंतर सात अर्घ्य चंद्रासी ॥५०॥
ब्राह्मणांचे करुन पूजन । नंतर करावें भोजन । मोदक,अपूप,लाडू,खीर, आदि अन्न । सेवन करावें प्रसादरुप ॥५१॥
रात्रीं जागरण करावें । माझ्या कथांचें मनन करावें । पंचमी तिथीस सर्वोपचारें । पूजा करावी प्रयत्नें ॥५२॥
ऐसें व्रत जो नर आचरित । सर्वार्थ सिद्धि त्यास प्राप्त । देवांसही तो मान्य होत । अंतीं ब्रह्मांत लय पावे ॥५३॥
जैसा मी देवादींत आदि पूज्य असत । तैसी तूं आदि पूज्या व्रतांत । शुक्ल, कृष्ण चतुर्थी व्रत । जे करिती ते सफळ होती ॥५४॥
सर्व कार्यात सिद्धि लाभत । ऐशा त्या दृढभक्तांस जगांत । ऐसें बोलून अंतर्हित । जाहला गणेश ब्रह्मनायक ॥५५॥
चतुर्थी तिथी भक्तिसंयुक्त । तेथेंचि राहिली मनन करित । हृदयीं आपुल्या आठवित । गणेशाचे बोल सुखद ॥५६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते शुक्ल कृष्ण चतुर्थीवरदानवर्णन द्वितीयोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP