मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय १८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । नरनारायण पुढें सांगतो । वर्णाश्रमांची महती । ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जगतीं । शूद्र हे चार वर्ण ॥१॥
ब्रह्मचर्य गार्हस्थ असत । वानप्रथ संन्यास आश्रम वेदोक्त । ब्राह्मणांसी चार आश्रय संमत । क्षत्रिय वैश्यांसी संन्यास नसे ॥२॥
शूद्रांसीं गार्हस्थ हाच आश्रम । अंत्यजांसी तोच परम । जाणावें विबुधीं वेदवचन । सर्वकाळ प्राचीन हें ॥३॥
ब्राह्मण कुळांत जन्मत । पाचव्या सातव्या आठव्या वर्षांत । मौजीबंधन होत जात । गुरुसन्निध कृतोपवीती ॥४॥
तेथ होऊन विनयान्वित । वेदादिक सर्व अभ्यासित । ब्रह्मचर्यव्रतें राहत । सायंप्रातर्भिक्षी मागे ॥५॥
गायत्रीचा जप करित । प्रातःकाळीं ब्रह्मरुप जी असत । मध्यान्हीं रुद्ररुप घेत । सायंकाळी विष्णुरुप ॥६॥
भूर्भुवस्वः म्हणून । करावें नियमपूर्ण आचमन । स्वाहा अन्तीं म्हणून । इंद्रियन्यासादी करावे ॥७॥
तर्जनी आदी अंगुलींनी मुख स्पर्श । तर्जनी अंगुष्ठानें नासिका स्पर्श । अंगुष्ठ अनामिकेनें चक्षुस्पर्श । कनिष्ठिकेनें कर्ण स्पर्श ॥८॥
दोन अंगुष्ठांनी स्पर्श नाभीस । करतलें तैसा हृदयास । सर्व अंगुलींनी भरुमध्यास । अंगुष्ठाग्रें शिखा स्पर्श ॥९॥
सर्वांगुलीनीं बाहूस । स्पर्श करोनी करावे न्यास । आपापल्या शाखोक्त नामास । उच्चारुन आचम्न करावें ॥१०॥
वैदिक मंत्रें संध्या करुन । प्रणवादींचें न्यास उच्चारुन । व्याहृती षडंग अक्षर उद्‌भव म्हणून । करावे न्यास गायत्रीचे ॥११॥
नंतर आचमन करावें । सूर्यश्च इति मंत्रे प्रातःकाली बरवें । आप पुनन्तु मध्यान्हीं म्हणावे । सायंकाळीं अग्निश्च आदि मंत्र ॥१२॥
नंतर करावें मार्जन । एकोणतीस वेळां मोजून । तदनंतर अर्ध्यदान । उपस्थानादि आचरावें ॥१३॥
गायत्रीचा शापमोक्ष उच्चारुन । तदनंतर ध्यान जप पावन । पंचकाल शतसंख्या प्रमाण । ब्रह्मचारी असे त्यानें ॥१४॥
गायत्रीचा जप अष्टोतर शत । गृहस्थें करावा एकाग्र चित्त । त्या समयीं रहावें मौन व्रत । ऐसा नियम शास्त्रांत असे ॥१५॥
वानप्रस्थें एक सहस्त्र जप करावा । त्रिकाळ संघ्येचा नियम राखावा । ब्राह्मणांनी धर्म पाळावा । गायत्री जपांत क्रम राखून ॥१६॥
त्रिपदा गायत्री ओंकार संयुत । जपावी तिचा क्रम सांगत । प्रथम प्रणव उच्चारुन पुनित । नंतर म्हणाव्या व्याहृती ॥१७॥
भूर्भुवः स्वः हया व्याहृती । तदनंतर प्रणवाची उक्ती । हयानंतर गायत्री म्हणती । ओंकार उचारती पुनरपि ॥१८॥
संन्यासी जनांनी जप करावा । चतुष्पाद गायत्रीचा आश्रय घ्यावा । आपापल्या आश्रमीचा पाळावा । श्रुतिधर्म प्रत्येकानें ॥१९॥
ब्रह्मचारी भिक्षा मागत । स्वगोत्रादि गृहस्थांच्या घरांत । विधानपूर्वक गुरुस समर्पित । जी जी भिक्षा जमविली ती ॥२०॥
व्रती विप्र भिक्षा मागत । तेव्हां भवत्‍ शब्द प्रथम उच्चारित । क्षत्रिय उच्चारिती मध्यांत । भवत्‍ शब्द वैश्य अंतीं म्हणे ॥२१॥
जरी संपूर्ण भिक्षा गुरु घेत । तरी उपवास करावा श्रद्धायुक्त । ब्रह्मचार्‍यांचें ऐसें व्रत । गुरु देईल तेवढें खावें ॥२२॥
स्वल्प अथवा परिपूर्ण देत । भिक्षा जरी गुरु शिष्यास परत । तरी ती स्वीकारावी भक्तियुक्त । विनीतभावें शिष्यानें ॥२३॥
पालाश दंड संयुक्त । सायंप्रातः अग्निव्रत । समिधांची आहुती यज्ञांत । विधिपूर्वक त्यानें द्यावी ॥२४॥
नखें केस न कापावे । धार्मिक नियम पाळावे । गुरुसी दैवत मानावें । सर्व भावें शिष्यानें ॥२५॥
गुरुच्यां स्त्री पुत्रासी सेवित । गुरुसमान त्यास मानत । ऐशा शिष्यें एकांतात । गुरु पत्नीसह न रहावें ॥२६॥
स्त्रियांशी संभाषण न करावें । स्त्रियांचे गायनादी न ऐकावें । आपल्या वीर्यासी जपावें । ब्रह्मचार्‍यानें विशेषें ॥२७॥
जरी स्वप्नांत वीर्यस्खलन । झालें तर करावें स्नान । एकशे आठ गायत्री जपून । प्रायःचित्त करावें ॥२८॥
गुरुनें जें जें शिकविलें । त्याचें अध्ययन पाहिजे केलें । विद्या परायणें शिष्य पाहिजे राखिले । मौन गुरुच्या पुढयांत ॥२९॥
ऐसा नानाविध लक्षणेंयुत । ब्रह्मचारी वेदाध्ययनीं रत । बारा अथवा सोळा वर्षात । अध्ययन पूर्ण करावें ॥३०॥।
अथवा इच्छेप्रमाणें आचरत । ब्रह्मचर्यव्रत निष्ठावंत । वेदादि कंठस्थ करित । तदनंतर देई गुरु दक्षिणा ॥३१॥
जरी मन असेल विषयसंयुक्त । तरी तो गृहस्थाश्रम स्वीकारित । अन्यथा जात वनांत । संन्यासव्रता घेऊन ॥३२॥
अन्यथा सदा ब्रह्मचर्यांत । द्विजोत्तम राही जगांत । जैसी ज्याची चित्तशुद्धी असत । तैसे त्यानें आचरावें ॥३३॥
जें जें केलें अध्ययन । जगतीं योगादिक ज्ञान । तें तें आचरणांत आणून । धर्म नियम पाळावे ॥३४॥
ऐसें हें ब्रह्मचर्य व्रत संक्षेपांत । महामुने सांगितलें तुजप्रत । तें ऐकतां पुण्यप्रद होत । लोकोपकारी सर्वदा ॥३५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खंडे महोदरचरिते ब्रह्मचर्याश्रमवर्णनं नामाष्टादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP